Tag Archive for: व्यावहारिक जीवन

धीर धरा ! उगवता सूर्य दररोज प्रात:काळी आपल्या पहिल्यावहिल्या किरणांच्या द्वारे जी शिकवण, जो संदेश या पृथ्वीतलावर प्रक्षेपित करतो आहे, तो ऐका; तो आशेचा आणि दिलासादायक संदेश आहे. जे रडत आहेत, जे दु:खभोग सहन करत आहेत, जे भयकंपित झाले आहेत, ज्यांना दु:खवेदनांचा अंतच दिसत नाही असे तुम्ही सारे, धीर धरा !

अशी कोणतीच निशा नाही जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी अरुणोदय होतो. सूर्यप्रकाशाने भेदले जाणार नाही असे कोणतेच धुके नसते आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनी ज्याची कड सोनेरी होत नाही असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रू आहे की जो कधीच सुकणार नाही? असे कोणते तुफान आहे की ज्याच्या शेवटी विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनी चमकणार नाही? सूर्यप्रकाशाने वितळणार नाही असे बर्फ कुठे आहे का?

– श्रीमाताजी
(CWM 02:44)

सर्वकाही सर्वांचे आहे. ‘एखादी गोष्ट माझी आहे’ असे म्हणणे वा तसा विचार करणे म्हणजे विलगता निर्माण करण्यासारखे आहे, विभाजन करण्यासारखे आहे, असे विभाजन खरोखर वास्तवातच नाहीये.

सर्वकाही सर्वांचे आहे, आपण ज्यापासून बनलो आहोत ते मूलद्रव्य देखील सर्वांचे आहे. क्रमश: होत जाणाऱ्या वाटचालीमधील एका टप्प्यावर, ज्या अणुरेणूंच्या समुदायापासून आपली संरचना झालेली आहे, आणि ज्यांच्यापासून उद्या दुसरीच संरचना तयार होणार आहे, ते अणुरेणू, ते मूलद्रव्यसुद्धा सर्वांचे आहे.

“एखादी कल्पना ही माझी आहे” असे जे म्हणतात आणि इतरांना त्याचा लाभ घेऊ देण्याची परवानगी देणे म्हणजे आपण फार मोठा परोपकार करत आहेत असा ज्यांचा विचार असतो, ते मूर्ख असतात. कल्पनांचे हे विश्वही सर्वांचे आहे आणि बौद्धिक शक्ती हीदेखील वैश्विक शक्ती आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 103)

(भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना ऑगस्ट १९४७ रोजी, ‘महायोगी श्रीअरविंद’ यांनी दिलेल्या संदेशातील हा अंशभाग – त्याला आजही समकालीन संदर्भ आणि मूल्य आहे…)

….भारताने पूर्ण सामर्थ्यानिशी आणि क्षमतेनिशी आपली भूमिका पार पाडायला सुरुवात केली आहे; आणि त्यातून भारताच्या अंगी असणाऱ्या संभाव्यतेच्या मोजमापाचा आणि राष्ट्रसमूहांच्या समितीमध्ये तो जे स्थान प्राप्त करून घेईल त्याचा निर्देश होत आहे.

समग्र मानवजात आज एकात्म होण्याच्या मार्गावर आहे. तिची ही वाटचाल सदोषपूर्ण अशी, अगदी प्रारंभिक अवस्था ह्या स्वरूपात असली तरी, असंख्य अडचणींशी झगडा देत, परंतु सुसंघटितपणे तिची वाटचाल चालू आहे. आणि त्याला चालना मिळालेली दिसत आहे आणि इतिहासाचा अनुभव गाठीशी धरला, त्याला मार्गदर्शक केले तर विजय प्राप्त होत नाही तोवर ती गती अगदी अनिवार्यपणे वाढवत नेली पाहिजे.

अगदी येथेसुद्धा भारताने त्याची महत्त्वाची भूमिका बजावयाला सुरुवात केली आहे, आणि केवळ सद्यकालीन तथ्यं आणि नजीकच्या शक्यता एवढ्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता भारत जर, भविष्याचा वेध घेऊ शकला आणि ते भविष्य निकट आणू शकला तर आणि एक व्यापक मुत्सद्देगिरी विकसित करू शकला तर मग, स्वत:च्या निव्वळ अस्तित्वानेही भारत, मंदगती व भित्रे तसेच धाडसी व वेगवान प्रगती करणारे यांच्यामध्येसुद्धा फरक घडवून आणू शकेल.

यामध्ये एखादे अरिष्टसुद्धा येऊ शकते, हस्तक्षेप करू शकते वा जे काही घडविण्यात आलेले आहे त्याचा विध्वंसही करू शकते, असे घडले तरीसुद्धा अंतिम परिणामाची निश्चित खात्री आहे…

कोणत्याही परिस्थितीमध्ये, एकत्रीकरण ही प्रकृतीच्या विकासाची एक आवश्यकता आहे, एक अपरिहार्य अशी हालचाल आहे आणि त्याच्या परिणामाविषयी, साध्याविषयी सुरक्षित भाकीत करता येणे शक्य आहे. एकत्रीकरणाची राष्ट्रांसाठी असलेली आवश्यकता पुरेशी स्पष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय ह्यापुढील काळात छोट्या समूहांचे स्वातंत्र्य कधीच सुरक्षित राहू शकणार नाही आणि अगदी मोठी, शक्तिशाली राष्ट्रदेखील अबाधित राहू शकणार नाहीत. भारत, जर असा विभागलेलाच राहिला तर त्याला त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येणार नाही. आणि म्हणूनच सर्वांच्या हितासाठी सुद्धा हे एकीकरण घडून यावयास हवे. केवळ मानवी अल्पमती आणि मूर्ख स्वार्थीपणाच ह्याला आडकाठी करेल.

एक आंतरराष्ट्रीय वृत्ती आणि दृष्टिकोन वाढीला लागावयास हवा; आंतरराष्ट्रीय रचना, संस्था ह्या वाढीस लागावयास हव्यात, राष्ट्रीयत्व तेव्हा स्वत:च परिपूर्ण झालेले असेल; अगदी दुहेरी नागरिकत्व किंवा बहुराष्ट्रीय नागरिकत्वासारख्या घडामोडीदेखील घडून येतील. या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये संस्कृतींचा ऐच्छिक संगमदेखील दिसू लागेल आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधील आक्रमकता नाहीशी झाल्याने, ह्या साऱ्या गोष्टी या एकात्मतेच्या स्वत:च्या विचारसरणीशी अगदी पूर्णत: मिळत्याजुळत्या आहेत, असे आढळून येईल. एकतेची ही नवी चेतना संपूर्ण मानवी वंशाचा ताबा घेईल.

ह्या विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीकडेच नाही तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचा ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत. उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी ह्या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ईश्वरी इच्छा तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच.

येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणिवेतूनच उदयास यावयास हवे, यामध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे, त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल किंवा नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 474-477)

व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावायचे हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाबरोबर तरी आहात. ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून, हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हां, जर तुम्ही भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी जर तुम्ही स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहाते आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेते. हो, तो मला तसे का म्हणाला?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही तिथेच प्रयत्न करत थांबून राहता. दुसरा माणूस बोलतच असतो – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणत आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि थोडी कल्पना करा, तो तुमच्याशी तसा का बोलत आहे ह्याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला पूर्वज्ञात असलेल्या कल्पनेच्या बरोबरीने ही आत्ताच समजलेली कल्पना शेजारी शेजारी ठेवलीत तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोहोंना एकवटणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

जर तुम्ही एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्याने, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे काही घडणार नाही. उलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे मांडू शकाल.. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)

प्रश्न : “जेव्हा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तेव्हा तिने स्वत:ला विशाल, व्यापक करावे,” ह्याचा अर्थ कसा लावावा?

श्रीमाताजी : मी येथे योगमार्गावरील अडचणींविषयी बोलत आहे; आकलन करून घेण्यातल्या अडचणी, मर्यादा, अडथळ्यांसारख्या. मला म्हणावयाचे असते की तुमच्या जाणिवेच्या कक्षा विशाल करा.

अडचणी या नेहमीच अहंकारामधून उद्भवतात. म्हणजे तुम्ही परिस्थितीला, घटनांना, तुमच्या अवतीभवतीच्या माणसांना, किंवा तुमच्या जीवनातील स्थितीला ज्या कमीअधिक अहंजन्य वैयक्तिक प्रतिक्रिया देता, त्यामधून अडचणी उद्भवतात. तुमच्याहून अधिक उन्नत आणि अधिक विशाल अशा वास्तवाशी एकात्म होण्यापासून जेव्हा तुमची जाणीव तुम्हाला रोखते, म्हणजे जेव्हा व्यक्ती एक प्रकारच्या कवचामध्ये, कोशामध्ये जखडून पडल्यासारखी होते तेव्हा त्या भावनेतूनदेखील अडचणी उद्भवतात.

व्यक्ती नक्कीच असा विचार करू शकते की, तिला विशाल व्हावयाचे आहे; तिला विश्वात्मक व्हावयाचे आहे, तिच्यामध्ये अहंकार असता कामा नये; सर्व काही त्या ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे, अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टींचा व्यक्ती विचार करू शकते पण हा काही खात्रीशीर उपाय नाही कारण बऱ्याचदा व्यक्तीला तिने काय करावे हे माहीत असते पण या ना त्या कारणामुळे ती ते करत नाही.

पण समजा जर का तुम्हाला क्लेश झाले, दुःखभोग, उद्रेक, वेदना किंवा अगतिकतेची भावना या साऱ्यांना सामोरे जावेच लागले – या मार्गामध्ये आड येणाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुमच्या अडचणी आहेत – अशा वेळी जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या म्हणजे, तुमच्या शारीर जाणिवेने स्वत:ला व्यापक करू शकलात, जर तुम्ही स्वत:ला उलगडू शकलात – एखादा कापडाचा तागा असावा आणि घड्यांवर घड्या याप्रमाणे तो बांधलेला असावा त्याप्रमाणे तुम्ही त्या तशा घड्यांमध्ये बंदिस्त झाला आहात अशी तुम्हाला जाणीव झाली तर – तेव्हा तुम्हाला जर बांधल्याप्रमाणे, घुसमटल्याप्रमाणे वाटत असेल, तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा तुमच्या हालचाली नि:शक्त होऊन जात असतील; एखादा कापडाचा खूप घटट् बांधलेला तागा असावा; एखादे खूप घट्ट, चापूनचोपून बांधलेले गाठोडे असावे अशी तुम्हाला जाणीव होत असेल तर जमिनीवर एखादा कागदाचा वा कापडाचा तुकडा उलगडावा तसे तुम्ही स्वत:वरील घड्या, सुरकुत्या दूर करू शकलात, स्वत:ला दोन्ही बाहू फैलावून ताणू शकलात, आणि जमिनीवर पडून स्वत:ला विशाल, जेवढे शक्य आहे तेवढे विशाल बनविण्याचा प्रयत्न केलात; स्वत:ला खुले करून, ज्याला मी ‘प्रकाशाचे मुख’ म्हणते त्या प्रति पूर्ण निष्क्रियपणाचा भाव राखत, खुले करू शकलात आणि स्वत:च्या अडीअडचणींमध्ये स्वत:ला परत लपेटून घेतले नाहीत, आणि त्या दुप्पट केल्या नाहीत, म्हणजेच त्यामध्ये अडकून पडला नाहीत, म्हणजे स्वत:मध्येच गुंतून पडला नाहीत तर; एवढेच नाही तर, शक्य तितके स्वत:ला उलगडविण्याचा प्रयत्न केलात, तुमची अडचण वरून येणाऱ्या त्या प्रकाशासमोर मांडलीत तर, आणि जर का तुम्ही हे सर्व क्षेत्रांमध्ये करू शकलात, आणि अगदी तुम्ही मानसिकरित्या हे करण्यामध्ये जरी यशस्वी झाला नाहीत तरी – कारण ते बऱ्याचदा अवघड असते – तुम्ही शारीरिकदृष्ट्या, अगदी भौतिक अर्थाने देखील जरी तुम्ही तशी कल्पना करू शकलात, तर जेव्हा तुम्ही स्वत:ला खुले करण्याचे, स्वत:ला ताणण्याचे, पसरविण्याचे काम पूर्ण करता तेव्हा तुमच्या अडचणींपैकी तीनचतुर्थांश अडचणी पळून गेल्या असल्याचे तुम्हाला आढळेल.

आणि त्यानंतर त्या प्रकाशाप्रत स्वत:ला ग्रहणशील बनविण्याचे शिल्लक राहिलेले थोडेसे काम पूर्ण केले की तो एक चतुर्थांश भाग देखील नाहीसा होऊन जाईल.

स्वत:च्या अडीअडचणींशी स्वत:च्या विचारांच्या साहाय्याने झगडत राहण्यापेक्षा हे कितीतरी अधिक पटीने सोपे आहे कारण जर तुम्ही स्वत:शीच चर्चा करू लागलात तर, तुमच्या मताच्या बाजूने आणि विरोधी बाजूनेसुद्धा तुम्हाला पुष्कळ युक्तिवाद आढळतील आणि ते इतके पटण्यासारखे असतील की, उच्चतर प्रकाशाशिवाय त्यांमधून बाहेर पडणेच अशक्य होऊन जाईल.

येथे तुम्ही अडीअडचणीच्या विरोधात झगडत नाही, तुम्ही स्वत:ला पटवून देण्याचा प्रयत्नही करत नाही. सूर्यासमोर सागरकिनारी वाळूमध्ये पडून राहावे त्याप्रमाणे तुम्ही केवळ स्वत:ला प्रकाशाप्रत खुले करता आणि त्या प्रकाशाला तुमच्या मध्ये कार्य करू देता, बस् इतकेच.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 285-287)

ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झाला आहे वा तुमची घडण झाली आहे त्याचे खरे मूल्य तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल, किंवा ज्या समाजात वा ज्या देशात तुमचा जन्म झाला आहे त्याविषयी, यथार्थदर्शी चित्र तुम्हाला हवे असेल, किंवा ज्या विशिष्ट वातावरणात तुम्ही फेकले गेला आहात आणि जेथे तुम्ही स्वत:ला जखडून घेतले आहे, ती गोष्ट किती सापेक्ष आहे, हे तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल तर, तुम्ही देशाटन करा. तेव्हा तुम्हाला आढळेल की, ज्याला तुम्ही चांगले समजता ते इतरत्र वाईट मानले जाते आणि ज्याला एका प्रांतात वाईट मानले जाते त्याचेच दुसऱ्या प्रांतात स्वागत केले जाते.

सर्व देश आणि धर्म यांची निर्मिती ही अनेक परंपरांच्या समूहांपासून झालेली आहे. सर्वच ठिकाणी तुम्हाला संतमहात्मे, शूरवीर, महान व्यक्तिमत्त्वे पाहायला मिळतात आणि त्याबरोबरच अगदी क्षुद्र, दुष्ट माणसंदेखील आढळतात. ”माझी अमुक एका धर्मामध्ये घडण झाली आहे त्यामुळे तोच खरा धर्म होय; मी अमुक एका देशामध्ये जन्माला आलो आहे त्यामुळे, माझाच देश सर्व देशांमध्ये चांगला आहे’ असे म्हणणे ही केवढी मोठी थट्टा आहे हे तुम्हाला जाणवेल. व्यक्ती आपल्या कुटुंबाविषयी देखील असाच दावा करू शकते : “अमुक एका देशामध्ये, अमुक एका ठिकाणी, शतकानुशतके राहत असलेल्या एका कुटुंबातून मी आलो आहे म्हणून त्याच्या परंपरा मला बंधनकारक आहेत, त्याच केवळ आदर्शवत आहेत.”

गोष्टी जेव्हा तुमच्यावर लादलेल्या नसतात, जेव्हा तुम्ही त्या स्वेच्छेने प्राप्त करून घेता, तेव्हाच त्या गोष्टींना तुमच्यासाठी आंतरिक मूल्य प्राप्त होते आणि तुमच्यासाठी त्या यथार्थ ठरतात. जर तुम्हाला तुमच्या खऱ्या धर्माविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या देशाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या कुटुंबाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, त्याचीसुद्धा तुम्ही निवड केली पाहिजे.

केवळ दैवयोगाने तुम्हाला जे देण्यात आले आहे, ते कोणताही प्रश्न न विचारता, जसेच्या तसे तुम्ही स्वीकारलेत तर, तुमच्यासाठी ते चांगले आहे का वाईट, तुमच्या जीवनासाठी ते योग्य आहे का नाही, ह्याची तुम्ही कधीच खात्री देऊ शकणार नाही.

ज्या कोणत्या गोष्टींमुळे तुमचे स्वाभाविक वातावरण घडते किंवा तुमची तथाकथित वंशपरंपरा निर्माण होते आणि निसर्गाच्या आंधळ्या यांत्रिक प्रक्रियेद्वारे हे वातावरण व ही वंशपरंपरा तुमच्यावर लादण्यात येते, त्या साऱ्या गोष्टींपासून दोन पावले मागे सरा; स्वत:च्या अंतरंगामध्ये शिरा आणि तेथून सर्व गोष्टींकडे शांतपणे आणि निरासक्तपणे पाहा. त्यांचे मूल्यमापन करा, मग स्वेच्छेने त्यांची निवड करा. मग तेव्हा तुम्ही आंतरिक सत्यानिशी म्हणू शकाल, ”हे माझे कुटुंब आहे, हा माझा देश आहे, हा माझा धर्म आहे.”

– श्रीमाताजी
(CWM 03 : 80-81)

धार्मिक मते आणि धार्मिक सिद्धान्त ह्या मनोनिर्मित गोष्टी असतात आणि जर तुम्ही त्यालाच चिकटून राहिलात आणि तुमच्यासाठी बनविलेल्या जीवनविषयक कायद्यांच्या चौकटीत स्वत:ला बंदिस्त करून घेतलेत तर या नियमांच्या, धर्मसिद्धान्तांच्या पलीकडे असलेल्या, व्यापक, महान, मुक्त अशा चैत्यनाचे सत्य तुम्हाला गवसू शकणार नाही. विश्वातील एकमेव सत्य असे गृहीत धरून, जेव्हा तुम्ही एखाद्या धार्मिक संप्रदायापाशीच थांबता, त्याच्याशी स्वत:ला जखडून घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात्म्याच्या विस्ताराची आणि विकासाची प्रक्रिया गमावून बसता.

पण जर तुम्ही धर्माकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, धर्म नेहमीच सगळ्या माणसांना अडथळा ठरतो असे नाही. मानवाचे उच्चतर कार्य, ह्या दृष्टीने जर तुम्ही त्याकडे पाहिलेत आणि मानवनिर्मित गोष्टींच्या अपूर्णतांकडे दुर्लक्ष न करता, त्याकडे मानवाची आकांक्षा म्हणून पाहिलेत तर आध्यात्मिक जीवनाकडे वळण्यासाठी धर्माचे तुम्हाला एकप्रकारे साहाय्यदेखील होऊ शकते.

धर्माकडे गंभीरतेने आणि उत्कट भावनेने पाहिले तर, त्यामधील सत्य काय आहे हे तुम्ही शोधून काढू शकता; त्यामध्ये कोणती आकांक्षा, अभीप्सा सुप्तपणे वसलेली आहे; कोणत्या दैवी प्रेरणेमध्ये, मानवी मन आणि मानवप्रणालीमुळे बदल होत आहेत, आणि कशाचे विरूपीकरण होत आहे हे तुम्हाला कळू शकते. योग्य अशा मानसिक भूमिकेतून बघितल्यास, धर्म त्याच्या आहे त्या स्थितीतदेखील तुमच्या मार्गावर काही प्रकाश टाकू शकतो आणि तुमच्या आध्यात्मिक प्रयासांना साहाय्य पुरवू शकतो.

प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला असे लोक आढळतात की, ज्यांची भावनिक क्षमता खूप मोठी असते आणि ते खरीखुरी, तळमळीची अभीप्सा बाळगत असतात, पण त्यांचे मन अगदी साधेसुधे असते आणि त्यांना ईश्वराकडे ज्ञानाच्या माध्यमातून जाण्याची गरज भासत नाही; अशा लोकांसाठी धर्माचा उपयोग होतो आणि त्यांच्यासाठी त्याची गरजदेखील असते. कारण बाह्य रूपांच्याद्वारा, उदाहरणार्थ चर्चमधील समारंभ इ. द्वारे त्यांच्या आंतरिक आध्यात्मिक आकांक्षेला एक प्रकारचे साहाय्य मिळते.

प्रत्येक धर्मामध्ये उच्च आध्यात्मिक जीवन ज्यांच्यामध्ये उदित झाले आहे अशा काही व्यक्ती असतात परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की, त्यांच्या धर्माने ही आध्यात्मिकता त्यांना प्रदान केलेली असते, उलट त्यांनीच त्यांच्या आध्यात्मिकतेद्वारे धर्मामध्ये भर घातलेली असते. अशा व्यक्तींना कोठेही ठेवले असते, त्यांचा जन्म कोणत्याही संप्रदायामध्ये झाला असता, तरी त्यांनी तेथेही अशाच आध्यात्मिक जीवनाचा शोध घेतला असता आणि असेच आध्यात्मिक जीवन व्यतीत केले असते. ती त्यांची स्वत:ची क्षमता असते, त्यांच्या अंतरात्म्याची ती एक प्रकारची शक्ती असते; मात्र त्यांची अशी जडणघडण धर्मामुळेच झाली आहे असा दावा धर्म करत असतो; पण वस्तुस्थिती मात्र तशी नसते. त्यांच्या प्रकृतीमधील या शक्तीमुळेच धर्म हा त्यांच्यासाठी गुलामी वा बंधन बनत नाही. एवढेच की, त्यांच्याकडे शक्तिशाली, सुस्पष्ट आणि सक्रिय मन नसल्यामुळे, त्यांना ह्या वा त्या संप्रदायाला निरपवाद सत्य म्हणून मानण्याची आणि कोणतेही विरोधी प्रश्न वा शंका मनात उठू न देता, स्वत:ला एखाद्या संप्रदायाला नि:शेषतया समर्पित करण्याची आवश्यकता भासते. मला प्रत्येक धर्मामध्ये अशा प्रकारची माणसे भेटलेली आहेत. आणि अशा लोकांच्या श्रद्धेला धक्का लावणे हा गुन्हा आहे. त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा नसतो.

परंतु जे याहूनही पुढे जाऊ शकतात, चैतन्याच्या मार्गावर जे एका विशिष्ट अंतरापर्यंत वाटचाल करू शकतात, त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा ठरतो, पण जे असे पुढे जाऊ शकत नाहीत त्याच्यांसाठी धर्म हा साहाय्यकारी ठरतो.

उत्तमोत्तम तसेच अगदी निम्न बाबींबाबत देखील धर्माचा आवेग आढळून येतो. एका बाजूला धर्माच्या नावाने तुंबळ युद्ध झाली आहेत आणि अगदी हिडीसपणे जाचदेखील झालेला आहे, पण त्याचबरोबर स्वार्थत्याग आणि सर्वोच्च धैर्यालाही तो पोषक, प्रेरक ठरलेला आहे. कोणत्या उच्चतर कृतींपर्यंत मानवी मन जाऊन पोहोचू शकते ह्याची मर्यादा तत्त्वज्ञानाप्रमाणेच धर्मानेही दाखवून दिली आहे. तुम्ही जर धर्माच्या बाह्य देहाचे गुलाम झालात तर, तुमच्यासाठी तो खोडा वा बेडी बनेल, पण जर तुम्हाला त्यांतील आंतरतत्त्व कसे उपयोगात आणावयाचे हे माहीत असेल तर चैतन्याच्या अधिराज्यामध्ये झेपावण्यासाठी धर्म ही उपयुक्त अशी उड्डाणफळी (jumping-board) बनेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 78-79)

समाजजीवनात धर्माची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते, हे लक्षात येण्याजोगे आहे. उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते. त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो, कधीकधी ह्या धर्माचे उद्दिष्ट अगदी कनिष्ठ प्रकारचे देखील असू शकते….

ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल, मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो शब्दांतदेखील सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी ते एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल. काही लोकांसाठी समाधान ही मोठी गोष्ट असते, तर काही जणांसाठी मौजमजा, चैन ही गोष्ट मोठी असते.

ह्या गोष्टी खरंतर खूप निम्न स्तरावरच्या आहेत आणि त्याला एका ध्येयाचे नाव देण्याची इच्छाही होत नाही, पण त्या गोष्टी धर्माची रूपे आहेत; त्या गोष्टी म्हणजे असे काहीतरी होय की ज्यासाठी व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन खर्ची घालावे असे वाटू शकते…. आधार म्हणून अशा गोष्टींचा वापर करून, अनेक गोष्टी मानवावर आपला प्रभाव टाकण्याची धडपड करीत असतात. माणसांमधील असुरक्षिततेची भावना, अनिश्चिततेची भावना ह्याच गोष्टींचा वापर करून, राजकीय किंवा धार्मिक समूह त्यांच्यावर प्रभाव टाकू पाहतात. ते या भावनांशी खेळू पाहतात. प्रत्येक राजकीय वा सामाजिक संकल्पना ही एखाद्या धर्माच्या मूलभूत आदर्शाची भ्रष्ट अशी अभिव्यक्ती असते. व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा, काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते. पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-356)

सामान्य जीवनामध्ये बुद्धीचे क्षेत्र ज्या परिघापर्यंत आहे तेथवर तर्कबुद्धी मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी जसे म्हटले आहे त्याप्रमाणे, सामान्य मानवी जीवनात प्राणिक आणि मानसिक कृतींवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे हेच तर्कबुद्धीचे खरेखुरे कार्य होय.

उदाहरणार्थ, जर कोणा व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि अशा वेळी जर त्या व्यक्तीने तर्कबुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या तर्कबुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहावयाचा प्रयत्न केला तर, ती व्यक्ती या सर्व गोष्टी परत सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व हालचाली संघटित करणे आणि नियमित करणे हे तर्कबुद्धीचे खरे कार्य होय.

उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत की, त्या एकमेकींच्या विरोधी आहेत; आपल्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत की, ते सिद्धान्त एकमेकांना मारक आहेत हे पाहण्यासाठी आपण तर्कबुद्धीचा आश्रय घेऊ शकतो. सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे आणि त्यापेक्षा देखील अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे, त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, तो आवेग चालवून देण्याजोगा आहे का, हे पाहण्याचे काम तर्कबुद्धीचे आहे. हे तर्कबुद्धीचे खरे कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 166-167)

प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “जर तुमची मने युरोपियन कल्पनांनी भारलेली असतील, जर तुम्ही आपल्या जीवनाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहत असाल, तर वरील ध्येये तुम्ही स्वत:पुढे ठेवू शकणार नाही….

आपल्या पूर्वजांचा वारसा परत मिळवा. आर्य विचार, आर्य प्रणाली, आर्य शील व आर्य जीवन पुन्हा संपादन करा. वेदान्त, गीता, योग ह्या गोष्टी पुनश्च प्राप्त करून घ्या. केवळ बुद्धीने अथवा भावनेने नव्हे, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनात त्या संपादन करा, त्यांचे आचरण करा. म्हणजे तुम्ही थोर, समर्थ, बलाढ्य, अजिंक्य आणि निर्भय व्हाल. जगण्याची किंवा मरणाची भीती तुम्हाला वाटणार नाही. अडचण आणि अशक्य हे शब्द तुमच्या शब्दकोषात राहणार नाहीत. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते, ते शाश्वत असते. बाह्य साम्राज्य मिळविण्यापूर्वी हे तुमचे आत्मसाम्राज्य, आंतरिक स्वराज्य तुम्ही प्रथम परत मिळवा.

तुमचे अंतरंग हे मातृदेवतेचे निवासस्थान आहे. तिने तुम्हाला सामर्थ्य प्रदान करावे म्हणून तुम्ही तिची प्रार्थना करावी यासाठी ती वाट पाहत आहे. तिच्यावर निष्ठा ठेवा, तिची सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा तिच्या इच्छेशी एकरूप करा. तुमचा वेगळा राहिलेला अहं राष्ट्राच्या अहंमध्ये विलीन करून टाका. तुमचा विभक्त स्वार्थ मानवजातीच्या सेवेत विलीन होऊ द्या. तुमच्या अंत:करणातील सर्व सामर्थ्याचा मूळ स्रोत हस्तगत करून घ्या. म्हणजे मग सामाजिक दृढता, बौद्धिक श्रेष्ठत्व, राजकीय स्वातंत्र्य, मानवी विचारांचे स्वामित्व, जगाचे नेतृत्व सर्वकाही तुम्हाला प्रदान केले जाईल”

-श्रीअरविंद
(CWSA 08 : 24-28)