Tag Archive for: व्यावहारिक जीवन

एक वृद्धत्व असे असते की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे असते ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता. ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रग्रल्भ होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध होता; म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा उतरणीचा प्रवास सुरू होतो.

असे काही तरुण असतात, की जे (वर उल्लेख केलेल्या अर्थाने पाहता) वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे (खरे तर) तरुण असतात. तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्योत बाळगलीत; तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, सर्व गोष्टी मागे टाकण्याची तयारी ठेवलीत; तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण राहता. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखायची अशी जर तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू. जे करायचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी [CWM 03 : 238]

जीवन आणि त्यातील अडचणींना धीराने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला साधनेमधील त्याहून खडतर अशा आंतरिक अडचणींमधून पार होणे शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या अग्नीपरीक्षा यांना शांत मनाने, अत्यंत धैर्याने आणि ‘ईश्वरी शक्ती’वरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे, हाच ‘पूर्णयोगा’मधील पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 111]

व्यक्तीच्या अंतरंगात ईश्वरी कृपेविषयी जर अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते. या श्रद्धेच्या साहाय्याने व्यक्ती सर्व अडचणींना सामोरी जाऊ शकते, अशा व्यक्तीला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते.

श्रद्धा अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, दीर्घायू अशी शक्ती असते; …ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि त्यामुळे तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 05 : 297]

समत्वाचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे विविध माणसं, त्यांची प्रकृती, त्यांच्या कृती, त्यांना कृतिप्रवण करणाऱ्या शक्ती ह्या साऱ्यांकडे समदृष्टीने पाहणे. यामुळे, व्यक्तीला त्यांच्याविषयीचे सत्य आकलन होण्यास मदत मिळते कारण(तेव्हा)व्यक्तीची दृष्टी, अंदाज-आडाखे आणि अगदी सारे मानसिक पूर्वग्रह यांच्याबाबतीतल्या सर्व वैयक्तिक भावनाव्यक्तीने मनामधून बाजूला सारलेल्या असतात.

वैयक्तिक भावभावनांमुळे नेहमीच विपर्यास होतो आणि माणसांच्या कृतींकडे पाहताना, त्या कृती पाहण्याचे सोडून, व्यक्ती त्यापाठीमागील गोष्टी पाहू लागते; अशा गोष्टी की, ज्या बहुतांशी तिथे अस्तित्वातच नसतात. ज्या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या अशा गोष्टींमध्ये म्हणजे गैरसमजुती, चुकीचे आडाखे यात त्यांचे पर्यवसान होते. छोटे परिणाम करणाऱ्या गोष्टीही मग विशालकाय रूप धारण करतात. जीवनातील अनिष्ट घटनांपैकी निम्म्यापेक्षा अधिक घटना ह्याच कारणामुळे घडतात, असे मी पाहिले आहे. परंतु सर्वसामान्य आयुष्यात मात्र वैयक्तिक भावभावना, संवदेनशीलता ह्या बाबी मानवी प्रकृतीचा एक नित्याचा भाग असतात आणि त्यांची स्वसंरक्षणासाठी निकड भासू शकते. असे असूनदेखील मला असे वाटते की, अगदी तेथेसुद्धा माणसांकडे आणि सर्व गोष्टींकडे बघण्याचा एक दृढ, विशाल आणि समत्वपूर्ण दृष्टिकोन हा संरक्षणाचा अधिक चांगला मार्ग असू शकतो.

साधकासाठी मात्र, भावभावना, संवेदनशीलता यांवर मात करून, आत्म्याच्या शांत सामर्थ्यामध्ये जीवन व्यतीत करणे, हा त्याच्याप्रगतीचा एक आवश्यक भाग असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 130-131)

कोणतेही कर्म हे शांततेमध्ये नेहमीच सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. काम करण्यासाठीच जर बोलणे आवश्यक असेल तर फक्त त्याचा अपवाद असावा. गप्पागोष्टी फावल्या वेळासाठी राखून ठेवाव्यात. अशावेळी मग काम करत असताना, तुम्ही शांत (गप्पगप्प) असता याबद्दल कोणीही आक्षेप घेता कामा नये. तुम्ही काय केले पाहिजे तर, इतरांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि इतर काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे स्वतःला अस्वस्थ, त्रस्त किंवा नाराज होऊ देऊ नये – दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ‘समता’ बाळगावी आणि योगसाधकाला साजेशी अशी वैश्विक सदिच्छा बाळगावी. तुम्ही तसे केलेत आणि तरीही इतर जण अस्वस्थ झाले किंवा नाराज झाले तर, तुम्ही ते मनावर घेता कामा नये; कारण (मग तेव्हा) त्यांच्या चुकीच्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही जबाबदार असणार नाही.

*

सामान्य मानवी प्राणिक मागण्यांच्या विरोधात जेव्हा साधक स्वतःच्या योगमार्गावर अढळ राहतो तेव्हा ज्यांना त्या साधकाबाबत काही जाण नसते असे लोक नेहमीच (हा दगडासारखा भावशून्य आहे इ.) अशा प्रकारची निंदा करत राहतात. पण त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता कामा नये. सामान्य प्राणिक मानवी प्रकृतीच्या चिखलाने भरलेल्या मार्गावरील हलकी आणि निःसत्त्व माती बनून राहण्यापेक्षा, दिव्यत्वाकडे जाणाऱ्या मार्गावरील दगड होणे परवडले.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 322-323), (CWSA 31 : 315)

तुम्ही जेवढे अधिक अचंचल (quieter) व्हाल, तेवढे तुम्ही अधिक शक्तिशाली व्हाल. समत्व हा सर्व आध्यात्मिक शक्तींचा दृढ पाया आहे. तुमची बैठक मोडू शकेल अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही थारा देता कामा नये; तुम्ही तसे करू शकलात, तर मग होणाऱ्या सर्व हल्ल्यांच्या प्रतिकार तुम्ही करू शकता. तसेच, त्याच्या जोडीला जर तुमच्याकडे पुरेसा विवेक असेल आणि जेव्हा अनिष्ट सूचना तुमच्यापाशी येत असतात तेव्हाच तुम्ही जर का त्या पाहू शकलात, पकडू शकलात तर, त्यांना परतवून लावणे हे तुम्हाला सोपे जाते; परंतु कधीकधी त्या नकळतपणे येतात आणि मग त्यांच्याशी मुकाबला करणे अवघड होऊन बसते. जेव्हा असे घडते तेव्हा तुम्ही शांत बसले पाहिजे आणि तेव्हा तुम्ही शांतीला व सखोल आंतरिक अचंचलतेला आवाहन केले पाहिजे. दृढ राहा आणि विश्वासाने, श्रद्धेने आवाहन करा. जर तुमची अभीप्सा शुद्ध आणि स्थिर असेल तर तुम्हाला खात्रीपूर्वक साहाय्य मिळतेच.

विरोधी शक्तींकडून होणारे हल्ले हे अटळ असतात. मार्गावरील परीक्षा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे आणि त्या अग्निदिव्यामधून मोठ्या धैर्याने बाहेर पडले पाहिजे. हा मुकाबला कठीण असू शकतो पण जेव्हा तुम्ही त्यामधून बाहेर पडता, तेव्हा तुम्ही काहीतरी प्राप्त करून घेतलेले असते, तुमचे एक पाऊल पुढे पडलेले असते. कधीकधी तर अशा विरोधी शक्तींच्या अस्तित्वाची आवश्यकताही असते. त्यांच्यामुळे तुमचा निश्चय अधिक दृढ होतो, तुमची अभीप्सा अधिक सुस्पष्ट होते. हेही खरे आहे की, तुम्हीच अशा शक्तींना जिवंत राहण्याचे खाद्य पुरविता म्हणून त्या टिकून राहतात. जोवर तुमच्यामधील काहीतरी त्यांना प्रतिसाद देत राहते तोवर, त्यांचा हस्तक्षेप हा अगदी यथायोग्यच आहे, असे म्हटले पाहिजे.

परिस्थिती कोणतीही असली तरी, जेव्हा विरोधी शक्तींकडून हल्ला होतो तेव्हा हा हल्ला बाहेरून होत आहे, असे समजावे आणि म्हणावे, “हे माझे स्वरूप नाही, मला या गोष्टीशी काहीही घेणेदेणे नाही”; हा दृष्टिकोन सुज्ञपणाचा आहे. सारे कनिष्ठ आवेग, साऱ्या इच्छाआकांक्षा, साऱ्या शंका आणि मनामधील साऱ्या प्रश्नांना तुम्ही याच पद्धतीने हाताळले पाहिजे. जर तुम्ही त्या साऱ्यांबरोबर वाहवत गेलात तर, त्यांच्याशी मुकाबला करण्यातील अडचणी अधिक वाढतात; कारण मग तुम्हाला, तुमच्या स्वतःच्याच प्रकृतीवर मात करण्याच्या कायमस्वरूपी अवघड कामाला सामोरे जावे लागत आहे, असे तुम्हाला जाणवेल. पण जर एकदा का तुम्ही असे म्हणू शकलात की, “नाही, हे माझे स्वरूप नाही. मला त्यांच्याशी काही कर्तव्य नाही”, तर मग त्यांना पिटाळून लावणे अधिक सोपे जाते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 34-35)

समतेशिवाय साधनेचा पाया पक्का होऊ शकत नाही. परिस्थिती कितीही असुखकर असू दे, इतरांची वागणूक कितीही मान्य न होण्यासारखी असू दे तरी, तुम्ही तिचा पूर्ण शांतपणे आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियेविना स्वीकार करायला शिकलेच पाहिजे. ह्या गोष्टी हीच समत्वाची खरी कसोटी असते. जेव्हा लोक चांगले वागत असतात आणि परिस्थिती सुखकारक असते आणि सर्व गोष्टी सुरळीत चालू असतात, तेव्हा समत्व राखणे आणि शांत राहणे सोपे असते; पण जेव्हा ह्या साऱ्या गोष्टी विपरित असतात तेव्हाच स्थिरता, शांती, समता यांच्या पूर्णत्वाचा कस लावता येणे शक्य होते, त्यांचे दृढीकरण करता येते, त्यांना परिपूर्ण करता येते.

*

समत्व हाच खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार आहे आणि साधक जेव्हा स्वत:च्या प्राणिक प्रवृत्तीला, भावना किंवा वाणी किंवा कृती यामध्ये वाहवत जायला मुभा देतो, तेव्हा तो या समत्वापासूनच ढळत असतो, विचलित होत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 129, 130)

आंतरिक शांतीचा आधार असतो समता. बाह्य गोष्टींचे हल्ले आणि बाह्य गोष्टींची विविध रूपे, मग ती सुखद असोत वा दुःखद, दुर्भाग्यपूर्ण असोत किंवा सौभाग्यपूर्ण, आनंददायी असोत वा वेदनादायी, मानसन्मानाचे असोत किंवा अपकीर्तीचे, स्तुती असो वा निंदा, मैत्री असो वा शत्रुत्व, पापी असो वा संत, आणि भौतिकदृष्ट्या उष्ण असोत वा शीत असोत इत्यादी सर्व गोष्टींना स्थिर आणि समतायुक्त मनाने स्वीकारण्याची क्षमता म्हणजे समता.

– श्रीअरविंद
(CWSA 10-11 : 03)

तुमच्यातील कोणताही एखादा घटक जोवर या जगाशी निगडीत असतो तोवरच हे जग तुम्हाला त्रास देईल. मात्र तुम्ही जर सर्वथा ‘ईश्वरा’चे होऊन राहिलात तरच तुमची त्या त्रासापासून मुक्तता होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 76)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ आहोत हे समजल्यामुळे खजील होऊन, लहान मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते कारण भीती ही चेतनेची अधोगती आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 362)