Posts

श्रीमाताजी आणि समीपता – १७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

श्रीमाताजींचे प्रेम सदोदित असतेच आणि त्यांच्या प्रेमापुढे मानवी प्रकृतीच्या अपूर्णतांचा पाडावच लागू शकत नाही. एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे, तुम्हाला ते प्रेम सदोदित मिळत असल्याची जाणीव असणे आवश्यक असते. तुमचा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येण्यासाठी ती गोष्ट आवश्यक असते कारण त्या चैत्य पुरुषाला त्याची जाण असते; मन, प्राण आणि शरीर हे घटक फक्त बाह्य वरवरच्या दृष्यांकडे पाहत असतात आणि ते त्या दृष्यांचा चुकीचा अर्थ लावतात. आणि असे होऊ नये म्हणून श्रीमाताजींची शक्ती कार्यरत असते.

जेव्हा जेव्हा तुमचा चैत्य पुरुष पृष्ठभागाजवळ आलेला होता तेव्हा तेव्हा तुम्हाला श्रीमाताजींच्या प्रेमाची आणि त्यांच्या समीपतेची जाणीव झाली होती. परंतु तुमच्या इतर भागांनाही तीच जाणीव होण्यासाठी, तसाच अनुभव येण्यासाठी त्या भागांचीही तयारी होणे आवश्यक असते आणि त्यासाठी वेळ लागतो. म्हणून धीर धरणे आवश्यक असते. साधनेमध्ये कितीही अडीअडचणी आल्या, दिरंगाई झाली तरी त्या सर्व गोष्टींमधून मार्ग काढत, श्रीमाताजी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि त्या तुम्हाला त्यांच्या परमधामी घेऊन जाणार आहेत याची खात्री बाळगणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481)

श्रीमाताजी आणि समीपता – १६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला श्रीमाताजींबद्दल जे एवढे प्रगाढ प्रेम वाटते ते प्रेम आणि तुम्ही ज्यांच्या समवेत राहता किंवा काम करता त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता व सौहार्दाची भावना या दोन्ही गोष्टी चैत्य पुरुषाकडून (psychic being) येतात. जेव्हा चैत्य पुरुषाचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा ‘श्रीमाताजीं’बद्दलचे हे प्रेम अधिक उत्कट होते आणि ते प्रेमच तुमच्या प्रकृतीचे मुख्य सारथी बनते. आणि त्याचबरोबर इतरांविषयी एक प्रकारची सद्भावना, सुसंवाद, दयाळूपणा किंवा आत्मीयता या भावनासुद्धा उदयाला येतात.

श्रीमाताजींची बालके असणाऱ्या सर्वच जिवांशी आपल्या आत्म्याचे जे आंतरिक नाते असते त्याचा हा परिणाम असतो आणि त्यामुळे त्यामध्ये (व्यक्तीचे) वैयक्तिक असे काही नसते. या आंतरात्मिक भावनेमध्ये काही अपाय नाही, उलट ती भावना संतोष आणि सुसंवाद निर्माण करते. आंतरात्मिक भावनेमुळे अंतरात्म्याचे श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये विकसन होण्यास साहाय्य लाभते आणि त्यामुळे कार्यालाही हातभार लागतो तसेच आंतरिक जीवन वृद्धिंगत होण्यासदेखील मदत होते.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये असणारे प्राणिक प्रेम (vital love) तेवढे नाकारले पाहिजे कारण ते प्रेम ‘ईश्वरा’प्रति करायच्या पूर्ण आत्म-निवेदनापासून (consecration) व्यक्तीला दूर नेते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)

श्रीमाताजी आणि समीपता – १५

माणसं ज्याला ‘प्रेम’ असे संबोधतात तशा प्रकारची सामान्य प्राणिक भावना ‘ईश्वराभिमुख’ प्रेमामध्ये असता कामा नये; कारण सामान्य प्रेम हे प्रेम नसते, तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, उपजत प्रवृत्ती असते, आणि स्वामित्वाची व वर्चस्व गाजविण्याची ती प्रेरणा असते. हे दिव्य ‘प्रेम’ तर नसतेच, पण इतकेच नव्हे तर ‘योगा’मध्ये या तथाकथित प्रेमाचा अंशभागसुद्धा मिसळलेला असता कामा नये. ईश्वराबद्दलचे खरे प्रेम म्हणजे आत्मदान (self-giving) असते, ते निरपेक्ष असते, ते शरणागती आणि समर्पण यांनी परिपूर्ण असते; ते कोणताही हक्क सांगत नाही, ते कोणत्याही अटी लादत नाही, कोणताही व्यवहार करत नाही; मत्सर, अभिमान किंवा क्रोधाच्या हिंसेमध्येही सहभागी होत नाही कारण या गोष्टी मूलतःच सामान्य प्रेमामध्ये नसतात.

खऱ्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून, ‘दिव्य माता’ स्वतःच तुमची होऊन जाते, अगदी मुक्तपणे! अर्थात हे सारे आंतरिकरित्या घडत असते. तिची उपस्थिती तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये जाणवते; तिची शक्ती तुमचे दिव्य प्रकृतीमध्ये पुनःसृजन करत असल्याचे तुम्हाला जाणवते; ती तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या वृत्ती-प्रवृत्ती हाती घेऊन त्यांना पूर्णत्वप्राप्तीचे आणि कृतार्थतेचे वळण देत असल्याचे तुम्हाला जाणवते; तिचे प्रेम तुम्हाला कवळून घेत आहे आणि आपल्या कडेवर घेऊन ती तुम्हाला ईश्वराच्या दिशेने घेऊन चालली आहे, असे तुम्हाला जाणवू लागते. या गोष्टींचा अनुभव यावा आणि अगदी जडभौतिकापर्यंत तुमचे सर्वांग तिने व्यापून टाकावे अशी आस तुम्ही बाळगली पाहिजे. आणि येथे काळाची किंवा पूर्णतेची कोणतीच मर्यादा असत नाही. एखादी व्यक्ती जर खरोखरच तशी आस बाळगेल आणि तिला ईप्सित ते साध्य होईल तर, तेथे अन्य कोणत्याही गोष्टीसाठी किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही वगैरे गोष्टींना वावच उरणार नाही. व्यक्ती जर खरोखर तशी आस बाळगेल तर तिला ते निश्चितपणे प्राप्त होते, व्यक्तीचे जसजसे शुद्धीकरण होत जाईल आणि तिच्या प्रकृतीमध्ये आवश्यक असणारा बदल जसजसा होत जाईल तसतसे तिला ते अधिकाधिक प्राप्त होते.

कोणत्याही स्वार्थी हक्काच्या आणि इच्छांच्या मागण्यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; तसे ते झाले तर तुम्हाला असे आढळेल की, तुम्ही जेवढे पेलू शकता, आत्मसात करू शकता तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 461)

श्रीमाताजी आणि समीपता – १४

तुम्हाला जर सदोदित श्रीमाताजींच्या संपर्कात राहायचे असेल तर निराशेमधून, औदासिन्यातून आणि त्यामधून ज्या मानसिक कल्पना तुम्ही करत राहता, त्यातून तुम्ही तुमची सुटका करून घेतली पाहिजे. त्यापेक्षा अन्य कोणतीच गोष्ट मार्गामध्ये इतका अडथळा निर्माण करणारी असत नाही.
*
कोणालाही दुसऱ्याविषयी किंवा दुसऱ्या गोष्टीबाबत मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही; कारण सर्वांना श्रीमाताजी व श्रीअरविंदांचा जो संपर्क लाभतो त्याव्यतिरिक्त, त्या दोघांशी संपर्क साधण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून एक कारण असते, ते अन्य कोणाकडेच नसते.
*
तुम्ही जर ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेच्या संपर्कात राहिलात तर तो संपर्कच तुम्हाला सर्व खऱ्या अभीप्सांच्या पूर्ततेप्रत आणि सर्व आवश्यक त्या साक्षात्कारांप्रत घेऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 459, 459, 457)

श्रीमाताजी आणि समीपता – १३

साधक : एखादी व्यक्ती जर स्वतःच्या अंत:करणामध्ये डोकावून पाहील तर तिथे व्यक्तीला निश्चितपणे श्रीमाताजींचे स्मितहास्य आढळून येईल. असे असताना मग हृदयातून बाहेरच का पडायचे आणि त्यांचे स्मितहास्य बाहेर शोधत का हिंडायचे?

श्रीअरविंद : अंतरंगामध्ये राहणे आणि अंतरंगामध्ये राहून, भौतिक जीवनाला नवीन आकार देणे हे आध्यात्मिक जीवनाचे पहिले तत्त्व आहे. परंतु बरेच जण बाह्य गोष्टींमध्येच रममाण होण्यावर भर देतात, त्यामुळे त्यांचे श्रीमाताजींशी असलेले नाते हे आध्यात्मिकीकरण न झालेल्या बाह्यवर्ती प्रकृतीच्या सामान्य प्रतिक्रियांनीच संचालित होत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 453)

श्रीमाताजी आणि समीपता – १२

साधक : एकमेव श्रीमाताजींमध्ये विलीन होण्याची आणि प्रत्येकाशी असलेले माझे नातेसंबंध तोडण्याची माझी तयारी आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते कृपा करून मला सांगाल का? श्रीमाताजींनी मला आंतरिकरित्या आणि बाह्यतः देखील साहाय्य करावे, अशी माझी प्रार्थना आहे.

श्रीअरविंद : तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे, केवळ त्यांच्याकडेच वळले पाहिजे, हीच त्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी पूरक ठरावे म्हणूनच केवळ बाहेरचे अतिरिक्त संपर्क टाळणे आवश्यक असते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे हे अभिप्रेत नाही किंवा त्याची आवश्यकही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती हीच की, तुम्ही स्वतःला पूर्णपणे बहिर्मुख न होऊ देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनिशी भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याशी वागले पाहिजे; त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 459)

श्रीमाताजी आणि समीपता – ११

साधक : मी माझ्या खोलीत एकटा होतो तेव्हा खूप खुश होतो, तेव्हा मला श्रीमाताजींच्या चेतनेची आंतरिक जाणीव होती. जेव्हा मी ‘क्ष’ला भेटायला बाहेर गेलो तेव्हा मात्र श्रीमाताजींसोबत असलेला माझा आंतरिक संपर्क तुटला आणि मला लगेचच अस्वस्थ वाटू लागले. लोकांमध्ये मिसळल्याने (श्रीमाताजींच्या सन्निध असल्याची) माझी ही आंतरिक जाणीव नष्ट होते, पण मी कायम एकांतवासात तर राहू शकत नाही. मग अशा वेळी काय केले पाहिजे?

श्रीअरविंद : तुम्ही तुमच्या अंतरंगामध्येच, श्रीमाताजींच्या सन्निध राहायला शिकले पाहिजे, त्यांच्या चेतनेच्या संपर्कात राहायला शिकले पाहिजे आणि इतरांना तुम्ही केवळ तुमच्या पृष्ठवर्ती, बाह्य व्यक्तिमत्त्वाद्वारे भेटले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 457-458)

श्रीमाताजी आणि समीपता – १०

व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर अशा गोष्टींवर व्यक्तीची नजर असेल तर तिला प्रत्येक पावलागणिक मन किंवा प्राणामध्ये संघर्षाचा सामना करावा लागतो. तसेच समजा जरी व्यक्तीचे मन व प्राण तुलनेने शांत झालेले असले तरीही शरीरामधील आणि मज्जातंतूमधील संघर्षाला तिने सामोरे जाणे अजून बाकी असते. व्यक्ती जेव्हा अंतरंगातून श्रीमाताजींपाशी राहते तेव्हाच फक्त शांती आणि आनंद स्थिर राहू शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)

श्रीमाताजी आणि समीपता – ०९

पूर्णयोगाच्या साधनेसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अविचलता आणि शांती, विशेषतः प्राणाची (vital) शांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर किंवा आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून नसते; तर ती उच्चतर चेतनेशी, म्हणजे ईश्वरी चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर, म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर अवलंबून असते.

ज्या व्यक्ती आपले मन आणि प्राण श्रीमाताजींच्या सामर्थ्याप्रत आणि शांतीप्रत खुले करतात त्यांना ते सामर्थ्य आणि ती शांती अत्यंत कठीण, अतिशय अप्रिय कामामध्ये आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये असतानासुद्धा लाभू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 458)

श्रीमाताजी आणि समीपता – ०८

साधक : श्रीमाताजींबरोबर असलेले कोणते नाते हे सर्वात खरे आणि सत्य असल्याचे म्हणता येईल? त्यांच्याशी असणारे आत्मत्वाचे नाते (soul relation) हेच एकमेव खरे नाते आहे, असे म्हणता येईल का? आणि आत्मत्वाचे नाते म्हणजे काय? मला ते कसे ओळखता येईल?

श्रीअरविंद : आंतरिक (आत्मत्वाचे) नाते म्हणजे व्यक्तीला श्रीमाताजींच्या अस्तित्वाची जाणीव असणे. अशी व्यक्ती सदोदित त्यांच्याकडे अभिमुख असते. त्यांची शक्ती आपल्याला संचालित करत आहे, त्यांची शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत आहे, साहाय्य करत आहे याची व्यक्तीला जाणीव असते. अशी व्यक्ती श्रीमाताजींच्या प्रेमभक्तीने आकंठ भारलेली असते. अशी व्यक्ती त्यांच्या भौतिकदृष्ट्या जवळ असो किंवा नसो, तिला त्यांच्या समीपतेची जाणीव असते. व्यक्तीला आपले मन श्रीमाताजींच्या मनाच्या समीप असल्याचे, आपला प्राण हा श्रीमाताजींच्या प्राणाशी सुमेळ राखत असल्याचे, आपली शारीरिक चेतना त्यांच्या चेतनेने परिपूर्ण असल्याचे जाणवेपर्यंत मन, प्राण आणि आंतरिक शरीराच्या बाबतीत या नात्याचा विकास होत राहतो. आंतरिक एकत्वाचे हे सारे घटक असतात, त्यामुळे (अशा प्रकारचे असलेले) हे एकत्व केवळ आत्म्यामध्ये, जिवामध्येच असते असे नाही, तर ते प्रकृतीमध्येही असते. असे आंतरिक नाते घनिष्ठ असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 453-454)