Tag Archive for: ध्यान

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २५

प्रश्न : ध्यान करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही का? आणि जितके अधिक तास एखादी व्यक्ती ध्यान करेल, तेवढ्या प्रमाणात तिची प्रगती अधिक होईल, हे खरे नाही का ?

श्रीमाताजी : ध्यानामध्ये व्यतीत केलेले तास हा काही आध्यात्मिक प्रगतीचा पुरावा होऊ शकत नाही. मात्र ध्यान करण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करावा लागत नसेल तर ती तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची खूण असते. तेव्हा अशा अवस्थेत, खरंतर तुम्हाला ध्यान थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; ध्यान थांबविणे अवघड असते; ईश्वरासंबंधीचे विचार थांबविणे अवघड असते; सामान्य चेतनेमध्ये उतरणे अवघड असते. असे असेल तेव्हा तुम्ही प्रगतीची खात्री बाळगू शकता. जेव्हा ईश्वरावर एकाग्रता करणे ही तुमच्यासाठी जीवनावश्यक गोष्ट झाली असेल, जर तुम्ही त्याविना जगू शकत नाही, तुम्ही कशामध्येही गुंतलेले असाल तरीही जर ती अवस्था रात्रंदिन सातत्याने टिकून राहत असेल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती केली आहे, असे होईल. तुम्ही ध्यान करत असाल किंवा इकडेतिकडे फिरत असाल, काही करत असाल, काही काम करत असाल, तर तेव्हा तुम्हाला आवश्यकता असते ती चेतनेची! ईश्वराची सातत्याने जाणीव असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे.

प्रश्न : पण ध्यानाला बसणे ही एक अपरिहार्य साधना नाही का? आणि त्यातून ईश्वराशी अधिक उत्कट आणि सघन ऐक्य प्राप्त होत नाही का?

श्रीमाताजी : तसे होऊ शकते. परंतु आपण काही साधनेसाठी साधना करत नाही. तर, आपण जे काही करत असू, सदा सर्व काळ, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक क्षणी ईश्वरावर एकाग्र असणे ही गोष्ट साध्य करण्यासाठी आपली धडपड आहे. इथे आश्रमात (श्रीअरविंद आश्रम) असे काही जण आहेत की ज्यांना ध्यान करायला सांगण्यात आले आहे. पण असेही काही जण आहेत की ज्यांना ध्यान करण्यास अजिबात सांगण्यात आलेले नाही. परंतु ते प्रगती करत नाहीयेत असा विचार करता कामा नये. तेही साधनाच करत आहेत पण ती वेगळ्या स्वरूपाची साधना आहे. कर्म करणे, भक्तिभावाने कर्म करणे आणि आंतरिक निवेदन (conscecration) करणे ही देखील एक प्रकारची आध्यात्मिक साधनाच आहे. केवळ ध्यानाच्या वेळीच नव्हे तर सर्व परिस्थितीमध्ये, जीवनातील प्रत्येक क्रियाकलापांमध्ये ईश्वराशी नित्य तादात्म पावून राहणे हे अंतिम ध्येय आहे.

असे काही जण आहेत की, जे ध्यानाला बसले असताना, त्यांना जी स्थिती अतिशय छान, आनंदी वाटते अशा स्थितीत ते जातात. ते त्यामध्ये आत्मसंतुष्ट होऊन राहतात आणि जगाला विसरतात. पण जर का ते विचलित झाले तर, ते अगदी रागारागाने आणि अस्वस्थ होऊन त्यातून बाहेर पडतात कारण त्यांच्या ध्यानामध्ये कोणीतरी बाधा आणलेली असते. ही काही आध्यात्मिक प्रगतीची किंवा साधनेची खूण नव्हे. काही जण असेही असतात की, जे ध्यान करणे म्हणजे ईश्वराचे ऋण चुकते करणे आहे असे समजतात. आठवड्यातून एकदा चर्चला गेलो की आपले ईश्वराविषयी जे कर्तव्य होते ते आपण पार पाडले असे समजणाऱ्या माणसांसारखी ही माणसं असतात.

तुम्हाला ध्यानात शिरण्यासाठी जर प्रयत्न करावे लागत असतील तर आध्यात्मिक जीवन जगण्यापासून अजून तुम्ही खूप दूर आहात. परंतु जर का तुम्हाला ध्यानातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील तर मग तुमचे ध्यान हे तुम्ही आध्यात्मिक जीवन जगत असल्याचे द्योतक आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19-21)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १५

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे (ईश्वराचे)अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

…प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम आणि भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

*

पूर्णयोगामध्ये ध्यान, कर्म, भक्ती या सर्व गोष्टींचाच समावेश होतो; परिपूर्तीच्या दिशेने जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून साहाय्यभूत होणारे हे प्रत्येक साधन आहे. जर व्यक्ती कर्माच्या माध्यमातून समर्पित होऊ शकत असेल तर आत्म-दानासाठी असलेल्या अत्यंत प्रभावी साधनांपैकी ते एक साधन असते; आणि स्वयमेव आत्म-दानदेखील साधनेचे एक अत्यंत शक्तिशाली आणि अपरिहार्य तत्त्व असते.

पूर्णयोग हा, समग्र अस्तित्वाचे त्याच्या सर्व घटकांनिशी आत्मार्पण करण्याचा, विचारी मनाचे आणि हृदयाचे, इच्छेचे आणि कृतींचे, आंतरिक व बाह्य साधनभूत घटकांचे अर्पण करण्याचा मार्ग आहे; ज्यामुळे व्यक्ती ईश्वराच्या अनुभूतीपर्यंत, आंतरिक उपस्थितीपर्यंत येऊन पोहोचते, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक परिवर्तनापर्यंत येऊन पोहोचते. (उपरोक्त) सर्वच मार्गांनी व्यक्ती जितके आत्म-दान करेल तेवढे ते साधनेसाठी चांगलेच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212), (CWSA 29 : 213-214)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०६

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या मस्तकाच्या वरती असतो आणि एकदा का तुम्हाला त्याची जाणीव झाली की, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरते; आनंदरूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते दिव्य अस्तित्व अवतरते. जोपर्यंत तुमच्याकडे ही चेतना असत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या सर्वच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जे कोणते रूप येते वा जे तुम्हाला अगदी सहजसोपे, स्वाभाविक वाटते ते तुम्ही अवलंबावे. दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करा (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करा आणि तेथे त्यांना आवाहन करा. तुम्ही यांपैकी कोणतीही एक गोष्ट करू शकता किंवा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेळी करू शकता – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: प्रथम एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल (quiet) करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा निश्चल मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही अधीर बनता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो; तुमची चेतना सिद्ध होईपर्यंत तुम्हाला प्रयत्न चालू ठेवावे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १०

धम्मपद : तुम्ही स्वत:ला निष्काळजी बनू देऊ नका, किंवा इंद्रियोपभोगामध्येही रममाण होऊ नका. जो सावधचित्त आहे आणि ज्याने आपले चित्त ध्यानमग्न केले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो.

श्रीमाताजी : असावधानता ह्याचा खरा अर्थ म्हणजे, इच्छाशक्तीची शिथिलता की, ज्यामुळे व्यक्ती तिचे उद्दिष्ट विसरून जाते आणि जे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे त्यापासून दूर नेणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ खर्च करते. त्यामुळे ती व्यक्ती एकप्रकारे मार्गात एकाच जागी थांबून राहते आणि बरेचदा तर ही शिथिलता व्यक्तीला मार्गापासून परावृत्त करते. अभीप्सेची ज्वालाच भिक्षूच्या असावधानतेचा निरास करते. दर क्षणाला त्याला ह्या गोष्टीची आठवण असते की, त्याच्या हाती असलेला अवधी अगदी अल्प आहे, त्यामुळे क्षणभरदेखील वेळ वाया न घालविता, शक्य तितक्या त्वरेने मार्गक्रमण केले पाहिजे. आणि जो अशा रीतीने सावध आहे, जो वेळ वाया घालवीत नाही, त्याच्यावरील सर्व बंधने, लहानमोठी सर्व बंधने एकापाठोपाठ एक गळून पडताना त्याला दिसतात. त्याच्या सर्व अडीअडचणी या सावधानतेमुळे नाहीशा होतात. आणि त्याचा हा दृष्टिकोन जर असाच कायम राहिला, आणि त्यातच त्याला संपूर्ण समाधान गवसू लागले तर, कालांतराने त्याला या सावधानतेतच इतका प्रगाढ आनंद अनुभवायला मिळतो की, लवकरच अशी वेळ येते की, जेव्हा तो सावधचित्त नसतो तेव्हा, त्याला चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागते, त्याला अस्वस्थ वाटू लागते.

ही वस्तुस्थिती आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती वेळ व्यर्थ न घालविण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा वाया घालविलेला प्रत्येक क्षण हा तिच्यासाठी दुःखदायक असतो आणि त्यात तिला कोणताही आनंद लाभत नाही. आणि एकदा का तुम्ही या अवस्थेप्रत जाऊन पोहोचलात, प्रगती आणि रूपांतरणासाठीचे प्रयत्न ही तुमच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट बनली, तुम्ही तिचाच सातत्याने विचार करू लागलात, तर खरोखरच तुम्ही शाश्वत अस्तित्वाच्या, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याच्या मार्गावर आहात, असे समजायला हरकत नाही.

या आंतरिक विकासाच्या वाटचालीमध्ये एक क्षण असा निश्चितपणे येतो की, जेव्हा एकाग्रता साधण्यासाठी, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये निमग्न होण्यासाठी आणि सत्यशोधनासाठी व त्याचे सर्वोत्तम आविष्करण करण्यासाठी – ज्याला बुद्धमार्गी लोक ‘ध्यान’ म्हणतात – ते करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत तर उलट, त्यामध्ये एक प्रकारची विश्रांती, आनंद, सुटकेचा मोकळा श्वास अनुभवास येतो आणि त्या अवस्थेमधून बाहेर पडून, ज्या गोष्टी खरोखरीच आवश्यक नाहीत, अशा गोष्टी करण्यासाठी वेळ खर्च करावा लागणे, यामध्ये वेळेचा अपव्यय आहे असे त्याला वाटू लागते; त्या गोष्टी त्याच्यासाठी भयंकर वेदनादायक वाटू लागतात. सर्व प्रकारच्या बाह्य गतिविधी, कृती ह्या अगदी अनिवार्यपणे आवश्यक अशा गोष्टींपुरत्याच सीमित होऊन, ईश्वरोपासना म्हणून केलेल्या कृतींपुरत्याच त्या शिल्लक राहतात. व्यर्थ, निरुपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी, ज्या गोष्टी निश्चितपणे काळाचा व प्रयत्नांचा अपव्यय करणाऱ्या आहेत, त्या सर्व गोष्टी, तीळमात्रही समाधान देत नाहीत तर, उलट असमाधान व थकवा उत्पन्न करतात. जेव्हा तुमचे लक्ष त्या एकमेव उद्दिष्टावर केंद्रित झालेले असते तेव्हाच तुम्हाला आनंद वाटतो. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मार्गावर आहात, असे समजावे.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 209)

तासन् तास ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला अनुभव येतात की नाही, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आत्ता अनुभव नव्हे तर चैत्याची वृद्धी हाच तुमचा मार्ग असावयास हवा.

याचा अर्थ म्हणजे, तीन गोष्टी पाहिजेत – पहिली गोष्ट म्हणजे, प्राणिक अहंकार आणि त्याचे गोंधळ, अस्वस्थता, अशांती यांपासून मागे होऊन, श्रद्धा व समर्पणाचा शांत दृष्टिकोन स्वीकारणे.

दुसरी गोष्ट म्हणजे, अंतरंगामध्ये अशा कोणत्यातरी गोष्टीचा उदय की जी गोष्ट, तुमच्या प्रकृतीमधील काय बदलायला हवे हे पाहते आणि तो बदल घडविण्याचा जोशही देते.

तिसरी गोष्ट म्हणजे, साधनेमधील चैत्य भावना की जी, भक्तीमध्ये वाढ करेल. अशी भावना की जी, ईश्वराचे स्मरण करण्यात, त्याच्या विषयीच्या बोलण्यामध्ये, त्याच्याविषयी लिहिण्यामध्ये, अनुभवण्यामध्ये, ईश्वराचा सतत विचार करण्यामध्ये सहजपणाने आनंद अनुभवेल; अशी भावना ही, बाह्यवर्ती गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा अधिकाधिक अगदी शांतपणे ईश्वराभिमुख होऊन, आत्म-उन्नतीमध्ये परिपूर्णपणे वृद्धिंगत होत राहील.

जेव्हा जाणीव ही वरील गोष्टींनी ओतप्रोत भरून जाईल म्हणजे, जेव्हा अशा प्रकारे पूर्ण चैत्य स्थिती असेल, चैत्य खुले झालेले असेल, तेव्हा आपोआप अनुभव यायला लागतील. प्रथम चैत्य खुलेपण आणि त्यानंतर उच्चतर जाणीव व तिचे अनुभव !

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 347-348)

एकाग्र ध्यान :

इकडेतिकडे धावणाऱ्या मनाला एक विशिष्ट सवय लावणे ही एकाग्रता साधण्यासाठीची पहिली पायरी असली पाहिजे. ही विशिष्ट सवय म्हणजे, इकडेतिकडे न ढळता स्थिरपणे, एकच विषय घेऊन, त्यावर एकाच दिशेने क्रमबद्ध विचार करण्याची सवय होय. मनाने हा विचार करताना सर्व मोह, तसेच त्याला ढळवू पाहणारे सर्व हाकारे कटाक्षाने टाळले पाहिजेत. आपल्या सामान्य जीवनात अशी एकाग्रता वरचेवर पाहावयास मिळते, अनुभवावयास मिळते; मनाला सामान्य जीवनात बाह्य विषय, बाह्य क्रिया यांवर एकाग्र व्हावयाचे असते व ते तसे एकाग्र होतेही; परंतु असा बाह्य विषय नसताना आंतरिक विषयावर एकाग्र होणे हे मनाला फार अवघड जाते; तथापि, ज्ञानाच्या साधकाला अशी ही आंतरिक एकाग्रता प्रत्यक्षात आणणे आवश्यकच आहे.

एकाग्रता ही कल्पनेच्या फलदायी सारतत्त्वावर करावयाची असते. जीवाच्या इच्छेने एकाग्र होऊन तसा आग्रह धरला की, ही कल्पना तिच्यात अंतर्भूत असलेल्या सत्याची सर्व अंगे प्रकट करते. उदाहरणार्थ, जर ‘दिव्य प्रेम’ हे आपल्या एकाग्रतेचा विषय असेल तर, प्रेम म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेच्या सारभूत तत्त्वावर एकाग्रतेने चिंतन केले पाहिजे. त्या दिव्य प्रेमाचे बहुविध आविष्करण तेजोमय रीतीने उदित व्हावे अशा पद्धतीने मनाने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ही एकाग्रता फक्त विचारांमध्ये नाही तर हृदयात, अस्तित्वात आणि साधकाच्या दृष्टीमध्येही असली पाहिजे. येथे विचार आधी आणि अनुभव नंतर असे होऊ शकते, पण कधीकधी, अनुभव आधी आणि नंतर त्या अनुभवातून ज्ञानाचा उदय असेही होऊ शकते. त्यानंतर मग प्राप्त झालेल्या गोष्टीचे अधिकाधिक चिंतन, मनन केले पाहिजे आणि ती जोवर नित्याचा अनुभव बनत नाही आणि पुढे जाऊन, जीवाचा तो नियमच किंवा धर्मच बनत नाही तोवर ती गोष्ट धरून ठेवली पाहिजे.

निदिध्यास :

एकाग्र ध्यानाची प्रक्रिया वर सांगितली; परंतु ह्या प्रक्रियेहून जोरदार, अधिक कष्टाची प्रक्रिया म्हणजे, समग्र मन हे कल्पनेच्या केवळ सारभूत अंशावरच एकाग्र करणे, त्याचे एकाग्रतेने निदिध्यासन करणे ही आहे. ध्यानविषयाचा फक्त मानसिक अनुभव घेण्यासाठी किंवा फक्त विचारगत ज्ञान मिळविण्यासाठी हा निदिध्यास केला जाऊ नये, तर कल्पनेच्या मागे असणाऱ्या वस्तूचे सार गाठण्यासाठी हा निदिध्यास केला जावा. या प्रक्रियेमध्ये साधकाचा विचार थांबतो आणि साधक तन्मयतेने वस्तूचे आनंदभरे दर्शन घेत राहातो अथवा आंतरिक समाधीच्या द्वारा त्या वस्तूत विलीन होऊन जातो. ही दुसरी प्रक्रिया जर उपयोगात आणली असेल तर नंतर, या प्रक्रियेने ज्या अवस्थेप्रत आपण चढून जातो त्या अवस्थेला खाली बोलावून, आपल्या निम्नतर अस्तित्वाचा ती ताबा घेईल, आपल्या सामान्य जाणिवेला ती प्रकाश, सामर्थ्य, आनंद प्रदान करेल असे करावे लागते. असे न केल्यास, आंतरिक समाधीत किंवा उच्च पातळीवर ती अवस्था आपली असेल पण आपण जागृतीत येऊन जगाच्या संपर्कात उतरलो की, आपल्या पकडीतून ती निसटलेली असेल, असे बरेच जणांचे होते. तेव्हा, हे असे अर्धवट प्रभुत्व हे पूर्णयोगाचे साध्य नाही.

मन निर्विषय करणे :

एकाच विषयावर मन एकाग्र करणे ही एक प्रक्रिया; विचार दृष्टिविषय झालेल्या एकाच वस्तूचा जोरदार निदिध्यास घेणे ही दुसरी प्रक्रिया; ह्या प्रक्रिया वर वर्णिल्या. तिसरी प्रक्रिया मन एकदम शांत, निर्विषय करणे ही आहे. अनेक मार्गांचा वापर करून, मन शांत करता येते. एक मार्ग असा आहे – मन क्रिया करीत असताना त्या क्रियेत साधकाने भाग घेऊ नये तर अगदी तटस्थ राहावे. मनाकडे केवळ पाहत राहावे; असे सारखे तटस्थतेने मनाकडे पाहात राहिले, तर शेवटी मन कंटाळते. त्याच्या उड्या, त्याची धावपळ ही त्याच्या मालकाच्या संमतीशिवाय चालली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग ते अधिकाधिक शांत होत जाते व शेवटी पूर्ण शांत होते. मन शांत करण्याचा दुसरा मार्ग असा – मन जे विचार सुचवील ते साधकाने असंमत करावे. ते मनातून बाहेर फेकून द्यावे. ते जसजसे त्याच्या समोर येत जातील तसतसे त्यांना फेकून देत राहण्याचे कार्य त्याने करीत राहावे; आणि आपल्या अस्तित्वात मनाच्या धांगडधिंग्यामागे जी शांती नेहमीच वसत असते, त्या शांतीला चिकटून राहावे. असे करीत राहिल्याने, अस्तित्वातील गुप्त शांती प्रकट होते; साधकाच्या मनात, सर्व अस्तित्वांत महान शांती प्रकटपणे स्थिर होते आणि या शांतीबरोबर सर्वव्यापी शांत ब्रह्माची अनुभूती साधकाला प्राप्त होते. या महान शांतीच्या पायावर दुसरी सर्व उभारणी करता येते. ही उभारणी, ज्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारावर केली जाते ते ज्ञान वस्तूंविषयीच्या वरवरच्या लक्षणांचे ज्ञान नसते तर, ते ईश्वरी अभिव्यक्तीच्या अति-खोल असणाऱ्या सत्याचे ज्ञान असते.

– श्रीअरविंद

(CWSA 23 : 323-324)