आत्मसाक्षात्कार – १५
साधक : आम्ही जेव्हा कोणताही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारू लागते आणि एवढ्या-तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि परिणामी सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सुटका कशी करून घ्यायची?
श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असतो, निरीक्षण करत असतो. आणि मग कधीकधी तो गर्वाने फुलून जातो. तेव्हा साहजिकच, आपल्या प्रयत्नांमधील सामर्थ्य पुष्कळ प्रमाणात कमी होते.
काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्तीला स्वत:चे निरीक्षण करण्याची सवय असते. स्वत:चे निरीक्षण केलेच पाहिजे; परंतु त्याहूनही अधिक आवश्यक असते ते संपूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा व सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी सहजस्वाभाविक असली पाहिजे; म्हणजे व्यक्तीने सतत स्वत:चे निरीक्षण करत राहणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करत राहणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, स्वत:वरच खुश होऊन स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट, तितकीच ही गोष्टदेखील वाईट असते; या दोन्हीही गोष्टी सारख्याच घातक असतात.
व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये; जणू काही ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.
…व्यक्ती जेव्हा स्व-केंद्रित राहात नाही, ती म्हणजे काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार असत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात, ती स्वत:च एक अभीप्सा बनून जाते तेव्हा, ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा अभीप्सा बाळगणारी व्यक्ती म्हणूनसुद्धा ती शिल्लक राहत नाही, तर ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव अभीप्साच बनून जाते आणि जेव्हा अशी व्यक्ती संपूर्ण एकाग्र अशा आवेगाने (ईश्वराप्रत) झेपावते तेव्हा ती खरोखरच खूप प्रगत होते. अन्यथा, नेहमीच एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, क्षुद्र आत्मप्रौढी आणि स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीमध्ये शिरकाव होतो आणि सारे काही बिघडून जाते. अवघड असते हे सारे!
– श्रीमाताजी (CWM 06 : 402)







