Tag Archive for: अतिमानस

(उदयाला येऊ घातलेल्या अतिमानवाच्या आगमनाच्या तयारीविषयी जपानमधील स्त्रियांसमोर, श्रीमाताजी बोलत आहेत. गर्भवती स्त्रियांनी कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे त्या सांगत आहेत.)

अतिमानव जन्माला यावयाचा आहे आणि तो स्त्रीच्या उदरातूनच जन्माला येणार, हे निर्विवाद सत्य आहे; पण म्हणून या सत्याविषयी केवळ अभिमान बाळगणे पुरेसे नाही; तर त्याचा अर्थ काय, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यामधून आपल्यावर काय जबाबदारी येते, ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे आणि आपल्यावर जे कार्य सोपविण्यात आले आहे, ते आपण अत्यंत जीव तोडून करावयास शिकले पाहिजे.

सध्याच्या विश्वव्यापक कार्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, सद्यकालीन गोंधळाचे आणि अंधकाराचे, प्रकाश आणि सुसंवादामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माध्यमे कोणती असतील ? आणि किमान हे ढोबळमानाने तरी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

…एका नवीनच आध्यात्मिक प्रकाशाचे, आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या कोणत्यातरी दिव्य शक्तीचे या पृथ्वीवर आविष्करण होणार आहे; ईश्वरासंबंधीचा एक सर्वस्वी नवीन विचार, या विश्वामध्ये अवतरणार आहे आणि इथे एक नवीनच आकार जन्माला येणार आहे. आणि इथेच आपण, ‘खऱ्याखुऱ्या मातृत्वाची आपली जबाबदारी’ या आपल्या आरंभीच्या मुद्द्याकडे येतो.

कारण या नवीन आकारातूनच, पृथ्वीची सद्यकालीन स्थिती परिवर्तित करण्यासाठी, सक्षम असणारी आध्यात्मिक शक्ती आविष्कृत होणार आहे. हा नवीन आकार, हे नवीन रूप एक स्त्री घडविणार नाही तर दुसरे कोण?

… ज्यांच्याविषयी आपण ऐकलेले असते, वा ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असते, अशा कितीही का थोर व्यक्ती असेनात, त्यांच्यासारख्या किंवा त्यांच्याही पेक्षा थोर, अधिक विख्यात, सिद्ध आणि प्रतिभावान अशी व्यक्ती वा मानव घडविणे हे आता पुरेसे नाही; तर, जी परमोच्च शक्यता आजवरच्या मानवाची सर्व परिमाणं आणि वैशिष्ट्य ओलांडून, अतिमानवाला जन्म देणार आहे; त्या परमोच्च शक्यतेच्या संपर्कात येण्यासाठी, आपण आपल्या मनाने, आपल्या विचाराच्या आणि इच्छेच्या सातत्यपूर्ण अभीप्सेद्वारे, धडपडले पाहिजे.

काहीतरी पूर्णत: नवीन, आजवर कल्पनाही केली नव्हती, असे काही नवेच निर्माण करण्याची एक आस या प्रकृतीला पुन्हा एकवार लागली आहे आणि तिच्यामधील ह्या आवेगालाच आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि तिचे आज्ञापालन केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 160-161)

श्रीमाताजी : अतिमानस चेतनेला मानवी चेतनेमध्ये प्रवेश करून, स्वत:चे आविष्करण करता येणे शक्य व्हावे, ह्यासाठी मानवी चेतनेची अपेक्षित अशी अवस्था, एक दिवस निश्चितपणे येईल. मानव वंश तयार होण्यासाठी जसा प्रचंड काळ लागला होता, त्याप्रमाणेच हा नवीन वंश तयार होण्यासाठीदेखील खूप काळ लागण्याची शक्यता आहे. आणि हे क्रमाक्रमानेच घडून येणार आहे. पण मी म्हटले होते त्याप्रमाणे, जेव्हा घडायचे असेल तेव्हा ते घडेलच… एक वेळ असते, जेव्हा हे घडून येते, जेव्हा ते अवतरण घडून येते, जेव्हा संयोजन घडून येते, जेव्हा हे तादात्म्य घडून येते. कदाचित हे निमिषार्धातही घडून येते. एक क्षण असतो, जेव्हा हे घडते. नंतर मात्र कदाचित खूप, खूप, खूप वेळ जावा लागतो. एका रात्रीमध्ये जिकडे तिकडे अतिमानव प्रकट झालेले एखाद्याला दिसू शकतील, अशी कल्पना कोणी करता कामा नये. आणि ते असे असणारही नाही. मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यांनी स्वत:ला पूर्णत: झोकून दिले आहे, ज्यांनी सर्वांसाठी सर्व प्रकारचा धोका पत्करला आहे, त्यांनाच हे कळू शकेल. केवळ त्यांनाच हे समजू शकेल; जेव्हा हे घडून येईल तेव्हा ते त्यांना ज्ञात होईल.

प्रश्न : म्हणजे, इतरांना ते दिसूही शकणार नाही?

श्रीमाताजी : इतरांना त्याची साधी जाणीवसुद्धा नसेल. काय घडले आहे ते जाणून न घेता, ते त्यांचे स्वत:चे मूढ जीवन तसेच चालू ठेवतील.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 328-329)

या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे. Read more

प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. Read more