Tag Archive for: साधना

आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंती-नापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि ‘ईश्वरी’ संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे असेल तर तुम्ही सुरक्षित असता; नसेल तर तुम्ही भयग्रस्त असता. आणि जोपर्यंत तुम्ही सुरक्षित नसता, तोपर्यंत कोंबडीची पिल्ले ज्याप्रमाणे आपल्या आईच्या पंखाखाली आसरा घेतात, तसे करणे अधिक चांगले !

– श्रीमाताजी (CWM 03 : 48)

आपण संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे आपले सर्वस्व ‘ईश्वरा’ला समर्पित करू या आणि त्याच्या संरक्षणाचा आनंद घेऊ या.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 47)

बाह्य गोष्टी जेव्हा गोंधळाच्या होतात तेव्हा, त्यांच्या रूपांवरून त्यांच्याविषयीचे मत बनवायचे नाही, असा एक दंडक तुम्ही तुमच्या मनावर त्वरित घालून घेतला पाहिजे. सर्व काही सुस्पष्ट होईल या विश्वासाने, अंतरंगातील श्रीमाताजींच्या प्रकाशाकडे त्या साऱ्या गोष्टी सोपविल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 418)

एखाद्याने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर आपण उभे नाही ना, याची काळजी घ्यावयास हवी. श्रीअरविंदांचे असे सांगणे आहे की, व्यक्तीने ‘दुहेरी जीवन’ जगता कामा नये. त्याने एक तर ही गोष्ट सोडावयास हवी किंवा ती – एकाच वेळी दोन्हींचे अनुसरण करता येत नाही.

-श्रीमाताजी
(CWM 04 : 377-378)

पूर्णयोगा’मध्ये साधना आणि बाह्य जीवन यांमध्ये कोणताही भेद नाही; दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी ‘सत्या’चा शोध घेतलाच पाहिजे आणि तो आचरणात आणलाच पाहिजे.

– श्रीमाताजी
(White roses : 33)

साधकाने सर्व कामधाम सोडून द्यावे आणि फक्त वाचन व ध्यान करावे, हे श्रीमाताजींना अपेक्षित नाही. कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ खाली अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247)

भौतिकामध्ये अंतरात्म्याची प्राप्ती व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर, केवळ ध्यानामध्ये बसल्याने आणि अमूर्त अनुभव घेतल्याने ते साध्य होणार नाही; भौतिक जीवन आणि कर्मामध्ये, श्रीमाताजींसाठी केलेल्या कार्याद्वारे, आज्ञापालनाद्वारे व श्रीमाताजींप्रत केलेल्या कर्मसमर्पणाद्वारे, त्याचा शोध घेतल्यानेच तो अंतरात्मा तुम्हाला प्राप्त होईल…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 249-250)

…कर्म हे पूर्णयोगाचे आवश्यक अंग आहे. तुम्ही कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा वैयक्तिक कल्पनांमध्ये गमावून बसाल…

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 248)

…आजवर जे काही केले आहे त्याच्या तुलनेत, अजूनही जे करायचे बाकी आहे त्याच्या सापेक्षतेची जाण असणे तसेच, ईश्वराच्या कृपेशिवाय व्यक्तीच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही, याची जाणीव असणे म्हणजे ‘आध्यात्मिक विनम्रता’.

-श्रीअरविंद
(CWSA 28 : 432)

… (ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या गोष्टींचा) स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी किंवा स्वार्थासाठी दुरूपयोग करता कामा नये; अभिमान नसावा, प्रौढी नसावी, उच्चतेची भावना नसावी, ईश्वराचे साधन असल्याचा कोणताही दावा किंवा अहंकारदेखील नसावा; तर ज्या कोणत्या मार्गाने, प्रकृतिजन्य सहज व शुद्ध आंतरात्मिक साधन कसे बनता येईल की ज्यामुळे ते ईश्वराच्या सेवेसाठी सुपात्र बनेल, याविषयी व्यक्तीने जागरूक असले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 245)