Tag Archive for: व्यावहारिक जीवन

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

कर्म आराधना – ५१

व्यावहारिक कर्म आपल्या योगाशी विसंगत नाही. शांती आणि ज्ञानाच्या आधारावर कर्म चालू राहिले पाहिजे. ते जाणीवपूर्वक आणि शांतचित्ताने केलेले असले पाहिजे. ज्यामध्ये खूप लोकांचा संबंध नाही, जे काम एकट्याने पूर्ण करणे शक्य आहे अशा प्रकारचे एखादे काम व्यक्ती हाती घेऊ शकते. उदाहरणार्थ, तशा प्रकारचे एखादे बौद्धिक काम किंवा एखादे शारीरिक काम हे या योगामध्ये करता येऊ शकते. अशी एक वेळ येऊ शकते की, जेव्हा सर्व कामधाम सोडून द्यावे लागेल; पण अशा स्थितीची उपयुक्तता तात्कालिक असते. त्या कालावधीमध्ये व्यक्तीने प्रकर्षाने एकाग्रतापूर्ण साधना केली पाहिजे.

दुसरी गोष्ट अशी की, व्यक्ती जेव्हा चेतनेच्या दुसऱ्या स्तरावर उन्नत होते तेव्हा तिचा समग्र दृष्टिकोनच बदललेला आहे, असे तिला आढळून येते. या अवस्थेमध्ये ती आधीचे बौद्धिक काम पूर्वीप्रमाणेच पुढे कायम करू शकेल असे नाही. उच्चतर चेतना कार्य करण्यास सुरुवात करेपर्यंत व्यक्तीला वाट पाहावी लागते. अर्थात, एकदा का व्यक्तीचे समग्र व्यक्तित्व रूपांतरित झाले की, तिला जीवनाच्या सर्व स्तरांचा स्वीकार करावा लागतो आणि उच्चतर चेतनेचे या जीवनात आविष्करण करावे लागते.

– श्रीअरविंद
[Evening talks : 179-180]

कर्म आराधना – ५०

भौतिक वस्तुंमध्ये चेतना असते. मनुष्यामध्ये किंवा प्राण्यामध्ये जशी चेतना असते आणि जसा प्राण असतो तशी चेतना किंवा तसा प्राण भौतिक वस्तुंमध्ये नसतो हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्यांच्यामध्येही गुप्त रूपाने आणि खरीखुरी चेतना असते. आणि म्हणूनच आपण भौतिक वस्तुंना योग्य तो मान दिला पाहिजे आणि आपण त्यांचा योग्य रीतीने वापर केला पाहिजे, त्यांचा गैरवापर किंवा अपव्यय करता कामा नये, त्यांचा वाटेल तसा वापर करता कामा नये; त्यांची हाताळणी निष्काळजीपणे करता कामा नये.

केवळ मनच नव्हे तर, आपली स्वतःची शारीरिक चेतना जेव्हा तिच्या अंधकारातून बाहेर पडते आणि सर्व वस्तुमात्रांच्या ठायी असलेल्या ‘एकमेवाद्वितीया’ची, सर्वत्र असलेल्या ‘ईश्वरा’चीच जेव्हा तिला जाणीव होते तेव्हा सर्व काही सचेत किंवा जिवंत असल्याची जाणीव व्यक्तीला होते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 287-288]

कर्म आराधना – ४८

कर्म करत असताना तुम्ही फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, कर्माच्या आधीही नको किंवा त्यानंतरही त्या कर्माचा विचार करू नका.

जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत वळू देऊ नका. कारण ते भूतकाळाचा भाग झालेले असते आणि ते मनामध्ये पुन्हापुन्हा घोळवत ठेवणे हा शक्तीचा अपव्यय असतो.

जे कर्म करायचे आहे त्याच्या पूर्वकल्पनेने तुमच्या मनाला कष्ट होऊ देऊ नका. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ योग्यवेळी त्या कर्माकडे लक्ष पुरवेल.

मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग आहेत, या सवयी काढून टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत आहे; परंतु शारीर-मनाने अजूनही त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण आहे. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याचे कर्म करू द्यायचे हे जर का तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर, ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. वास्तविक, अतिमानसिक कार्याने शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती आणण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 287]

कर्म आराधना – ४९

भौतिक गोष्टींमधील सुव्यवस्था, सुसंवाद आणि संघटन या बाबी कार्यक्षमता आणि परिपूर्णता यांचा आवश्यक असा भाग असतात आणि त्यामुळे, साधनाला जे कोणते कार्य दिले जाते ते करण्यासाठी ते साधन अधिक सुयोग्य बनते.

*

भौतिक गोष्टींना तुच्छ लेखता कामा नये – कारण त्यांच्याविना या जडभौतिक विश्वामध्ये आविष्करणच होऊ शकणार नाही.

*

भौतिक वस्तुंना जीवन असते आणि त्यांना त्यांचे स्वत:चे असे एक मूल्य असते, ते मूल्य त्यांच्या किमतीवर अवलंबून नसते. भौतिक वस्तुंचा आदर करणे आणि त्यांचा काळजीपूर्वक व काटेकोरपणे वापर करणे हा योगसाधनेचाच एक भाग असतो, कारण त्याशिवाय जडभौतिकावर प्रभुत्व मिळविणे शक्य नाही.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 276, 287]

कर्म आराधना – ४७

सुव्यवस्था आणि तालबद्धता यांच्याविना भौतिक जीवन अस्तित्वात असू शकत नाही. जेव्हा ही व्यवस्था बदलली जाते तेव्हा व्यवस्थेतील बदल हा आंतरिक वृद्धीच्या अनुषंगानेच असला पाहिजे; केवळ काहीतरी वरवरची नूतनता हवी म्हणून तो बदल करता कामा नये. पृष्ठवर्ती कनिष्ठ प्राणिक प्रकृतीच्या एका विशिष्ट भागाची फक्त बदलासाठी बदल आणि नूतनतेसाठी नूतनता मिळविण्याची ही नेहमीची धडपड असते.

सातत्याने होणाऱ्या आतंरिक विकासामुळेच व्यक्तीला जीवनामध्ये नित्यनूतनता आणि अविरत रस आढळून येणे शक्य असते. याखेरीज दुसरा कोणताही समाधानकारक मार्ग नाही.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 276]

कर्म आराधना – ४०

मानवतेची सेवा करण्याची कल्पना ही महत्त्वाकांक्षेच्या अत्यंत सामान्य रूपांपैकी एक रूप आहे. अशा प्रकारच्या सेवेविषयी किंवा कार्याविषयी असणारी सर्व आसक्ती ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची खूण असते. ज्या ‘गुरुं’ची अशी समजूत असते की, त्यांच्यापाशी मानवतेला शिकविण्यासाठी एक फार महान सत्य आहे आणि ज्यांना भरपूर मोठा शिष्यवर्ग हवा असतो आणि शिष्य त्यांच्यापासून निघून जातात तेव्हा जे बेचैन होतात किंवा त्यांच्याकडे जो कोणी येईल त्याला पकडून ते त्या व्यक्तीला शिष्य बनविण्याचा प्रयत्न करतात, असे गुरू निःसंदेहपणे अन्य कशाचे नव्हे तर, स्वतःच्या महत्त्वाकांक्षेचे अनुसरण करत असतात.

– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]

कर्म आराधना – १५

कौशल्यपूर्ण हात, स्वच्छ दृष्टी, एकाग्र अवधान, अथक चिकाटी या गोष्टी व्यक्तीपाशी असताना व्यक्ती जे काही करेल ते उत्कृष्टच असेल.
*
कौशल्यपूर्ण हात, काटेकोर काळजी, टिकून राहणारे अवधान या गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील ती व्यक्ती ‘जडभौतिका’ला ‘चैतन्या’च्या आज्ञा पाळण्यास भाग पाडते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 308)

कर्म आराधना – १३

कर्मामध्ये सुव्यवस्था आणि सुमेळ असला पाहिजे. वरकरणी पाहता जी गोष्ट अगदीच सामान्य वाटते ती गोष्टसुद्धा अगदी परिपूर्ण पूर्णतेने, स्वच्छतेच्या, सौंदर्याच्या, सुमेळाच्या भावनेने आणि व्यवस्थितपणाने केली पाहिजे.
*
कर्मामध्ये ‘परिपूर्णते’ची आस बाळगणे ही खरी आध्यात्मिकता.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 305-306)

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)