राष्ट्रीय पुनरुज्जीवन
(दि.०६.११.१९०९)
एकेकाळी भारतीय एकता आणि सहिष्णुता यांच्याकडे कल असणारी मोगल सत्ता पुढे जेव्हा दडपशाही करणारी आणि विघातक अशी बनली तेव्हा ती उलथून टाकणे हे राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट होते आणि तेव्हा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आणि रामदास स्वामी यांच्या काळात हिंदू राष्ट्रीयत्वाला काही एक अर्थ होता. हे त्याकाळी शक्य होते कारण भारत तेव्हा स्वत:च एक जग असल्यासारखा होता आणि महाराष्ट्र व राजपुताना, हे दोन भौगोलिक प्रांत पूर्णत: हिंदू होते, त्यांनी यास भक्कम पाया पुरविला होता. ते आवश्यकही होते कारण मोगलांनी त्यांच्या सत्तेचा जो गैरवापर केला होता तो भारताच्या भवितव्यासाठी घातक होता आणि त्यांना दंडित करून, हिंदू सत्ता आणि पुनरुत्थान यांच्या आधारे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकताच होती. ते आवश्यक होते आणि शक्यही होते त्यामुळे ते अस्तित्वात आले.
परंतु आधुनिक काळातील परिस्थिती विचारात घेता, भारत हा एकसंधपणेच अस्तित्वात राहू शकतो. एखाद्या राष्ट्राचे अस्तित्व हे त्याच्या भौगोलिक सीमांवर आणि भौगोलिक एकसंधतेवर, एक विशिष्ट, स्वतंत्र राष्ट्र असण्यावर अवलंबून असते. वंश, भाषा, धर्म, इतिहास यांमधील भेद हे अखेरीस भौगोलिक वेगळेपणाच्या अस्तित्वात निश्चितच विराम पावतील. ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये असेच झालेले आहे. भारतातदेखील असेच होईल. परंतु भौगोलिक एकसंधतादेखील आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देश इतका एकसंध असला पाहिजे की परस्परांतील संवाद आणि केंद्र-शासनाचे संघटन सोपे झाले पाहिजे, किमान ते अवघड तरी होता कामा नये. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 08 : 304)
- राष्ट्रीय पुनरुज्जीवन - October 22, 2026
- हिंदू-संघटन - October 21, 2026
- हिंदू-मुस्लीम ऐक्य - October 20, 2026





