Posts

जो सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होतो, त्या ईश्वरा, तुझा जयजयकार असो.

आम्हास असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट तुझ्या कार्यात अडसर ठरू नये.

आम्हास असे वरदान दे की, कोणत्याही गोष्टीमुळे तुझ्या आविष्करणामध्ये विलंब होणार नाही.

आम्हास असे वरदान दे की, प्रत्येक क्षणी, सर्व गोष्टींमध्ये तुझीच इच्छा कार्यरत होईल.

तुझ्या मन:संकल्पाची परिपूर्ती आमच्यामध्ये होऊ दे, आमच्या प्रत्येक घटकामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कृतीमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जाऊ दे, यासाठी आम्ही तुझ्यासमोर उभे आहोत.

आम्हास असे वरदान दे की, आम्ही तुझ्याप्रत कायमच पूर्णपणे एकनिष्ठ राहू.

आम्हास असे वरदान दे की, इतर कोणताही प्रभाव वगळून, आम्ही पूर्णत: तुझ्याच प्रभावाला खुले राहू.

आम्हास असे वरदान दे की, आम्ही तुझ्याप्रत एक गहन आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही.

आम्हास असे वरदान दे की, तुझ्याकडून प्रसादरूपाने, हरघडी मिळणाऱ्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही.

आम्हास असे वरदान दे की, आमच्यामधील सर्व गोष्टी तुझ्या कार्यात सहभागी होतील आणि तुझ्या साक्षात्कारासाठी सज्ज होतील.

सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी असणाऱ्या हे ईश्वरा, तुझा जयजयकार असो. आम्हाला तुझ्या विजयाबद्दलची सक्रिय आणि उत्कट, परिपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 382)

ज्याला तुझी सेवा करण्यासाठी पात्र बनायचे आहे त्याने कशालाच चिकटून राहता कामा नये, अगदी ज्या कामकाजामुळे त्याला तुझ्याशी अधिकाधिक जाणीवपूर्वकतेने संपर्क साधता येतो अशा कामकाजाची देखील त्याने आसक्ती बाळगता कामा नये.

आणि समग्र परिस्थितीचा परिणाम म्हणून, जर त्याच्या जीवनातील बरीचशी जागा ही नेहमीपेक्षाही अधिक भौतिक गोष्टींनी व्यापली जात असेल, तर त्यामध्ये त्याने गुंतून कसे पडू नये आणि त्याच्या हृदयाच्या अंतर-हृदयामध्ये त्याने तुझ्या अस्तित्वाची स्पष्ट जाण कशी बाळगावी आणि कशानेही विचलित होऊ शकणार नाही अशा त्या प्रगाढ शांतीमध्ये सतत कसे राहावे, हे त्याला माहीत असले पाहिजे.

हे प्रभो, सर्व गोष्टींमध्ये, तसेच सर्वत्र तुझेच दर्शन घेत कार्य करणे आणि अशा पद्धतीने कृती केली जात असल्यामुळे – एरवी बंदिवान म्हणून आपल्याला पृथ्वीशी जखडून ठेवणाऱ्या बेड्या न पडता – त्या कृतीच्या कितीतरी वर जाऊन झेपावणे…

हे प्रभो, मी जे तुला माझ्या अस्तित्वाचे अर्पण करत आहे ते अधिकाधिक परिणामकारक आणि समग्र ठरावे, असा आशीर्वाद दे.

हे अनिर्वचनीय सारतत्त्वा, अकल्पनीय सत्यरूपा, अनाम एकमेवाद्वितीया, अत्यंत आदराने आणि प्रेमपूर्ण भक्तीने मी, तुझ्यासमोर नतमस्तक होत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 84)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

हे ईश्वरा, मला तुझा प्रकाश प्रदान कर. हे प्रभो, माझ्या हातून कधीही चूक घडू नये असे मला वरदान दे. माझ्यामध्ये तुझ्याविषयी जो परम आदर आहे, तुझ्याविषयीची जी परमभक्ती आहे, तुझ्याविषयी माझ्या मनात जे उत्कट आणि गभीर प्रेम आहे ते प्रेम, ती भक्ती, तो आदर दीप्तीमान होत, विश्वास उत्पन्न करणारा होत, सहवासामुळे इतरांमध्येही प्रसृत होत, सर्वांच्या हृदयामध्ये उदित होऊ दे.

हे प्रभो, शाश्वत स्वामी, तूच आहेस माझा प्रकाश आणि माझी शांती ! माझा मार्गदर्शक हो, तूच माझे डोळे उघड, माझे हृदय उजळवून टाक आणि जो थेट तुझ्याकडेच घेऊन जाईल असा मार्ग मला दाखव.

हे ईश्वरा, तुझ्या इच्छेव्यतिरिक्त माझी कोणतीही अन्य इच्छा असता कामा नये आणि माझ्या कृती या तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती असतील, असे वरदान दे.

तुझ्या दिव्य प्रकाशाचा ओघ माझे संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकत आहे आणि मला आता तुझ्या व्यतिरिक्त अन्य कशाचेही भान नाही, केवळ तुझीच…..

शांती, शांती, शांती, या पृथ्वीवर शांती.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 39)

हे ईश्वरा, जरी एखाद्याने नीरव एकांतवासामध्ये, पूर्ण समाधी अवस्था प्राप्त करून घेतली तरी ती अवस्था त्याने स्वत:च्या शरीरापासून स्वत:स विलग करून, शरीराची उपेक्षा करून मिळविलेली असते आणि त्यामुळे ज्या घटकांनी देह बनलेला असतो ते घटक तसेच अशुद्ध, आधीइतकेच अपूर्ण राहून जातात, कारण त्याने त्यांना तसेच सोडून दिलेले असते. आणि गूढवादाची शिकवण चुकीच्या रीतीने आकलन झाल्यामुळे, अतिभौतिकाच्या वैभवाने मोहित होऊन, स्वतःच्या वैयक्तिक समाधानासाठी जेव्हा तुझ्याशी एकत्व पावण्याची अहंभावी इच्छा तो बाळगतो, तेव्हा त्याने त्याच्या पार्थिव अस्तित्वाच्या मूळ कारणाकडेच पाठ फिरविलेली असण्याची शक्यता असते. ‘जडभौतिकाचे शुद्धीकरण आणि त्याचा उद्धार’ हे त्याचे खरे जीवितकार्य पूर्ण करण्यास, त्याने एखाद्या भित्र्या माणसाप्रमाणे नकार दिलेला असू शकतो. आपल्या अस्तित्वातील एखादा भाग हा संपूर्णत: शुद्ध झाला आहे हे जाणणे, त्या शुद्धतेशी संबंध प्रस्थापित करणे, त्याच्याशी एकत्व पावणे हे सारे तेव्हाच उपयुक्त ठरू शकते, जेव्हा हे ज्ञान या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वरा करण्यासाठी, म्हणजेच तुझे उदात्त कार्य पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 20)

माझ्या सगळ्या भौतिक जबाबदाऱ्या संपल्या रे संपल्या की, त्याबाबतचे सर्व विचार माझ्या मनातून पार नाहीसे होतात आणि मग मी केवळ आणि समग्रतया तुझ्या विचारांनी व्याप्त होते, तुझ्या सेवेमध्ये निमग्न होते. आणि मग एका गभीर शांतीमध्ये आणि प्रसन्नतेमध्ये, माझी इच्छा तुझ्या इच्छेशी एकरूप करते आणि त्या परिपूर्ण शांतीमध्ये मी तुझे सत्य ऐकते, त्या सत्याची अभिव्यक्ती ऐकते. तुझ्या इच्छेविषयी जागृत होण्याने आणि आपली इच्छा त्याच्या इच्छेशी एकरूप करण्यामध्येच खऱ्याखुऱ्या स्वतंत्रतेचे आणि सर्वशक्तिमानतेचे रहस्य सापडते; शक्तीच्या पुनरुज्जीवनाचे आणि जीवाच्या रूपांतरणाचे रहस्यही त्यामध्येच सापडते.

तुझ्याशी सदोदित व समग्रतया एकत्व पावलेले असण्यामध्येच – आम्ही आतील आणि बाहेरील, सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो, सर्व संकटांवर विजय मिळवू शकतो – ह्याची खात्री सामावलेली आहे.

हे ईश्वरा, माझे हृदय असीम आनंदाने भरून गेले आहे, माझ्या मस्तकामध्ये आनंदगानाच्या अद्भुत लाटाच जणु उसळत आहेत आणि तुझ्या निश्चित विजयाच्या पूर्ण खात्रीमध्येच मला सार्वभौम शांती आणि अजेय शक्ती अनुभवास येत आहे. तू माझ्या सर्व अस्तित्वामध्ये भरून गेला आहेस, तूच त्यामध्ये संजीवन आणतोस, माझ्या अस्तित्वामधील दडलेले झरे तूच प्रवाहित करतोस, तू माझ्या आकलनास उजाळा देतोस, तू माझे जीवन उत्कट बनवितोस, तू माझ्यामधील प्रेमाची दसपटीने वृद्धी करतोस, आणि आता मला हे उमगत नाही की, हे ब्रह्मांड म्हणजे मी आहे की, मी हे ब्रह्मांड आहे. मला हे उमगत नाही की, तू माझ्यामध्ये आहेस की, मी तुझ्यामध्ये आहे; आता केवळ तूच आहेस; सारे काही तूच आहेस आणि तुझ्या अनंत कृपेच्या प्रवाहाने हे विश्व भरून, ओसंडून वाहत आहे.

भूमींनो, गान करा. लोकांनो, गान करा. मानवांनो, गान करा. तिथे दिव्य सुसंवाद अस्तित्वात आहे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 19)

शांतपणे तेवणाऱ्या एखाद्या ज्योतीप्रमाणे, कोणतीही वेडीवाकडी वळणे न घेता, सरळ वर जाणाऱ्या सुगंधाप्रमाणे, माझे प्रेम सरळ तुझ्याप्रत जात आहे आणि एखाद्या बालकाप्रमाणे, कोणत्याही तार्किकतेविना, किंवा कोणत्याही काळजीविना, मी तुझ्याप्रत असा विश्वास बाळगत आहे की, तुझा मानस प्रत्यक्षात उतरेल, तुझा प्रकाश उजळून येईल, तुझी शांती सर्वत्र प्रसृत होईल. आणि तुझे प्रेम विश्वावर पांघरले जाईल. जेव्हा तुझी इच्छा असेल की, मी तुझ्यामध्ये असावे, मी तूच व्हावे तेव्हा मग आपल्यामध्ये कोणताही भेद उरलेला नसेल. त्या कृपांकित क्षणांची मी कोणत्याही अधीरतेविना वाट पाहत आहे; एखादा शांतपणे वाहणारा झरा जसा असीम सागराकडे प्रवाहित होत असतो, तशीच मी स्वत:ला त्या क्षणांप्रत अप्रतिहतपणे जाऊ देत आहे.

तुझी शांती माझ्यामध्ये आहे आणि त्या शांतीमध्ये मी हे पाहत आहे की, या अवघ्या चराचरात एकमेव तूच विद्यमान आहेस, तू सर्वत्र चिरकालाच्या स्थिरतेनिशी निवास करत आहेस.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 11)

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही, अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या उपटून फेकून दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे. तुम्ही काय होतात ह्याचा विचार करू नका, पण तुम्हाला काय व्हायचे आहे, त्याच अभीप्सेचा विचार करा; जे तुम्ही प्रत्यक्षात उतरवू पाहत आहात त्याच्यामध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि भविष्याकडे पाहा. ईश्वर हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)

प्रश्न : ज्यांची चेतना सामान्य आहे अशा माणसांसाठी धार्मिक विधी महत्त्वाचे असतात का?

श्रीमाताजी : धार्मिक विधी म्हणजे तुला काय म्हणावयाचे आहे?

प्रश्नकर्ता : जप वगैरे गोष्टी.

श्रीमाताजी : ओह ! ती तर अगदीच सापेक्ष गोष्ट आहे. त्या गोष्टींचा तुमच्यावर काय परिणाम होतो आणि तुम्ही त्यावर किती विश्वास ठेवता, यावरच त्यांचे मूल्य अवलंबून असते. जर त्या गोष्टींनी तुमचे मन एकाग्र व्हायला मदत होत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. पण बहुधा सामान्य चेतना असणारे लोक ती गोष्ट अंधश्रद्धेपोटी करतात. त्यांची अशी समजूत असते की, “मी जर ह्या गोष्टी केल्या, मी जर आठवड्यातून एकदा देवळात किंवा चर्च वगैरेंमध्ये गेलो, प्रार्थना केली तर माझ्याबाबतीत काहीतरी चांगले घडून येईल.” ही अंधश्रद्धा आहे, ती जगभर सर्वत्र पसरलेली आहे, पण तिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून अजिबात महत्त्व नाही.

– श्रीमाताजी

(CWM 06 : 193)

पूर्णयोग आणि बौद्धमत – २३

श्रीमाताजी : धम्मपदामध्ये एका गोष्टीचा उल्लेख झालेला नाही; ती गोष्ट म्हणजे आत्मपरिपूर्णता. परम निर्लिप्तता (Supreme Disinterestedness) आणि परम मुक्ती (Supreme Liberation) ह्या नंतर आत्मपरिपूर्णतेची (Self-perfection) साधना अनुसरली पाहिजे. येथे ‘निर्वाणाची मुक्ती’ हे नियोजित साध्य आहे, असे सांगण्यात आले आहे, परंतु ते तसे नसून प्रगतीची वाटचाल करीत राहणे, प्रगतिपथावर वाटचाल करीत राहणे, हा या पार्थिव जीवनाचा गहन कायदा व प्रयोजन आहे, वैश्विक जीवनाचे ते सत्य आहे आणि तुम्ही त्याच्याशी सममेळ राखत असल्यामुळे, साहजिकपणे, जे काही फळ असेल, त्याची चिंता न करता प्रगतिपथावर वाटचाल करीत राहिले पाहिजे.

दिव्य कृपेमध्ये प्रगाढ विश्वास; दिव्य इच्छेप्रत संपूर्ण समर्पण; दिव्य योजना, जी व्यक्तीस फळाची आशा न बाळगता, जे करावयास हवे ते करण्यास प्रवृत्त करते त्या दिव्य योजनेप्रत समग्र निष्ठा असणे, म्हणजे परिपूर्ण मुक्ती होय.

ह्यामध्येच दु:खभोगाचा खराखुरा निरास आहे. जाणिवशक्ती ही अचल आनंदाने भरून जाते आणि प्रत्येक पावलागणिक त्या दिव्यत्वाच्या परमवैभवाचे अचंबित करणारे आविष्कार तुमच्यासमोर उलगडत राहतात.

मानवी प्रगतीसाठी भगवान बुद्धांनी जे काही मांडले आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत आणि मी अगदी सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे, त्यांनी शिकविलेल्या अनेकानेक उत्तमोत्तम गोष्टींपैकी थोड्यातरी आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या प्रयत्नांचे साध्य आणि त्या प्रयत्नांचा परिणाम हे त्या परम प्रज्ञेवर सोपविले पाहिजे, की जी परमप्रज्ञा मानवी बुद्धिच्या आकलनशक्तीच्या कितीतरी अतीत अशी असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 297)

पूर्णयोग आणि बौद्धमत – २२

(कालचे वचन हे, दु:खभोगापासून मुक्तता ज्यामुळे घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी संबंधित होते. काल आपण ती चार उदात्त तत्त्वे विचारात घेतली. आता, श्रीमाताजींनी अष्टपदी मार्गाविषयी – अष्टांग मार्गाविषयी – जे विवेचन केले आहे ते पाहू.)

श्रीमाताजी : उदात्त मार्गामध्ये पुढील आठ पायऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समावेश होतो.

१) सम्यक दृष्टी : गोष्टी जशा आहेत तशा पाहणे, ह्याला म्हणायचे शुद्ध व अचूक दृष्टी, सर्वोत्तम दृष्टी. वेदना, अशाश्वतता आणि सघन अशा स्व-जाणिवेचा (fixed ego) अभाव, ही अस्तित्वाची तीन वैशिष्ट्ये आहेत, असे धम्मपदात म्हटले आहे. पण ते खरेतर तसे नसून, मनोभावनांच्या समुच्चयामध्ये सघन, टिकाऊ, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा अभाव, वैयक्तिक चेतनेतील खऱ्या सातत्याचा अभाव असा त्याचा अर्थ आहे. आणि यामुळेच माणसाला सर्वसामान्यपणे त्याचे गतजन्म आठवत नाहीत किंवा व्यक्तीच्या सर्व जीवनांमध्ये काही प्रयोजनात्मक सातत्य असल्याचेही त्याला जाणवत नाही.

पहिला मुद्दा म्हणजे योग्य रीतीने पाहणे. योग्य रीतीने पाहणे म्हणजे, सर्वसामान्य जीवनाशी दुःखभोग, वेदना सहसंबंधित झालेल्या आहेत हे पाहणे, सर्व गोष्टी अस्थायी आहेत आणि वैयक्तिक जाणिवेमध्ये कोणतेही सातत्य नाही, हे पाहणे.

२) सम्यक प्रयोजन वा इच्छा : येथे इच्छा ह्या शब्दाचा उपयोग करायला नको होता कारण आत्ताच आपणांस सांगण्यात आले आहे की, आपल्यामध्ये इच्छावासना असता कामा नयेत. खरेतर येथे ‘योग्य अभीप्सा’ अशी शब्दरचना हवी होती. ‘इच्छा’ या शब्दाच्या जागी ‘अभीप्सा’ हा शब्द पाहिजे.

”सर्व प्रकारच्या आसक्तीपासून मुक्त असणे आणि अस्तित्वात असलेल्या सर्वांविषयी प्रेमळ विचार असणे.” सातत्याने दयाळूपणाच्या स्थितीमध्ये असणे. सर्वांविषयी नेहमीच सदिच्छा बाळगणे.

३) सम्यक वाणी – कोणालाच न दुखविणारी वाणी : कधीही निरर्थकपणे बोलू नये, आणि द्वेषपूर्ण, आकसयुक्त बोलणे कटाक्षाने टाळावे.

४) सम्यक वर्तन – शांतिपूर्ण व प्रामाणिक वर्तन : केवळ भौतिक दृष्ट्याच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही, तसेच मानसिकदृष्ट्यादेखील शांतिपूर्ण व प्रामाणिक वर्तन असले पाहिजे. मानसिक सचोटी ही साध्य करून घेण्यास सर्वात अवघड असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.

५) जगण्याची सम्यक पद्धत – कोणत्याही जीवाला इजा वा धोका न पोहोचविणे : ही गोष्ट समजून घेणे तुलनेने सोपे आहे. काही लोक असेही असतात की जे ह्या तत्त्वाचे अगदी टोकाचे पालन करतात. ते लोक जीवजंतू पोटात जाऊ नयेत म्हणून तोंडाला रूमाल बांधतात, रस्त्यामध्ये एखाद्या किड्यावर आपला पाय पडायला नको म्हणून चालायच्या आधी रस्ता झाडून घेतात. मला हे काहीसे अतिरेकी वाटते, कारण तसेही सद्यस्थितीमध्ये समग्र जीवनच विध्वंसक वृत्तीने भरलेले आहे. पण जर तुम्ही या वचनाचा अर्थ नीट समजून घेतलात तर, ज्यामुळे कोणासही इजा होईल अशा सर्व शक्यता टाळायचा प्रयत्न करावयाचा, व्यक्तीने जाणूनबुजून कोणत्याही जीवाला त्रास द्यावयाचा नाही असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही येथे सर्व जीवजंतूंचा समावेश करू शकता आणि पुढे जाऊन तुम्ही ही काळजी व दयाळुता, अस्तित्वात असणाऱ्या सर्वच गोष्टींसाठी बाळगलीत तर, आंतरिक विकासाच्या दृष्टीने ते खूपच उपयुक्त ठरेल.

६) सम्यक प्रयत्न : निरुपयोगी गोष्टींसाठी व्यर्थ प्रयत्न करू नका; किंबहुना, या अज्ञानावर मात करण्यासाठी आणि स्वत:ची मिथ्यत्वापासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांसाठी, तुमची सर्व शक्ती राखून ठेवा.

७) सम्यक जागरूकता (VIGILANCE) : आधीच्या सहाव्या तत्त्वाची पुष्टी करण्यासाठी हे सातवे तत्त्व आले आहे. तुमच्याकडे सक्रिय आणि सावध मन असले पाहिजे. अर्धवट झोपेत, अर्धवट अचेतनेमध्ये जगू नका – सहसा, तुम्ही जीवन जसे समोर येईल तसे, तुमच्या तुमच्या पद्धतीने नुसते जगत राहता. प्रत्येकजण हे असेच करत असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही भानावर येता तेव्हा तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही वेळ वाया घालविला आहे. मग तुम्ही खूप धडपड करता, ती जणूकाही पुन्हा होतात तिथेच जाऊन पडण्यासाठी. लगेच पुढच्याच क्षणी तुमचा उत्साह मावळून जातो. त्यापेक्षा, कमी जोशाचे पण अधिक सातत्यपूर्ण प्रयत्न असणे, हे अधिक बरे.

८) सम्यक चिंतन : वस्तुंच्या सारतत्त्वावर, अगदी सखोल सत्यावर आणि साध्य करून घ्यावयाच्या लक्ष्यावर केंद्रित केलेला अहंविरहित विचार म्हणजे सम्यक चिंतन होय.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 248-250)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)