Tag Archive for: योग

• पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतरे आणि प्रतिक्रिया यांपासून स्वत:ला दूर राखणे अगदी अनिवार्य असते.

• सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल, ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे, असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी कोणती प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

• तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

• कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून तिला सामोरे जा.

• आणि तरीसुद्धा, तुम्ही अजून कोणती प्रगती करणे आवश्यक आहे ह्याचा शोध घेण्यामध्ये कायम सतर्क राहा आणि तसे करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका.

• वरवर दिसणाऱ्या भौतिक घटनांकडे पाहून त्यांचे अर्थ लावू नका. कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

• एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर ती ताकद असेलच, तर तक्रार करण्याऐवजी ती बदलून टाका.

• तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका.

• एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात.

• खाण्यापूर्वी काही सेकंद अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य असे द्रव्य मिळावे आणि तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल.

• झोपी जाण्यापूर्वी काही सेकंद अशी अभीप्सा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरु करू शकाल.

• कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच नाही तर, परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

• जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी, ते शब्द पडताळून पाहण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा वेळ चित्त एकाग्र करा आणि जे शब्द बाहेर पडणे नितांत आवश्यक आहेत तेवढेच बोलण्यास संमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास संमती द्या.

• सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

• तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, बाह्य रूपे केवळ नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे फाटलेले कपडे जसे टाकून द्यावेत त्याप्रमाणे असतात, ह्याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल.

• आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायला नको असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल ; आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 33-35)

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहुतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे.

म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

योग म्हणजे आपली जाणीव उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे जेणेकरून, आपल्या सामान्य जाणिवेच्या आणि आपल्या सामान्य प्रकृतीच्या अतीत असणाऱ्या गोष्टींसाठी ती सक्षम होईल.

योग म्हणजे आंतरिक सखोलतेशी, वर असणाऱ्या उत्तुंगतेशी, आपल्या अतीत असणाऱ्या व्यापकतेशी संपर्क; त्यांच्या महान प्रभावाप्रत, महान अस्त्वितांप्रत, त्यांच्या हालचालीबाबत खुले असणे म्हणजे योग. किंवा योग म्हणजे आपल्या पृष्ठवर्ती जाणिवेमध्ये आणि आपल्या अस्तित्वामध्ये त्यांचा स्वीकार करणे; ज्यामुळे आपल्या ‘सामान्य मी’ नसलेल्या अशा आत्म्याद्वारे आपल्या बाह्य अस्तित्वाचे परिवर्तन होईल, आपल्या अस्तित्वाला तो आत्मा कवळून घेईल आणि त्या आत्म्याचे सुशासन आपल्या बाह्य अस्तित्वावरदेखील चालू लागेल.

आपण ज्या सद्वस्तुचा शोध घेऊ इच्छितो ती आपल्या पृष्ठभागावर असत नाही किंवा जर ती सद्वस्तू तिथे असलीच तर ती अवगुंठित (Concealed) असते. आपल्या आवाक्यात असलेल्या जाणिवेपेक्षा अधिक गहनतर, उच्चतर किंवा व्यापकतर जाणीवच तेथे पोहोचू शकते, त्या सद्वस्तुला स्पर्श करू शकते, त्या सद्वस्तुचे ज्ञान करून घेऊ शकते आणि त्या सद्वस्तुला प्राप्त करून घेऊ शकते. आपण आपल्या सामान्य जाणिवेच्या आतमध्ये, तेथे काय आहे हे शोधण्यासाठी, बुडी मारली तरी त्या सद्वस्तुच्या केवळ अंशभागामध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 327-328)

योग हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून व्यक्ती वस्तुमात्रांमागील सत्याशी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त जाणिवेकडून आंतरिक आणि सत्य जाणिवेप्रत घेऊन जाण्यात येते.

योग-चेतना (Yogic Consciousness) ही बाह्य व्यक्त विश्वाचे ज्ञान वगळत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती विश्वाकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्यात्कारी अनुभवही घेत नाही. योग-चेतना आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात बदल घडविते. आणि त्याला सद्वस्तुचा कायदा लागू करते; प्राणिमात्रांच्या अज्ञानी कायद्याच्या जागी ईश्वरी संकल्प आणि ज्ञानाचा नियम प्रस्थापित करते.

जाणिवेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 327)

योगाचा अर्थ

 

श्रीमाताजींनी एका लहान मुलाला योगाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एका चित्राचे रेखाटन केले आहे.

खालील बाजूस माणूस दर्शविला आहे आणि वरील बाजूस ईश्वर आहे.

नागमोडी वळणे असलेली रेषा ही सामान्य जीवनमार्गाचे प्रतीक आहे तर, मधोमध असलेली सरळ रेषा हे योगमार्गाचे प्रतीक आहे.

(Stories told by the Mother : Part II)

योगपद्धती आणि मानवाच्या सवयीच्या मनोवैज्ञानिक क्रिया यांचा संबंध थोड्याबहुत प्रमाणात विज्ञान आणि निसर्ग यांच्या संबंधासारखा आहे : वाफ किंवा वीज या निसर्ग शक्तीचे स्वाभाविक सामान्य व्यापार आणि याच शक्तीचे विज्ञानघटित व्यापार याचा जो संबध तोच संबध थोड्याफार प्रमाणात मानवाच्या सवयीच्या सामान्य मनोवैज्ञानिक क्रिया आणि योगप्रक्रिया यांचा आहे. विज्ञानाच्या प्रक्रिया ज्याप्रमाणे नियमितपणे केलेले प्रयोग, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि सातत्याने दिसून येणारे परिणाम यांद्वारे विकसित व निश्चित झालेल्या ज्ञानावर आधारित असतात, त्याचप्रमाणे योगाच्या प्रक्रिया पण अशाच ज्ञानावर आधारित असतात.

उदाहरणार्थ राजयोग घ्या. हा योग पुढील आकलनावर व अनुभवावर आधारलेला आहे : आमचे आंतरिक मूळ घटक, आमचे आंतरिक संयोग, आंतरिक नियत कार्ये आणि शक्ती, या सर्वांना एकमेकांपासून अलग करता येते, त्यांचा विलय पण करता येतो, त्यांच्यातून नवे संयोग घडविता येतात; आणि या नव्या संयोगांच्या द्वारा पूर्वी अशक्य असणाऱ्या नव्या कार्यांना त्यांना जुंपता येते. तसेच त्यांचे रूपांतर घडवून आणता येते. आणि निश्चित अशा आंतरिक प्रक्रियांच्या द्वारा त्यांचा नवा सर्वसाधारण समन्वय घडवून आणता येतो. ही राजयोगाची गोष्ट झाली.

हठयोगाची गोष्ट अशीच आहे. हा योग पुढील आकलनावर व या अनुभवावर आधारलेला आहे : आमचे जीवन सामान्यतः ज्या प्राणशक्तीवर आणि प्राणव्यापारांवर आधारलेले आहे, ज्यांचे सामान्य व्यापार निश्चित स्वरूपाचे व अपरिहार्य वाटतात, त्या शक्ती व त्या व्यापारांवर मानवाला प्रभुत्व संपादित करता येते, ते व्यापार बदलता येतात, स्थगितही करता येतात. अशक्यप्राय वाटावे असे परिणाम त्यामुळे घडून येतात आणि ज्यांना या प्रक्रियांमागील तर्कसंगती उमगत नाही त्यांना ते चमत्कारच वाटतात. ही हठयोगाची गोष्ट झाली.

राजयोग आणि हठयोग यांखेरीज जे योगाचे इतर प्रकार आहेत, त्या प्रकारात योगाचे हे वैशिष्ट्य तितकेसे दिसून येत नाही; याचे कारण, दिव्य समाधीचा आनंद प्राप्त करून देणारा भक्तियोग आणि दिव्य अनंत अस्तित्व व जाणीव प्राप्त करून देणारा ज्ञानयोग हे दोन्ही योग राजयोग वा हठयोग या दोन योगांइतके यांत्रिक नाहीत, ते अधिक अंतर्ज्ञानप्रधान आहेत. मात्र त्यांचाही आरंभ हा आम्हातील एखादी महत्त्वाची शक्ती वापरण्यापासूनच होत असतो.

एकंदरीत, योग या सामान्य नावाखाली ज्या पद्धती एकत्र करण्यात येतात, त्या सर्व पद्धती म्हणजे विशिष्ट मानसिक प्रक्रिया आहेत, निसर्गाच्या एखाद्या निश्चित सत्यावर त्या आधारलेल्या आहेत. योगामध्ये, या विशिष्ट मानसिक प्रक्रियाच्या आधारे, सामान्यतः न आढळून येणारे परिणाम व शक्ती विकसित होतात. अर्थात या शक्ती, हे परिणाम, सामान्य व्यापारांत नेहमीच अप्रकट अवस्थेत अंतर्भूत असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 07)