Tag Archive for: अतिमानस

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘अधिमानस’ आणि ‘अतिमानस’ यातील फरक स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात, पृथ्वी-रूपांतरणाचे एक आगळेवेगळे कार्य हे श्रीअरविंदांचे मुख्य कार्य आहे. मनाच्या वर चेतनायुक्त जिवाचे अनेकानेक स्तर आहेत, त्यामध्येच जे खरे दिव्य विश्व आहे, ज्याला श्रीअरविंदांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ते सत्याचे विश्व आहे. परंतु त्या दरम्यान (पृथ्वी आणि अतिमानसिक विश्व यांच्या दरम्यान) ज्याला त्यांनी ‘अधिमानस’ (Overmind) म्हणून ओळखले होते ते वैश्विक देवदेवतांचे जगत आहे. आत्तापर्यंत आपल्या विश्वाचे शासन या ‘अधिमानसा’ने केले होते. स्वतःच्या प्रदीप्त अशा चेतनेमध्ये मनुष्याला अधिमानसाचीच प्राप्ती करून घेता येणे शक्य झाले होते. आणि तेच परमोच्च दिव्य आहे असे समजण्यात येत होते आणि आजवर जे कोणी तेथवर जाऊन पोहोचले होते त्यांच्या मनात, त्यांनी सत्य-चैतन्याला स्पर्श केला आहे, याविषयी तीळमात्रही शंका नव्हती. कारण सामान्य मानवी चेतनेच्या दृष्टीने याचे (अधिमानसाचे) वैभव एवढे महान असते, ते एवढे चमकदार असते की, त्यामुळे आपण अंतिमतः शिखरस्थानी असणाऱ्या सत्याप्रत पोहोचलो आहोत असे मानण्यास ते मनुष्याला प्रवृत्त करते. तथापि वास्तव हे आहे की ‘अधिमानस’ हे अस्सल ‘दिव्यत्वा’च्या पुष्कळ खाली आहे. ते सत्याचे खरेखुरे धाम नाही. तर इतिहासाच्या आरंभापासून माणसं ज्यांच्यापुढे नतमस्तक होत आली आहेत अशा पूर्वसुरींचे, सर्व सर्जक शक्तींचे आणि सर्व देवदेवतांचे ते क्षेत्र आहे. पण अस्सल दिव्यत्व आजवर आविष्कृत झालेले नाही आणि त्याने या पृथ्वी-प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविलेले नाही. याचे कारण हेच की, आजवर ‘अधिमानसा’लाच ‘अतिमानस’ म्हणून समजण्याची चूक झाली. वैश्विक देवदेवता सत्य-चेतनेमध्ये पूर्णतः वसती करत नाहीत : तर त्या केवळ त्या ‘सत्य-चेतने’च्या संपर्कात असतात आणि त्या देवदेवता त्या वैभवाच्या प्रत्येकी एकेका पैलूचे प्रतिनिधित्व करत असतात.

….’अधिमानसा’मध्ये मानवतेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता नसते आणि ती त्याच्याकडे असूही शकत नाही. त्यासाठी, ‘अतिमानस’ हेच एकमेव प्रभावी मध्यस्थ आहे. आणि येथेच आमचा योग (पूर्णयोग) हा जीवनाचे आध्यात्मिकीकरण करू पाहणाऱ्या भूतकाळातील इतर प्रयत्नांपेक्षा वेगळा ठरतो. कारण ‘अधिमानसा’चे वैभव हे सर्वोच्च वास्तव नाही तर, मन आणि अस्सल ‘दिव्यत्व’ या दोहोंच्या दरम्यानची ती केवळ एक पायरी आहे, हे आमचा योग (पूर्णयोग) जाणतो. (क्रमश:)

विचार शलाका – ३०

चेतना ही एखाद्या शिडीसारखी असते. प्रत्येक युगामध्ये असा एखादा महान जीव असतो की, जो या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्यासाठी आणि आजवर सामान्य चेतना जेथवर जाऊन पोहोचू शकली नाही तेथवर जाण्यासाठी समर्थ असतो. उच्च अवस्था प्राप्त करून घेऊन, जडभौतिक चेतनेपासून पूर्णतः विलग होऊन जायचे असेही शक्य असते. पण मग तेव्हा व्यक्ती या शिडीचा भाग राहात नाही. परंतु, जडभौतिकाशी संपर्क न गमावता, या शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालण्याची क्षमता हीच, विश्वातल्या महान युगामधील महान उपलब्धी राहिलेली आहे. म्हणजे, ‘सर्वोच्च’ अवस्थेपर्यंत जायचे आणि त्याच वेळी, विविध पातळ्यांवरील, परस्परांमधील संबंध एक प्रकारच्या रिक्तपणाने तोडून न टाकता, सर्वोच्चाचा धागा तळागाळाशीदेखील जोडून ठेवायचा.

अशा रीतीने वर आणि खाली जाणे आणि तळाचे सर्वोच्चाशी ऐक्य घडवून आणणे हेच साक्षात्काराचे पूर्ण रहस्य आहे आणि हेच ‘अवतारा’चे कार्य असते. प्रत्येक वेळी जेव्हा तो अशा रीतीने शिडीमध्ये एका नवीन पायरीची भर घालतो तेव्हा या पृथ्वीवर एक नवीन निर्मिती घडून येते.

श्रीअरविंदांनी ज्याला ‘अतिमानस’ (Supramental) असे संबोधले आहे त्या नवीन पायरीची भर त्यांनी घातली आहे. त्याचा परिणाम म्हणून, चेतना ही अतिमानसिक जगामध्ये प्रवेश करू शकेल आणि तरीही ती स्वतःचे वैयक्तिक रूप, तिची पृथगात्मकता (individualization) टिकवून ठेवू शकेल आणि एका नवीन निर्मितीच्या प्रस्थापनेसाठी खाली अवतरू शकेल. अर्थातच ही काही अंतिम निर्मिती असणार नाही, कारण जीवाच्या या पुढच्याही अधिक श्रेणी असतात. परंतु सध्या तरी आम्ही ही अतिमानसिक चेतना अवतरीत व्हावी म्हणून कार्यरत आहोत. त्याचा परिणाम म्हणून या जगाची पुनर्रचना होईल, या विश्वामध्ये सत्य दिव्य व्यवस्था पुन्हा एकवार परतेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 178-179)

विचार शलाका – १६

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामधील आपल्या जन्माचे गुप्त सत्य असेल तर, आजचा मनुष्य हा त्या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे आणि ते केवळ साधनभूत आहे. मन हे चेतनेचा केवळ एक मधला टप्पा आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि मनुष्य जर का अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

पण मनाच्या अतीत असणाऱ्या गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनुष्याच्याच मनाची क्षमता असेल तर मग त्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानव तत्त्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्याच्या उत्क्रांतीसाठी आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

अतिमानसिक देह

जे अतिमानसिक शरीर येथे अस्तित्वात आणायचे आहे त्या शरीराची हलकेपणा (lightness), अनुकूलनशीलता (adaptability), विकासानुगामित्व (plasticity) आणि प्रकाशमानता (luminosity), ही चार गुणवैशिष्ट्ये असतील.

जेव्हा शरीर हे सर्वांगांने दिव्य होईल तेव्हा जणू काही असे वाटेल की, ते हवेमधून चालत आहे, त्यामध्ये कोणतेही जडत्व किंवा तमस किंवा अचेतनता असणार नाही.

त्याच्या अनुकूलनशीलतेच्या शक्तीला कोणतीच मर्यादा असणार नाही. त्याला ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये ठेवण्यात येईल, ती परिस्थिती त्याच्याकडून जी मागणी करेल त्या मागणीशी ते लगेचच स्वतःला अनुकूल करून घेईल; नेहमी जसे आत्म्याला जडत्व (जडभौतिक शरीर) हे लोढणे म्हणून वागवावे लागते तसे आता करावे लागणार नाही; कारण त्या शरीरातील पूर्ण चैतन्य हे जडत्व आणि अक्षमता या गोष्टींना पूर्ण हद्दपार करेल.

शरीरावर आघात करू पाहणाऱ्या प्रत्येक विरोधी शक्तीच्या हल्ल्याचा सामना करण्यास अतिमानसिक विकासानुगामित्व त्या शरीरास सक्षम बनविते. शरीर त्या हल्ल्याचा प्रतिकार दुबळेपणाने करणार नाही; उलट, ते शरीर एवढे लवचिक, लवलवीत असेल की विरोधी शक्तीला निघून जाण्यासाठी वाट मोकळी करून देऊन, ते त्या शक्तीलाच शून्यवत करून टाकेल. त्यामुळे त्याला कोणतेही हानीकारक परिणाम सहन करावे लागणार नाहीत आणि अगदी प्राणघातक हल्लेदेखील त्याला कोणतीही हानी न पोहोचवता निघून जातील.

आणि अंततः ते शरीर दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ अशा व्यक्तींनाच नव्हे; तर अगदी सामान्य माणसालादेखील ही प्रभा जाणवेल. अगदी हरएक व्यक्तीसाठी ती गोष्ट उघड सत्य असेल, अगदी शंकेखोर माणसाची सुद्धा ज्यामुळे खात्री पटेल असा तो रूपांतरणाचा स्थायी पुरावा असेल.

देहाचे रूपांतरण हा सर्वोच्च आध्यात्मिक पुनर्जन्म असेल – हे रूपांतर म्हणजे सामान्य गतकाळ पूर्णतया नाहीसा होणे असेल. कारण सातत्याने आपले आधीचे सहसंबंध आणि आधीची परिस्थिती झुगारून देत, प्रत्येक नव्या क्षणी जणू नव्यानेच जीवन सुरू केल्याप्रमाणे वाटचाल करत राहणे म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय. आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, प्रकृतीच्या कार्य आणि कारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा, त्या सगळ्या चुका, सगळे गुन्हे, सगळे दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात, रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला चिकटून बसलेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात. हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात पाडू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो. आपल्याला आपल्या भूतकाळाच्या अतीत व्हायचे असेल, आपल्याला तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याचा प्रतिकार करायचा असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही. अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या चेतनेच्या प्रदीप्त अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ईश्वराशी एकत्व पावलेले असतो आणि कर्माच्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य जाणिवेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (Psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु जो आत्मा सदासर्वदा ईश्वराप्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन नित्य नवीन स्वरुपात पुन्हा एकदा सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते, असा सदोदित अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 175-177)

शारीरिक परिवर्तन

…तुमच्या शरीराची घडण कशी झाली? सर्व अवयव, सर्व कार्ये यांची घडण ही अगदी प्राण्यांच्या पद्धतीने झाली. तुम्ही पूर्णतः अवलंबून असता : तुमचे हृदय सेकंदाच्या हजाराव्या भागाइतका वेळ जरी बंद पडले तरी सगळे संपते, तुम्ही मरण पावता. सर्व गोष्टी चालू असतात आणि त्या आपोआप चालू असतात, तुमच्या जागृत इच्छेविना चालू असतात (आणि ते चांगलेच आहे, कारण जर तुम्हाला या साऱ्या कारभारावर देखरेख करावी लागली असती तर, तो सारा कारभार केव्हाच चुकीच्या दिशेने गेला असता.) तेव्हा सारे काही चालू असते. प्रत्येक गोष्ट आवश्यक असते कारण प्रत्येक गोष्ट त्याच पद्धतीने सुनियोजित करण्यात आली आहे. इंद्रियाशिवाय तुम्ही कार्य करू शकत नाही, निदान पूर्णतः तरी करू शकत नाही; त्याचे प्रतिनिधित्व करणारे असे तुमच्यामध्ये काहीतरी असावे लागते.

रूपांतरामध्ये हे अध्याहृत आहे की, या सगळ्या पूर्णत: शारीरिक व्यवस्थेची जागा ही ठरावीक प्रकारच्या विविध स्पंदनांनी युक्त अशा शक्तिसंचयाच्या व्यवस्थेने घेतली जाईल; प्रत्येक इंद्रिय-अवयवाची जागा, जागृत इच्छाशक्तिद्वारे संचालित होणाऱ्या आणि उच्चतर प्रांतामधून, वरून येणाऱ्या प्रक्रियेने जिला दिशा मिळत असते अशा एका जागृत शक्तिकेंद्राने घेतली जाईल. तेव्हा मग पोट, हृदय या गोष्टीच असणार नाहीत, रक्ताभिसरण नाही, फुफ्फुसे नाहीत… या साऱ्या गोष्टी नाहीशा होतील. हे सर्व इंद्रिय-अवयव ज्याचे प्रतीक असतात त्या गोष्टींचे प्रतिनिधित्व या स्पंदनांच्या पूर्ण संचाद्वारे केले जाईल आणि हे संच त्या अवयवांची जागा घेतील. कारण हे इंद्रिय-अवयव म्हणजे शक्तिकेंद्रांची केवळ भौतिक प्रतीके असतात; त्यांना मूलभूत अशी वास्तविकता नसते; तर या गोष्टी विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या शक्तिकेंद्रांना एक विशिष्ट रूप किंवा एक आधार पुरवितात. तेव्हा मग हे रूपांतरित शरीर या खऱ्या शक्तिकेंद्रांमार्फत कार्य करू लागेल. त्यामुळे, प्राण्यांच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे इंद्रिय-अवयव हे शक्तिकेंद्रांची प्रतीके म्हणून विकसित झाले होते, त्या प्रतीकात्मक प्रतिनिधींच्या मार्फत कार्य करण्याची गरज रूपांतरित शरीराला आता उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 58-59)

अमर्त्यत्व समजून घेताना

अमर्त्यत्व या शब्दाबद्दल काही गैरसमज आहेत आणि हे समज काही नवीन नाहीत; हे गैरसमज वारंवार होताना आढळतात. अमर्त्यत्वाविषयी जेव्हा कोणी बोलतो तेव्हा बहुतेक सगळ्यांना शरीराचे अस्तित्व अनंत काळ टिकून राहणार असे वाटते.

पहिली गोष्ट म्हणजे, शरीर अनंत काळपर्यंत तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा, त्याला त्याच्या अमर्त्य आत्म्याविषयी पूर्ण जाणीव होते आणि ते त्या आत्म्याशी एकत्व पावते, शरीर त्याच्याशी इतके तादात्म्य पावते की, शरीरालासुद्धा आत्म्यासमान क्षमता प्राप्त होते, सातत्यपूर्ण रूपांतरणाचे तसेच गुण प्राप्त होतात ज्यामुळे शरीरसुद्धा वैश्विक गतिविधीचे अनुसरण करण्याइतपत सक्षम होते. शरीर जर टिकून राहायचे असेल तर त्यासाठी ही अगदी पूर्णपणे अनिवार्य अशी गोष्ट आहे. कारण शरीर हे कठीण (rigid) असते, कारण ते गतिविधींचे अनुसरण करत नाही, वैश्विक उत्क्रांतीशी सातत्याने तादात्म्य पावण्यासाठी स्वतःमध्ये जे त्वरेने रूपांतरण घडवून आणले पाहिजे तसे ते करू शकत नाही, त्याचे विघटन होते आणि ते नष्ट होते. त्याचा अडेलतट्टूपणा, त्याचे काठिण्य, त्याची स्वतःचे रूपांतरण करण्याची अक्षमता या गोष्टींमुळेच त्याचा विनाश आवश्यक होऊन बसतो, त्यामुळे त्याचे मूलद्रव्य (substance) हे भौतिक मूलद्रव्यांच्या सर्वसाधारण प्रांतामध्ये परत जाऊन मिसळू शकते; ज्यामुळे त्या शरीराची पुन्हा नव्या रूपांमध्ये पुनर्घडण होऊ शकते आणि अशा प्रकारे ते पुढील प्रगती करायला सक्षम होते. पण सहसा, जेव्हा कोणी अमर्त्यत्वाविषयी बोलतो, तेव्हा माणसं शारीरिक अमर्त्यत्वाचाच विचार करतात – ते अजूनपर्यंत साध्य झालेले नाही, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

शारीरिक अमर्त्यत्व शक्य आहे असे श्रीअरविंद सांगतात आणि ते असेही सांगतात की, असे अमर्त्यत्व घडून येईल; परंतु ते त्यासाठी एक अट घालतात, ती अशी की, त्यासाठी शरीराचे अतिमानसिकीकरण (supramentalised) झाले पाहिजे, त्याच्यामध्ये अतिमानसिक जिवाचे काही गुण तरी असले पाहिजेत, विकासानुगामित्व (plasticity) आणि सातत्यपूर्ण रूपांतर हे ते गुण आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 28-29)

शारीरिक अमर्त्यत्वाचे सार

चेतनेमधील परिवर्तन ही आवश्यक गोष्ट आहे आणि त्याशिवाय कोणतीही शारीरिक सिद्धी मिळणे शक्य नाही. शरीर जर आहे तसेच राहिले, ते जर मृत्युचे, रोगाचे, क्षय, वेदना, अचेतनता आणि अज्ञानाच्या साऱ्या परिणामांचे गुलाम बनून राहिले, तर अतिमानसिक परिवर्तनाचे पूर्णत्व शक्य नाही. ह्या गोष्टी जर राहणारच असतील तर अतिमानसाच्या अवतरणाची (Descent of the Supramental) काहीच आवश्यकता नाही कारण ईश्वराबरोबर मानसिक व आध्यात्मिकरित्या एकत्व साध्य करण्यासाठी आवश्यक असे चेतनेमधील परिवर्तन घडण्यासाठी, केवळ अधिमानस (The Overmind) पुरेसे आहे, इतकेच काय उच्च मन (The Higher Mind) देखील पुरेसे आहे. मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये ‘सत्या’चे गतिशील कार्य घडून येण्यासाठी अतिमानसिक अवतरण आवश्यक आहे. याचा अंतिम परिणाम म्हणून देहामधून अचेतनता नाहीशी होणे अंतर्भूत असेल; असे शरीर मग ऱ्हास आणि आजाराच्या अधीन राहणार नाही. ज्या सर्वसामान्य प्रक्रियांमुळे मृत्यु ओढवतो त्या प्रक्रियांच्याही अधीन शरीर राहणार नाही, असा याचा अर्थ होतो. शरीरामध्ये परिवर्तन घडवून आणायचे झाले तर, त्या शरीरामध्ये निवास करणाऱ्या रहिवाशाची तशी इच्छा असली पाहिजे. हे शारीरिक अमर्त्यत्वाचे सार असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310)

प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव,त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल.

मानवाला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक जाणिवेमध्ये जगणारा मानव हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, सत्य-चेतना प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी मानवाला सांगितले. ही सत्यचेतना, जिला ते ‘अतिमानस’ (SupraMental consciousness) असे संबोधत असत, ती चेतना स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 116)

एकत्व – ०२

 

आपण जर एखाद्या धार्मिक संघटनेचे उदाहरण घेतले – तर त्या संघाचे प्रतीक म्हणजे मठासारख्या वास्तुरचना, एकसमान पोषाख, एकसमान उपक्रम, एकसमान हालचालीसुद्धा असतात. मी अधिक स्पष्ट करून सांगते. प्रत्येकजण एकसारखाच गणवेश परिधान करेल, प्रत्येक जण सकाळी ठरावीक वेळीच उठेल, एकसारख्याच प्रकारचे अन्नग्रहण करेल, एकत्रितपणे येऊन समानच प्रार्थना करतील इ. ह्याला एक सर्वसाधारण अशी एकसमानता म्हणता येईल. आणि साहजिकपणेच, आंतरिकदृष्ट्या तेथे जाणिवांचा गोंधळ आढळून येतो, कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने वागत असतो. ही अशी एकरूपता जी विश्वास आणि विशिष्ट मतप्रणालीवर आधारित असते ती, सर्वस्वी ‘आभासी एकरूपता’ असते.

माणसांमध्ये ही अशी सामूहिकता नेहमी पाहावयास मिळते. समूहाने एकत्र यायचे, संबंधित राहायचे, एखाद्या समान आदर्शाभोवती, समान कृतीभोवती, समान साक्षात्काराभोवती एकसंघ राहावयाचे पण हे सारे काहीशा कृत्रिम पद्धतीने चालते. याउलट, श्रीअरविंद येथे खराखुरा समुदाय काय असतो ते सांगत आहेत – त्याला त्यांनी ‘विज्ञान वा अतिमानसिक समुदाय’ असे म्हटले आहे – असा हा समुदाय त्यातील प्रत्येक घटकाच्या आंतरिक साक्षात्काराच्या पायावरच उभा राहू शकतो. त्यातील प्रत्येक घटक हा त्या समुदायातील इतर घटकांबरोबरच्या खऱ्याखुऱ्या, मूर्त अशा एकात्मतेसाठी, एकरूपतेसाठी झटत असतो. म्हणजे असे की, समुदायातील इतर सर्व घटकांशी या ना त्या प्रकारे एखादा घटक जोडला गेलेला आहे, असे नव्हे; तर, त्यातील प्रत्येक घटक हा इतरांशी आंतरिकरित्या, सगळेजण म्हणजे जणू एकच आहेत ह्या पद्धतीने जोडलेला असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी इतर घटक हे जणूकाही त्याच्या स्वतःच्या शरीराप्रमाणेच असतील, केवळ मानसिकरित्या, कृत्रिमपणाने नाही तर, एका आंतरिक साक्षात्काराद्वारा, चेतनेच्या वास्तविकतेच्या द्वारे देखील ते तसेच असतील.

म्हणजे, ही अतिमानसिक सामुदायिकता प्रत्यक्षात उतरविण्याची आशा बाळगण्यापूर्वी, आधी प्रत्येक व्यक्तीने विज्ञानमय अस्तित्व बनावयास हवे किंवा किमान ते बनण्याकडे वाटचाल तरी केली पाहिजे. हे तर उघडच आहे की, व्यक्तिगत कार्य हे आधी पुढे गेले पाहिजे आणि सामुदायिक कार्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे होते की, कोणत्याही अमुक एखाद्या इच्छेच्या हस्तक्षेपाविनाही, सहजगत्या, व्यक्तिगत प्रगती ही समुहाच्या अवस्थेमुळे नियंत्रित केली जाते, रोखली जाते. व्यक्ती आणि समाज ह्यांच्यामध्ये परस्परावलंबित्व असते आणि व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरीही, व्यक्ती त्यापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही. आणि अगदी एखाद्या व्यक्तीने, ह्या पूर्णयोगात जरी स्वतःला पार्थिव आणि मानवी जाणिवेच्या स्थितीच्या अतीत होऊन, मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरीही, किमान अवचेतनेमध्ये तरी, ती व्यक्ती समूहाच्या स्थितीमुळे बांधली जाते, समूहाची स्थिती एखाद्या रोधकाप्रमाणे काम करते आणि खरंतर ती मागे खेचते. व्यक्तीने कितीही वेगाने जाण्याचा प्रयत्न केला तरी, सर्व आसक्ती आणि जबाबदाऱ्यांचे ओझे टाकून देण्याचा प्रयत्न केला तरी, अगदी काहीही असले तरीसुद्धा, अगदी एखादी व्यक्ती शिखरस्थानी असली तरीसुद्धा आणि उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये ती सर्वात पुढे असली तरीसुद्धा, सर्वांच्या साक्षात्कारावर, या पृथ्वीनिवासी समुदायाच्या स्थितीवर त्याचा साक्षात्कार अवलंबून असतो. आणि यामुळे खरोखरच व्यक्ती मागे खेचली जाते. इतकी मागे खेचली जाते की, जे घडवून आणायचे आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी, या पृथ्वीची तयारी होण्यासाठी, कधीकधी व्यक्तीला शतकानुशतके देखील थांबावे लागते.

म्हणूनच श्रीअरविंद असे म्हणतात, दुहेरी प्रक्रिया आवश्यक आहे. व्यक्तीच्या प्रगतीचे आणि साक्षात्काराचे प्रयत्न हे समग्र समुहाच्या उत्थानाच्या प्रयत्नांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत, कारण व्यक्तीच्या महत्तर प्रगतीसाठी ते आवश्यक आहे. त्याला सामुहिक प्रगती असे म्हणता येईल, ह्या प्रगतीमुळे व्यक्तीला अजून एक पाऊल पुढे टाकणे शक्य होईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 141-42)

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, या पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामध्ये आपल्या (मनुष्याच्या) जन्म घेण्याचे गुप्त सत्य असेल तर, आज आहे तसा मनुष्य हा या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. आणि मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे; व ते केवळ साधनभूत आहे. चेतनेची केवळ एक मधली पायरी म्हणजे मन आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि जर का मनुष्य अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

परंतु मनाच्या अतीत असणाऱ्या अशा गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनाचीच क्षमता असेल तर मग मनुष्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानत्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्या उत्क्रांतीला आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)