Tag Archive for: साधना

सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो आंतरात्मिक चेतनेचा (psychic consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो.

तुमच्या संकल्प दृढ असेल तर तो प्रकाश तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत होईल. तुम्ही कायमच जीवित होतात, तुम्ही कायम जीवित असणार आहात, हे तुम्हाला जाणवेल. तेव्हा मग तुम्ही शरीरापासून पूर्णपणे स्वतंत्र व्हाल. आत्ता तुम्ही ज्या शरीरामधून आविष्कृत झाला आहात ते शरीर म्हणजे, अनेकानेक क्षणभंगुर आकारांपैकी केवळ एक आकार आहे; आणि तुमचे जागृत अस्तित्व हे आता शरीरावर अवलंबून नाही; हे तुम्हाला जाणवू लागते. आता मृत्यू हा शेवट असत नाही तर, ते केवळ एक संक्रमण असते. मग सगळी भीती क्षणार्धात नाहीशी होते आणि तुम्ही जीवनामध्ये एखाद्या मुक्त मनुष्याप्रमाणे शांतपणे खात्रीपूर्वक मार्गक्रमण करू लागता.

– श्रीमाताजी (CWM 12 : 83-84)

 

 

स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव शोकांतिका आहे आणि तरीही त्याची त्याला खंत वाटत नाही. वास्तविक, स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये त्याचे मार्गदर्शन पूर्णतया न लाभणे हीच खरेतर एकमेव शोकांतिका आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन न जगताच मरण पावणे, हे खरेखुरे अपयश आहे.

स्वत:मधील ईश्वराचा शोध घेणे आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन व्यतीत करणे, हेच खरे महाकाव्य, हेच खरे वैभव!

– श्रीमाताजी (CWM 10 : 277)

 

एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच संपुष्टात येत नाही. ही ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा असते आणि ती अचेतनेच्या गर्तेमधून, निम्न स्तरातून नव्हे तर, वरून म्हणजे मनुष्यमात्रांचे व या विश्वाचे परमोच्च उगमस्थान असलेल्या ठिकाणाहून, म्हणजे अतिचेतनाच्या सर्व-शक्तिमान आणि शाश्वत वैभवाकडून प्राप्त होते.

ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र असते, ती प्रत्येक वस्तुमध्ये झिरपत असते. तिच्या संपर्कात येण्यासाठी व ती ग्रहण करण्यासाठी तिच्याविषयी अगदी प्रामाणिकपणे आस बाळगणे आणि श्रद्धेने व विश्वासाने तिच्याप्रत
खुले होणे, तसेच स्वतःची चेतना विशाल करणे आणि या वैश्विक चेतनेशी तादात्म्य पावणे, एवढेच पुरेसे असते.

सुरुवातीला, ही गोष्ट अगदी अशक्यप्राय नाही, पण अतिशय अवघड वाटू शकते. परंतु बारकाईने या घटनेचा विचार केला तर व्यक्तीला असे आढळते की, ही गोष्ट वाटते तेवढी अप्राप्य नाही किंवा सामान्य रितीने विकसित झालेल्या मानवी चेतनेपासून ती फार दूरदेखील नाही.

…कधीकधी हा मार्ग काहीसा दीर्घ व संथ असतो परंतु व्यक्तीने जे कष्ट घेतलेले असतात त्या कष्टांचे सरतेशेवटी सार्थक होते. ज्योतिर्मय विशुद्धतेमध्ये सर्व-शक्तिमान असणाऱ्या, ऊर्जेच्या या अमर्याद स्रोताकडून, सर्व परिस्थितीमध्ये, स्वतःच्या इच्छेनुसार ऊर्जा संपादन करण्याच्या या शक्तीच्या परिणामांची आपण अगदी सहजतेने कल्पना करू शकतो. काळजी, थकवा, आजारपण, वार्धक्य आणि एवढेच काय पण अगदी मृत्युसुद्धा या मार्गावरचा फक्त एक अडथळा असतो आणि सातत्यपूर्ण संकल्पशक्तीद्वारे त्या सर्वांवर निश्चितपणे मात केली जाऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 261-262)

(व्यक्तीचा जेव्हा तिच्या अंतरात्म्याशी किंवा चैत्य पुरुषाशी संपर्क झालेला असतो, तेव्हाचे ते क्षण महत्त्वाचे असतात असे श्रीमाताजी सांगत आहेत…)

अंतरात्म्याशी होणाऱ्या संपर्काचे हे क्षण म्हणजे बरेचदा जीवनातील एखाद्या निर्णायक वळणाचे क्षण असतात. अशा वेळी व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडलेले असते, चेतनेच्या दृष्टीने तिची प्रगती झालेली असते. आणि बरेचदा त्याचा संबंध संकटाशी किंवा एखाद्या अत्यंत बिकट परिस्थितीशी असतो. अशा प्रसंगी व्यक्तीच्या समग्र अस्तित्वाकडून त्या ईश्वराचा अत्यंत तीव्र, उत्कट धावा केला जातो. तो इतका आर्त असतो की, त्यामुळे व्यक्तीची आंतरिक चेतना, तिला झाकून टाकणारे अचेतनेचे सर्व पडदे भेदून, तिच्या सर्व दीप्तिमानतेनिशी पृष्ठभागावर येते.

व्यक्ती जेव्हा असा अत्यंत आर्ततेने ईश्वराचा धावा करते तेव्हा त्यातून एखाद्या व्यक्तित्वाचे, दिव्य अंशावताराचे (emanation) अवतरणदेखील घडून येऊ शकते. त्या विशिष्ट क्षणी, एखादे नियत कार्य पूर्ण करण्यासाठी, तुमच्या व्यक्तित्वाशी एखादा दिव्य पैलू जोडला जाऊ शकतो. एखादी लढाई जिंकणे किंवा एखादी गोष्ट अभिव्यक्त करणे अशा प्रकारचे हे नियत कार्य असू शकते. आणि एकदा का हे नियत कार्य पूर्ण झाले की, बहुतेक वेळा तो अंशावतार लोप पावतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 341)

 

शांती किंवा शक्ती शरीरात अवतरित होऊ लागल्यामुळे शरीर ग्रहण-सुलभ होते. तेव्हा काही जणांना शरीर डोलत असल्याचा किंवा शरीरात स्पंदने निर्माण झाल्याची जाणीव होते. शरीराला जेव्हा हे शांतीचे किंवा शक्तीचे अवतरण सवयीचे होऊन जाते तेव्हा त्याचे हे हलणे-डुलणे थांबते. ध्यानाच्या वेळी शांती पूर्णपणे अवतरित होते कारण त्या वेळी श्रीमाताजींप्रति केलेल्या एकाग्रतेमुळे उच्चतर चेतनेची शक्ती खाली अवतरित होते आणि व्यक्ती जर सक्षम असेल तर, ती त्या शक्तीचा स्वीकार करू शकते.

एकदा का त्या शक्तीचे अवतरण सुरू झाले की, सहसा तिचे बळ वाढत जाते आणि त्याबरोबर साधकाची ग्रहणशीलतादेखील वाढत राहते. पुढे ती शक्ती सदा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीमध्ये अवतरित होऊ शकते आणि अधिकाधिक काळ टिकून राहू शकते. ती स्थिर होईपर्यंत हे असे चालू राहते.

साधकाने मात्र त्याच्या बाजूने एक प्रयत्न केला पाहिजे आणि तो म्हणजे, ती शक्ती ग्रहण करण्यासाठी म्हणून त्याने स्वतःची चेतना शक्य तितकी अविचल आणि स्थिर ठेवली पाहिजे. उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद या साऱ्या गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्यांच्या अवतरणासाठी एक प्रकारची उन्मुखता (opening) असली पाहिजे. मनाची अविचलता आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या दिव्य प्रभावाला खुली असणारी एकाग्र क्रियाविरहितता (concentrated passivity) या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 481-482)

 

‘शांतीचे अवतरण’ हा बरेचदा साधनेमधील काही महत्त्वाच्या पहिल्या सकारात्मक अनुभवांपैकी एक अनुभव असतो. शांतीच्या या स्थितीमध्ये असताना, सामान्यतः जिला ‘बुद्धी’ असे म्हटले जाते ती बुद्धी शांत होते किंवा तिचे बरेचसे मनोव्यापार विराम पावतात, हे योग्यच असते. त्यावेळी व्यक्ती सतर्क नसेल तर, तिथे बऱ्याच वेळा एकतर प्राणिक मन (vital mind) शिरकाव करते; अन्यथा एक प्रकारे यांत्रिक शारीर-मनातील (mechanical physical mind) किंवा अवचेतन मनातील (subconscient mind) काही गोष्टी कशाही रितीने पृष्ठभागावर येऊन, कृती करण्याची शक्यता असते. निश्चल-नीरवतेमध्ये (silence) अडथळे आणणारे हे मुख्य घटक असतात. अन्यथा, कनिष्ठ प्राणिक मन अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकते. आणि त्यामुळे अहंकार व भावावेग उफाळून येतो आणि त्यांचा खेळ सुरू होतो.

साधकाने ज्या घटकांपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे, त्या घटकांच्या या सगळ्या खुणा आहेत. कारण जर या गोष्टी तशाच शिल्लक राहिल्या आणि त्याच वेळी जर दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती, दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम किंवा दिव्य आनंद यांसारख्या उच्चतर शक्ती अवतरित होऊ लागल्या तर, उपरोक्त कनिष्ठ गोष्टी त्यांच्या आड येऊ शकतात. आणि त्याचा परिणाम म्हणून एकतर उच्चतर चेतना त्यातून मागे सरते किंवा मग तिचे अवतरण झाकोळले जाते किंवा त्यातून मिळालेल्या चालनेचा कनिष्ठ प्रकृतीच्या हेतुंसाठी गैरवापर केला जाऊ शकतो.

मोठमोठे आध्यात्मिक अनुभव येऊन गेल्यानंतरही बरेचसे साधक पुष्ट झालेला अहंकार, भावभावनांची खळबळ, महत्त्वाकांक्षा, अतिरेकी कामवासना किंवा त्यासारख्या इतर प्राणिक आवेगांच्या किंवा विकारांच्या कचाट्यात सापडलेले दिसतात, त्याचे हेच कारण असते. आणि म्हणूनच किमान ज्यांच्यामध्ये प्राण अतिशय सक्रिय असतो अशा प्रकृतीच्या व्यक्तींनी तरी, सकारात्मक अनुभवाच्या गतीशी प्राणाची गती मिळतीजुळती ठेवली पाहिजे किंवा आधी स्वतःच्या प्राणाचे संपूर्ण शुद्धीकरण केले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 180-181)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला शांती, विशुद्धतेची आणि स्थिरचित्ततेची जी जाणीव होत आहे ती जाणीव, कनिष्ठ चेतनेचा उच्चतर चेतनेशी घनिष्ठ संपर्क आल्यामुळे किंवा तिच्याशी एकत्व पावल्यामुळे निर्माण झाली आहे. सुरुवातीला ती जाणीव चिरस्थायी असू शकत नाही परंतु पुढील दोन गोष्टींमुळे ती चिरस्थायी होऊ शकते.

• स्थिरचित्तता व शांती यांची वारंवारिता (frequency) आणि त्यांची टिकून राहण्याची क्षमता (durability) वाढत गेली तर त्याद्वारे ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.
• उच्चतर चेतनेच्या चिरंतन शांतीचे तसेच स्थिरचित्तत्ता व निश्चल-नीरवता यांचे कनिष्ठ प्रकृतीमध्ये पूर्ण अवतरण झाले तर त्याद्वारेदेखील, ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 66)

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

सघन आध्यात्मिक शक्ती म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? आध्यात्मिक शक्तीला तिचा स्वतःचा असा एक सघनपणा असतो. उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या झऱ्याप्रमाणे ती शक्ती एखादे रूप धारण करू शकते, की ज्याची व्यक्तीला जाणीव होऊ शकते. आणि मग ती व्यक्ती त्या शक्तीस ज्या दिशेला किंवा ज्या कोणत्या वस्तुकडे पाठवायची असेल त्या दिशेला किंवा त्या वस्तुकडे अगदी प्रत्यक्षपणे पाठवू शकते. आध्यात्मिक चेतनेमध्ये अंतर्भूत असलेल्या शक्तीबाबतचे हे वस्तुस्थितीनिदर्शक विधान आहे.

मी या जगामधील एका विशिष्ट बिंदूवर कोणतातरी एक विशिष्ट परिणाम साध्य करून घेण्यासाठी, केलेल्या सूक्ष्म शक्तीच्या इच्छापूर्वक वापरासंबंधी बोलत होतो. (मग ती शक्ती आध्यात्मिक असेल किंवा मानसिक किंवा प्राणिक शक्ती असेल.) अदृश्य असणाऱ्या भौतिक शक्तींच्या (वैश्विक शक्तींच्या) लाटा असाव्यात किंवा वीजेचा प्रवाह असावा त्याप्रमाणेच मनाचेही तरंग असतात, विचारांचे प्रवाह असतात; राग, दुःखादी भावनांचे तरंग असतात. हे प्रवाह, हे तरंग बाहेर पडतात आणि ते इतरांवर परिणाम करतात. आपल्यामध्ये त्या प्रवाहांनी कधी किंवा कसा शिरकाव केला हे त्यांना माहीतदेखील नसते, त्यांना फक्त त्याचा परिणाम अनुभवास येतो. ज्या व्यक्तीमध्ये आंतरिक संवेदना जागृत झालेल्या असतात किंवा ज्या व्यक्तीला गूढविद्येचे ज्ञान असते अशा व्यक्तीला त्यांचा प्रवेश आणि त्यांचा हल्ला याची जाणीव होऊ शकते. चांगले किंवा वाईट प्रभाव अशा रितीने पसरू शकतात. कोणताही हेतू नसतानासुद्धा, अगदी आपोआप अशा रितीने ते पसरू शकतात. पण त्यांचा हेतुपूर्वक वापर करता येणेदेखील शक्य असते.

आध्यात्मिक किंवा इतर शक्तींची हेतुपुरस्सर निर्मिती करणे देखील शक्य असते. कोणत्याही बाह्य कृतीच्या, वाणीच्या किंवा इतर कोणत्याही साधनाच्या साहाय्याशिवाय अगदी थेटपणेसुद्धा प्रभावशाली इच्छाशक्तीचा किंवा संकल्पनेचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याला तुम्ही म्हणता त्या अर्थाने सघन असे म्हणता येणार नाही, पण तरीदेखील हा उपयोग परिणामकारक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 183)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अदृश्य शक्ती इंद्रियसंवेद्य (tangible) असे आंतरिक आणि बाह्य परिणाम घडवून आणतात, हा योग-चेतनेचा संपूर्ण अर्थ आहे. तुम्ही म्हणत आहात की, योगामुळे तुम्हाला त्या शक्तीची नुसती जाणीव होते पण त्यातून कोणतीही फलनिष्पत्ती होत नाही. पण असे म्हणणे हेच खरंतर चमत्कारिक आहे. अशा प्रकारच्या निरर्थक भ्रमाबाबत कोण बरे समाधानी राहू शकेल आणि असे असेल तर मग तिला ‘शक्ती’ असे तरी कसे म्हणता येईल?

आंतरिक शक्ती मनामध्ये पालट घडवून आणू शकते, मनाच्या शक्तींचा विकास करू शकते किंवा नवीन क्षमतांची त्यामध्ये भर घालू शकते; ती शक्ती ज्ञानाच्या नवीन श्रेणी उदयास आणू शकते; प्राणिक गतिप्रवृत्तींवर स्वामित्व संपादन करू शकते; व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडवून आणू शकते; माणसांवर व वस्तुमात्रांवर प्रभाव पाडू शकते; शरीराच्या कार्यप्रणालीवर आणि परिस्थितीवर नियंत्रण आणू शकते; इतर शक्तींवर गतिमान शक्ती या नात्याने सघन कार्य करू शकते; घटनांमध्ये सुधारणा करू शकते अशा प्रकारच्या गोष्टी ती करत असते. असे जर हजारो अनुभव आम्हाला आले नसते तर आम्ही आत्ता जे सांगत आहोत ते तसे सांगितलेच नसते.

या शक्तीचे परिणामच इंद्रियसंवेद्य असतात असे नाही तर, तिच्या गतिविधीसुद्धा इंद्रियसंवेद्य आणि मूर्त असतात. शक्तीची किंवा ऊर्जाशक्तीची जाणीव झाल्याचे मी जेव्हा म्हणतो तेव्हा तिची अगदी ठोस जाणीव मला असते आणि परिणामतः मी तिला दिशा देऊ शकतो, तिला हाताळू शकतो, तिच्या गतिविधींचे निरीक्षण करू शकतो, तिच्या वस्तुमानाविषयी आणि तिच्या तीव्रतेविषयी मी सचेत असतो, इतर विरोधी शक्तींबाबत मला जशी जाणीव असते तशीच ती या शक्तीबाबतही असते, या सर्व गोष्टी योगाच्या विकासामुळे शक्य होतात आणि त्या नित्याच्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 181-182)

 

‘योगशक्ती’ आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या सर्व चक्रांमध्ये निद्रिस्त असते आणि ती तळाशी वेटोळे घालून बसलेली असते. या शक्तीस तंत्रशास्त्रामध्ये ‘कुंडलिनी’ शक्ती असे म्हणतात.

परंतु ती योगशक्ती आपल्या वरच्या बाजूसदेखील असते, आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस ती ‘ईश्वरी शक्ती’ म्हणून स्थित असते. तेथे मात्र ती वेटोळे घालून बसलेली नसते, अंतर्हित, निद्रिस्त अशी देखील नसते तर ती जागृत, ज्ञानसंपन्न, ओजस्वी, विस्तृत आणि व्यापक असते. ती तेथे आविष्करणासाठी वाट पाहत असते. या ईश्वरी शक्तीप्रति म्हणजेच ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीप्रति आपण स्वतःला खुले केले पाहिजे.

मनामध्ये ती योगशक्ती ‘दिव्य मनःशक्ती’ म्हणून किंवा ‘वैश्विक मनःशक्ती’ म्हणून आविष्कृत होते आणि वैयक्तिक मनाला जे करता येणे शक्य नसते ते सारेकाही ती करू शकते; तेव्हा ती ‘योगिक मनःशक्ती’ असते.

त्याचप्रमाणे जेव्हा ती योगशक्ती प्राण किंवा शरीर यांमध्ये आविष्कृत होते तेव्हा ती ‘योगिक प्राणशक्ती’ किंवा ‘योगिक शारीरिक-शक्ती’ म्हणून प्रकट होते. ती वरील सर्व रूपांमध्ये जागृत होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 422)