Posts

प्रामाणिकपणा – २२

अगदी एक कणभर प्रामाणिकपणादेखील पुरेसा असतो, आणि साहाय्य मिळते. एखाद्याने खरोखर अगदी प्रामाणिकपणे धावा केला, खरोखर प्रामाणिकपणे साद घातली आणि व्यक्तीला अगदी प्रामाणिकपणे उत्तर हवे असेल, तर व्यक्ती प्रतीक्षा करते आणि ते उत्तर नेहमीच मिळते. (मात्र नुसती हाक मारायची आणि त्याच वेळी म्हणायचे, “बघू या, आपण यशस्वी होते का” तर अर्थातच ही काही योग्य परिस्थिती नाही.) आणि व्यक्ती जर स्वतःच्या मनाला शांत करू शकली, आणि थोडीशी जरी शांत झाली, तर व्यक्तीला असे साहाय्य मिळत आहे हे देखील संवेदित होते, एवढेच नव्हे तर ते साहाय्य ज्या रूपात मिळणार आहे तेही तिला संवेदित होते.
*
ढोंग आणि नाटकीपणाचा महासागर असण्यापेक्षा, प्रामाणिकपणाचा एक थेंब हा ‘शाश्वत चेतने’ च्या दृष्टीने, कितीतरी अधिक मूल्यवान असतो.

– श्रीमाताजी [CWM 05 : 370-371], [CWM 12 : 129]

प्रामाणिकपणा – २१

व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या दोषांची जाणीव नसणे, हे कोठेतरी अप्रामाणिकपणा असल्याची खूण आहे. आणि सामान्यतः तो अप्रामाणिकपणा हा प्राणात (vital) लपून राहिलेला असतो. जेव्हा प्राण सहकार्य करण्यास संमती देतो – जी मुळातच खूप मोठी पायरी आहे – जेव्हा तो ठरवितो की तो सुद्धा काम करणार आहे, त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, तो काम पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे, तेव्हादेखील कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते – आपण त्याला काय म्हणू या? अशी एक अपेक्षा असते की, सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील. आणि ही अपेक्षाच प्रामाणिकपणाला पूर्णपणे झाकून टाकते. कारण ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक बाब असते आणि ती प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यावेळी तुम्हाला स्वत:चे दोष दिसत नाहीत.

परंतु, एखादी व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, ती जेव्हा एखादे अयोग्य काम करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे – आक्रमकपणे नव्हे तर, अगदी स्पष्टपणे, अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, “नाही, हे काम करता कामा नये.” आणि व्यक्तीमध्ये अजिबात आसक्ती नसेल तर व्यक्ती ती गोष्ट करणे लगेचच थांबविते, अगदी त्वरित ती ते काम थांबविते.

पण व्यक्तीला आसक्ती असते, अगदी निरपेक्ष कामाच्या बाबतीतसुद्धा आसक्ती असते, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. तुम्ही तुमचे जीवन अहंभावात्मक नसलेल्या अशा एका कार्यासाठी वाहून घेतलेले असते, परंतु तेथेही अहंकार असतोच असतो. आणि ते कार्य करण्याची तुमची स्वतःची एक खास, वैयक्तिक अशी पद्धत असते; आणि तुमच्या मनात एक आशा असते की, याचा परिणाम अमुक असा असा होईल, तुम्हाला त्यातून अमुक अमुक मिळेल, आणि मग ती गोष्ट अमुक प्रकारे पार पडेल. (मी इच्छा आकांक्षाबद्दल येथे बोलत नाहीये.) अमुक एखादे कार्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता, पण जे कार्य तुम्ही हाती घेतलेले असते, तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा बाळगत असता की, ते कार्य यशस्वी होईल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला व्यक्तिगत स्वतःला नव्हे, तर तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे, तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला यश लाभेल, अशी अपेक्षा तुम्ही बाळगत असता. त्यामुळे एखादी अगदी छोटीशी गोष्ट, खोलवर, तळाशी दडून बसते… परंतु तशी अपेक्षाच तुम्ही बाळगली नसती तर, जे करणे आवश्यक होते ते करण्यात कुचराई करताक्षणीच, आपण चूक करत आहोत हे तुमच्या लक्षात आले असते. तुम्हाला अगदी नेमकेपणाने त्याची जाणीव झाली असती. एका मिलिमिटरचा एक हजारांश भाग असावा इतके ते स्पंदन सूक्ष्म असते. हो, ते तिथे असते, आणि तेवढे पुरेसे असते, तुम्हाला जाणवते की, “माझी चूक झाली आहे.” आपल्याकडून कोणताही प्रमाद घडता कामा नये असे वाटण्यासाठी, तुमच्याकडे परिपूर्ण प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्याही प्रकारच्या भ्रमात जीवन जगण्यापेक्षा, असा प्रामाणिकपणा काहीही करू शकतो, अगदी काहीही सोडून देण्यास तयार असतो. परंतु हे अतिशय अवघड असते; त्यासाठी वेळ लागतो, पुष्कळ परिश्रम करावे लागतात.

तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता, तेव्हा नेहमीच तेथे मन आणि प्राण या दोन गोष्टी असतात, आणि त्या गोष्टी, तुम्ही जे जे काही करत असता त्यापासून काही ना काहीतरी लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असतात : वैयक्तिक समाधानाचा लाभ, आनंदीपणाचा लाभ, स्वतःबद्दलची जी चांगली प्रतिमा तुमच्या मनात असते तिच्या लाभासाठी, मन किंवा प्राण प्रयत्न करत असतात. स्वतःला न फसविणे हे खूप अवघड असते.

– श्रीमाताजी [CWM 05 : 54-55]

प्रामाणिकपणा – २०

तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य-असत्य यातील भेद जाणवेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांनाच तो सत्य मानू लागतो. जो दुष्ट प्रवृत्तीचा आहे तो त्याची अभीप्सा गमावून बसतो, साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. आकलन, संवेदना आणि साक्षात अनुभूतीच्या सर्व शक्यता तो गमावून बसतो. हीच शिक्षा असते.

असा माणूस स्वत:हून, स्वत: आणि ‘ईश्वर’ यांच्या दरम्यान अडथळे, आवरणे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेतो. ‘ईश्वर’ मागे सरत नाही तर, तो माणूसच स्वतःला ‘ईश्वरा’चा स्वीकार करण्यास अक्षम बनवितो. अशाप्रकारे, ‘ईश्वर’ हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस असे हे अजिबात काही नसते.

एखादी व्यक्ती जेव्हा अप्रामाणिक असते, जेव्हा व्यक्ती दुरिच्छा बाळगते, जेव्हा ती कृतघ्न असते तेव्हा अशी व्यक्ती तत्काळ स्वत:लाच शिक्षा करून घेत असते. अशी जी अप्रामाणिक माणसं असतात, त्यांच्याकडे जी काही थोडीफार चेतना शिल्लक असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. वास्तविक त्या चेतनेमुळेच आपण स्वत: दुष्ट आहोत हे त्यांना कळू शकले असते, पण आता ते ती चेतनाच गमावून बसलेले असतात. इतके की जणुकाही ते निश्चेतन (unconscious) असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी, त्यांना काहीच समजेनासे होते.

– श्रीमाताजी [CWM 05 : 21-22]

प्रामाणिकपणा – १९

(श्रीमाताजी येथे प्राणशक्तीच्या दुर्बलतेविषयी काही सांगत आहेत.)

प्राणशक्ती (vital power) दुर्बल असेल तर तुमची अभीप्साही दुर्बल असते. असे लक्षात घ्या की, दुर्बलता हाच एक प्रकारचा अप्रामाणिकपणा असतो, दुर्बलता ही व्यक्तीने स्वत:च स्वत:ला दिलेली एक सबब असते; कदाचित ती फार जाणीवपूर्वकपणे दिलेली असते असेही नाही, पण तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, अवचेतना (subconscient) हे असे एक स्थान आहे की, जेथे अप्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो. आणि “मला अमुक एक गोष्ट करायला आवडली असती, पण ती करणे मला शक्य नाही”, असे जी दुर्बलता म्हणते, ती दुर्बलता नसून, ती अप्रामाणिकता असते. कारण जर का एखादी व्यक्ती खरंच प्रामाणिक असेल तर ती व्यक्ती जे आज करू शकत नाही ते उद्या करू शकते, आणि जे ती उद्या करू शकणार नाही ते ती परवा करू शकते आणि असे कधीपर्यंत ? तर तिला ती गोष्ट करणे जमू लागते तोपर्यंत.

….सर्व प्रकारचे दुःखभोग, सर्व दुर्बलता, सर्व अक्षमता यांचे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, या साऱ्या गोष्टी म्हणजे अंतिमत: अप्रामाणिकताच असतात. अशी अनेक ठिकाणे असतात की, जेथे अप्रामाणिकता नांदू शकते आणि म्हणून ”मी अगदी प्रामाणिक आहे”, असे जी कोणी माणसं मला नेहमी सांगत असतात, त्यांनी तसे कधीही म्हणू नये. “मी कधीच खोटे बोललेलो नाही”, असे माणसे छातीठोकपणे सांगत असतात, तोही तसाच प्रकार आहे. तुम्ही जर खरोखरच पूर्ण प्रामाणिक असतात, तर तुम्ही ‘ईश्वर’च झाला असतात, तुम्ही खरोखर कधीच खोटे बोलला नसतात, तर तुम्ही साक्षात ‘सत्य’च बनला असतात. पण, प्रत्यक्षात तुम्ही ‘ईश्वर’ही नाही किंवा ‘सत्य’ही नाही (तत्त्वरूपाने तुम्ही तसे आहात पण वास्तवात तसे नाही.) असे असल्याने, ‘सत्य’ आणि प्रामाणिकपणा यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नेहमीच खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात असू द्या.

– श्रीमाताजी [CWM 04 : 252-253]

प्रामाणिकपणा – १८

सर्व प्रकारच्या अनुभवांची योग्यता ही व्यक्तीच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात आणि अद्भुत असे अनुभव रचतात आणि ते अशी कल्पना करू लागतात की, त्यांना तसे अनुभव (खरोखरच) आले आहेत. मी त्यांच्याबाबत येथे काही बोलू इच्छित नाही. पण जे लोक प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात त्यांच्याबद्दल सांगायचे तर, जेव्हा तुम्हाला ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती मिळते, त्याच्या उपस्थितीची जाणीव होते तेव्हा सर्व जगाने जरी सांगितले की, ‘तुमचा तो अनुभव खरा नाही’, तरी त्याने तुम्ही यत्किंचितही विचलित होत नाही.

– श्रीमाताजी [CWM 04 : 135]

प्रामाणिकपणा – १७

मी अनेकदा सांगत असते की, पूर्णपणे प्रामाणिक व्हा. स्वतःलादेखील फसविण्याचा कधीही प्रयत्न करू नका, स्वत:बद्दल असे कधीही म्हणू नका की, ‘मला जे जे करता येण्यासारखे होते ते सारेकाही मी केले आहे.’ उद्या जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत, तर त्याचा अर्थ असा होईल की, जे करण्यासारखे होते ते सारे तुम्ही केले नव्हते. कारण तुम्हाला जे जे करता येणे शक्य होते ते ते ‘सारे’ तुम्ही खरोखरच केले असते, तर तुम्हाला निश्चितच यश मिळाले असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 73-74]

प्रामाणिकपणा – १६

प्रश्न : प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता यांमध्ये काही फरक आहे का ?

श्रीमाताजी : हो, दोन भिन्न गोष्टींमध्ये नेहमीच फरक असतो. अर्थात, मला असे वाटते की, प्रामाणिक नसताना एकनिष्ठ असणे, आणि त्याच्या उलट, म्हणजे, एकनिष्ठ नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या एकनिष्ठ होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा एक प्रकारचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही एकनिष्ठता नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा येतो असे होत नाही, पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

प्रश्न : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी एकनिष्ठता ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, तसेच असते. एकनिष्ठतेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधांचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी एकनिष्ठता असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत असते. एखादी व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती पूर्ण प्रामाणिकपणाने वागू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. याला अपवाद असा की, एखादी व्यक्ती ईश्वरी ‘उपस्थिती’बाबत (divine Presence) आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे निवेदित असेल तर ती (एकटी असूनही) या ‘उपस्थिती’शी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी [CWM 15 : 299]

प्रामाणिकपणा – १५

तुम्ही जेव्हा पूर्णत: प्रामाणिक व्हाल, तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्यामध्ये पूर्णतः निर्भेळ असे काहीही नाही. मात्र तुम्ही तुमच्या सर्वोच्च चेतनेच्या प्रकाशात, स्वतःकडे स्वतःच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत, तर मग, तुमच्या प्रकृतीमधील जे काही काढून टाकायची तुमची इच्छा असेल ते नाहीसे होईल. अशा संपूर्ण प्रामाणिकपणासाठी प्रयत्न केला नाही तर एखादा दोष किंवा त्याची लहानशी पडछाया पुन्हा वर येण्यासाठी, योग्य संधीची वाट पहात एखाद्या कोपऱ्यात टपून बसेल.

मी येथे अशा प्राणाविषयी (vital) बोलत नाही की, जो ढोंगी आहे; तर मी केवळ मनाविषयी बोलत आहे. तुमच्या ठिकाणी एखादी लहानशी अप्रिय संवेदना किंवा थोडीशी जरी अस्वस्थता निर्माण झाली, तर पहा, तुमचे मन किती पटकन त्याविषयी अनुकूल स्पष्टीकरण देते! ते दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडते किंवा परिस्थितीला दोष देत बसते; ते म्हणते की, “मी जे काय केले ते योग्यच होते; आणि त्याला मी जबाबदार नाही वगैरे वगैरे.” …स्वत:ची किंवा दुसऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जर एखादे मूल अगदी लहानपणापासून स्वत:चे काळजीपूर्वक परीक्षण करू लागले, प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करू लागले, तर ते त्याच्या अंगवळणी पडेल आणि त्यामुळे त्याचा नंतरचा बराचसा संघर्ष वाचेल.

– श्रीमाताजी [CWM 15 : 298]

प्रामाणिकपणा – १४

(‘प्रामाणिकपणा’ कसा अतिशय आवश्यक असतो, हे मुलांना अगदी लहानपणापासूनच सांगण्याबाबत श्रीमाताजी आग्रही असत. त्याचे स्पष्टीकरण करताना, त्या म्हणतात…)

दुसऱ्यांपेक्षा चलाख कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण शिक्षणाच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत वाईट पद्धत आहे; कारण त्यामुळे खोटे बोलणे, फसविणे, ढोंग करणे आणि तत्सम अन्य गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. पण तुम्ही जर मुलांना वारंवार असे समजावून सांगितलेत की : मुलांनो, तुम्ही जर पूर्ण प्रामाणिक नसाल, म्हणजे केवळ दुसऱ्याशीच असे नव्हे, तर स्वत:शी सुद्धा पूर्णपणे प्रामाणिक राहिला नाहीत, स्वत:तील अपूर्णता व कमतरता झाकण्याचा केव्हाही प्रयत्न केलात, तर तुम्ही कधीच कोणतीही प्रगती करू शकणार नाही; कोणतीही प्रगती कधीच न करता, तुम्ही आज जसे आहात तसेच आयुष्यभर राहाल. तेव्हा तुम्हाला जर नुसत्या प्राथमिक अजाण अवस्थेतून बाहेर पडून विकसित होत जाणाऱ्या चेतनेत उन्नत व्हायचे असेल, तर त्यासाठीसुद्धा सर्वात महत्त्वाची, एकमेव महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा ही आहे. जर, करू नये अशी एखादी गोष्ट तुम्ही केली असेल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी कबूल केलीच पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी अयोग्य अशी ऊर्मी उठली असेल, तर तिच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही स्वत:ला सांगितले पाहिजे की, ‘हे चांगले नाही’ किंवा ‘हे घृणास्पद होते’, एवढेच नव्हे तर, ‘हे दुष्टपणाचे होते.’

– श्रीमाताजी [CWM 15 : 297-298]

प्रामाणिकपणा – १३

जो प्रामाणिकपणे ‘योगमार्गा’चे आचरण करतो त्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य व शांती लाभणे क्रमप्राप्तच असते. पण बहुसंख्य लोक असे असतात की, जे स्वत:लाच फसवतात; त्यांना असे वाटत असते की, ते ‘योगमार्गा’चे अनुसरण करत आहेत पण ते काही अंशीच साधना करत असतात आणि ते विरोधाभासाने भरलेले असतात.

*

मानसिक, प्राणिक वा शारीरिक आवडीनिवडी आणि पूर्वग्रहदूषित कल्पना या बाबी म्हणजे सर्वांगीण, परिपूर्ण प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे शत्रू असतात. या अडथळ्यांवर मात केलीच पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 70, 71]