ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रश्न : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?

श्रीमाताजी : मुक्तता आणि प्रारब्ध, स्वातंत्र्य आणि निश्चयवाद ह्या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.

चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नाही, तर ती खूप जटिल आहे; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नाही तर ती बहुआयामी आहे. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ आहे तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ आहे आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या अगणित पातळ्या आहेत, स्तर आहेत.

जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या पातळीवर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता तुम्ही कर्मबंधांनी बांधलेले असता, आणि तेथे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या ज्या वैश्विक घडामोडी चालतात त्यांचा तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, तिच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.

पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या जणू एखाद्या दांड्याचाच तुम्ही ताबा घेऊ शकता. एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की तुम्ही मुक्त आहात.

तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त होता; तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नाही, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदल सुद्धा घडवून आणू शकता.

एकदा का तुम्ही ह्या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या प्रतलावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहलीप्रमाणे हालचाल करणारे उरत नाही तर ती सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.

प्रकृतीच्या यांत्रिक रहाटगाडग्यामधून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे बाहेर पडून; तुम्ही, उच्चतर नियतीचे कामकाज जेथे चालू असते त्या एका निराळ्या चेतनेच्या प्रतलावरील जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 29-31)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

15 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago