Tag Archive for: साधना

प्रामाणिकपणा – ३७

तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगाची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ‘ईश्वरा’बरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबात शक्यताच नसते. तुम्ही जर विनम्र असाल आणि अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही या ‘मार्गा’वरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 05]

प्रामाणिकपणा – ३४

प्रारंभ करण्यासाठी तीन गोष्टी अनिवार्य आहेत.

०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि त्याच्या सर्व गतिविधींमध्ये परिपूर्ण प्रामाणिकपणा.

०२) हातचे काहीही राखून न ठेवता केलेले संपूर्ण आत्म-समर्पण.

०३) स्वतःवर धीराने काम करायचे आणि त्याच वेळी, पूर्ण अविचल शांती आणि समता यांचा स्थिर विजय प्राप्त करून घ्यायचा.

– श्रीमाताजी [CWM 14 : 41]

प्रामाणिकपणा – ३३

प्रश्न : श्रीअरविंदांच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रीअरविंदांना मी वैयक्तिकरित्या सर्वोत्तम असे काय अर्पण करू शकेन ?

श्रीमाताजी : संपूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे मन त्यांना अर्पण करा.

प्रश्न : श्रीअरविंदांना संपूर्ण प्रामाणिकपणे माझे मन अर्पण करायचे झाले तर, त्यासाठी एकाग्रतेची शक्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे ना? तर मग ही मौलिक क्षमता विकसित करण्याची एखादी पद्धत मला सांगाल का?

श्रीमाताजी : तुम्ही दररोज ज्या वेळी शांतचित्त असू शकाल अशी एक वेळ निश्चित करा. श्रीअरविंदांचे कोणतेही एक पुस्तक घ्या आणि त्यातील एक किंवा दोन वाक्यं वाचा. मग शांत राहून, त्या वाक्यांमधील गर्भितार्थ जाणून घेण्यासाठी एकाग्रचित्त व्हा. मानसिक शांतता मिळविण्यासाठी पुरेसे खोलवर जाऊन एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा आणि जोवर तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत रोज याची नव्याने सुरूवात करा. अर्थातच, (एकाग्रतेचा हा अभ्यास करत असताना) तुम्ही झोपी जाता कामा नये.

– श्रीमाताजी [CWM 12 : 205]

प्रामाणिकपणा – ३२

प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो तेव्हा त्या व्यक्तीसमोर आपण नतमस्तक झालेच पाहिजे.

आपण ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो, त्या प्रामाणिकपणामध्ये परिपूर्ण सचोटी आणि पारदर्शकता असते. त्या व्यक्तीमध्ये ढोंगीपणाचा लवलेशही नसतो, ती व्यक्ती कोणतीही लपवाछपवी करत नाही किंवा स्वतः कोणीही नसताना, मी कोणीतरी आहे असे ती व्यक्ती दाखवीत नाही.

*

मानसिक प्रामाणिकपणाचा उदय : या उदयामुळे मनाला हे उमगेल की, मन हे केवळ एक माध्यम आहे, ते स्वयमेव गंतव्य नव्हे.

– श्रीमाताजी [CWM 08 : 73], [CWM 14 : 339]

प्रामाणिकपणा – ३१

प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच ध्येय देखील आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर तुम्ही असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला आणि इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते, हे नक्की.

– श्रीमाताजी [CWM 08 : 399]

प्रामाणिकपणा – ३०

तुमच्या साधनेमध्ये काय महत्त्वाचे असते तर, पावलोपावली आवश्यक असणारा प्रामाणिकपणा; तुमच्यापाशी जर असा प्रामाणिकपणा असेल तर चुका झाल्या तरी फारसे काही बिघडत नाही, कारण चुका दुरूस्त केल्या जाऊ शकतात. पण जर थोडासुद्धा अप्रामाणिकपणा असेल तर त्यामुळे साधना एकदम निम्न स्तरावर खेचली जाते. पण, प्रामाणिकपणा अविरत आहे का अथवा कोणत्या एखाद्या क्षणी तुम्ही त्यापासून ढळत आहात हे पाहणे तुमचे तुम्हीच शिकले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारी तळमळ व सातत्यपूर्ण इच्छा जर तुमच्याकडे असेल तर ते पाहण्याची शक्ती तुमच्यामध्ये येईल. इतरांना संतुष्ट करण्यावर किंवा न करण्यावर प्रामाणिकपणा अवलंबून नसतो – ती एक आंतरिक बाब असते….

– श्रीमाताजी [CWM 14 : 68]

प्रामाणिकपणा – २९

हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा असेल तर, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यांवर मात करता येते किंवा कालांतराने त्यांमध्ये बदल करता येतो.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 528]

प्रामाणिकपणा – २७

संपूर्ण प्रामाणिकपणा ही अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वतःबद्दल कोणतीही बढाई मारता कामा नये, ‘ईश्वरा’पासून, स्वतःपासून किंवा ‘सद्गुरू’पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ‘ईश्वर’प्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे याची व्यक्तीने तयारी ठेवली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 43]

प्रामाणिकपणा – २६

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये खरी प्रामाणिकता सामावलेली असते. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही, तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 282-283]

प्रामाणिकपणा – २४

(व्यक्तीचे अस्तित्व विविध भागांमध्ये विखुरलेले असते, त्याचे एकीकरण कसे करायचे यावरचा उपाय श्रीमाताजी सांगत आहेत…..)

….त्यावर केवळ एकच उपाय आहे, असा एक आरसा असला पाहिजे की जो आरसा, व्यक्तीच्या भावना, आवेग, सर्व संवेदना यांच्यासमोर धरला असता, व्यक्ती या साऱ्या गोष्टी त्यात पाहील. दिसायला सुंदर, आनंददायी नसतील अशाही काही गोष्टी त्यामध्ये दिसतील; तर काही सुंदर, सुखद असतात आणि जपून ठेवाव्या अशाही काही गोष्टी त्यामध्ये दिसतील. आवश्यकतेनुसार व्यक्ती दिवसभरात शंभर वेळादेखील त्या आरशामध्ये बघेल. आणि ते खूप रोचक असते. व्यक्ती या चैत्य आरशाभोवती एक प्रकारचे मोठे वर्तुळ काढते आणि सर्व घटक त्या आरशाच्या आजूबाजूला मांडून ठेवते. अयोग्य असे जर काही त्यांमध्ये असेल तर त्याची या आरशामध्ये एक प्रकारची धूसर छाया पडते हा घटक व्यक्तीने दूर केलाच पाहिजे, योग्य त्या जागी ठेवलाच पाहिजे… त्याच्याशी बोलले पाहिजे, त्याला समजावून सांगितले पाहिजे, व्यक्तीने त्या काळोखातून बाहेर पडलेच पाहिजे. तुम्ही जर असे करत असाल, तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. लोक जेव्हा तुमच्याशी प्रेमाने वागत नाहीत, जेव्हा कधी डोकं सर्द झालेले असते, जेव्हा कधी अभ्यास कसा करायचा ते समजत नाही, असे काही घडते तेव्हा व्यक्ती या आरशात बघायला लागते. हे खूप गंमतीशीर असते, त्यातच व्यक्तीला एक प्रकारचा डाग आढळतो. ‘आपण खूप प्रामाणिक आहोत असे आपल्याला वाटत होते,’ पण नाही, तसे अजिबात नव्हते. (असे त्या व्यक्तीला कळते.)

या जगामध्ये रोचक नाही अशी एकही गोष्ट नाही. हा आरसा खूपच छान, खूपच छान प्रकारे बनविण्यात आलेला असतो. असे दोन, तीन, चार वर्षे करा, कधीकधी तर व्यक्तीला वीसवीस वर्षे असे प्रयत्न करावे लागतात. मग काही वर्षांनंतर, परत मागे वळून पाहा, तीन वर्षांपूर्वी तुम्ही काय होतात ते आठवून पाहा. (तुम्ही मनातल्या मनात म्हणता की,) : “मी किती बदललो आहे… काय? मी असा होतो?” “तेव्हा मी असे बोलूच कसा काय शकलो? मी असं बोलू शकतो? असा विचार करू शकतो? …खरंच, मी किती वेडा होतो… आता मी किती बदललो आहे…”

हे सारे खूपच मनोरंजक असते…

– श्रीमाताजी [CWM 05 : 10-11]