श्रीमाताजी : हे जग म्हणजे संघर्ष, दुःखभोग, अडीअडचणी, ताणतणाव यांचे जग आहे; या सर्व गोष्टींनीच ते बनलेले आहे. ते अजूनपर्यंत बदललेले नाही; त्याला बदलायला अजून काही काळ जावा लागेल. आणि त्यामधून बाहेर पडण्याची एक शक्यता प्रत्येकापाशी असते. तुम्ही ‘परमेश्वरी कृपे’च्या उपस्थितीचा आश्रय घेतलात तर बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे.
प्रश्न : मग, आता आम्ही काय केले पाहिजे?
श्रीमाताजी : तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहात. पण मानवी प्रशंसेची अपेक्षा बाळगू नका, कारण एखाद्या गोष्टीची प्रशंसा कशाच्या आधारावर करायची हेच माणसांना माहीत नसते आणि त्यातही, जेव्हा त्यांना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही आढळते, तेव्हा त्यांना ते आवडत नाही.
प्रश्न : पण मग यासाठी ताकद कुठून मिळवायची?
श्रीमाताजी : तुमच्याच अंतरंगामधून! तुमच्यामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’ आहे, ती तुमच्यामध्येच असते. मात्र तुम्ही तिचा शोध बाहेर घेता, आत पाहा. ती तुमच्यामध्येच आहे. त्याची उपस्थिती तेथे आहेच. तुम्हाला सामर्थ्य मिळावे, ताकद मिळावी म्हणून इतरांनी तुमची प्रशंसा करावी, अशी तुमची अपेक्षा असते; पण तशी प्रशंसा तुम्हाला कधीही लाभणार नाही. ती ताकद तुमच्या स्वतःच्या अंतरंगातच आहे. तुमची जर इच्छा असेलच तर, तुम्हाला परमोच्च ध्येय, परमोच्च प्रकाश, परमश्रेष्ठ ज्ञान, परमप्रेम असे जे जे काही भासते त्याची तुम्ही आस बाळगू शकता – अन्यथा तुम्ही त्यांच्याशी कधीच संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर तुमच्या अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर तुम्हाला त्या गोष्टी तेथे आढळतील; तेथे सरळ वर जाणारी एक ज्योत तेवत असलेली तुम्हाला आढळेल.
आणि ही गोष्ट करणे फार अवघड आहे असे समजू नका. ती तशी अवघड वाटते याचे कारण दृष्टी ही कायमच बहिर्मुख असते आणि म्हणून तुम्हाला ईश्वराची उपस्थिती जाणवत नाही. पण, आधार शोधण्यासाठी कोठेतरी बाहेर पाहण्यापेक्षा, तुम्ही जर एकाग्र झालात आणि प्रार्थना केलीत – त्या परमश्रेष्ठ ज्ञानाप्रत आतून प्रार्थना केलीत – प्रत्येक क्षणी काय केले पाहिजे हे जाणण्यासाठी, ते करण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रार्थना केलीत आणि पूर्णत्व प्राप्त करून घेण्याच्या हेतुने तुम्ही जे जे काही करता त्या साऱ्या गोष्टी आणि तुमचे सर्वस्व प्रदान केलेत तर, तुम्हाला तो आधार तुमच्या अंतरंगामध्येच असल्याचे, तो सदासर्वदा तुम्हाला मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल. आणि जर का काही अडचण उद्भवली तर, झगडा करत बसण्याची इच्छा बाळगण्यापेक्षा, त्या परमश्रेष्ठ प्रज्ञेनेच ती अडचण सोडवावी म्हणून तुम्ही ती अडचण त्या प्रज्ञेकडे सोपवा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात तर, मग तो तुमच्या काळजीचा विषय राहत नाही. तर तो ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, त्याने ती अडचण स्वतःकडे घेतलेली असते आणि त्या अडचणीबाबतीत काय केले पाहिजे हे कोणाहीपेक्षा अधिक चांगल्या रीतीने त्याला कळत असते. हा एकमेव मार्ग आहे, हाच एकमेव मार्ग आहे.
– श्रीमाताजी
(CWM 15 : 399-400)