Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ११२

चेतनेमधील उन्मुखतेप्रमाणेच कर्मामध्येही उन्मुखता असते. ध्यानाच्या वेळी तुमच्या चेतनेमध्ये जी ‘शक्ती’ कार्य करत असते आणि तुम्ही जेव्हा तिच्याप्रत उन्मुख, खुले होता तेव्हा ती ज्याप्रमाणे शंकांचे आणि गोंधळाचे ढग दूर पळवून लावते अगदी त्याचप्रमाणे ती ‘शक्ती’ तुमच्या कृतीदेखील हाती घेऊ शकते. आणि त्याद्वारे ती तुम्हाला तुमच्यामधील दोषांची जाणीवच करून देऊ शकते असे नाही तर, काय केले पाहिजे यासंबंधी तुम्हाला ती सतर्क बनवू शकते आणि ते करण्यासाठी तुमच्या मनाला आणि हातांना ती मार्गदर्शन करू शकते. तुम्ही कर्म करत असताना तिच्याप्रत उन्मुख, खुले राहाल तर तुम्हाला या मार्गदर्शनाची अधिकाधिक जाणीव होऊ लागेल. आणि एवढेच नव्हे तर नंतर तुम्हाला, तुमच्या सर्व कृतींच्याच पाठीमागे कार्यरत असलेल्या ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ची जाणीव होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 262)

साधना, योग आणि रूपांतरण – १०५

श्रीमाताजींसाठी जे कोणी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करतात त्यांच्या योग्य चेतनेची तयारी त्या कर्मामधूनच होत जाते. अगदी ते ध्यानाला बसले नाहीत किंवा त्यांनी कोणती एखादी योगसाधना केली नाही तरीही त्यांच्या चेतनेची तयारी होत असते.

ध्यान कसे करावे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर कर्म करत असताना तसेच सदासर्वकाळ प्रामाणिक असाल आणि जर तुम्ही श्रीमाताजींप्रति उन्मुख राहाल तर जे गरजेचे आहे ते आपोआप घडून येईल.

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म हे एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

साधना, योग आणि रूपांतरण – १०४

मी नेहमीच असे सांगत आलो आहे की, साधना म्हणून करण्यात आलेले कर्म – करण्यात आलेले कर्म म्हणजे ‘ईश्वरा’कडून आलेला ऊर्जेचा प्रवाह या भूमिकेतून केलेले कर्म, पुन्हा त्या ‘ईश्वरा’ला अर्पण करणे किंवा ‘ईश्वरा’साठी केलेले कर्म किंवा भक्तिभावाने केलेले कर्म हे साधनेचे एक प्रभावी माध्यम असते आणि अशा प्रकारचे कर्म हे विशेषतः पूर्णयोगामध्ये आवश्यक असते. कर्म, भक्ती आणि ध्यान हे योगाचे तीन आधार असतात. तुम्ही या तिन्ही आधारांच्या साहाय्याने योग करू शकता किंवा दोन किंवा एका आधाराच्या साहाय्यानेही योग करू शकता. ज्याला रुढ अर्थाने ‘ध्यान’ असे म्हटले जाते तसे ध्यान करणे काही जणांना जमत नाही, परंतु अशी माणसं कर्माच्या किंवा भक्तीच्या द्वारे किंवा कर्म आणि भक्ती या दोहोंच्या एकत्रित माध्यमातून प्रगती करून घेतात. कर्म आणि भक्ती यांच्याद्वारे चेतनेचा विकास होतो आणि सरतेशेवटी त्या चेतनेमध्ये सहजस्वाभाविक ध्यान आणि साक्षात्कार शक्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 209)

साधना, योग आणि रूपांतरण – १०३

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला तुम्ही ‘ध्यान’ म्हणता? खरी चेतना अवतरित करण्यासाठी तिला आवाहन करण्याची ही केवळ एक पद्धत आहे. खऱ्या चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, हीच गोष्ट फक्त महत्त्वाची असते आणि जर ते अवतरण कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, तर ते अधिक चांगले! ध्यान हे केवळ एक साधन आहे, उपकरण आहे. चालताना, बोलताना, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी योग-प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

साधना, योग आणि रूपांतरण – १०१

आजपर्यंत आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, एकाग्रतेच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणारे अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या मार्गांनी मात करता येते, समाधी – अवस्था म्हणजे काय, पारंपरिक योगमार्गातील समाधी आणि पूर्णयोगांतर्गत समाधी यामधील फरक, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय इत्यादी विविध गोष्टी, त्यांचे बारकावे समजावून घेतले.

ध्यानाच्या मार्गाने उन्नत होत होत, समाधी-अवस्थेपर्यंत पोहोचणे हा साधनेचा केवळ एक मार्ग झाला. तो महत्त्वाचा असला तरी एकमेव नाही. पूर्णयोगांतर्गत साधना ही फक्त ध्यानापुरती सीमित नाही. तर ध्यानावस्थेत प्राप्त झालेली शांती, प्रेम, प्रकाश, ज्ञान, आनंद या साऱ्या गोष्टी बाह्य व्यवहारामध्येही उतरविणे येथे अभिप्रेत असते. आणि येथेच महत्त्वाची भूमिका असते ती कर्माची!

ध्यानासाठी दिवसाकाठी आपण किती वेळ देऊ शकतो ? फारफार तर तास-दोन तास. पण उरलेला सर्व वेळ आपण काही ना काही कर्म करत असतो. दैनंदिन व्यवहार करत असतो, उपजीविकेसाठी कामकाज करत असतो. ते करत असताना आपली वृत्ती कशी असते, आपली भूमिका कशी असते, आपण कोणत्या भावनेने कर्म करतो, कर्मफलाबाबत आपला दृष्टिकोन काय असतो, या व यासारख्या गोष्टींवरच कर्म हे ‘कर्मबंधन’ ठरणार की त्याचे पर्यवसान ‘कर्मयोगा’ मध्ये होणार हे अवलंबून असते.

पूर्णयोगामध्ये तर कर्माला विशेषच महत्त्व दिलेले आढळते. कारण या पार्थिव जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये रूपांतरण घडविणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने, पूर्णयोगाच्या प्रकाशात, एक साधनामार्ग या दृष्टिकोनातून ‘कर्म-व्यवहारा’कडे पाहण्याचा प्रयत्न आपण येथून पुढच्या भागांमध्ये करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – ८८

(ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….)

प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या ठायी स्पष्टता आणि सौंदर्य असते आणि त्यामुळे ते ओळखणे हे तितकेसे कठीण नसते.

*

(ध्यानावस्थेमध्ये एका साधकाला काही ध्वनी ऐकू येत असल्याचे त्याने श्रीअरविंदांना पत्राने लिहून कळविले असावे, तेव्हा त्या साधकाला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर… )

शारीरिक दृष्टीशिवाय जशी आणखी एक वेगळी अंतर्दृष्टी असते, त्याप्रमाणेच बाह्य श्रवणाप्रमाणेच आंतरिक श्रवणही (inner hearing) असते. आणि ते आंतरिक श्रवण इतर जगतांमधील, इतर स्थळकाळातील किंवा अतिभौतिक जिवांकडून येणारे आवाज, ध्वनी आणि शब्द ऐकू शकते. पण इथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी परस्परविरोधी आवाजात जर तुम्हाला कोणी काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकता कामा नये किंवा त्यांना प्रत्युत्तरदेखील देता कामा नये. तुम्ही काय करावे किंवा काय करू नये यासंबंधी केवळ मी आणि श्रीमाताजीच तुम्हाला सांगू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 304-305, 112)

साधना, योग आणि रूपांतरण – ८०

अंतरंगामध्ये खूप खोलवर आणि दूर गेल्यावर सौख्य आणि शांती यांचा अनुभव येतो कारण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये (psychic) असतात आणि अंतरात्मा हा आपल्या अंतरंगामध्ये खूप खोलवर, मन आणि प्राण यांनी झाकलेला असतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही या अंतरात्म्याप्रत खुले होता, उन्मुख होता, आणि तेव्हा तुम्हाला अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या आंतरात्मिक चेतनेची जाणीव होते आणि मग तुम्हाला सौख्य, शांती या गोष्टी जाणवतात. सौख्य, शांती आणि आनंद या गोष्टी अधिक समर्थ व स्थिर व्हाव्यात आणि त्यांचा अनुभव तुमच्या सर्व व्यक्तित्वामध्ये, आणि अगदी शरीरामध्येदेखील यावा यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये अधिक खोलवर गेले पाहिजे आणि अंतरात्म्याची पूर्ण शक्ती शारीरिक अस्तित्वामध्ये आणली पाहिजे.

खऱ्या चेतनेसाठी अभीप्सा बाळगून, नियमित एकाग्रता आणि ध्यान केल्याने, हे सर्वाधिक सहजतेने शक्य होते. हे कर्माद्वारे, निष्ठेद्वारेसुद्धा शक्य होते; स्वतःसंबंधी विचार न करता, हृदयामध्ये श्रीमाताजींप्रति सातत्याने आत्मनिवेदन (consecration) करत राहण्याच्या संकल्पनेवर नेहमी लक्ष केंद्रित करून, ‘ईश्वरा’साठीच कर्म करत राहिल्यानेसुद्धा हे शक्य होते. परंतु हे परिपूर्णपणे सुयोग्य रीतीने करणे सोपे नसते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधीमध्येच असले पाहिजे असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 299), (CWSA 30 : 250)

साधना, योग आणि रूपांतरण – ६९

एखादी व्यक्ती जेव्हा ध्यान करण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा अंतरंगामध्ये शिरण्यासाठी, जाग्रत चेतनेचा विलय करण्यासाठी आणि अंतरंगामध्ये, सखोल अशा आंतरिक चेतनेमध्ये जागृत होण्यासाठी तिला एक प्रकारचा दबाव जाणवत असतो. परंतु हा दबाव म्हणजे निद्रिस्त होण्यासाठीचा दबाव आहे अशी समजूत मन सुरुवातीला करून घेते कारण मनाला निद्रा ही एकाच प्रकारची आंतरिक चेतना सवयीची असते. म्हणूनच ध्यानाच्या माध्यमातून योगसाधनेचा प्रयत्न करत असताना, निद्रा ही बरेचदा पहिली अडचण ठरते. परंतु व्यक्ती जर चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर हळूहळू निद्रा आंतरिक सचेत स्थितीमध्ये परिवर्तित होते.

*

मला वाटते, डुलकी लागणे ही अशी एक अवस्था आहे की ज्यामधून प्रत्येकजणच जात असतो. साधनेच्या एकाग्रतेमध्ये शरीराला सहभागी करून घेण्याचा जो प्रयत्न केला जातो तेव्हा त्याच्या दबावाला शरीराने दिलेली ती एक प्रकारची यांत्रिक प्रतिक्रिया असते. ही गोष्ट फारशी मनावर न घेणे बरे. चेतना जसजशी वृद्धिंगत होत जाते आणि ती शारीरिक अस्तित्वालासुद्धा जेव्हा तिच्या कक्षेत समाविष्ट करते तेव्हा डुलकी लागणे आपणहून निघून जाते.

*

व्यक्ती जेव्हा ध्यान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशा प्रकारे झोप येतेच. तिच्यावर दोन प्रकारे मात करता येते. जिथे शक्य असेल तिथे तिला सजग आंतरिक आणि अंतर्मुख स्थितीकडे वळवायचे आणि शक्य नसेल तेव्हा, कोणताही खटाटोप न करता, अविचलपणे एकाग्र राहून, ग्रहण करण्यासाठी सजगपणे उन्मुख, खुले राहायचे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 319)

साधना, योग आणि रूपांतरण – ६०

(ध्यानामध्ये प्राप्त झालेली) चांगली अवस्था कायम टिकून राहत नाही ही बऱ्यापैकी सार्वत्रिकपणे आढळणारी घटना आहे. चांगली अवस्था येणे व निघून जाणे अशी दोलायमान स्थिती नेहमीच आढळून येते. जो बदल होऊ घातलेला आहे तो जोपर्यंत स्वतः स्थिर होत नाही, तोपर्यंत अशी ये-जा चालूच राहते. हे दोन कारणांमुळे घडून येते. प्राण आणि शरीर दोघेही आपापल्या जुन्या गतिविधी एकदम सोडून देण्यास आणि नवीन गतिविधींशी जुळवून घेण्यास असमर्थ असतात हे पहिले कारण. आणि वरून (उच्च शक्तीचा) दबाव आला तर प्रकृतीमध्ये कोठेतरी दडून बसायचे आणि संधी मिळताच डोकं पुन्हा वर काढायचे ही जी (जड)द्रव्याची सवय असते, ती सवय हे दुसरे कारण असते.

*

(तुमच्या प्रकृतीमधील) सर्व घटक खुले होईपर्यंत ही दोलायमानता नेहमीच चालू राहते. दोनपैकी कोणत्या तरी एका कारणामुळे हे घडू शकते.

०१) तुमच्या अस्तित्वामधील एखादा लहानसा भाग किंवा एखादी गतिविधी उफाळून पृष्ठभागावर येते, जो भाग (दिव्य शक्तीप्रत) खुला नाहीये आणि त्याच्यामध्ये उच्चतर शक्तीचा प्रभाव निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

०२) बाह्यवर्ती शक्तीकडून तुमच्यावर एक प्रकारचे सावट टाकण्यात आले आहे आणि ते सावट तुमच्यामध्ये तुमचा जुना अडथळा परत निर्माण करत आहे असे नाही, पण काहीसा तात्पुरता अंधकार किंवा अंधकाराचा वरकरणी आभास निर्माण करत आहे.

अस्वस्थ होऊ नका, परंतु लगचेच अविचल होऊन स्वतःला खुले करण्याचा प्रयत्न करा. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, ती जुनी चिवट अडचण आणि गोंधळ यांना पुन्हा परतून येण्यास मुभा देऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे, भलेही हा अंधकार काही गंभीर व्यत्यय निर्माण करणारा नसला तरीसुद्धा या अंधकाराला दीर्घ काळ टिकून राहण्याची मुभा देऊ नका. अविचल, सातत्यपूर्ण इच्छाशक्ती बाळगली की, अगदी गंभीरातल्या गंभीर अडचणींना तुम्ही अटकाव करू शकता. तुम्ही अविचल आणि स्थिरपणे सातत्याने उन्मुख राहिलात तर कोणत्याही दीर्घ पीडेचे निवारण होईल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 60)

साधना, योग आणि रूपांतरण – ५८

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि (असे असेल तरच) तुम्हाला ध्यान करणे शक्य होईल असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही आवश्यक गोष्ट आहे. डोकं रिकामं करणे याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वरा’च्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल. त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यतः ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता मात्र बदललेली असेल. जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले असल्याचे तुम्हाला जाणवेल. एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, अढळ अशी निश्चल शक्ती तुम्हाला जाणवेल.

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात; त्यासाठी विविध शक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. …पण त्यामध्ये त्या काही प्रमाणातच यशस्वी होतात. तुम्ही प्रगती करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी जेवढ्या प्रमाणात बाधा पोहोचविणे आवश्यक असेल तेवढ्याच प्रमाणात त्या तुम्हाला बाधा पोहोचवितात. जेव्हा कधी तुमच्यावर जीवनाकडून आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केलीच पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही ताठ मानेने आनंदाने म्हणता, “मला काय शिकले पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे. मला माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे”… अशी तुमची वृत्ती असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 121-122)