Tag Archive for: प्रामाणिकपणा

 

(बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते आपण कालच्या भागात पाहिले.)

तुमची अभीप्सा जेव्हा क्षीण होते, प्रयत्न मंदावतात तेव्हा तुमच्यामधील बदलास नाखूष असणारा हा घटक गाजावाजा न करता पण पटकन उसळी मारून वर येतो. तो त्याची इच्छा तुमच्यावर लादू पाहतो आणि तुम्हाला जे करायचे नसते नेमके तेच करायला तो तुम्हाला भाग पाडतो. तुम्ही अमुक एक गोष्ट करायची नाही असे ठरविलेले असते पण तुमच्याही नकळत, तुम्ही ती गोष्ट करून मोकळे झालेला असता. असे का झाले, कसे झाले याची तुम्हाला अजिबात कल्पना येत नाही. हे असे घडलेले असते कारण तो घटक तिथे असतो. आणि त्याची वेळ आता आलेली असते. गोष्टी छोट्या असू देत किंवा मोठ्या असू देत, तपशिलाचा भाग असू दे किंवा जीवनाची दिशा ठरविणे असू दे, या सर्व बाबतीत या घटकाची वेळ कधी ना कधी येतच असते.

अशी अनेक माणसं असतात, त्यांना स्वतःमध्ये काय बदल केला पाहिजे हे नेमकेपणाने माहीत असते, पण तरीसुद्धा त्यांना असे वाटत असते की, नाही, तो बदल ते करू शकणार नाहीत. पण असे का वाटत असते, याचे कारण मात्र त्यांना माहीत नसते. पण दुसरेतिसरे काही नसून, हा घटक हेच ते कारण असते. बदल करण्यास नाखूष असणारा हा असा छोटासा भाग असतो आणि तो त्याला संधी मिळण्याची वाट पाहत बसलेला असतो.

आणि मग त्याला संधी मिळण्याचा अवकाश! मग ती संधी तुमच्या ढिलाईमुळे असो, थकव्यामुळे असो, किंवा निद्रानाशामुळे असो, किंवा काहीशा कंटाळ्यामुळे असो, त्या घटकाला डोकं वर काढण्याची संधी तुम्ही दिलीत की मग तो घटक त्याच्या पूर्ण ताकदीनिशी, अगदी एकवटून उफाळून वर येतो आणि तुम्ही जे करायचे ठरविलेले असते त्याच्या अगदी विरूद्ध असे तो तुम्हाला बोलायला, वागायला भाग पाडतो. आणि मग तुम्हाला असे वाटायला लागते की, “छे, हे किती नाउमेद करणारे आहे!” आणि मग काही लोकं विचार करायला लागतात की, “काय करणार, माझं नशीबच फुटकं आहे.” पण हे काही त्यांचे नशीब नसते, तर ते स्वतःच त्याला जबाबदार असतात.

लक्षात घ्या की, त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शोधविजेरीचा (searchlight), प्रकाशाचा उपयोग केलेला नसतो. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या छोट्याछोट्या कानाकोपऱ्यात विजेरीचा प्रकाश टाकून पाहिलेले नसते, तिथे सांदीकोपऱ्यात काय दडलेले आहे हे त्यांनी पाहिलेले नसते. ती गोष्ट त्यांनी तिथे तशीच पडीक ठेवलेली असते आणि ती गोष्ट दृष्टीस पडू नये म्हणून त्यांनी स्वतः तिच्याकडे जणू पाठ फिरवलेली असते. असे कितीदा तरी घडते की व्यक्तीला आता काहीतरी (म्हणजे तो घटक) हाती लागणार असते. पण ती गोष्ट तिला दुखावणारी असते, त्रासदायक असते.. मग अशा वेळी ती गोष्ट चिमटीत पकडण्याऐवजी व्यक्ती दुसरीकडेच आपला मोहरा वळवते. आणि मग काय होते तर, प्रगती करण्याची ती संधी तुम्ही दवडलेली असते.

आणि मग त्या गोष्टीची शेपूट पकडून तिला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी किंवा तिचे कान उपटण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागते, त्यापूर्वी पुन्हा काही चुका घडतात. तेव्हा कुठे एकदा तुमच्या पकडीत ती गोष्ट येते आणि मग तुम्ही म्हणता, “नाही. आता तू माझ्यापासून लपून राहू शकत नाहीस. तू जशी आहेस तशी मला तू स्पष्टपणे दिसत आहेस, आता एकतर तुला माझ्यामधून बाहेर पडावे लागेल नाहीतर तुला स्वतःमध्ये बदल तरी करावा लागेल.” पण हे असं सारं करण्यासाठी, व्यक्तीची स्वतःवर मजबूत पकड हवी आणि तिच्यापाशी अविचल दृढ निश्चय असला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 06 : 243-244)

(स्वत:मध्ये बदल व्हावा असे व्यक्तीला वाटत असले तरी तो बदल का होत नाही याचे कारण श्रीमाताजी समजावून सांगत आहेत.)

व्यक्तीमध्ये एखादा घटक असा असतो की, त्याच्यामध्ये अभीप्सा असते, तो ईश्वराप्रत समर्पित असतो आणि त्याचवेळी त्या व्यक्तीमध्ये इतर काही घटक असे असतात – कधीकधी एखादा छोटासाच घटक असतो, तर कधीकधी मोठाही असू शकतो – तो तळाशी, खूप खोलवर व्यवस्थित लपून बसलेला असतो. तो कोणाला सापडू नये अशा रितीने कोणतीही चुळबूळ न करता, अगदी शांतपणे तेथे दडून बसलेला असतो आणि तो त्याच्या पूर्ण ताकदीनिशी बदलासाठी विरोध करत राहतो.

व्यक्ती मात्र विचार करत राहते, “माझ्यामध्ये इतकी उत्कट अभीप्सा आहे, इतकी सदिच्छा आहे, माझ्यामध्ये बदल करावा असे मला अगदी मनापासून वाटत आहे, आणि असे असूनही माझ्यामध्ये काहीच बदल होत नाहीये. असे का?” अशा वेळी त्या व्यक्तीचा मानसिक उद्धटपणा आड येतो आणि म्हणू लागतो, “मला माझ्या योग्यतेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाहीये, ईश्वरी कृपा मला साहाय्य करत नाहीये आणि मला एकट्यालाच हे सारे प्रयत्न करावे लागत आहेत. इत्यादी इत्यादी…” पण हे तसे नसते.

तो तुमच्यामध्येच वेटोळे घालून बसलेला, पुष्ट झालेला, स्वतःमध्येच मश्गुल झालेला आणि दडून बसलेला, तुमच्यामधीलच एक घटक असतो. तो जणू काही पेटीच्या अगदी तळाशी लपून राहिलेला, बदल करण्यास नकार देणारा घटक असतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 242-243)

 

साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते?

श्रीमाताजी : सोपे आहे हे समजायला. कल्पना करा की, तुम्ही एखादी मोठी चूक केली आहे आणि आता तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहात. तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, ईश्वरी कृपेवर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर खरोखरच तिच्यावर विसंबून राहिलात तर, तुम्हाला अचानक असे जाणवेल की, हा एक धडा आहे. म्हणजे, ही अडचण किंवा तुम्ही केलेली चूक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, तो एक धडा आहे आणि तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायला हवा हे तुम्ही शोधावे, ते शिकविण्यासाठी ती चूक घडली होती. आणि अशा रितीने, ईश्वरी कृपेच्या साहाय्याने तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, त्याचा तुम्हाला शोध लागतो. आणि मग तुम्ही त्या गोष्टीमध्ये बदल करता. अशा रितीने, आलेल्या त्या अडचणीमधून तुम्ही एक मोठी झेप घेतलेली असते, तुम्ही खूप प्रगती केलेली असते. हे असे सदासर्वकाळ चालू असते.

फक्त त्यासाठी तुम्ही खरोखरच पूर्ण प्रामाणिक असले पाहिजे. म्हणजे तुम्ही ईश्वरी कृपेवर भरवसा ठेवला पाहिजे आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करू दिले पाहिजे. तुमच्यामधील एखादा घटक साहाय्यासाठी याचना करत आहे आणि त्याचवेळी दुसरा घटक मात्र त्याला प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, असे असता कामा नये. त्या दुसऱ्या घटकाला स्वतःमध्ये बदल करण्याची मुळीच इच्छा नसते, आणि त्यामुळे तो प्रतिकार करत राहतो, हीच खरी अडचण असते. म्हणून, तुम्ही हातचे काहीही राखून न ठेवता अगदी पूर्णपणे, समग्रपणे प्रामाणिक राहिले पाहिजे, असे श्रीअरविंद सांगतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 242)

 

(श्रीमाताजींनी बालकांना प्रामाणिकपणाचे महत्त्व कसे समजावून सांगितले, ते आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

मुलांना एक गोष्ट अवश्य शिकवावी असे माझे पालकांना आणि शिक्षकांना सांगणे आहे. मुलांना असे सांगावे की, ‘’मुलांनी ते चांगले आहेत असे ‘दाखविणे‌’, जणू काही ते फार आज्ञाधारक आहेत असे ‘दाखविणे‌’ किंवा ते खूप उत्तम रितीने अभ्यास करत आहेत असे ‘दाखविणे‌’ हे अजिबात उपयोगाचे नाही.” (तशा प्रकारची कोणतीही गोष्ट मुळात नसताना केवळ ‘दाखविणे‌’ काहीच उपयोगाचे नसते, हे मुलांना शिकवावे.) पण बरेचदा आपली मुले अशी ‘दिसावीत’ यासाठी पालक आणि शिक्षकच मुलांना प्रोत्साहन देत असतात.

बरेचदा असेही घडते की, एखादे मूल अगदी सहजस्वाभाविकपणे, अगदी प्रांजळपणे त्याची चूक कबूल करण्यासाठी पालकांकडे किंवा शिक्षकांकडे जाते; पण तेव्हा त्याला ओरडा खावा लागतो. पालकांची ही सर्वात मोठी चूक असते. मुलाला कधीही रागवता कामा नये आणि त्यासाठी स्वतः पालकांकडे पुरेसा संयम असावा लागतो. अगदी त्या मुलाने कितीही किमती किंवा अतिशय मौल्यवान अशी वस्तू मोडलेली असेल तरीही त्याला रागावता कामा नये. त्याला फक्त असे विचारावे की, “हे असे कसे झाले? नक्की काय झाले?” असे केल्यामुळे, नक्की काय घडले व ते तसे का घडले हे मुलाला समजेल, म्हणजे मग पुढच्या वेळी तो अधिक काळजी घेऊ शकेल. बस इतकेच. तुम्ही असे वागलात तर, ते मूल तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करणार नाही, तर ते तुमच्यापाशी प्रांजळपणे चूक कबूल करेल. ढोंगीपणा ही स्वतःच्या व्यक्तित्वाच्या रूपांतरणातील सर्वात मोठी अडचण असते. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर वागताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवलीत तर तुम्ही त्याचे खूप भले करू शकाल. अर्थात, तुम्ही त्याला उपदेशाचे डोस पाजत बसता कामा नये किंवा भाषणबाजीसुद्धा करता कामा नये.

व्यक्तीमध्ये एक प्रकारचा उदात्तपणा असतो, एक महान विशुद्धता असते, सौंदर्याविषयी निरतिशय प्रेम असते आणि या सगळ्या गोष्टी इतक्या शक्तिशाली असतात की, अगदी अत्यंत दुष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्यसुद्धा अशा खऱ्याखुऱ्या सौंदर्यपूर्ण कृतीसमोर किंवा वीरवृत्तीच्या किंवा निःस्वार्थी कृतीसमोर नतमस्तक होतो. म्हणजे तो तसे वागण्यास प्रवृत्त होतो इतकी तो गोष्ट शक्तिशाली असते, ही गोष्ट मुलांना समजावून सांगितली पाहिजे.

कारण (सर्वच) मनुष्यमात्रांमध्ये एक ईश्वरी उपस्थिती असते, या पृथ्वीवरील ती सर्वात अद्भुत अशी उपस्थिती असते. ती उपस्थिती हृदयामध्ये सुप्त स्वरूपात असते. हृदयामध्ये म्हणजे शारीर-हृदयामध्ये नाही, तर सर्व मनुष्यमात्रांच्या चैत्य केंद्रामध्ये (psychic centre) ती उपस्थिती असते. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा त्या ईश्वरी उपस्थितीचे वैभव पुरेशा विशुद्धपणे आविष्कृत होते तेव्हा, त्या उपस्थितीचा पडसाद हा सर्व जीवमात्रांमध्ये सुप्त असणाऱ्या त्या ईश्वरी उपस्थितीला जाग आणतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 298-299)

(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. आपण कालच्या भागात त्याचा विचार केला.)

काही व्यक्ती वर नमूद केलेल्या नियमाला अपवाद असतात, असे समजू नका. कारण (जडत्व, आळस, अज्ञान, नैराश्य, नकारात्मक विचार इ.) प्राकृतिक स्वभावधर्माचा भाग वाट्यालाच आला नाही, अशा रितीने कोणीही या भौतिक जगात राहू शकत नाही. आणि प्राकृतिक स्वभाव हा नेहमीच संमिश्र असतो; त्यात खऱ्याखोट्याची सरमिसळ झालेली असते. जेव्हा तुम्ही पूर्णत: प्रामाणिकपणा अंगी बाणवाल तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या ठिकाणी संपूर्णतः निर्भेळ असे काहीही नाही. पण तुम्ही तुमच्यातील सर्वोच्च चेतनेच्या प्रकाशात, स्वतःच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत तर मग, तुमच्या प्रकृतीमधील जे काही काढून टाकायची तुमची इच्छा आहे ते नाहीसे होईल. अशा संपूर्ण प्रामाणिकपणासाठी तुम्ही प्रयत्न केला नाहीत तर एखादा दोष किंवा त्याची लहानशी पडछाया पुन्हा डोकं वर काढण्याच्या संधीची वाट पाहत एका कोपऱ्यात दडून बसेल.

मी येथे मी प्राणाविषयी बोलत नाहीये तर, मी फक्त मनाविषयी बोलत आहे. (तुमच्या हातून घडलेल्या चुकीविषयी अंतरंगातून कोणीतरी सांगते की, तुम्ही चुकीचे वागलात. आणि तेव्हा बघा तुमच्यामध्ये कशी अस्वस्थता निर्माण होते.) तुमच्या ठिकाणी एखादी लहानशी अप्रिय संवेदना, थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली तर पाहा, तुमचे मन किती पटकन तुमच्या त्या तशा वागण्याचे समर्थन करते. ते दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडते किंवा परिस्थितीला दोष देते. ते म्हणते की, “मी जे काही केले ते बरोबरच होते; आणि अमुक एक गोष्ट चुकीची झाली त्याला मी जबाबदार नाही.” तुम्ही जर स्वत:कडे काळजीपूर्वक पाहिलेत तर तुम्हाला असे दिसून येईल की हो, खरंच की, ते तसंच आहे आणि त्याची तुम्हाला खूप गंमतही वाटेल.

स्वत:ची किंवा दुसऱ्यांची फसवणूक न व्हावी म्हणून जर एखादे मूल अगदी लहानपणापासून स्वत:चे काळजीपूर्वक परीक्षण करू लागले, प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करू लागले, तर ते त्याच्या अंगवळणी पडेल आणि त्यामुळे त्याच्या नंतरच्या जीवनातील (प्रामाणिक होण्यासाठी करावे लागणारे) बरेचसे कष्ट कमी होतील. (क्रमश:)

“बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम विजयाबद्दल खात्री बाळगली पाहिजे. त्याने ध्येय संपादन करण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि सातत्यपूर्ण प्रगतीची शक्यता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.”

मी निरपवाद प्रामाणिकपणावर एवढा भर का देत असते? ते तुम्हाला सांगते. तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही लहान होतात त्या वेळी तुम्हाला काय शिकवण्यात आले होते ते कदाचित तुम्हाला आठवत असेल. बहुधा सर्वच पालक त्यांच्या मुलांना सांगत असतात की, ”तुम्ही खोटे बोलता कामा नये, खोटे बोलणे अतिशय वाईट असते.” परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, ते स्वतःच बरेचदा तुमच्यासमोर खोटं बोलत असतात. आणि मग जी गोष्ट ते स्वतःच करत नाहीयेत, ती गोष्ट ते तुम्हाला का करायला सांगत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि असे असूनसुद्धा, प्रामाणिक असणे हे अत्यंत आवश्यक आहे, हे अगदी लहान वयातच मुलांना सांगितले गेले पाहिजे.

दुसऱ्यांपेक्षा चलाख (smart) कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी, हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण शिक्षणाच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत वाईट पद्धत आहे; कारण त्यामुळे खोटे बोलणे, फसविणे, ढोंग करणे आणि तत्सम अन्य गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. पण पालकांनी जर मुलांना वारंवार असे समजावून सांगितले की, “तुम्ही जर पूर्ण प्रामाणिक नसाल, म्हणजे केवळ दुसऱ्याशीच असे नव्हे, तर स्वत:शीसुद्धा पूर्णपणे प्रामाणिक राहिला नाहीत आणि स्वत:तील अपूर्णता व कमतरता झाकण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही कधीच कोणतीही प्रगती करू शकणार नाही; कोणतीही प्रगती कधीच न करता, तुम्ही जसे आज आहात तसेच कायम राहाल. तेव्हा तुम्हाला अगदी नुसत्या प्राथमिक अजाण अवस्थेतून जरी बाहेर पडायचे असेल आणि विकसित होत जाणाऱ्या चेतनेत उन्नत व्हायचे असेल, तर त्यासाठीसुद्धा सर्वात महत्त्वाची, एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा.

करू नये अशी एखादी गोष्ट जर तुम्ही केली असेल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी कबूल केली पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी अयोग्य अशी ऊर्मी उठली असेल, तर तिच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही स्वत:ला सांगितले पाहिजे की, ‘ते चांगले नाही‌’ किंवा ‘ते घृणास्पद आहे’, एवढेच नव्हे तर, ‘ते दुष्टपणाचे आहे.” (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 15 : 297-298)

साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे हजार मार्ग असतात. मग अशा वेळी व्यक्तीने तिचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापासून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : सावकाशपणे करायचे हे एक दीर्घकालीन कार्य आहे. व्यक्तीमध्ये जर परिपूर्ण प्रामाणिकपणा असेल तरच हे कार्य पूर्णत्वाला जाऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने सतत सावध असणे आणि सतत जागता पहारा ठेवणे आवश्यक असते; त्यासाठी तिने स्वतःच्या भावभावना-तरंगांचे आणि प्राणिक प्रतिक्रियांचे निरीक्षण करत राहिले पाहिजे; स्वतःच्या दुर्बलतेची कोडकौतुकं करण्याच्या नादात त्या गोष्टींकडे कधीच डोळेझाक करता कामा नये. (पण एवढी सतर्कता बाळगूनही) जेव्हा कधी एखादी चूक तिच्या हातून घडेल तेव्हा, मग भलेही ती चूक कितीही लहानशी असली तरीपण, प्रत्येक वेळी त्या चुकीसाठी व्यक्तीने स्वतःला जबाबदार धरले पाहिजे. व्यक्ती असे जर सातत्याने करत राहिली तर, ही गोष्ट खूपच स्वारस्यपूर्ण होते आणि उत्तरोत्तर ती अधिकाधिक सोपी होत जाते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 295–296)

 

व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

*

आंतरिक संघर्ष ही प्रामाणिकपणाच्या अभावाची खूण असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68, 69)

ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल अशा वेळी, तिने जर अगदी प्रामाणिकपणे ईश्वराला आवाहन केले आणि त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा केली तर, व्यक्तीला त्याच्याकडून नेहमीच प्रतिसाद मिळतो. मात्र एकीकडे आवाहन करायचे आणि त्याच वेळी दुसरीकडे, “आता मी ईश्वराला आवाहन तर केले आहे, पण तो प्रतिसाद देतोय का पाहू या,” असे म्हणायचे, (बरेच जणं असं करतात.) पण अर्थातच ही गोष्ट काही योग्य नाही. व्यक्ती जर मन निश्चल-निरव करू शकली आणि ती थोडी जरी शांत झाली तर, ईश्वरी साहाय्य मिळत आहे हे तिला संवेदित होते. एवढेच नव्हे तर, ते साहाय्य कोणत्या रूपात मिळणार आहे तेही तिला संवेदित होते.

*

ढोंग आणि नाटकीपणाचा महासागर असण्यापेक्षा, प्रामाणिकपणाचा एक थेंब हा शाश्वत चेतनेच्या दृष्टीने कितीतरी अधिक मौल्यवान असतो.

– श्रीमाताजी (CWM 05 : 370-371) & (CWM 12 : 129)

प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो तेव्हा त्या व्यक्तीसमोर आपण नतमस्तक झाले पाहिजे. आपण ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो, त्या प्रामाणिकपणामध्ये परिपूर्ण सचोटी आणि पारदर्शकता असते. त्या व्यक्तीमध्ये ढोंगीपणाचा लवलेशही नसतो, ती व्यक्ती कोणतीही लपवाछपवी करत नाही किंवा स्वतः कोणीही नसताना, मी कोणीतरी आहे असे कधीही दाखवीत नाही.

*

व्यक्तीमध्ये जर खऱ्या मानसिक प्रामाणिकपणाचा उदय झाला तर तिला हे उमगेल की, मन हे केवळ एक माध्यम आहे, ते स्वयमेव गंतव्य नाही.

– श्रीमाताजी (CWM 08 : 73), (CWM 14 : 339)