हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस.
तुम्ही जर अगदी तळमळीने ईश्वराला म्हणाल, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ईश्वर अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल. तुमच्या अस्तित्वातील कोणतातरी एखादा भाग जेव्हा म्हणतो की, ‘हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस.’ अशा वेळी तुमच्या त्या अभीप्सेमुळे काय होते? तर, तो तुम्हाला त्याचे अस्तित्व कळू देणार नाही, तो तुम्हाला दिसणारसुद्धा नाही, पण तो येईल. तुम्हाला त्याची पुसटशी चाहूलदेखील लागणार नाही पण तो सर्व परिस्थितीची अशा रितीने रचना करेल की, तुम्ही पूर्णपणे ईश्वराचे होण्यामध्ये ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या गोष्टी अगदी अपरिहार्यपणे तो तुमच्या मार्गामधून काढून टाकेल.
पण मग अशा रितीने तुमच्यापासून सर्व गोष्टी बाजूला केल्या गेल्यामुळे, तुम्ही आक्रोश करू लागता, तक्रार करू लागता. पण नंतर, तुम्ही खरोखरच प्रामाणिक असाल आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन, जर थेटपणे स्वतःकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्हीच कधी काळी ईश्वराला म्हटले होते, ‘मला फक्त तूच हवा आहेस.’ आता तो तुमच्या सन्निध असेल पण बाकी सारे नाहीसे झालेले असेल. ही खरोखरच एक उच्चतर ईश्वरी कृपा असते. अट एकच असते, तुम्ही ते तसे अगदी खात्रीने, विश्वासाने मागितले पाहिजे.
तुम्ही ते अगदी समग्रपणे म्हटले पाहिजे असेही मी म्हणत नाहीये. कारण जर एखादी व्यक्ती खरोखरच अशा रितीने समग्रपणे ‘मला फक्त ईश्वरच हवा आहे,’ असे म्हणेल तर तिचा सर्व कार्यभागच पूर्ण झालेला असतो. आवश्यकता असते ती तुमच्या अस्तित्वाच्या एखाद्या भागाने, खरंतर, तुमच्या केंद्रवर्ती संकल्पाने, ‘मला फक्त ईश्वरच हवा,’ असे अगदी खात्रीने म्हणण्याची! व्यक्तीने एकदा जरी असे प्रामाणिकपणे म्हटले असेल तर ते तेवढे पुरेसे असते. अर्थात या सर्व गोष्टींना कमी अधिक कालावधी लागतो. कधीकधी तर त्याला अनेक वर्षं लागतात पण व्यक्ती ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतेच.
• श्रीमाताजी (CWM 06 : 176–177)
- हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस. - May 14, 2026
- प्रामाणिक अभीप्सेचा परिस्थितीवर होणारा परिणाम - May 13, 2026
- प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक अनुभव - May 11, 2026





