Tag Archive for: ईश्वरी कृपा

ईश्वरी कृपा – १५

व्यक्ती अज्ञानामध्ये जीवन जगत असते तोवर नियती या शब्दाचा काटेकोर अर्थ, व्यक्तिच्या बाह्य अस्तित्वालाच लागू पडतो. आम्ही ज्याला नियती म्हणतो ती म्हणजे वस्तुतः एक परिणाम असतो. जिवाने गतकाळात जी प्रकृती आणि ज्या उर्जांचा संचय केलेला असतो, त्यांचे एकमेकांवर जे कार्य चालू असते त्यांचा, आणि त्या ऊर्जा ज्या सद्यकालीन प्रयत्नांचा व त्यांच्या भावी परिणामांचा निर्णय करत असतात त्यांचा, तसेच व्यक्तिची सद्यकालीन स्थिती या साऱ्याचा तो परिणाम असतो. पण व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करते त्याच क्षणी, या जुन्या पूर्वनियोजित नियतीची पिछेहाट व्हायला सुरुवात होते. आणि तिथे एका नवीनच घटकाचा म्हणजे ईश्वरी कृपेचा, कर्मशक्तिपेक्षा भिन्न असणाऱ्या उच्चतर ईश्वरी शक्तिच्या साहाय्याचा प्रवेश होतो; ही कृपा साधकाला त्याच्या प्रकृतिच्या सद्यकालीन संभाव्यतांच्या पलीकडे उचलून घेऊ शकते. अशा वेळी, त्या जिवाची आध्यात्मिक नियती म्हणजे ईश्वरी निवड असते, जी भविष्याबद्दल आश्वस्त करते. या मार्गावरील चढउतार आणि ते ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ, एवढीच काय ती शंका असते. आणि इथेच, भूतकालीन प्रकृतिच्या दुर्बलतांशी खेळणाऱ्या विरोधी शक्ती, प्रगतिची गती रोखण्यासाठी आणि प्रगतिची परिपूर्ती पुढे ढकलण्यासाठी आटापिटा करत असतात. जे अपयशी ठरतात ते या प्राणिक शक्तिंच्या हल्ल्यांमुळे अपयशी ठरतात असे नव्हे, तर ते स्वतःहून विरोधी शक्तिंची बाजू घेतात आणि आध्यात्मिक सिद्धिंपेक्षा ते प्राणिक आकांक्षेला किंवा इच्छेला (आकांक्षा, फुशारकी, लोभ इ. गोष्टींना) अधिक प्राधान्य देतात, हे त्यामागचे कारण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 509-510)

ईश्वरी कृपा – १४

“खरोखरच, ईश्वरच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर एखाद्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या नाहीत तर त्याच्या सर्व चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो.”
— श्रीमाताजी

(आपल्या ह्या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी एके ठिकाणी म्हणतात की,)

“व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. एखादी व्यक्ती जेव्हा चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचा तिच्या जीवनात काही ना काही परिणाम होत असतोच, ते कर्म संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची ताकद असते; पण यासाठी व्यक्तिने त्याच दोषाची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनिश्चित काळपर्यंत करत राहील आणि ईश्वरी ‘कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनिश्चित काळपर्यंत करत राहील, असे व्यक्तिने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नाही. भूतकाळाचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही, इतका भूतकाळ पुसला जाऊ शकतो, शुद्ध केला जाऊ शकतो. मात्र एक अट आहे – व्यक्तीने तो भूतकाळ पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढून आणता कामा नये, या एकाच अटीवर तो विशुद्ध केला जाऊ शकतो. तुम्ही स्वतःहूनच तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनिश्चित काळपर्यंत निर्माण करत राहता कामा नये.”

– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)

ईश्वरी कृपा – ११

मनाच्या पलीकडे, ‘ईश्वरी कृपे’वरील श्रद्धाच आपल्याला सर्व अग्निपरीक्षांमधून बाहेर पडण्याचे, आपल्या सर्व दुर्बलतांवर मात करण्याचे सामर्थ्य देते आणि ती श्रद्धाच आपला दिव्य चेतनेशी संपर्क करून देते, ही ‘दिव्य चेतना’ आपल्याला केवळ शांती आणि आनंदच देत नाही तर, शारीरिक संतुलन आणि उत्तम आरोग्यसुद्धा प्रदान करते, ही सारी शिकवण आपल्याला देण्यासाठीच जीवनातील सर्व परिस्थिती घडविण्यात आलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 320)

ईश्वरी कृपा – १०

(तुम्ही केलेल्या धाव्याला ईश्वरी कृपेने प्रतिसाद दिला आणि नंतर ईश्वरी कृपेमुळे आपण संकटातून, अडचणीमधून बाहेर पडलो हे विसरलात तर काय होते, त्याबद्दल श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोवर तुम्हाला वाटत असते तोवर, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.

प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच धक्क्या-चपेट्यांची संख्या वाढते आणि ते आघात कधी कधी अधिक भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा मोडीत काढण्याचा तो एकमेव मार्ग असतो; याप्रकारे आपत्तींचे स्पष्टीकरण करता येते. फक्त जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितिमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितिला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हा तुमच्यातील मूर्खपणा काही अंशाने का होईना नाहीसा होतो. पण तो अगदी काही अंशाने जरी नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये काहीतरी शिल्लक राहतेच. आणि म्हणूनच या साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपण अस्तित्वातच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तिला खोल अंतःकरणात जाण येण्यासाठी, जीवनामध्ये कितीतरी धक्केचपेटे आवश्यक असतात. आणि ज्या क्षणी व्यक्तिला या गोष्टीची जाण येते तेव्हा सारे (दुःखभोग) संपलेले असतात, साऱ्या अडचणी नाहीशा झालेल्या असतात. व्यक्तिला हे पूर्णपणे कळावे लागते आणि त्याला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहता कामा नये… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये असताना व्यक्तीला देवाची आठवण होते, अशी व्यक्ती देवाचा धावा करते, त्या परिस्थितीमधून सोडवावे म्हणून त्याची प्रार्थना करते, ‘ईश्वरी कृपा’ व्हावी अशी तिला आस असते. आणि कधीकधी ‘ईश्वरी कृपा’ घडूनही येते. पण ती केव्हा झाली, कशी झाली, कृपा झाली म्हणजे नेमके काय झाले, व्यक्तीने अशा वेळी काय करायला हवे, तिचा दृष्टिकोन कसा असावा? किंवा कृपा व्हावी म्हणून काय करायला हवे, याची तिला जाण नसते. कृपा होणे म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे सारे काही होणे अशी व्यक्तीची समजूत असते, त्यामध्ये कितपत तथ्य आहे, या साऱ्याचा मागोवा श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांच्या आधारे घेण्याचा आपण उद्यापासून प्रयत्न करणार आहोत.

तसेच एकंदर विश्वसंचालनामध्ये ‘ईश्वरी कृपे’चे कार्य कसे चालते, तेही आपण येथे समजावून घेणार आहोत. सामान्य जीवन ज्या कर्मसिद्धान्ताच्या नियमानुसार चालल्यासारखे दिसते, त्या सिद्धान्ताच्या वर ‘ईश्वरी कृपा’ असते, आणि तिच्यामध्ये गतकर्मांच्या बंधनांचा निरास करण्याची क्षमता असते, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या वचनांच्या आधारे, ‘ईश्वरी कृपा’ म्हणजे नेमके काय ते आपण समजावून घेऊ. उद्यापासून ‘ईश्वरी कृपा’ ही मालिका सुरु करत आहोत. धन्यवाद…

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

मानसिक परिपूर्णत्व – १७

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)

ईश्वरी कृपेविषयी कोणतीच शंका घेण्याचे कारण नाही. जर माणूस प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत पोहोचेलच, हे म्हणणेही अगदी खरे आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तो अगदी लगेचच, सहजपणे, कोणताही विलंब न लागता पोहोचेल. इथेच तुमची चूक होत आहे. तुम्ही देवासाठी पाच वर्षे, सहा वर्षे, अमुक इतकी वर्षे असा कालावधी नेमून देत आहात आणि अजूनपर्यंत कोणताच परिणाम दिसत नाही म्हणून त्याविषयी शंका घेत आहात. एखादी व्यक्ती ही तिच्या गाभ्यामध्ये प्रामाणिक असू शकते आणि तरीही तिच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्या गोष्टींमध्ये, साक्षात्कार होण्यापूर्वी परिवर्तन घडविण्याची आवश्यकता असते. व्यक्ती तिच्या प्रामाणिकपणामुळे नेहमीच चिकाटी बाळगण्यास सक्षम झाली पाहिजे. कारण ईश्वरासाठीची तळमळच अशी असते की, जी कशामुळेही मावळू शकत नाही. विलंबामुळे, निराशेमुळे, कोणत्याही अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे ही इच्छा मावळता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 116-117)

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने शोधायचा, तो मार्ग अभीप्सेच्या (Aspiration) आधारे शोधावयास हवा; विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा यांच्या माध्यमातून शोधावयास हवा.

जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो.

अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट बनते. ती मांडणी कमी अधिक तंतोतंत असू शकते.

…ती मांडणी तुमच्यासाठी चांगली आहे, हेच केवळ महत्त्वाचे आहे. ती कशीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील जेव्हा तुम्ही ती इतरांवर लादू पाहता तेव्हाच ती मिथ्या बनते…

मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत पण प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:चा आक्रमिला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल करावयास हवी.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 407)