Tag Archive for: रूपांतरण

उठा, स्वत:च्या अतीत जा, तुम्ही स्वत: जे आहात ते बना. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची संपूर्ण प्रकृतीच अशी आहे की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मनुष्य-प्राणी होता, आता तो पशु-मानवापेक्षा वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण तो विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनू शकतो, तो ज्ञान-द्रष्टा बनावा, तो कारागीरापेक्षा अधिक काही बनावा. तो निर्माणकर्ता बनावा आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी बनावा; त्याला सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा लाभ घेता यावा म्हणून, त्याने निव्वळ सौंदर्याची उपासना करण्यापेक्षा अधिक काही बनावे.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य द्रव्य मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या प्राणमय अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे, आणि त्याच्याकडे आंशिक (Partial) ज्ञान असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि दिव्य दृष्टी ह्यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

ह्या सर्व गोष्टी प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे होय; कारण हे बनणे म्हणजे मनामधून अतिमनाकडे उन्नत होणे होय. त्याला दिव्य मन वा दिव्य ज्ञान किंवा अतिमन काहीही नाव द्या; ती दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती आणि प्रकाश आहे. आत्म्याने अतिमनाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने स्वत:साठी ही विश्वं निर्माण केली, अतिमनाच्याद्वारेच तो त्यांच्यामध्ये राहतो आणि शासन करतो. अतिमनामुळेच तो स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे.

अतिमन म्हणजे अतिमानव; त्यामुळे मनाच्या वर उठणे ही महत्त्वाची अट आहे.

अतिमानव असणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव असणे म्हणजे देवाचे शक्तिसामर्थ्य असणे. तुम्ही मानवामधील देवाचे सामर्थ्य बना.

दिव्य अस्तित्वामध्ये ठाण मांडून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेने, आनंदाने, संकल्पशक्तीने आणि ज्ञानाने तुमचा ताबा घेणे आणि तुमच्या बरोबर आणि तुमच्या माध्यमातून लीला करणे हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण होय. स्वत:मध्ये देवाचा शोध घेणे आणि त्याचे प्रकटीकरण प्रत्येक गोष्टीमध्ये करणे, हे तुमचे सर्वोच्च रूपांतरण आहे. त्याच्या अस्तित्वामध्ये जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीने कृती करा, त्याच्या आनंदाने आनंदी व्हा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

तुम्ही ह्यापैकी अंशभाग जरी करू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या पहिल्या पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 151-152)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य कारागीराकडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी आवाहन करेल आणि परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व कृतींचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा व्यक्ती रूपांतरणाविषयी बोलत असे तेव्हा तिला केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही निगूढ चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करावयाचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून धुत्कारत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही निगूढ अशा सत्याची अभिव्यक्ती करावी, अशी त्या सत्याकडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य की, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या सत्याचा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रहणशीलता, याबद्दल आपण या आधीही बोललो आहोत. रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी ह्यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंतच झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा काहीसे असेच घडून येते. खूप काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची जाणीव नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. जर का तुमच्यापाशी तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोध देखील जाणवतो; जणू काही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही पडत नाही. पण जेव्हा तुम्ही अंतरंगातून सिद्ध झालेला असता तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न – आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 18-19)

या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे. Read more