Posts

प्रामाणिकपणा – १२

व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

*

स्वतःशी प्रामाणिक राहा – आत्म-वंचना नको.
‘ईश्वरा’प्रत प्रामाणिकपणा बाळगा – समर्पणात व्यवहार नको.
मानवतेप्रत सरळसाधे असा – त्यात ढोंगीपणा वा दिखावा नको.

– श्रीमाताजी [CWM 14 : 68-70]

प्रामाणिकपणा – ११

प्रश्न : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नको, केवळ ‘ईश्वर’च हवा आहे. पण जेव्हा माझा दुसऱ्या माणसांशी संबंध येतो, साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये जेव्हा मी गुंतलेला असतो, त्यावेळी साहजिकच मला माझ्या एकमेव ध्येयाची, ‘ईश्वरा’ची आठवण राहात नाही. हा अप्रमाणिकपणा असतो का? तसे नसेल, या साऱ्याचा अर्थ काय?

श्रीमाताजी : होय. ज्यावेळी व्यक्तीला एकीकडे ‘ईश्वर’ हवा असतो आणि दुसरीकडे वेगळेच काहीतरी हवे असते, त्यावेळी तो त्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणा असतो. अज्ञान आणि मूढता यांमुळे व्यक्ती अप्रामाणिक असते. पण दृढ इच्छाशक्ती आणि ‘ईश्वरी कृपे’ वर संपूर्ण विश्वास यांमुळे हा अप्रामाणिकपणा नाहीसा करता येतो.

– श्रीमाताजी [CWM 14 : 680]

प्रामाणिकपणा – १०

जे तळमळीचे आणि प्रामाणिक असतात त्यांचा ‘ईश्वर’ नेहमीच सोबती असतो.

*

संपूर्ण प्रामाणिकपणा आणि खरेपणा यामध्येच मुक्ती आहे.

*

‘प्रामाणिकपणा’ व ‘निष्ठा’ हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत.

*

जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकता असते तेव्हा तेथे मात्र मी फारसे काही करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 14 : 66-68]

प्रामाणिकपणा – ०९

तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे.
ढोंग करू नका – प्रामाणिक बना.
केवळ आश्वासने देऊ नका – तशी कृती करा.
नुसती स्वप्ने बघू नका – ती प्रत्यक्षात उतरवा.

*

पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही.

– श्रीमाताजी [CWM 14 : 66]

प्रामाणिकपणा – ०८

‘ईश्वरा’प्रत असलेल्या तुमच्या आत्मनिवेदनात तुम्ही प्रामाणिक आणि परिपूर्ण व्हा म्हणजे तुमचे जीवन हे सुसंवादी आणि सुंदर होईल.

*

घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक कवच आहे.

*

तुम्ही जर अगदी तळमळीने ‘ईश्वरा’ला म्हणाल की, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ‘ईश्वर’ अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल.

– श्रीमाताजी [CWM 14 : 65], [CWM 14 : 66], [CWM 14 : 66]

प्रामाणिकपणा – ०७

[स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, श्रेष्ठत्वाची चुकीची भावना, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता] या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट असते. आणि त्याचा अर्थ असा की, ‘परमसत्याचा’ निरपवाद आग्रह आणि परमसत्याविना दुसरे काहीही नको असणे. मग, कोणतेही समर्थन न करता, स्वयं-आलोचना (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी असेल आणि मिथ्यत्वाचा शिरकाव झाला तर व्यक्तीला एकप्रकारची अस्वस्थता जाणवत असेल आणि व्यक्तीमध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा असेल तर, सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धीकरण घडवून आणेल.

– Sri Aurobindo [CWSA 36 : 379]

प्रामाणिकपणा – ०६

तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या तत्त्वाशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता. प्रत्येक क्षणी म्हणजे, तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रीतीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी सुसंवादी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आणि तुम्ही जर तुमच्या अस्तित्वाच्या सत्यतत्त्वाविषयी जागृत झाला असाल तर, त्या तत्त्वाशी सुसंवादी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळी तुम्ही खराखुरा प्रामाणिकपणा साध्य केला आहे असे म्हणता येईल.

आणि जर तुम्ही तसे असाल, म्हणजेच खरोखरच तुम्ही कधीही अहंभावात्मक वृत्तीने किंवा वैयक्तिक कारणासाठी कोणतीही कृती करत नसाल, तुमच्या आंतरिक सत्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही कृती करत असाल, म्हणजेच जर तुम्ही संपूर्णत: प्रामाणिक आणि प्रांजळ असाल, तर जगाने तुमच्याबद्दल काहीही म्हटले, तुमच्याबद्दल चांगला, वाईट काहीही ग्रह करून घेतला, काहीही मत बनविले, तरी तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटणार नाही, तुम्ही त्याविषयी संपूर्ण उदासीन, संपूर्ण समवृत्तीने राहाल. त्या संपूर्ण प्रामाणिकपणाच्या स्थितीत असताना, चांगले ‘दिसण्याची’ किंवा इतरांनी तुम्हाला चांगले म्हणावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. कारण तुमच्या आंतरिक खऱ्या चेतनेशी जेव्हा तुम्ही सुसंवादी असता, तेव्हा पहिली गोष्ट ही घडते की, तुम्ही कसे ‘दिसता’, कसे भासता याची तुम्ही चिंता करत बसत नाही. लोक तुम्हाला काहीही म्हणोत; उदासीन, थंड, दूरस्थ किंवा गर्विष्ठ म्हणोत तरी, त्याला तुमच्या दृष्टीने काही महत्त्वच उरत नाही. अर्थात, मी पुन्हा सांगते की, त्यासाठी तुम्ही संपूर्ण प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. म्हणजेच, तुम्ही तुमचे आंतरिक, मध्यवर्ती सत्य व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी जीवन जगत आहात, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

– श्रीमाताजी [CWM 04 : 16-17]

प्रामाणिकपणा – ०५

….केवळ बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा’ प्रत्यक्षात तसे ‘असणे’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण आणि निर्दोष असेल, तर आपण चांगले आहोत असे दाखविण्याची गरज नाही. आणि ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा’ म्हणजे आम्हाला असे म्हणायचे आहे की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, फक्त आपल्या अस्तित्वाचे मध्यवर्ती ‘सत्-तत्त्व’च आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 12 : 268]

प्रामाणिकपणा – ०४

पूर्णतः प्रामाणिक असणे म्हणजे फक्त आणि फक्त दिव्य ‘सत्या’चीच इच्छा बाळगणे; ‘दिव्य माते’प्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व इच्छा-वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ‘ईश्वरा’लाच अर्पण करणे आणि हे कार्य ‘ईश्वरा’ने दिलेले आहे हे जाणून, कोणताही अहंकार आड येऊ न देता, कार्य करणे; हाच ‘दिव्य जीवना’चा पाया आहे. व्यक्ती एकाएकी एकदम पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर व्यक्ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगत असेल आणि ‘ईश्वरी शक्ती’ने साहाय्य करावे म्हणून अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने नेहमी तिचा धावा करत असेल, तर अशी व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत जाते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 51]

प्रामाणिकपणा – ०२

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व भागांनी ‘ईश्वरा’प्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक आहे – म्हणजे असे की, एखाद्या भागाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे अंग मात्र त्याला नकार देते किंवा बंड करते, असे असता कामा नये.

अभीप्सेमध्ये प्रामाणिकता असणे याचा अर्थ, ‘ईश्वरा’साठीच ‘ईश्वर’ हवा असणे, प्रसिद्धी अथवा नावलौकिक अथवा प्रतिष्ठा अथवा शक्ती किंवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठी नव्हे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 65]