Tag Archive for: तत्त्वज्ञान

अमृतवर्षा ०५

 

साधक : आम्हाला सदासर्वकाळ भौतिक परिस्थितीमध्ये अडकवून ठेवणाऱ्या शारीरिक चेतनेमधून आम्ही बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : त्यासाठी अनेक मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करायची म्हटले तर हाती काहीच लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांच्यापाशी परत येऊन पोहोचतो. यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला, ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग कधीच रूपांतरित होत नाही, तो तसाच शिल्लक राहतो. रूपांतरण करणे हा त्यांच्याकडे मार्गच नसतो, तर शरीराला नकार देऊन, त्या शरीरातून शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडणे हाच केवळ एक मार्ग त्यांच्याकडे असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला जे हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक चेतनेचे रूपांतरण हवे आहे, त्याला नकार देणे येथे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा ‘ईश्वरा’प्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक क्रियाकलापांचा व भौतिक चेतनेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर किंवा जडभौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

 

– श्रीमाताजी [CWM 08 : 299-300]

अमृतवर्षा ०२

 

चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. प्रथम आरोहण असते; तुम्ही जडभौतिक चेतनेमधून बाहेर पडून, उच्चतर चेतनेच्या श्रेणीमध्ये स्वत:चे उन्नयन करता. निम्नतर श्रेणीमधून उच्चतर श्रेणीमध्ये होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर श्रेणीमध्ये अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता, उन्नत होता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, किंवा रूपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे तुम्ही अवतरण घडवता.

आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकींशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर या गोष्टी आता एकत्रित येऊ लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला ‘चमत्कार, चमत्कार’ असे म्हणतात ते असे घडून येतात.

विश्व हे चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्या स्तराला लागू पडत नाहीत. ‘चमत्कार’ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानकपणे घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो.

त्या परिणामाला आपण ‘चमत्कार’ म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य कक्षेमधील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.

आपल्या जडभौतिक जगामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही असामान्य घटना नाही, किंबहुना अशा घटना या नित्याच्या असू शकतात;  आपल्याला त्या घटना पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.

 

– श्रीमाताजी [CWM 03 : 30-31]

अमृतवर्षा ०१

साधक : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा पूर्वनिर्धारित असते का ? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?

श्रीमाताजी : स्वाधीनता आणि प्रारब्ध (Freedom and fatality) स्वातंत्र्य आणि निश्चयवाद (liberty and determinism) या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.

चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नसते, तर ती खूप जटिल असते; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नसते; तर ती बहुआयामी असते. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ असते तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ असते आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या स्तरांच्या अगणित छटा असतात.

जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या स्तरावर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता; तुम्ही कर्मबंधांनी बद्ध झालेले असता, आणि तेथे जे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या लौकिक व्यापारांचे तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, प्रकृतीच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.

पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करत राहण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या सुकाणूचा तुम्ही ताबा घेऊ शकता.

एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही मुक्त आहात. तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त आहात. तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नव्हे, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदलसुद्धा घडवून आणू शकता.

एकदा का तुम्ही या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या स्तरावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाल करणारे राहात नाही तर तिची सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.

कर्माच्या चक्रातून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट असते. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे तुम्ही बाहेर पडता आणि एका निराळ्या स्तरावर चढून जाता; तेथे तुम्ही ‘उच्चतर नियती’च्या कार्याचे जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 29-30]

श्रीअरविंद बडोद्यामध्ये प्राध्यापक होते तेव्हा श्री. के. एम. तथा कन्हैयालाल मुन्शी हे त्यांचे विद्यार्थी होते. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना, मुन्शी यांनी श्रीअरविंदांना प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

 

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पवर्तराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक ‘सचेतन माता’ आहे असा भाव ठेवून तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा….

 

पुढील काळात याच कन्हैयालाल मुन्शी यांनी राष्ट्रभावनेतून ‘भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

 

‘भारत  – एक दर्शन’ ही मालिका येथे समाप्त होत आहे.

 

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे, आणि हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत.

 

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.

 

आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे.

 

– श्रीअरविंद [CWSA 01 : 413]

 

*

 

भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. भारत हा जगत्गुरू आहे. जगाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.

 

भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 13 : 353]

भारत – एक दर्शन ३१

भारत हा एकच असा देश आहे की, जेथे आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य चालू शकते आणि ते तसे चाललेच पाहिजे. आणि त्यासाठी सुयोग्य काळ आता येथे आला आहे.

…ज्या भारताकडे एकमेवाद्वितीय असा आध्यात्मिक वारसा आहे, त्या भारतासाठी – आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य प्रस्थापित होणे – ही एकमेव शक्य अशी मुक्ती असेल.

*

भारत हा आधुनिक मानवजातीच्या सर्व समस्यांचे प्रतिनिधित्व करणारा देश झाला आहे. भारत हाच पुनरुत्थानाची भूमी ठरेल – तो अधिक उन्नत आणि अधिक सत्य अशा जीवनाच्या पुनरुत्थानाची भूमी बनेल.

– श्रीमाताजी [CWM 13 : 370, 368]

भारत – एक दर्शन ३०

(अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश…)

विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांचा अगोदरच अंदाज बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा (सनातन धर्म, हिंदु धर्म) हा एकच धर्म आहे.

‘ईश्वरा’चे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ‘ईश्वरा’च्या सन्निध जाण्यासाठी मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.

‘ईश्वर’ हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ‘ईश्वरा’तच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ‘ईश्वरा’शिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हा असा एकच धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ याच सत्यावर भर देतो.

हा असा एकच धर्म आहे की जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करतो असे नाही तर, त्या सत्याची आपल्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आपल्याला सक्षम करतो.

हा असा एकच धर्म आहे की जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, (म्हणजे) जग ही ‘वासुदेवा’ची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.

हा असा एकमेव धर्म आहे की ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. या धर्माने आपल्यामधून मृत्युची वास्तविकताच सर्वथा पुसून टाकली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 11-12]

भारत – एक दर्शन २९

(अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश…)

भारताचा उदय व्हावा असे म्हटले जाईल तेव्हा ‘सनातन धर्मा’चा उदय होईल. भारत महान होईल असे जेव्हा म्हटले जाईल तेव्हा तेव्हा हा ‘सनातन धर्म’च महान होईल. भारताचा विस्तार होऊन, त्याची व्याप्ती वाढेल असे जेव्हा म्हटले जाईल तेव्हा त्याचा अर्थ हाच की, या ‘सनातन धर्मा’चा विस्तार होऊन, स्वयमेव त्याची व्याप्ती जगभर वाढेल. धर्माकरताच आणि धर्मामुळेच भारताचे अस्तित्व आहे.

आपण ज्याला ‘सनातन’, शाश्वत धर्म असे संबोधतो तो धर्म म्हणजे आहे तरी काय? तो हिंदुधर्मच आहे. तो धर्म हिंदु आहे याचे कारण हिंदु राष्ट्रामध्ये त्याचे जतन करण्यात आले आहे. समुद्र आणि हिमालय यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या या द्विपकल्पातच त्याचा उदय झाला आणि या प्राचीन पुण्यभूमीत त्याचे शतकानुशतके जतन करण्याची जबाबदारी आर्यांकडे देण्यात आली. पण कोणत्याही एका देशापुरताच तो सीमित असावा यासाठी तो मर्यादाबद्ध करण्यात आलेला नाही, तो जगाच्या अमुक एखाद्या नेमक्या ठरावीक भागाच्या मालकीचा नाही व सदा सर्वकाळासाठी तो त्यास बांधला गेलेला नाही. ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर सनातन धर्मच आहे. याचे कारण, तो असा एक विश्वात्मक धर्म आहे की ज्याने इतर सर्वांना कवेत घेतले आहे. एखादा धर्म विश्वात्मक नसेल तर तो शाश्वत असूच शकणार नाही. एखादा धर्म संकुचित असेल, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा असेल, तो मर्यादित स्वरूपाचा असेल तर, असा धर्म मर्यादित काळापर्यंतच टिकू शकेल; व ठरावीक हेतू अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहू शकेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 08 : 10-11]

भारत – एक दर्शन २८

वास्तविक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकता हीच एकमेव चिरस्थायी अशी एकता असते आणि टिकाऊ शरीर व बाह्य संघटन यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात चिकाटीयुक्त मन व आत्मचैतन्य यांमुळेच लोकसमूहाचा आत्मा टिकून राहत असतो. …प्राचीन राष्ट्रं, भारताच्या समकालीन असणारी काही राष्ट्रं आणि भारताच्या उदयानंतर उदयास आलेली अनेक राष्ट्रं आज मृतप्राय झालेली आहेत आणि आता त्यांचे केवळ अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. ग्रीस आणि इजिप्त ही राष्ट्रं आता केवळ नकाशापुरती शिल्लक राहिली आहेत, ती फक्त नावाने शिल्लक उरली आहेत….

रोमने मध्यसमुद्राच्या आसमंतांत राहणाऱ्या लोकांवर राजकीय आणि निव्वळ बाह्य सांस्कृतिक एकता लादली, पण त्याला त्या लोकांमध्ये जितीजागती आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकता निर्माण करता आली नाही. म्हणून पौर्वात्य राष्ट्रं पाश्चिमात्य राष्ट्रांपासून अलग झाली. रोमन लोकांचे आफ्रिकेवर काही काळ राज्य होते, त्या कालखंडाच्या कोणत्याही खाणाखुणा आफ्रिकेने शिल्लक ठेवल्या नाहीत, इतकेच नव्हे तर, आजही स्वतःला लॅटिन म्हणवणारी जी पाश्चिमात्य राष्ट्रं आहेत ती रानटी आक्रमकांचा जोरकस प्रतिकार करू शकली नाहीत; परकीय प्राणतत्त्वाचा संयोग होऊन त्यांचा पुनर्जन्म व्हावा लागला, आणि तेव्हा त्यातून आधुनिक काळामध्ये इटली, स्पेन आणि फ्रान्सचा उगम झाला.

परंतु भारत मात्र आजही जीवित आहे आणि प्राचीन भारताच्या आंतरिक मनाचे, आत्म्याचे आणि चैतन्याचे सातत्य त्याने आजही कायम ठेवले आहे.

भारतावर अनेक आक्रमणं झाली, परकीय सत्ता आल्या. ग्रीक, पार्थियन, हूण यांच्या स्वाऱ्या झाल्या; प्रबळ इस्लामांनी आक्रमण करून आपली सत्ता प्रस्थापित केली, भुईसपाट करणाऱ्या एखाद्या गाडीच्या अवजडपणासारख्या असलेल्या ब्रिटिश ताबेदारीने आणि ब्रिटिश यंत्रणेने भारताला व्यापून टाकले. पाश्चिमात्य राष्ट्रांचेही प्रचंड दडपण भारतावर आले, असे असूनसुद्धा भारताच्या शरीरामधून – वैदिक ऋषींनी भारताचा जो आत्मा घडविला होता – त्या प्राचीन आत्म्याला, कोणीही बाहेर हाकून देऊ शकले नाही किंवा चिरडून टाकू शकले नाही.

भारतावर आलेल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळी, प्रत्येक हल्ल्यामध्ये, परकीय वर्चस्वाच्या वेळी, प्रत्येक पावलागणिक, भारत प्रतिकार करून टिकून राहण्यात सक्षम ठरला; मग तो प्रतिकार सक्रिय असो अथवा अक्रिय असो. भारताचे जेव्हा चांगले वैभवाचे दिवस होते तेव्हा त्याच्या आध्यात्मिक एकतेमुळे आणि आत्मसात करण्याच्या आणि प्रतिसाद देण्याच्या शक्तीमुळे त्याला टिकून राहता आले, त्यावेळी जे काही सामावून घेण्यासारखे नव्हते ते सारे त्याने हद्दपार केले आणि जे हद्दपार करण्यासारखे नव्हते ते सारे त्याने आत्मसात केले. आणि अगदी त्याच्या अवनतीला आरंभ झाल्यानंतरही, भारत त्याच शक्तीमुळे टिकून राहिला, त्याचे हे सामर्थ्य अवनतीच्या काळात काहीसे कमी झाले परंतु ते नाहीसे करण्यासारखे नव्हते. भारताने तेव्हा माघार घेतली परंतु काही काळासाठी का होईना, पण दक्षिणेमध्ये स्वतःची प्राचीन राजकीय प्रणाली त्याने टिकवून ठेवली. इस्लामचे दडपण आले तेव्हा ते झुगारून देण्यासाठी आणि भारताचा प्राचीन आत्मा आणि त्याची संकल्पना यांचे रक्षण करण्यासाठी राजपूत, शीख आणि मराठा पुढे आले. जिथे सक्रिय प्रतिकार करणे शक्य नव्हते तेथे भारत, अक्रिय विरोध करत राहिला; भारताचे कोडे ज्याला उकलता आले नाही, किंवा भारताशी ज्याला मिळतेजुळते घेता आले नाही अशा प्रत्येक साम्राज्याच्या ह्रासाचा निषेध करत, भारत, नेहमीच आपल्या पुनरुज्जीवनाच्या दिवसाची वाट पाहत राहिला, (पण या सगळ्यामधूनही) तो टिकून राहू शकला. आजही आमच्या डोळ्यांसमोर हीच प्रक्रिया, अशीच घटना घडताना दिसत आहे.

जी सभ्यता (civilisation) हा चमत्कार सिद्धीस नेत आहे त्या सभ्यतेच्या, सर्वोत्तम प्राणशक्तीचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? आणि कोणत्याही बाह्य गोष्टींवर नव्हे तर, आत्मचैतन्यावर आणि आंतरिक मनाच्या आधारावर या सभ्यतेचा पाया रचण्याचे आणि आध्यात्मिक व सांस्कृतिक एकतेला, भारतीय जीवनवृक्षाचे केवळ क्षणभंगुर फूल न बनविता, त्याचे मूळ आणि खोड बनविणाऱ्या, नश्वर डोलाऱ्याचे रूप नव्हे तर, शाश्वत आधार बनविणाऱ्या प्रज्ञेचे कौतुक कसे वर्णावे?

– श्रीअरविंद [CWSA 20 : 430-431]

भारत – एक दर्शन २७

‘धर्माची भारतीय संकल्पना’ ही महाभारताची मुख्य प्रेरणा आहे. अंधकार, भेद व मिथ्यत्व यांच्या शक्ती आणि सत्य, प्रकाश, ऐक्य यांच्या देवदेवता यांच्यामधील संघर्षाची जी ‘वैदिक’ संकल्पना आहे ती संकल्पना येथे आध्यात्मिक, धार्मिक आणि आंतरिक स्तरावरून, बाह्यवर्ती पातळीवर – बौद्धिक, नैतिक आणि प्राणिक पातळीवर आणण्यात आलेली आहे.

येथे कथानकाने एकाच वेळी वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाचे दुहेरी रूप धारण केलेले आहे. वैयक्तिक पातळीवरील संघर्षाचा विचार करता, येथे एकीकडे भारतीय धर्माचे महत्तर नैतिक आदर्श ज्यांच्यामध्ये मूर्त झालेले आहेत अशी प्रातिनिधिक आणि नमुनेदार व्यक्तिमत्त्वं आहेत आणि दुसऱ्या बाजूला आसुरी अहंकार, स्वार्थमूलक इच्छा आणि धर्माचा दुरूपयोग यांची जणू प्रकट रूपंच असावीत अशी व्यक्तिमत्त्वं आहेत. या वैयक्तिक संघर्षाची परिणती राजकीय युद्धामध्ये होते. धर्माच्या आणि न्यायाच्या नव्या राजवटीच्या प्रस्थापनेने या आंतरराष्ट्रीय महा-संघर्षाची परिसमाप्ती होते, झगडा करणाऱ्या दोन वंशांना संघटित करणाऱ्या धर्मराज्यामध्ये, किंबहुना धर्मसाम्राज्यामध्ये त्याची परिसमाप्ती होते. राजेरजवाडे आणि अमीरउमरावांच्या महत्त्वाकांक्षी उद्दामपणाच्या जागी, न्यायी आणि मानवतावादी साम्राज्याचे प्रभुत्व, स्थिरता आणि शांती यांची प्रस्थापना होते. ‘देव’ आणि ‘असुर’ यांचा जुनाच संघर्ष येथे चित्रित करण्यात आलेला आलेला आहे पण येथे तो मानवी जीवनाच्या परिभाषेमध्ये मांडण्यात आलेला आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 347-348]