फेब्रुवारी १९५४

भारताचे आणि जगाचे संरक्षण करण्यासाठी सामंजस्यपूर्ण इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान यांच्या आधारे घडण झालेल्या एका सशक्त बांधणी असलेल्या समूहाची आवश्यकता आहे. जगामध्ये भारतच सत्याचे आगमन घडवून आणू शकतो. पाश्चात्त्यांच्या भौतिकवादाचे अनुकरण करून नव्हे तर, केवळ ईश्वरी संकल्प आणि शक्ती यांच्या आविष्करणानेच भारत जगाला स्वत:चा संदेश देऊ शकतो. ईश्वरी संकल्पाचे अनुसरण केल्यास, भारत आध्यात्मिक पर्वतराजींच्या शिखरावर विराजमान होऊ शकतो आणि जगाला सत्याचा मार्ग दाखवून, जागतिक एकात्मतेचे संघटन करू शकतो.

*

केवळ ‘दिव्य शक्ती’च भारताला साहाय्य करू शकते. तुम्ही जर देशामध्ये श्रद्धा आणि सामंजस्य निर्माण करू शकलात तर कोणत्याही मानव-निर्मित शक्तीपेक्षा ती गोष्ट अधिक शक्तिशाली असेल.

– श्रीमाताजी (CWM 13 : 353)

 

ऑक्टोबर १९४८

प्रामाणिक, धैर्यवान, सहिष्णू आणि सत्त्वनिष्ठ राहून तुम्ही तुमच्या देशाची सर्वोत्तम सेवा करू शकता. भारताला जगामधील महान आणि एकमेवाद्वितीय देश बनविण्यासाठी प्रयत्नशील राहा.

*

२३ ऑगस्ट १९५१

भारताच्या चैतन्यमय आत्म्याच्या कृपाशीर्वादाने आणि साहाय्याने, भारताला नजीकच्या भविष्यकाळात, त्याच्या गतवैभवाचा पुनर्लाभ होवो.

*

फेब्रुवारी १९५४

जगाच्या कल्याणासाठी भारताचे रक्षण झालेच पाहिजे. कारण एकटा भारत देशच या जगाला शांतीकडे आणि एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे घेऊन जाऊ शकतो.

– श्रीमाताजी (CWM 13 : 352-353)

 

दि.०३.०६.१९४७

(भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबेटन यांनी ०२ जून १९४७ रोजी रेडिओवरून एक भाषण दिले होते. त्यामध्ये भारत-पाकिस्तान फाळणीचा आणि भारताच्या काही विशिष्ट प्रांतांची हिंदू व मुस्लीम राज्यांमध्ये विभागणी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हे प्रसारण ऐकल्यानंतर श्रीमाताजींनी पुढील उद्गार काढले होते.)

भारताच्या स्वातंत्र्याची सुव्यवस्था लावण्याबाबत आपल्या ज्या अडचणी आहेत त्यावर तोडगा म्हणून एक प्रस्ताव आपल्यासमोर ठेवण्यात आला आहे आणि खेदाने व जड अंतःकरणाने भारतीय नेत्यांकडून तो स्वीकारला गेला आहे.

परंतु (नियतीकडून) आपल्यासमोर हा प्रस्ताव का ठेवण्यात आला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तर, आपल्या भांडणतंट्यांमधील निरर्थकता कळावी म्हणून हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

आपल्याला हा प्रस्ताव स्वीकारणे का भाग पडले, हे तुम्हाला माहीत आहे का? कारण आपल्या भांडणतंट्यांमधील निरर्थकता आपली आपल्यालाच कळावी म्हणून, आपल्याला हा प्रस्ताव स्वीकारणे भाग पडले आहे.

हे उघडच आहे की, हा काही उपाय असू शकत नाही. ही परीक्षा नाही, तर अग्निपरीक्षा आहे. आपण जर आपल्या पूर्ण प्रामाणिकतेनिशी त्या परीक्षेस सामोरे गेलो तर एक गोष्ट सिद्ध होईल की, भारताचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करून आपण त्याची एकता आणि महानता संपादन करू शकणार नाही; एकमेकांच्या विरोधात उभे ठाकून आपण समृद्धी संपादन करू शकणार नाही; किंवा एका सिद्धान्तांच्या विरोधात दुसरा सिद्धान्त मांडून, आपण सत्यधर्माची सेवा करू शकणार नाही. काहीही असले तरी, भारताचा आत्मा एकसंध आहे. एकात्म आणि अखंड भारताविषयी बोलण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु तोपर्यंत आपण “भारताचा आत्मा चिरायू होवो,” असा उद्घोष करत राहू या.

*

दि. ०६.०६.१९४७

भारताचा आत्मा एक आहे आणि अविभाज्य आहे. भारत जगातील स्वत:च्या नियतकार्याबाबत सचेत आहे. पण तो आविष्करणाच्या बाह्य माध्यमांची वाट पाहात आहे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 351)

 

 

(सन १९१८)

सध्याचा काळ असा आहे की जेव्हा, अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याचा पुढील मार्ग शतकासाठी म्हणून आत्ताच दमदारपणाने निर्धारित केला जात आहे. हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत. आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे. आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात अगदी उघडपणाने ‘नियतीच्या स्वामी‌’चे झुकते माप पडावे.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 413)

 

(सन १९१०)

खरी अडचण ही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नसते; तर ती नेहमी आपल्यामध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्षता आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. आपल्यामध्ये पारतंत्र्यातून सुटका करून घेण्याची इच्छा असू शकते, पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परम मोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा आपल्याकडे अभाव असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, आपण त्यांचा अवलंब हा आपल्या कार्यफलाच्या तीव्र आसक्तीला चिकटून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईत जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, (स्वतःला बंधमुक्त करण्याच्या) अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, पूर्वी कधीही ज्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले नव्हते त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती‌’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. येथेच साधनेची आवश्यकता असते.

ईश्वर‌ आपल्या अंतरंगामध्येच आहे. सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ ‘शक्ती‌’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वरा‌चे आणि आपले स्वरूप मूलतः एकच आहे. आपण जर त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सोपा होतो.

इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ईश्वरी इच्छा असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थी, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने असे म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला म्हणू शकता, ये आणि तुम्ही तसे म्हटल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे श्रद्धा या शब्दाचा अर्थ, खरंतर, परिपूर्ण श्रद्धेसहित ईश्वरी संकल्प असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला ज्ञात असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असते आणि ईश्वरी‌ संकल्प काय आहेत हे ती जाणते. आणि तिला हे ज्ञात असते की, ईश्वरा‌ची जी इच्छा आहे तसेच घडणे आवश्यक असते. अंध असलेली श्रद्धा नव्हे पण आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणणारी श्रद्धा ही सर्वज्ञ बनू शकते.

इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि ती स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह, तात्पुरत्या किंवा चिरस्थायी स्वरूपात त्या सर्वांना प्रदान करू शकते. एखाद्या एकांतवासात राहणाऱ्या माणसाने निःस्वार्थी आणि निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यास, त्याचा विचार हा राष्ट्राचा विचार बनू शकतो. एका वीराची इच्छा ही लाखो भ्याड लोकांच्या हृदयामध्ये धैर्य निर्माण करू शकते.

हीच साधना आपण सिद्धीस नेली पाहिजे. आपल्या मोक्षाची ही पूर्वअट आहे. आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित अपरिपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हालविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते साध्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वरा‌च्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

 

डिसेंबर १९०९

देशभूमी ही आपली माता आहे या दृष्टीचा अभाव असणे हा आपला मुख्य अडथळा आहे. …‘भारतमाते’ची अखंड प्रतिमा अजूनही साकार व्हायची आहे.

आम्ही (तत्कालीन) काँग्रेसमध्ये ज्या ‘भारतमाते’चे स्तुतिगान करायचो, आराधना करायचो ती पाश्चात्त्य पेहरावातील, ब्रिटिश राजवटीच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली एक दासी होती, ती काल्पनिक मूर्ती होती, ती अदिव्य (undivine) असा भ्रम होती. खरंतर ती आमची माता नव्हती. पण त्यावेळीही, एका निगूढ, धूसर अशा अंधारात लपून असलेली आमची ‘खरी माता’च आमचा आत्मा व आमचे अंत:करण वेधून घेत असे.

ज्या दिवशी आपण भारतमातेच्या खऱ्या अखंड स्वरूपाचे दर्शन घेऊ शकू, जेव्हा तिच्या प्रभेने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवनं तिच्या सेवेमध्ये मोठ्या हिरीरीने समर्पित करू, तेव्हा हा अडथळा दूर होईल आणि तेव्हा भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद मग आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. ‘हिंदू-मुस्लीम’ संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ‘माता’ या स्वरूपात देशाचे दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांवर मात करावी ही आस आम्हाला पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे ओलांडण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती ‘भारतमाते’च्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची! पण, खऱ्याखुऱ्या दर्शनाऐवजी त्याच्या आभासालाच भुलून, जर का आपण केवळ हिंदुंची माता किंवा फक्त हिंदू राष्ट्रवाद ही कल्पना जोपासली तर आपण पुन्हा एकदा त्याच जुन्या चुकांच्या भक्ष्यस्थानी पडू आणि (खऱ्या) ‘राष्ट्रवादा’च्या पूर्ण उन्मीलनापासून स्वत:ला वंचित ठेवू.

– श्रीअरविंद (CWSA 09 : 225-226)

 

(दि.०६.११.१९०९)

एकेकाळी भारतीय एकता आणि सहिष्णुता यांच्याकडे कल असणारी मोगल सत्ता पुढे जेव्हा दडपशाही करणारी आणि विघातक अशी बनली तेव्हा ती उलथून टाकणे हे राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट होते आणि तेव्हा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आणि रामदास स्वामी यांच्या काळात हिंदू राष्ट्रीयत्वाला काही एक अर्थ होता. हे त्याकाळी शक्य होते कारण भारत तेव्हा स्वत:च एक जग असल्यासारखा होता आणि महाराष्ट्र व राजपुताना, हे दोन भौगोलिक प्रांत पूर्णत: हिंदू होते, त्यांनी यास भक्कम पाया पुरविला होता. ते आवश्यकही होते कारण मोगलांनी त्यांच्या सत्तेचा जो गैरवापर केला होता तो भारताच्या भवितव्यासाठी घातक होता आणि त्यांना दंडित करून, हिंदू सत्ता आणि पुनरुत्थान यांच्या आधारे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकताच होती. ते आवश्यक होते आणि शक्यही होते त्यामुळे ते अस्तित्वात आले.

परंतु आधुनिक काळातील परिस्थिती विचारात घेता, भारत हा एकसंधपणेच अस्तित्वात राहू शकतो. एखाद्या राष्ट्राचे अस्तित्व हे त्याच्या भौगोलिक सीमांवर आणि भौगोलिक एकसंधतेवर, एक विशिष्ट, स्वतंत्र राष्ट्र असण्यावर अवलंबून असते. वंश, भाषा, धर्म, इतिहास यांमधील भेद हे अखेरीस भौगोलिक वेगळेपणाच्या अस्तित्वात निश्चितच विराम पावतील. ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये असेच झालेले आहे. भारतातदेखील असेच होईल. परंतु भौगोलिक एकसंधतादेखील आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देश इतका एकसंध असला पाहिजे की परस्परांतील संवाद आणि केंद्र-शासनाचे संघटन सोपे झाले पाहिजे, किमान ते अवघड तरी होता कामा नये. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 08 : 304)

 

(दि.०६.११.१९०९)

हिंदू धर्मीयांना एकत्रित आणण्यासाठी केवळ दोनच गोष्टी समर्थ आहेत. त्या पुढीलप्रमाणे –
• एक अशी नवी आध्यात्मिक प्रेरणा की जी, वेदान्तावर आधारलेली असेल, जी मानवाच्या मूलभूत एकत्वावर भर देणारी असेल, जी संस्थांचे नश्वर व उपयुक्ततावादी स्वरूप ओळखून असेल, तसेच जी बंधुता, स्वातंत्र्य, समानता यांच्या भव्यदिव्य आदर्शांवर उभारलेली असेल आणि जिला भारतीय वंश तसेच हिंदू आध्यात्मिक संकल्पना व साधना यांच्या महान कार्याची आणि उज्ज्वल भवितव्याची जाण असेल.
• किंवा दुसरी गोष्ट म्हणजे समाजाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी सर्व हिंदुंना संघटित करू शकेल अशी एक पुरेशी जोमदार राजकीय लाट.

– श्रीअरविंद (CWSA 08 : 302-303)

 

(दि. १९.०६.१९०९)

आपण एका बाबतीत खात्री बाळगली पाहिजे, ती बाब अशी की हिंदू-मुस्लीम ऐक्य हे कोणत्याही राजकीय तडजोडींनी किंवा राजकीय पक्षाने केलेल्या अनुनयाने घडून येणार नाही. ते ऐक्य अगदी मुळाशी जाऊन, हृदय आणि मनामध्ये शोधले पाहिजे; कारण जिथे त्यांच्यातील दुहीची कारणे रुजलेली आहेत, तिथेच त्यावरील उपायदेखील शोधले पाहिजेत.

अशा समस्या सोडविण्याचे प्रयत्न करताना आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की, गैरसमज हेच आपल्या आपापसातील मतभेदांचे मुख्य कारण आहे. आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, प्रेमामधून प्रेम उदयाला येते आणि शक्तीच बलवानांना शांत करू शकते. परस्परांचा अधिक चांगला परिचय करून घेऊन त्याद्वारे आणि सहानुभूतीद्वारे या गैरसमजांची कारणे दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. एखाद्या देशभक्ताचे अढळ प्रेम आपण आपल्या मुस्लिम बांधवालाही देऊ केले पाहिजे; तसे करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याच्याही अंत:करणामध्ये नारायणाचा अधिवास आहे आणि आपल्या (भारत)मातेने तिच्या वक्षस्थळी त्यालासुद्धा कायमस्वरूपी जागा देऊ केली आहे. मात्र खोटेपणाने किंवा स्वार्थी दुर्बलतेमुळे आणि भित्रटपणामुळे त्याच्याशी संपर्क साधणे किंवा त्याचा अनुनय करणे आपण टाळले पाहिजे. अडचणीशी सामना करण्याचा हा एकमेव व्यवहार्य मार्ग आहे असा आमचा विश्वास आहे.

– श्रीअरविंद (CWSA 08 : 31)

 

(दि. १९.०६.१९०९)

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठले पाहिजे; आणि मानवता आता ज्याकडे वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामदायक सुखसोयींच्या सेवेत जुंपून या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच या समस्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान आवश्यक असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. या कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करत आहे…”

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26-27)