Tag Archive for: साधना

प्रामाणिकपणा – ०६

तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या तत्त्वाशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता. प्रत्येक क्षणी म्हणजे, तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रीतीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी सुसंवादी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आणि तुम्ही जर तुमच्या अस्तित्वाच्या सत्यतत्त्वाविषयी जागृत झाला असाल तर, त्या तत्त्वाशी सुसंवादी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळी तुम्ही खराखुरा प्रामाणिकपणा साध्य केला आहे असे म्हणता येईल.

आणि जर तुम्ही तसे असाल, म्हणजेच खरोखरच तुम्ही कधीही अहंभावात्मक वृत्तीने किंवा वैयक्तिक कारणासाठी कोणतीही कृती करत नसाल, तुमच्या आंतरिक सत्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही कृती करत असाल, म्हणजेच जर तुम्ही संपूर्णत: प्रामाणिक आणि प्रांजळ असाल, तर जगाने तुमच्याबद्दल काहीही म्हटले, तुमच्याबद्दल चांगला, वाईट काहीही ग्रह करून घेतला, काहीही मत बनविले, तरी तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटणार नाही, तुम्ही त्याविषयी संपूर्ण उदासीन, संपूर्ण समवृत्तीने राहाल. त्या संपूर्ण प्रामाणिकपणाच्या स्थितीत असताना, चांगले ‘दिसण्याची’ किंवा इतरांनी तुम्हाला चांगले म्हणावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. कारण तुमच्या आंतरिक खऱ्या चेतनेशी जेव्हा तुम्ही सुसंवादी असता, तेव्हा पहिली गोष्ट ही घडते की, तुम्ही कसे ‘दिसता’, कसे भासता याची तुम्ही चिंता करत बसत नाही. लोक तुम्हाला काहीही म्हणोत; उदासीन, थंड, दूरस्थ किंवा गर्विष्ठ म्हणोत तरी, त्याला तुमच्या दृष्टीने काही महत्त्वच उरत नाही. अर्थात, मी पुन्हा सांगते की, त्यासाठी तुम्ही संपूर्ण प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. म्हणजेच, तुम्ही तुमचे आंतरिक, मध्यवर्ती सत्य व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी जीवन जगत आहात, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

– श्रीमाताजी [CWM 04 : 16-17]

प्रामाणिकपणा – ०४

पूर्णतः प्रामाणिक असणे म्हणजे फक्त आणि फक्त दिव्य ‘सत्या’चीच इच्छा बाळगणे; ‘दिव्य माते’प्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व इच्छा-वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ‘ईश्वरा’लाच अर्पण करणे आणि हे कार्य ‘ईश्वरा’ने दिलेले आहे हे जाणून, कोणताही अहंकार आड येऊ न देता, कार्य करणे; हाच ‘दिव्य जीवना’चा पाया आहे. व्यक्ती एकाएकी एकदम पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर व्यक्ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगत असेल आणि ‘ईश्वरी शक्ती’ने साहाय्य करावे म्हणून अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने नेहमी तिचा धावा करत असेल, तर अशी व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत जाते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 51]

प्रामाणिकपणा – ०२

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व भागांनी ‘ईश्वरा’प्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक आहे – म्हणजे असे की, एखाद्या भागाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे अंग मात्र त्याला नकार देते किंवा बंड करते, असे असता कामा नये.

अभीप्सेमध्ये प्रामाणिकता असणे याचा अर्थ, ‘ईश्वरा’साठीच ‘ईश्वर’ हवा असणे, प्रसिद्धी अथवा नावलौकिक अथवा प्रतिष्ठा अथवा शक्ती किंवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठी नव्हे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 65]

प्रामाणिकपणा – ०१

आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा!
प्रामाणिकपणा हा केंद्रीय ‘दिव्य संकल्पा’च्या भोवती संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह व सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी [CWM 14 : 65]

कर्म आराधना – ५३

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत अधिक प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 247], [CWSA 32 : 256-257]

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

कर्म आराधना – ४६

तुम्हाला न आवडणारे काम तुम्हाला करावे लागेलच असे नाही, तर तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे (vital) चोचले पुरवण्यासारखे आणि त्याचे प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवन प्राणिक आवडी-निवडीच्या अधीन असणे, हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे तत्त्व आहे. कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगामधील खरी आंतरात्मिक आणि प्राणिक अवस्था असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 248]

कर्म आराधना – ४५

अडीअडचणींचा नाईलाजास्तव स्वीकार करणे हा कर्मयोगाचा भाग असू शकत नाही – तर घटना साहाय्यकारी असोत वा विरोधी असोत, त्या सद्भाग्यपूर्ण असोत वा दुर्भाग्यपूर्ण असोत; सौभाग्य असो अथवा दुर्भाग्य असो, प्रयत्नांना यश मिळो वा अपयश, या साऱ्या गोष्टींना स्थिर समतेने सामोरे जाणे आवश्यक असते. आवश्यक ते ते सारे करत असताना, गडबडून न जाता, न डगमगता, राजसिक आनंदाविना किंवा दुःखाविना, व्यक्तीने सर्व गोष्टी सहन करण्यास शिकले पाहिजे; आणि अडचणी वा अपयश आले तरीही खचून जाता कामा नये. एखादी व्यक्ती जीवनाच्या ओझ्याखाली दबून न जाता, जे जे करता येणे शक्य आहे ते ते सारे करत राहू शकते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 243]

कर्म आराधना – ४४

कर्म ज्या वृत्तीने आणि ज्या चेतनेनिशी केले जाते त्यानुसार ते कर्म ‘योगिक’ बनते, स्वयमेव कर्मामुळे ते कर्म योगिक किंवा अ-योगिक ठरत नाही.
*
फलाच्या आशेने एखादी गोष्ट करणे हे ‘योगा’च्या नियमांशी विसंगत आहे. एखादी गोष्ट योग्य आहे म्हणूनच ती केली पाहिजे किंवा ती ‘ईश्वरा’साठीच केली गेली पाहिजे, कोणत्याही फलासाठी नव्हे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 232-233]

कर्म आराधना – ४३

आध्यात्मिक सत्याच्या दृष्टीने, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची कल्पना खचितच परकी आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिले असता, कोणतीच गोष्ट छोटी वा मोठी नसते. साहित्यिक लोकांच्या अशा कल्पना असतात की, काव्य लिहिणे हे श्रेष्ठ दर्जाचे कर्म आहे आणि चपलाबूट तयार करणे, स्वयंपाकपाणी करणे हे हलक्या दर्जाचे, किरकोळ कर्म आहे. परंतु आत्म्याच्या दृष्टीने ही सारी कर्मं समानच असतात – आणि कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती आंतरिक वृत्तीच महत्त्वाची असते.
*
सर्व काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे – एखादे काम करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या साऱ्या गोष्टी, सामान्य चेतनेच्या विखुरलेल्या आणि अशांत हालचालींनिशी करता कामा नयेत; तर त्या खऱ्या चेतनेचा एक भाग म्हणूनच केल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 247, 254]