Posts

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०८

पौर्वात्य लोकांपेक्षा पाश्चिमात्त्य लोकांसाठी योगसाधना अधिक धोकादायक असते असे काही नाही. तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते. जर योगसाधना तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवी असेल, स्वतःच्या वैयक्तिक हेतुंच्या पूर्ततेसाठी हवी असेल तर ती धोकादायक बनते. परंतु ईश्वराचा शोध घेणे हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून, एका पवित्र भावनेने तुम्ही जर योगसाधनेकडे वळलात तर, ती धोकादायक तर ठरत नाहीच, उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा, सुरक्षितता बनते.

जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर, शक्ती संपादन करून, योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा योगसाधनेमध्ये अडचणी आणि धोके निर्माण होतात. जर तुम्ही महत्त्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योगसाधनेला स्पर्शदेखील करू नका. मग ती आग आहे, ती सारे काही भस्मसात करून टाकेल.

… तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला सुरुवातच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार तरी शक्यता असू शकते पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही. जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 04-05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०७

व्यक्ती त्या ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते किंवा नाही यावरच पूर्णयोगामध्ये सारे काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल, आणि कितीही अडथळे आले तरी, उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याची धीरयुक्त इच्छा असेल तर, कोणत्या ना कोणत्या प्रकारे खुलेपण निश्चित येते. यासाठी जास्त वेळ लागेल की कमी ते मन, हृदय आणि शरीराची तयारी असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून असते. आणि म्हणून आवश्यक तो धीर व्यक्तीकडे नसेल तर, आरंभीच्या अडचणीमुळेच व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल अशी शक्यता असते. एकाग्र होणे, शक्यतो हृदयकेंद्रावर एकाग्र होणे आणि श्रीमाताजींनी अस्तित्वाचा स्वीकार करावा, म्हणून श्रीमाताजींच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तीद्वारे चेतनेमध्ये परिवर्तन घडून येणे, याव्यतिरिक्त या योगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. व्यक्ती मस्तककेंद्रावर किंवा भ्रूमध्यामध्येही एकाग्रता करू शकते परंतु बऱ्याच जणांसाठी येथील खुलेपण अधिक अवघड असते. जेव्हा मन निश्चल होते आणि जेव्हा एकाग्रता दृढ होते आणि जेव्हा अभीप्सा उत्कट होते, तेव्हा तेथे अनुभूतीचा प्रारंभ होतो. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम शीघ्र गतीने प्राप्त होण्याची शक्यता अधिक. इतर बाबींसाठी व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क आणि श्रीमाताजींच्या शक्तीप्रत व त्यांच्या उपस्थितीप्रत ग्रहणशीलता प्रस्थापित करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 107)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०६

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या मस्तकाच्या वरती असतो आणि एकदा का तुम्हाला त्याची जाणीव झाली की, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरते; आनंदरूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते दिव्य अस्तित्व अवतरते. जोपर्यंत तुमच्याकडे ही चेतना असत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या सर्वच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जे कोणते रूप येते वा जे तुम्हाला अगदी सहजसोपे, स्वाभाविक वाटते ते तुम्ही अवलंबावे. दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करा (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करा आणि तेथे त्यांना आवाहन करा. तुम्ही यांपैकी कोणतीही एक गोष्ट करू शकता किंवा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेळी करू शकता – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: प्रथम एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल (quiet) करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा निश्चल मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही अधीर बनता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो; तुमची चेतना सिद्ध होईपर्यंत तुम्हाला प्रयत्न चालू ठेवावे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०५

चेतना (consciousness) ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिक आंतरिक चेतनेमध्ये निवास करत, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे; ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरासाठी सज्ज होऊ शकेल आणि दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प आणि दिव्य प्रेम यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे या योगाचे ध्येय आहे. दुसरे ध्येय म्हणजे योगिक चेतना विकसित करणे – म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, विश्व-पुरुषाविषयी आणि वैश्विक शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि अधिमानसापर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ईश्वराशी एकत्व पावून राहणे. तिसरे ध्येय असे की, अधिमानसाच्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेच्या (supramental consciousness) माध्यमातून, विश्वातीत ईश्वराच्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 20)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४

येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये ईश्वराचे आविष्करण घडविणे आणि या जडभौतिकामध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे या योगमार्गाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना बहुतेकांना तर तो अशक्यच भासतो. सर्वसामान्य अज्ञ विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या योगमार्गाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती या मार्गाला नाकारतात आणि त्या शक्ती या योगमार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरले आहेत. जर तुम्ही हे ध्येय अगदी पूर्ण अंतःकरणाने स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच केवळ तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभवाच्या द्वारे सापडण्याची काही आशा असते.

या योगाची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबद्ध अशा मानसिक शिक्षणाने किंवा ध्यानधारणेच्या नेमून दिलेल्या प्रकारांच्या द्वारे, कोणत्याही मंत्रांनी किंवा तत्सम गोष्टींनी, प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या दिव्य प्रभावाप्रत स्वतःला खुले केल्याने, आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या दिव्य शक्तीप्रत आणि तिच्या कार्याप्रत स्वतःला खुले केल्याने, हृदयामध्ये असणाऱ्या दिव्य अस्तित्वाला खुले होत, आणि या साऱ्यांना ज्या ज्या गोष्टी परक्या असतील त्या साऱ्या गोष्टींना नकार दिल्याने ही साधना प्रगत होते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांच्या द्वारेच हे आत्मउन्मीलन (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19-20)

पूर्णयोगाची योगसूत्रे – ०३

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत व्हायला हवे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेल्या अधिकांश भागाविषयी आपण अजागरूक असतो. आणि या अजागरूकतेमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि ती अजागरूकताच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडवून आणण्यास प्रतिबंध करते. या अजागरूकतेच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात. तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत याचे तुम्ही ज्ञान करून घेतले पाहिजे. जे हेतू व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सारांश असा की, तुम्ही तुमच्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रितीने एकदा का तुम्ही जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की तुमच्या त्या ज्ञानानुसारच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, त्याच्या विरोधी असणाऱ्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल; संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, ‘निद्रारहित’ राहावे लागेल. दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 02)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३७

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील पूर्णयोग आपल्या कवेत घेतो; आणि त्यामुळे पूर्णयोग व्यक्तिगत मोक्ष किंवा व्यक्तिगत सुटका एवढ्यापुरताच मर्यादित राहू शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो; त्यामुळे त्याचे या विश्वातील दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 270)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३५

मर्यादित बहिर्मुख अहंभावाला हद्दपार करून, त्याच्या जागी प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता म्हणून ईश्वराला सिंहासनावर बसविणे, हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे. प्रथमतः वासनेचा वारसा रद्द करणे, आणि त्यानंतर, वासनाभोगाला आपल्या जीवनाचे शासन करण्यास संमती न देणे; असा ह्याचा अर्थ आहे. वासनेमधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळविणार नाही; तर सारभूत जीवनाचा एक नि:स्वार्थी शुद्ध आध्यात्मिक आनंद असतो, त्यामधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळवेल. वासनेचा शिक्का असलेली आपली जी प्राणिक प्रकृती आहे, केवळ तिलाच नवा जन्म, नवे रूपांतर आवश्यक आहे असे नाही, तर आपल्या मनोमय अस्तित्वाचाही नवा जन्म, नवे रूपांतर होणे आवश्यक आहे. आपला भेदमय, अहंप्रधान, मर्यादित, अज्ञानव्याप्त विचार व तशाच प्रकारची बुद्धी नष्ट झाली पाहिजे. त्यांच्या जागी छायाविरहित दिव्य प्रकाश, सर्वगामी निर्दोष प्रकाश प्रवाहित झाला पाहिजे; या प्रकाशाची वाढ होऊन शेवटी त्याची परिणती, चाचपडणारे अर्धसत्य आणि ठेचाळणारा प्रमाद यापासून मुक्त अशा स्वाभाविक स्वयंभू सत्य-जाणिवेमध्ये झाली पाहिजे. आपली गोंधळलेली आणि खजिल झालेली अहंभावकेंद्रित क्षुद्र हेतूंची इच्छा व कृती थांबली पाहिजे; आणि त्यांची जागा द्रुतगतीच्या समर्थ, सुबोध स्वयंचलित, ईश्वरप्रेरित, ईश्वरी मार्गदर्शन लाभलेल्या शक्तीने घेतली पाहिजे; ईश्वराच्या इच्छेशी आपली इच्छा स्वखुशीने संपूर्णपणे एकरूप झाली पाहिजे आणि मग ही आपली श्रेष्ठ, निर्व्यक्तिक, न अडखळणारी, निश्चयात्मक इच्छा आपल्या सर्व कार्यात पायाभूत होऊन सक्रिय झाली पाहिजे. आपल्या अहंभावप्रधान, पृष्ठवर्ती, असंतुष्ट, दुर्बल भावनांचा खेळ बंद झाला पाहिजे; आणि त्याच्या जागी स्वतःच्या संधीची वाट पाहात असणाऱ्या, गुप्त, खोल, व्यापक आंतरात्मिक हृदयाचा व्यापार सुरू झाला पाहिजे. ईश्वराचे स्थान असलेल्या या आंतरिक हृदयाने प्रेरित झालेल्या आपल्या भावना तेव्हा मग, दिव्य प्रेम व बहुविध आनंद यांच्या शांत, जोरकस दुहेरी व्यापारांमध्ये रुपांतरित होतील. दिव्य मानवता किंवा अतिमानसिक मानवजात कशी असेल त्याची ही व्याख्या आहे. ज्याच्यामध्ये असामान्य कोटीची वा परिशुद्ध अशी मानवी बुद्धी आणि मानवी कृती आहे, अशा तऱ्हेचा अतिमानव नव्हे तर, उपरोक्त स्वरूपाचा, लक्षणाचा अतिमानव, आमच्या योगाच्या द्वारा आम्ही विकसित करावा, अशी हाक आम्हाला आली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 90-91)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३४

 

आमचा योग-समन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा असण्यापेक्षा, मनोमय आत्मा आहे असे धरून चालतो; म्हणजेच मनाच्या पातळीवर मानव आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; आणि उच्चतर आध्यात्मिक शक्तीला आणि अस्तित्वाला स्वतः थेट खुला होत, मानव मनामधील आत्मशक्तीच्या योगे, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो, असे मानतो; त्या उच्चतर शक्तीने परिव्याप्त (Possessed) झालेला तो, स्वतःला परिपूर्ण बनवू शकतो आणि आपल्या समग्र प्रकृतीमध्ये या गोष्टी तो कृतीत उतरवू शकतो, अशी क्षमता मानवाकडे असते, असे आमचा समन्वय-योग मानतो. याप्रमाणे आमची दृष्टी असल्याने, आमचा प्रारंभिक जोर मनामध्ये असणाऱ्या आत्मशक्तीच्या उपयोगावर आहे; आत्म्याच्या कुलुपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली वापरून, ती कुलुपं उघडण्यावर आमचा भर आहे; तेव्हा आमच्या समन्वययोगात हठयोग-पद्धती उपयोगात आणावी लागत नाही; मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही. राजयोगपद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते. आध्यात्मिक शक्तीच्या आणि आध्यात्मिक अस्तित्वाच्या अधिकात अधिक विकसनाप्रत, सर्वांत जवळच्या मार्गाने जाऊन पोहोचावे आणि त्यायोगे दिव्य झालेली आणि मानवी जीवनाच्या सर्व प्रांतात जिचा अत्युच्च मुक्ताविष्कार असेल अशी प्रकृती असावी, अशी आमची स्फूर्तिदायक प्रेरणा आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-613)