संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)

दुर्दम्य हाक आली असेल तर आणि तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो. केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर या योगासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटकांपैकी ती एक आवश्यक बाब आहे, इतकेच.

*

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहिततता व संपूर्ण शरणागती यांजकडे वाटचाल करण्याचा ज्यांचा दृढ संकल्प आहे केवळ त्यांच्यासाठीच हा योग आहे.

*

पूर्णयोगामध्ये ईश्वराचा केवळ साक्षात्कार अभिप्रेत नाही, तर संपूर्ण आत्मनिवेदन अभिप्रेत आहे. तसेच, ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यास व्यक्तीचे आंतरिक आणि बाह्य जीवन जोपर्यंत सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवीत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्रतपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन येथे अपेक्षित असते.

*

हा योगमार्ग इतर बहुतेक योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे त्यामुळे, अंतरात्म्याकडून आलेल्या हाकेची खात्री असल्याखेरीज आणि अंतिम साध्याप्रत वाटचाल करीत राहण्याची ‘तयारी असल्या’ची खात्री पटल्याखेरीज, व्यक्तीने या मार्गामध्ये प्रवेश करता कामा नये. ‘तयारी असणे’, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. जर सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छाशक्ती असेल, तरच या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 27)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य कारागीराकडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी आवाहन करेल आणि परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)

अभीप्सा म्हणजे जीवाने उच्चतर गोष्टींसाठी केलेला धावा होय; जे काही उच्चतर किंवा ईश्वरी चेतनेशी संबंधित आहे, त्यासाठी किंवा ईश्वरासाठी केलेला धावा होय, त्याला दिलेली हाक आहे.

*

अभीप्सा ही वासनेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याच्या निकडीची भावना आणि ईश्वराप्रत व ईश्वरप्राप्तीची शांत, स्थिर इच्छा असली पाहिजे, आस असली पाहिजे.

*

साधकाने योगमार्ग चालणे सुरु केल्यानंतर, आरंभीआरंभी व पुढेही दीर्घ काळपर्यंत त्याला अनुभव किती वेगाने येतील, अनुभवाची व्यापकता किती असेल, त्यांची तीव्रता किती असेल, अनुभवाच्या फलांची ताकद किती असेल हे सारे मूलतः साधकाच्या अभीप्सेवर आणि त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर अवलंबून असते.

वस्तूंच्या बाह्यवर्ती रूपांमध्ये व त्यांच्या आकर्षणात बुडालेल्या अहंप्रधान जाणिवेतून बाहेर पडून, एका उच्च अवस्थेच्या दिशेने मानवी आत्म्याचे वळणे की ज्या अवस्थेत मग विश्वरूप आणि विश्वातीत असलेले तत्त्व व्यक्तिरूपी साच्यात उतरून, व्यक्तिरूप साच्याचे परिवर्तन घडवू शकते, ती प्रक्रिया म्हणजे योगाप्रक्रिया होय. म्हणून या सिद्धीचा पहिला निर्णायक घटक असतो तो म्हणजे, आत्म्याला अंतर्मुख करणाऱ्या शक्तीची, आत्माभिमुखतेची तीव्रता.

साधकाच्या हृदयातील अभीप्सेचा जोर, त्याची इच्छाशक्ती, मनाची एकाग्रता, त्याच्या प्रयत्नांची चिकाटी आणि शक्तीचे उपयोजन करण्याचा त्याचा निर्धार ह्या गोष्टी म्हणजे ती तीव्रता दर्शविणारे मापदंड असतात….

….ईश्वरप्राप्तीचा हा उत्साह आणि ईश्वरप्राप्तीसाठी हृदयाची तळमळ, व्याकुळता ह्या गोष्टी साधकाचा अहंकार नष्ट करतात आणि त्याचा क्षुद्र, मर्यादित असा जो साचा असतो त्याच्या मर्यादा मोडून काढतात. आणि ज्याच्या भेटीसाठी तो तळमळत होता त्याच्या परिपूर्ण व व्यापक स्वागतासाठी जागा करून देतात. आणि त्यामुळे वैयक्तिक आत्मा व प्रकृती ही कितीही मोठी, कितीही उच्च असली तरी, ज्याचे स्वागत करावयाचे ते ईश्वरीतत्त्व हे विश्वरूप असल्याने अधिक व्यापक असते, आणि ते विश्वातीत असल्याने वैयक्तिक आत्म्याच्या अतीत असते.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 56), (CWSA 29 : 60-61), (CWSA 23 : 58)

योगाच्या परिभाषेमध्ये चैत्य (Psychic) या संकल्पनेने कशाचा बोध होतो?

‘प्रकृतीमधील आत्म्याचा घटक’ या अर्थाने ‘चैत्य’ ही संकल्पना आहे. मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे उभे असणारे ते शुद्ध चैत्य किंवा ईश्वरी केंद्र असते; (ते म्हणजे अहंकार नाही) परंतु आपल्याला त्याची अगदी पुसटशीच जाणीव असते.

हे चैत्य अस्तित्व म्हणजे ईश्वराचा अंश असतो आणि तो जन्मानुजन्म कायम असतो; स्वत:च्या बाह्य साधनांच्या माध्यमातून तो जीवनानुभव घेत राहतो. जसजसा हा अनुभव वाढत जातो तसतसे त्यामधूनच एक चैत्य व्यक्तिमत्त्व विकसित होऊ लागते. ते नेहमीच सत्य, शिव, सुंदरता यांवर भर देते आणि अंतिमत: मग त्याची प्रकृती ही ईश्वराभिमुख होण्यासाठी सज्ज आणि पुरेशी सक्षम होते.

नंतर मन, प्राण, शरीर यांचे पडदे भेदून, हे चैत्य अस्तित्व पूर्णत: पुढे येते व उपजत प्रेरणांचे नियमन करू लागते आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणते. तेव्हा मग, प्रकृती आत्म्यावर सत्ता गाजवत नाही तर; आत्मा, पुरुष हा प्रकृतीवर अधिकार चालवू लागतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 337)

एका विशिष्ट दृष्टीने पाहिले तर समता आणि तमस ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकमेकींच्या उजळ व अंधाऱ्या अशा प्रतिकृती आहेत. उच्चतर प्रकृती शांतीमध्ये आराम शोधते तर, निम्नतर प्रकृती उर्जेच्या विश्रांतीमध्ये आणि तमसामध्ये, अचेतनामध्ये परतण्यामध्ये आराम मिळविण्यासाठी धडपड करते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 477)

कशामध्ये तरी गढलेली प्रगाढ अशी स्थिरता म्हणजे शांती होय. ती अतिशय सकारात्मक असते, ती जणुकाही शांत, लाटाविरहित आनंदाच्या जवळ जाणारी असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद ह्या साऱ्या गोष्टी वर आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्या खाली अवतरण्यासाठी एक विशिष्ट ऊर्ध्वगामी असणारा झरोका असला पाहिजे. मनाची शांती आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या प्रभावाला खुली असणारी एककेंद्री क्रियाविरहितता ह्या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 482)

साधनेमधील पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर, ती म्हणजे मनामध्ये स्थिर शांती आणि शांतता प्राप्त करून घेणे. अन्यथा तुम्हाला साधनेतील अनुभूती येऊ शकतील पण स्थायी असे काहीही नसेल. शांत मनामध्येच खरीखुरी जाणीव निर्माण करता येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 149-150)

खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार म्हणजे समता होय. आणि जेव्हा एखादा साधक स्वत:ला प्राणिक भावावेगाच्या लाटेबरोबर, भावनेद्वारे, वाणीद्वारे वा कृतीद्वारे वाहवत जाऊ द्यायला संमती देतो तेव्हा, तो साधक ह्या समतेपासूनच विचलित होतो.

स्थिर झालेली समता ही खूप मोठ्या प्रमाणात, कधीकधी तर अगदी अमर्यादपणे माणसाची सहनशीलता आणि क्षमाशीलता नि:संशयपणे वाढविते तरीही ती सहनशीलता, क्षमाशीलता म्हणजे समता नव्हे.

समता म्हणजे शांत, अविचल मन आणि प्राण.

समता म्हणजे, तुमच्या बाबतीत घडलेल्या किंवा तुमच्याविषयी बोलल्या गेलेल्या गोष्टींनी स्पर्शित वा विचलित न होणे. तर कोणत्याही वैयक्तिक भावभावनांमुळे विकार निर्माण न होऊ देता, त्यांच्याकडे स्वच्छ दृष्टीने पाहणे, आणि त्या गोष्टींच्या पाठीमागे काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करणे, त्या गोष्टी का घडल्या, त्यापासून आपण काय धडा घेतला पाहिजे, आपल्यामध्ये असे काय आहे की, ज्यामुळे त्या गोष्टी आपल्या विरोधात उभ्या ठाकल्या, त्यापासून कोणता आंतरिक लाभ किंवा प्रगती आपण करू शकतो हे सारे स्वच्छ दृष्टीने पाहणे.

समता म्हणजे प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व ! राग, संवेदनशीलता, गर्व किंवा ताठा, तसेच इच्छावासना आणि विश्रांती ह्या साऱ्या प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व! त्यांना आपल्या भावनिक अस्तित्वाचा ताबा घेऊन, आपली आंतरिक शांती बिघडवू न देणे ; त्यांच्या भरीस पडून, बोलण्याची किंवा कृती करण्याची घाई न करणे, नेहमी आत्म्याच्या आंतरिक शांत स्थितीत राहून कृती करणे आणि बोलणे..

कोणत्याही व्यक्तीमध्ये ही अशा प्रकारची समता पूर्णांशाने असणे ही काही सोपी गोष्ट नाही; तरीही व्यक्तीने ह्या अशा समतेला आपल्या आंतरिक स्थितीचा आणि बाह्य हालचालींचा पाया बनविण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावयास हवा.

समतेचा अजूनही एक अर्थ आहे. विविध माणसं, त्यांची प्रकृती, त्यांच्या कृती, त्यांना कृतिप्रवण करणाऱ्या शक्ती ह्या साऱ्याकडे समदृष्टीने पाहणे. हे असे केल्याने, म्हणजे व्यक्तीच्या मनामधील, दृष्टीमधील, न्यायनिवाड्यातील सर्व वैयक्तिक भावना दूर सारल्याने, किंबहुना सारे मानसिक पूर्वग्रह मनातून दूर सारल्याने, व्यक्तीला त्यांच्याविषयीचे सत्य दिसण्यास मदत मिळते. वैयक्तिक भावभावनांमुळे नेहमीच विपर्यास होतो आणि माणसांच्या कृतींकडे पाहताना, कृती पाहण्याचे सोडून व्यक्ती त्यापाठीमागील गोष्टी पाहवयास लागते, अशा गोष्टी की ज्या बहुतांशी तिथे अस्तित्वातच नसतात. आणि ज्या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या अशा गोष्टी म्हणजे गैरसमजुती, चुकीचे आडाखे अशा गोष्टींमध्ये त्यांचे पर्यवसान होते. छोटे परिणाम करणाऱ्या गोष्टीही मग विशालकाय रूप धारण करतात. मी हे पाहिले आहे की, जीवनातील निम्म्यापेक्षा अधिक संख्येने अनिष्ट घटना ह्याच कारणामुळे घडतात.

परंतु सर्वसामान्य आयुष्यात मात्र वैयक्तिक भावभावना, संवदेनशीलता ह्या बाबी मानवी प्रकृतीचा एक नेहमीचा भाग असतात आणि त्यांची स्वसंरक्षणासाठी निकड भासू शकते. असे असूनदेखील मला असे वाटते की, अगदी तेथेसुद्धा माणसं आणि गोष्टींविषयीचा एक दृढ, विशाल आणि समतापूर्ण दृष्टिकोन हा संरक्षणाचा अधिक चांगला मार्ग असू शकतो. साधकासाठी मात्र, त्यांच्यावर मात करून, आत्म्याच्या शांत सामर्थ्यामध्ये जीवन व्यतीत करणे, हे त्याच्या प्रगतीचा एक आवश्यक भाग असतो.

आंतरिक प्रगतीची पहिली अट ही आहे की, प्रकृतीमधील कोणत्याही भागातील चालू असलेली किंवा आजवर चालत आलेली कोणतीही चुकीची कल्पना, चुकीची भावना, चुकीचे बोलणे, चुकीची कृती ओळखणे आणि ‘चुकीची’ असे म्हणत असताना त्याचा अर्थ असा की, जी कृती सत्यापासून, उच्चतर चेतनेपासून, उच्चतर आत्म्यापासून, ईश्वरत्वाच्या मार्गापासून व्यक्तीची फारकत करते. आणि एकदा ती लक्षात आल्यानंतर, ती कबूल करणे, तिच्यावर पांघरूण न घालणे किंवा तिचे समर्थन न करणे, हे आवश्यक असते. मग अशी कृती, त्यामध्ये प्रकाश व ईश्वरी कृपा अवतरित व्हावी आणि सत्चेतनेच्या सुयोग्य कृतीने तिची जागा घ्यावी म्हणून ती ईश्वराला अर्पण करावी.

*

समता नसेल तर, साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. ह्या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समता बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समता ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

(CWSA 29 : 130-131), (CWSA 29 : 129)

– श्रीअरविंद

ग्रहणशीलता म्हणजे ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्याची आणि तिचे अस्तित्व अनुभवण्याची शक्ती होय. त्यामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवणे हेही अनुस्यूत आहे. व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य श्रीमाताजींना करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय.

(CWSA 29:266)

मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणाऱ्या आणि मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर व मागेही अस्तित्वात असणाऱ्या अशा महान दिव्य चेतनेला, स्वत:च्या सर्व अंगांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणतीही मर्यादा येऊ न देता, स्वीकारता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे उन्मुखता (opening) होय.

(CWSA 12 : 169)

– श्रीअरविंद

मानवामध्ये उपजतच आध्यात्मिक आस असते; कारण पशुंमध्ये नसणारी अपूर्णतेची आणि मर्यादांची जाणीव त्याच्यामध्ये असते आणि तो आज जे काही आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करण्याजोगे काहीतरी आहे, हे ही त्याला जाणवत असते. स्वत:च्या पलीकडे जाण्याची ही उर्मी मानववंशामधून पूर्णपणे कधीही नाहीशी होत नाही.

जडामधून, विकसित अशा विचारी मनाचा उदय होण्याची आजवर झालेली वाटचाल ही आत्मभान असणाऱ्या अभीप्सेमुळे, हेतुपूर्वक, संकल्पपूर्वक किंवा जिवंत व्यक्तीच्या धडपडीतून घडून आलेली नसून, ती अर्धजागृतपणे किंवा नकळतपणे, प्रकृतीच्या यांत्रिक कार्याचा भाग म्हणून घडून आली आहे.

हे असे घडले कारण, अचेतनेपासून उत्क्रांतीला सुरुवात झाली आणि त्या अचेतनेपासून गुप्त चेतना अजूनपर्यंत पुरेशी उदयास आली नव्हती. जिवंत प्राणिमात्राची आत्म-जागृत वैयक्तिक इच्छेचा सहभाग होऊन, त्या माध्यमातून काही कार्य घडून यावे इतपत ती उदयास आली नव्हती. परंतु मानवामध्ये मात्र आवश्यक तो बदल घडून आलेला आहे – मानव जागृत झाला आहे आणि त्याला स्वत:विषयीची जाणीव निर्माण झालेली आहे. ज्यायोगे इच्छाशक्ती विकसित होईल, ज्ञान वृद्धिंगत होईल व आंतरिक अस्तित्व अधिक सखोल होईल, बाह्य अस्तित्व अधिक व्यापक होईल, प्रकृतीच्या क्षमता वाढीस लागतील अशा प्रकारच्या शक्ती मनामध्ये आविष्कृत करण्यात आल्या आहेत.

आपल्यापेक्षा अधिक उच्च अशी जाणिवेची एक अवस्था आहे हे मानवाला दिसले आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या प्राणामध्ये उत्क्रांतीची प्रेरणा वसलेली आहे, स्वत:ला ओलांडून पलीकडे जाण्याची आस त्याच्यामध्ये वसली आहे. त्याला त्याच्या आत्म्याची जाणीव झाली आहे, त्याला स्व आणि चेतनेचा शोध लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 21 : 875-76)

*

जर तुम्ही जागरूक अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या साऱ्या गोष्टी या तुमच्या अभीप्सेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्यक होतील, अशा रीतीनेच रचल्या जातील. एकतर त्या तुमची प्रगती व्हावी म्हणून, एखाद्या नवीनच गोष्टीशी तुमचा संपर्क साधून देतील किंवा जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी तुमच्या प्रकृतीमधील एखादी गोष्ट काढून टाकतील. ही काहीतरी लक्षणीय गोष्ट आहे.

जर तुम्ही खरोखर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल, तर अशी कोणतीच परिस्थिती नसते की, जी तुमची अभीप्सा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करत नाही. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणु काही एका अतिशय परिपूर्ण व निपुण चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. आणि तुमच्या बहिर्वर्ती चेतनेला कदाचित ते जाणवणारही नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोध करता, तक्रार करता, ती बदलविण्याचा प्रयत्न करता; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काहीसे अंतर निर्माण होते, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते.

तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत आहे आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक परिणामकारक रीतीने कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)

विचलित न होणे, स्थिर आणि सश्रद्ध असणे हा खचितच योग्य दृष्टिकोन आहे. परंतु त्याचबरोबर, श्रीमाताजी आपले जे संगोपन करत असतात त्यापासून कोणत्याही कारणास्तव विन्मुख न राहणे आणि श्रीमाताजींकडून मिळणाऱ्या साहाय्याचा स्वीकार करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. व्यक्तीने स्वत:ची अक्षमता, प्रतिसाद देण्याची अक्षमता यांविषयीच्या कल्पनांमध्ये गुंतून राहणे; स्वतःचे दोष, अपयश ह्या गोष्टी अती उगाळत राहणे आणि त्याबद्दल दुःखीकष्टी होत राहण्यास किंवा त्याविषयी लाज बाळगत राहायला मनाला संमती देणे, या गोष्टी करता कामा नयेत; कारण या सर्व कल्पना, भावना ह्या गोष्टी अंततः व्यक्तीला दुर्बल बनविण्यास कारणीभूत ठरतात.

दुःखसंकटे आली, अपयश आले, ठोकरा खाव्या लागल्या तर, अशा प्रत्येक वेळी व्यक्तीने अविचल राहून त्यांकडे पाहावयास हवे आणि त्यांचा निरास व्हावा म्हणून समचित्ततेने आणि सातत्याने ईश्वरी साहाय्यासाठी धावा करावयास हवा. परंतु उदास होणे, व्यथित होणे वा नाउमेद होणे, ह्या गोष्टींना कधीच थारा देता कामा नये.

योग हा काही सोपा मार्ग नाही आणि प्रकृतीमध्ये पूर्ण परिवर्तन ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 294)