प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक साक्षात्कार
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.
‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान माणसं ज्यांना अगदीच नगण्य समजतात अशा अनेक व्यक्तींना ईश्वरी कृपेमुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना किंवा फारशी मानसिक शक्ती नसताना किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना किंवा त्यांच्या व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांना एकाएकी किंवा अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते आणि त्यांनी अभीप्सा बाळगली होती.
ही आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांचा एवढा ऊहापोह का केला जातो, किंवा इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.
‘सामर्थ्य’, जर ते आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती ‘प्रामाणिकपणा’मध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती त्या सगळ्यातून पार होतेच, हे मी आजवर अनेकदा सांगितले आहे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)
- ईश्वराबरोबरचे नाते - September 24, 2026
- चैत्य पुरुष आणि मन, प्राण व शरीर यातील संबंध - September 23, 2026
- भक्तीचे विविध प्रकार - September 22, 2026





