हिंदुधर्माने स्वत:ला कोणतेही नाव देऊ केले नाही कारण त्याने स्वत:वर कोणत्याही पंथाच्या मर्यादा घालून घेतल्या नाहीत; त्याने कोणत्याही एकाच एक गोष्टीला वैश्विक समर्थन दिलेले नाही; त्याने कोणत्याच मतप्रणालीला बिनचूक म्हणून घोषित केलेले नाही; मुक्तीचा कोणताच एकच एक मार्ग वा प्रवेशद्वार असे सांगितलेले नाही; हिंदुधर्म म्हणजे कोणता एकच एक असा पंथ वा संप्रदाय नसून, मानवी आत्म्याने ईश्वराभिमुख राहत, सातत्याने केलेल्या विस्तारित प्रयत्नांची ती परंपरा आहे. आध्यात्मिक आत्मरचना आणि आत्मशोधासाठी, अनेकांगी, आणि अनेक पातळ्यांवरील व्यवस्था यामध्ये आहे; या साऱ्यामुळेच ज्या नावाने हा धर्म ओळखला जातो, शाश्वत धर्म हेच नाव स्वत:ला लावण्याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे. या धर्माच्या अर्थाची आणि त्याच्या आत्म्याची न्याय्य आणि योग्य समज आपल्याला असेल तर आणि तरच भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ आणि तिचा आत्मा यांचे आपल्याला आकलन होऊ शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 178-179)

पाश्चिमात्य बुद्धीला परिचित असलेल्या कोणत्याही व्याख्येने ‘भारतीय धर्मा’चे वर्णन करता येत नाही. समग्रतेने विचार केला तर, भारतीय धर्म हा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक पूजाअर्चा व अनुभूतींचा सहिष्णू व मुक्त असा समन्वय आहे. एकमेव सत्याकडे हा धर्म सर्व बाजूंनी पाहतो आणि सत्याची कोणतीच बाजू तो त्याज्य मानीत नाही.

या धर्माने स्वतःला कोणतेच विशेष नाव दिले नाही, कोणत्याच मर्यादा घालणाऱ्या वैशिष्ट्याने स्वतःला बांधून घेतले नाही. या धर्मामध्ये जे घटक पंथ, विभाग आहेत त्यांना विभिन्न नावे धारण करावयास त्याने संमती दिली पण ज्या ब्रह्माचा युगानुयुगे तो शोध लावू पाहत आहे त्या ब्रह्माप्रमाणेच तो स्वत: मात्र अनाम, निराकार, विश्वव्यापी व अनंत राहिला आहे.

इतर संप्रदायांपासून वेगळेपणाने ओळखू येतील असे ह्या धर्माला पारंपरिक धर्मग्रंथ आहेत, संस्कार आहेत, प्रतीके आहेत, पण मूलत: त्याच्या अवश्यभावी गुणधर्मानुसार तो एक सांप्रदायिक धर्म नसून, ती एक व्यापक, बहुआयामी, नित्य संघटनशील, नित्य प्रगतिशील, आत्मसंवर्धक अशी आध्यात्मिक संस्कृतीची व्यवस्था आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 193-195)

भविष्यात होणाऱ्या बदलांमध्ये हिंदु समाजाने नवीन विश्वात्मक मानदंडाच्या प्रस्थापनेसाठी पुढाकार घ्यावयास हवा. हिंदु असल्यामुळे आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या माध्यमातूनच आपण तो शोध घेण्याचा प्रयत्न करावयास हवा.

आपला स्वत:चा असा एक मानदंड आहे की, जो एकाचवेळी विश्वात्मक आहे आणि व्यक्तिगत असाही आहे. शाश्वत धर्म, हा नेहमीच भारताचा आधार राहिलेला आहे; तो चिरस्थायी असून भारतामध्ये अंगभूत आहे; अशा परिवर्तनशील आणि बहुरूप धारण करणाऱ्या गोष्टीला आपण हिंदुधर्म म्हणतो.

जिथे तुम्ही एखाद्या खडकामध्ये रुतून बसणाऱ्या शिंपल्यासारखे चिकटून राहता, तो धर्म असत नाही; धर्म म्हणजे काय हे समजून न घेता, न पाहता त्यात उडी मारणे हाही धर्म असू शकत नाही.

शाश्वत धर्म म्हणजे आपल्या आंतरिक जीवनामध्ये आणि आपल्या बाह्य अस्तित्वामध्ये, तसेच व्यक्तीप्रमाणेच समाजातदेखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे होय. ‘एशा धर्म: सनातन:।’

…..ईश्वर जो मूलतः सच्चिदानंद आहे, त्याचे आविष्करण म्हणजे सत्य, प्रेम, शक्ती होय. जे काही सत्याला आणि वस्तुतत्त्वाला धरून आहे, सुसंगत आहे, ज्या कोणत्या गोष्टीमुळे माणसांमधील प्रेम वाढीस लागते, ज्या कोणत्या गोष्टीमुळे व्यक्तीमध्ये, राष्ट्रामध्ये, वंशामध्ये सामर्थ्य निर्माण होते त्या गोष्टी दैवी होत, हा आहे शाश्वत धर्म आणि हे हिंदु शास्त्र आहे.

एवढे मात्र लक्षात घ्यायला हवे की, ईश्वर हा त्रिमुखी सुमेळ आहे, तो एकमुखी नाही. आपल्या प्रेमाने आपल्याला दुबळे, अंध वा अविवेकी बनविता उपयोगी नाही; आपल्या शक्तिसामर्थ्याने आपल्याला कठोर व कोपिष्ट बनविता कामा नये; आपल्या तत्त्वांनी आपल्याला धर्मांध वा भावविवश बनविता कामा नये.

आपण शांतपणे, धीराने, नि:पक्षपातीपणे विचार करूया; आपण पूर्णपणे, तीव्रतेने पण विवेकीपणे प्रेम करूया; आपण सामर्थ्य, उमदेपणा आणि शक्तीनिशी कार्य करूया. असे करूनसुद्धा जर का आपल्याकडून चुका घडल्याच, तरीही ईश्वर मात्र चूक करत नाही. आपण ठरवितो आणि कृती करतो; ईश्वर त्याचे फळ ठरवितो आणि तो जे काही ठरवितो ते कल्याणकारीच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 53-54)

दिव्य पावित्र्य, विशालता, प्रकाश, स्वातंत्र्य, सत्ता, सामर्थ्य, आनंद, प्रेम, मांगल्य, ऐक्य, सौंदर्य या गुणांची आम्हांमध्ये वाढ होण्यास साह्यभूत होणारे जे काही, ते म्हणजे धर्म होय.

या धर्माच्या विरुद्ध त्याची छाया म्हणजे धर्मनिषेध हा सतत उभा असतो. वरील दिव्य गुणांच्या वाढीला विरोध करणारे, या वाढीचा नियम न मानणारे सर्व काही धर्माच्या विरुद्ध उभे असते.

आपल्यातील दिव्य मूल्यांचे रहस्य जी वस्तु स्वत:च्या ठिकाणी दाबून ठेवीत आहे, प्रकट करू इच्छित नाही, जी उलट, विकृतीचे आणि विरोधाचे रूप घेत आहे, अशुद्धता, संकुचितता, दास्य, अंधकार, दुबळेपणा, दुष्टपणा, विसंवाद, दुःख, भेद आणि दुही यांचे रूप घेऊन जी पुढे होत आहे, जी वस्तु किळसवाण्या रानटी स्वरूपाची आहे, थोडक्यात जे काही, प्रगतिशील मानव प्रगती करताना, मागे टाकून देणेच भाग आहे ते सर्व, वर सांगितलेल्या धर्माच्या विरुद्ध उभे असते. धर्माच्या विरुद्ध उभे असणारे जे काही, त्याला अधर्म असे नाव आहे.

अधर्म हा धर्मावर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो, धर्माला मागे ओढण्याचा, खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. अधर्म म्हणजे प्रतिगामी शक्ती होय. पाप, अज्ञान, अंधार यांचा उठाव अधर्मांतून होतो. धर्म आणि अधर्म यांजमध्ये सतत झगडा चालू असतो. कधी अधर्म विजयी होतो, कधी धर्म विजयी होतो. कधी उन्नतीच्या शक्ती सत्ता गाजवतात, कधी अवनतीच्या शक्ती सत्ता गाजवतात.

वेदांमध्ये वरील गोष्टी देव आणि दानव ह्या प्रतिकांद्वारे व्यक्त झाल्या आहेत. प्रकाशाचे व अनंताचे पुत्र आणि अंधाराची व भेदात्मकतेची मुले ह्यांच्यातील हा झगडा आहे.

ह्याच त्या गोष्टी आहेत ज्यामधून, अवतारासाठी आवश्यक अशी परिस्थिती आणि अवताराचे कार्य निर्धारित होते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

धर्म ह्या शब्दाला नैतिक व व्यावहारिक, नैसर्गिक व तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक व आध्यात्मिक असे अर्थ आहेत; तसेच, हा शब्द वरील अर्थांपैकी केवळ एकाच अर्थाने, जसे की केवळ नैतिक अर्थाने, केवळ तात्विक अर्थाने किंवा केवळ धार्मिक अर्थानेदेखील वापरला जाऊ शकतो.

उदा. नैतिक दृष्टीने पाहिले असता, ‘सद्वर्तनाचा, नीतिमान वर्तनाचा नियम’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो; किंवा अधिक बाह्य व व्यावहारिक दृष्टीने पाहिले असता, ‘सामाजिक आणि राजकीय न्याय’ किंवा ‘फक्त सामाजिक नियमांचे पालन’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो.

धर्माच्या भारतीय संकल्पनेत केवळ चांगले, योग्य, नैतिक, न्याय्य या बाबींचाच समावेश होतो असे नाही. दिव्य तत्त्वाच्या अंगाने विचार करता, माणसाचे इतर जीवांशी, निसर्गाशी, ईश्वराशी जे सर्व नातेसंबंध असतात, त्या साऱ्यांचे नियमन करणारा धर्म असतो. दिव्य तत्त्वाची अभिव्यक्ती विविध रूपांद्वारे, आंतरिक व बाह्य जीवनाच्या रूपांद्वारे, कृतीच्या कायद्यांच्या माध्यमातून होत असते. जगातील या सर्व प्रकारच्या नातेसंबंधांची सुव्यवस्था लावण्याचे कामदेखील धर्म करीत असतो.

धर्म हा शब्द दोन्ही अर्थाने घेता येतो – एक म्हणजे आपण ज्याला धरून राहतो तो धर्म आणि दुसरा अर्थ आपल्या आंतरिक व बाह्य कृतींची जो धारणा करतो तो धर्म !

धर्म शब्दाचा मूळ अर्थ, आमच्या प्रकृतीचा मूलभूत, पायाभूत नियम; आमच्या सर्व क्रियांचा गुप्त आधार व आलंबन असणारा आमच्या प्रकृतीचा पायाभूत नियम असा आहे. या अर्थाने प्रत्येक भूतमात्राला, प्रत्येक जीवप्रकाराला, जीवजातीला, व्यक्तीला, समूहाला त्याचा त्याचा धर्म असतो.

धर्माचा दुसरा अर्थ, आमच्यात जी दिव्य प्रकृती विकसित व व्यक्त व्हावयाची असते ती, ज्या आंतरिक व्यापारांनी आम्हामध्ये विकसित होते, त्या व्यापारांचा नियम असा आहे.

धर्म म्हणजे असा कायदा होय की, ज्यायोगे आमचे बाह्य विचार, कृती व आमचे परस्परांशी असलेले सर्व संबंध यांचे नियमन केले जाते. ह्या नियमनामुळे दिव्य आदर्शाच्या दिशेने आमचा स्वत:चा विकास आणि आमच्या मानववंशाचा विकास होण्यास साहाय्य होते.

धर्म न बदलणारा असतो, शाश्वत असतो असे सामान्यत: म्हणण्यात येते. धर्माचे मूलतत्त्व, धर्माचा आदर्श ही शाश्वत आणि अपरिवर्तनीय वस्तु आहे हे खरे आहे; पण धर्माचे विशिष्ट विचार व आचार नित्य बदलणारे, नित्य विकास पावणारे असतात. कारण, अद्यापि मानवाला आदर्श धर्म सापडलेला नाही किंवा मानव अद्यापि आदर्श धर्माला धरून वागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा आदर्श धर्माच्या प्राप्तीसाठी मानव कमीअधिक पूर्णतेने तळमळत आहे, धडपडत आहे. अशा आदर्श धर्माचे त्याला अधिकाधिक ज्ञान होत आहे व तो अशा धर्माचे आचरण अधिकाधिक प्रमाणात पसंत करू लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

ज्याला आपण शाश्वत धर्म असे म्हणतो तो धर्म आहे तरी काय? तो एवढ्यासाठी हिंदु धर्म आहे कारण हेच की हिंदु राष्ट्रामध्ये त्याचे जतन झाले आहे. समुद्र आणि हिमालय ह्यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या ह्या द्विपकल्पातच त्याचा उदय झाला आणि त्याचे शतकानुशतके जतन करण्याची जबाबदारी या प्राचीन पुण्यभूमीतच आर्यांकडे देण्यात आली. पण हा शाश्वत धर्म कोणत्याही एका देशापुरताच मर्यादाबद्ध करण्यात आलेला नाही, तो जगातील अमुक एखाद्या नेमक्या ठरावीक भागापुरता व सदा सर्वकाळासाठी बांधला गेलेला नाही.

ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर शाश्वत धर्मच आहे. ह्याचे कारण, तो असा एक विश्वात्मक धर्म आहे की ज्याने इतर सर्वांना कवेत घेतले आहे. जर एखादा धर्म विश्वात्मक नसेल तर तो शाश्वत असूच शकणार नाही. जो धर्म संकुचित आहे, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा आहे, जो मर्यादित स्वरूपाचा आहे, असा धर्म मर्यादित कालापर्यंतच टिकेल; व ठरावीक हेतु अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहील.

विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांची अगोदरच अटकळ बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा हा एकच धर्म आहे.

ईश्वराचे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ईश्वराप्रत पोहोचण्याचे मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.

ईश्वर हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ईश्वरातच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ईश्वराशिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हिंदुधर्म हा एकच असा धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ ह्याच सत्यावर भर देतो.

हा असा एकच धर्म आहे की, जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करत नाही तर, त्या सत्याची आमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आम्हाला सक्षम करतो.

हा असा एकच धर्म आहे की, जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, जग ही वासुदेवाची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.

हिंदुधर्म हा असा एकमेव धर्म आहे की, ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. ह्या धर्माने आमच्यामध्ये असणारी मृत्यूची वास्तविकताच पूर्णत: पुसून टाकली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 11-12)

हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचा, अतिभौतिक जगताच्या सत्याशी व अनंताच्या सत्याशी योग्य नाते तो जर प्रस्थापित करू शकला तर तो समाधानी होत असे.

धर्म हा केवळ संत वा विचारवंतांनाच नव्हे तर, सर्वसामान्य लोकांना देखील सत्य म्हणून उपयोगात यावयाचा असेल तर त्याची हाक आपल्या सर्व अस्तित्वाला पोचली पाहिजे, केवळ आपल्या अतिबौद्धिक व बौद्धिक अंगांना पोचून भागणार नाही. कल्पना, भावना, सौंदर्यसंवेदना यांना ती हाक पोचली पाहिजे. अर्धवट अवचेतन असलेल्या अंगांच्या सहज जन्मजात भावनांना देखील ती हाक पोचली पाहिजे. ही सर्व अंगे धर्माच्या प्रभावाखाली आली पाहिजेत; ह्याचीदेखील हिंदु धर्माला जाण होती. धर्माने मनुष्याला अतिबौद्धिक, आध्यात्मिक सत्याकडे घेऊन गेले पाहिजे, मार्गात त्याने प्रकाशपूर्ण बुद्धीची मदत घेतली पाहिजे हे खरे आहे, तरी आमच्या संकीर्ण प्रकृतीची बाकीची अंगेसुद्धा ईश्वराकडे धाव घेतील असेही त्याने केले पाहिजे; धर्माने त्या अंगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आणखी एक गोष्ट, प्रत्येक मनुष्य जेथे उभा असेल, ज्या ज्ञानाच्या व भावनेच्या अवस्थेत असेल, तेथेच, त्या अवस्थेतच त्याला धर्माने हात देऊन आध्यात्मिक केले पाहिजे, अध्यात्मपरायण केले पाहिजे; त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये. सत्य जिवंतशक्ती देखील, त्याला तशी ती दिसत नाही तोपर्यंत त्याच्यावर लादली जाता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 147-148)

उच्च आणि सत्यतर हिंदुधर्मामध्ये ही दोन प्रकार आहेत – सांप्रदायिक आणि असांप्रदायिक, विध्वंसक आणि समन्वयात्मक. एक स्वत:ला कोणत्यातरी एकाच पैलूला जखडून ठेवतो आणि दुसरा ‘सर्वात्मका’ला मिळविण्याची खटपट करतो.

धर्मविषयक सांप्रदायिक संकल्पना
एखादी संकल्पना, एखादा अनुभव, एखादे मत वा मतप्रणाली, एखादी प्रवृत्ती, कल, एक विशिष्ट गुरु, एखादा निवडक अवतार यांच्याबद्दलच्या राजसिक किंवा तामसिक आसक्तीमधून सांप्रदायिक संकल्पनांचा उदय होतो. त्यांविषयी असलेली ही बांधिलकी असहिष्णु, गर्विष्ठ असते. ती आपल्या तोकड्या ज्ञानाविषयी अभिमान बाळगणारी आणि आपल्याकडे नसलेल्या ज्ञानाविषयी कुत्सित भूमिका घेणारी असते. ती दुसऱ्यांचे कुसंस्कार, अंधश्रद्धा याविषयी बडबड करत राहते आणि स्वत:चे कुसंस्कार आणि अंधश्रद्धा यांविषयी अंध असते. किंवा ती संकल्पना म्हणते, ”माझे गुरु हेच तेवढे खरे एकमेव गुरु आहेत आणि इतर एकतर भोंदू आहेत किंवा कनिष्ठ प्रतीचे आहेत,” किंवा “माझी मानसिकताच फक्त योग्य आहे आणि जे माझा मार्ग अनुसरत नाहीत ते मूर्ख आहेत किंवा पढिक वा अप्रामाणिक आहेत,” किंवा ”माझा अवतार हाच खराखुरा ईश्वर आहे आणि इतर सर्व कनिष्ठ आविष्कार आहेत.” किंवा ”माझी इष्ट देवता हीच ईश्वर आहे आणि इतर देवता ह्या केवळ तिची आविष्करणं आहेत.”

धर्मविषयक समन्वयी संकल्पना
जेव्हा जीव अधिकाधिक उन्नत होत जातो, तेव्हाही तो त्याच्या संकल्पना, अनुभव, मते, प्रकृती, गुरु, इष्ट देवता यांचे अग्रक्रमाने अनुसरण करतो, पण आता तो इतरांकडे अज्ञानी आणि वर्जक दृष्टीने पाहत नाही. तो म्हणतो, “ईश्वराकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि सर्वच मार्ग समानतेनेच ईश्वराकडे जाऊन पोहोचतात. सर्व माणसं, मग ती गुन्हेगार असू देत वा नास्तिक असू देत, सर्वच माझे साधनेतील बंधू आहेत आणि तो ईश्वर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मार्गाने त्या ‘एकमेवाद्वितीया’कडे घेऊन जात आहे.”

मात्र जेव्हा पूर्ण ज्ञान उदित होते तेव्हा तो स्वत:मध्ये सर्वच अनुभव कवळून घेतो. त्याला उमगते की, सर्वच संकल्पना सत्य आहेत, सर्व मतमतांतरं उपयुक्त आहेत; सर्व अनुभव आणि वृत्तीप्रवृत्ती ह्या वैश्विक अनुभव आणि पूर्णता मिळविण्याची साधने आणि स्तर आहेत; सर्व गुरु हे त्या एका आणि एकमेव गुरुची अपूर्ण माध्यमं वा अवतार आहेत; सर्व इष्टदेवता आणि अवतार हे ईश्वरच आहेत…..

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 551)

संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)

(श्रीअरविंदांना त्यांच्या पूर्वजीवनाविषयी एका शिष्याने प्रश्न विचारला होता, त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर.)

जर कोणाला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करावयाची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य चेतना आणि दिव्य शक्ती लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले.

हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाचा आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण करणे ह्याला मी पूर्णयोग म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि ती तो नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा योग करणे त्याला अशक्य होईल.

माझ्या योगामध्ये, परमात्मलोकाचा, आपल्या भूलोकाचा आणि या दरम्यानच्या सर्व जगतांचा आणि त्यांच्या आपल्या जीवनावरील व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचा समावेश होतो.

पण हेही शक्य आहे की, आधी केवळ परमपुरुषाच्या साक्षात्कारावर भर द्यायचा किंवा त्याच्या एखाद्या अंगावर भर द्यायचा, जसे की, आपला आणि आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या विश्वाधिपती कृष्ण, शिव यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा आणि या योगासाठी आवश्यक असे परिणाम साध्य करून घ्यावयाचे आणि नंतर (दिव्य जीवनाकडे वाटचाल आणि आत्म्याचा भौतिक जीवनावर विजय हे ध्येय जर एखाद्याने स्वीकारलेले असेल तर) त्याच्या पूर्ण परिणामांकडे वळणे शक्य आहे. वस्तुविषयक हा अनुभव, अस्तित्वविषयक हे सत्य आणि हा दृष्टिकोन यामुळेच ‘दिव्य जीवन’ आणि ‘सावित्री’ लिहिणे मला शक्य झाले.

ईश्वराचा, पुरुषोत्तमाचा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांतून त्या ईश्वराकडे वळणे, स्वत:च्या कर्मांच्या द्वारे त्याची सेवा करणे आणि केवळ बौद्धिक जाणिवेने नव्हे तर, आध्यात्मिक अनुभूतीच्या माध्यमातून त्याला जाणणे ह्यादेखील पूर्णयोगाच्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 234-235)