साधना, योग आणि रूपांतरण – ३०२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनाला (subconscient) प्रकाशाने भेदले पाहिजे आणि अवचेतन हे सत्याची आधारशिला तसेच योग्य संस्कारांचे आणि ‘सत्या’ला दिलेल्या योग्य शारीरिक प्रतिसादांचे भांडार झाले पाहिजे. नेमकेपणाने सांगायचे तर, असे झाल्यास ते अवचेतन म्हणून शिल्लकच राहणार नाही, तर अवचेतन हे उपयोगात आणता येईल अशा खऱ्या मूल्यांची एक प्रकारची पेढीच (bank) तयार झालेली असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०१

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधक : व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःचे सचेत (conscious) विचार नियंत्रित करू शकते त्याप्रमाणे ती स्वतःच्या अवचेतनावर (subconscient) नियंत्रण मिळविण्यास शिकू शकते का?

श्रीमाताजी : विशेषतः शरीर जेव्हा निद्रिस्त असते तेव्हा व्यक्ती अवचेतनाच्या संपर्कात येते. स्वतःच्या रात्रींविषयी सचेत झाल्यामुळे अवचेतनावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे होते. पेशी जेव्हा त्यांच्यामधील ‘ईश्वरा’विषयी सचेत होतात आणि त्या स्वेच्छेने ‘त्याच्या’ प्रभावाप्रत खुल्या होतात तेव्हा हे नियंत्रण सर्वांगीण होऊ शकते. गेल्या वर्षी (१९६९) या पृथ्वीवर जी चेतना अवतरित झाली होती ती चेतना या गोष्टीसाठीच कार्य करत आहे. हळूहळू शरीराच्या अवचेतनाच्या यांत्रिकतेची जागा ‘ईश्वरी उपस्थिती’च्या चेतनेने घेतली जात आहे आणि ती चेतना आता शरीराच्या संपूर्ण क्रियाकलापांवर शासन करू लागली आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 365)

साधना, योग आणि रूपांतरण – ३००

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधक : अवचेतनाने (subconscient) उच्चतर चेतनेचा स्वीकार केला आहे का?

श्रीमाताजी : अवचेतनाने उच्चतर चेतनेचा स्वीकार केला असता, तर ते अवचेतन या रूपात शिल्लकच राहिले नसते, तर ते स्वयमेव चेतना बनले असते. मला वाटते तुम्हाला असे विचारायचे आहे की, अवचेतनाने उच्चतर चेतनेचा आधिपत्य आणि कायदा मान्य केला आहे का? ही गोष्ट समग्रतया झालेली नाही कारण अवचेतन ही प्रचंड आणि जटिल अशी गोष्ट आहे; मानसिक अवचेतन, प्राणिक अवचेतन, जडभौतिक अवचेतन आणि शारीरिक-अवचेतन अशा प्रकारच्या अवचेतना असतात. आपल्याला या अवचेतनाच्या अज्ञानी आणि जड प्रतिकाराला अंशाअंशाने बाहेर काढायचे आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 363-364)

*

जेव्हा मन निःस्तरंग, नीरव होते तेव्हाच अवचेतन रिक्त होऊ शकते. त्यासाठी काय केले पाहिजे? तर, अवचेतनामधून सर्व जुन्या अज्ञानी अ-योगिक, योगसुसंगत नसलेल्या गोष्टी बाहेर काढून टाकल्या पाहिजेत.

*

(तुमच्यामधील) अवचेतन प्रांत जर रिकामा झाला असेल तर त्याचा अर्थ असा की, आता तुम्ही सामान्य चेतनेच्या पलीकडे गेला आहात आणि स्वयमेव अवचेतन हे ‘सत्या’चे साधन होण्यासाठी सुसज्ज झाले आहे.

*

जोपर्यंत अगदी अवचेतनापर्यंत, पूर्णपणे आणि समग्रतया, अतिमानसिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत व्यक्तीच्या या ना त्या भागावर कनिष्ठ प्रकृतीचा ताबा राहणारच.

– श्रीअरविंद (SABCL 24 : 1594), (CWSA 31 : 611 & 595)

साधना, योग आणि रूपांतरण – २९९

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुमचे सध्या शारीर-चेतनेवर (physical consciousness) कार्य चालू असल्यामुळे, सर्व जुने संस्कार एकत्रितपणे उफाळून वर आले आहेत आणि ते तुमच्या चेतनेवर चाल करून आले असावेत. हे जुने संस्कार सहसा अवचेतनामध्ये शिल्लक असतात आणि वेळोवेळी पृष्ठभागावर येत असतात आणि दरम्यानच्या काळामध्ये विचार, कृती आणि भावभावना यांच्यावर नकळतपणे प्रभाव टाकत असतात.

साधकाला ते दिसावेत आणि त्याने त्यास नकार द्यावा आणि साधकाने आपल्या सचेत आणि अवचेतन भागांमध्ये दडलेल्या शारीरिक भूतकाळापासून स्वतःची पूर्णपणे सुटका करून घ्यावी यासाठी ते अशा रीतीने पृष्ठभागावर येत असतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 603)

साधना, योग आणि रूपांतरण – २९८

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामध्ये (subconscient) प्रवेश करणाऱ्या आणि परिवर्तन करणाऱ्या प्रकाशाचे काही पहिलेवहिले परिणाम पुढीलप्रमाणे असतात –

१) अवचेतनामध्ये काय दडलेले आहे ते आता अधिक सहजतेने अवचेतनाकडून दाखविले जाते.

२) अवचेतनामधून पृष्ठभागावर येणाऱ्या गोष्टींचा स्पर्श चेतनेला होण्यापूर्वी किंवा त्यांचा परिणाम चेतनेवर होण्यापूर्वीच त्या गोष्टींची मनाला जाणीव होते.

३) आता अवचेतन हे अज्ञानी व अंधकारमय गतिप्रवृत्तींचे आश्रयस्थान राहत नाही तर, आता उच्चतर चेतनेला जडभौतिकाकडून अधिक आपसूकपणे प्रतिसाद मिळू लागतो.

४) विरोधी शक्तींच्या सूचनांना अवचेतन आता अधिक उघडपणे सामोरे जाते आणि त्या सूचनांना वाव देण्याचे प्रमाणही कमी होते.

५) निद्रेमध्ये सचेत राहणे आता अधिक सहजसोपे होते आणि स्वप्नांमध्ये अधिक उच्च प्रकारचे अनुभव येऊ शकतात. विरोधी स्वप्नं पडली तर, म्हणजे उदाहरणार्थ, स्वप्नांमध्ये कामुक सूचना आल्या तर त्यांचा तिथेच सामना करता येतो आणि अशी स्वप्नं थांबविता येतात आणि स्वप्नदोषासारखा परिणामदेखील थांबविता येतो.

६) झोपण्यापूर्वी स्वप्नावस्थेवर एक जागृत संकल्प केंद्रित करणे अधिकाधिक परिणामकारक ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 612)

साधना, योग आणि रूपांतरण – २९७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही जे वर्णन केले आहे त्यावरून तुमच्यामध्ये अवचेतन (subconscient) अनियंत्रितपणे उफाळून वर आले आहे आणि सहसा शारीर-मन (physical mind) ज्या गोष्टींनी व्याप्त असते त्या गोष्टींचे म्हणजे जुने विचार, जुन्या आवडीनिवडी किंवा इच्छावासना यांच्या यांत्रिक पुनरावृत्तीचे रूप अवचेतनाने धारण केले आहे, असे दिसते. हे जर का एवढेच असते तर त्या गोष्टींना नकार देणे, तुम्ही त्यापासून निर्लिप्त होणे आणि त्या गोष्टी जाऊ देणे आणि त्या शांत होतील असे पाहणे, एवढे करणे पुरेसे होते. परंतु तुम्ही जे लिहिले आहे त्यावरून मला असे समजले की, तो एक हल्ला आहे आणि तुमच्या मनावर व शरीरावर आक्रमण करून, त्यांना त्रास देण्यासाठी अंधकारमय शक्तीने या पुनरावृत्तीचा वापर केला आहे.

ते काहीही असो, एक गोष्ट करा आणि ती म्हणजे तुमच्या अभीप्सेच्या (aspiration) साहाय्याने, श्रीमाताजींचे स्मरण करून किंवा अन्य मार्गाने, स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले करा आणि श्रीमाताजींच्या शक्तीला हा हल्ला परतवून लावून दे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 605)

साधना, योग आणि रूपांतरण – २९६

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतन (subconscient) हे शरीराला प्रभावीत करते कारण शरीरातील सर्व गोष्टींची घडण ही अवचेतनामधूनच झालेली असते आणि खुद्द त्या अवचेतनामधील सर्व गोष्टी अजून अर्ध-सचेतच (half conscious) असतात आणि (म्हणूनच) त्यातील बहुतांशी कार्य हे अवचेतन म्हणावे असेच असते. आणि म्हणूनच शरीरावर सचेत मन किंवा सचेत संकल्पाचा किंवा अगदी प्राणिक मन व प्राणिक इच्छेचा प्रभाव पडण्याऐवजी, त्यावर अधिक सहजतेने अवचेतनेचा प्रभाव पडतो. मात्र ज्या गोष्टींवर सचेत मनाचे व प्राणाचे नियंत्रण स्थापित झालेले असते आणि स्वयमेव अवचेतनेने ते स्वीकारलेले असते, त्यांचा येथे अपवाद करावा लागेल.

असे नसते तर, (अवचेतनाचा प्रभाव पडत नसता तर) मनुष्याचे स्वतःच्या कृतींवर आणि शारीर-स्थितींवर पूर्णपणे नियंत्रण राहिले असते आणि मग आजारपणाची शक्यताच उरली नसती किंवा जरी आजारपण आले असतेच तरी ते मनाच्या कृतीद्वारे त्वरित बरे करता आले असते. परंतु (सद्यस्थितीत) ते तसे नाही. आणि म्हणूनच उच्चतर चेतना खाली उतरवली पाहिजे, तिच्याद्वारे शरीरास व अवचेतनास प्रकाशित केले पाहिजे आणि शरीराने व अवचेतनाने उच्चतर चेतनेचे आधिपत्य मान्य करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 599)

साधना, योग आणि रूपांतरण – २९५

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

बहुधा जुन्या स्मृती या अवचेतनामधून (Subconscient) पृष्ठभागावर येतात. जेव्हा अशा स्मृती जाग्या होतात तेव्हा, त्यांचे विलयन (dissolve) करण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठीच पृष्ठभागावर आल्या आहेत हे ओळखून त्यांची (योग्य रीतीने) हाताळणी केली पाहिजे. (अवचेतनाच्या प्रभावामुळे व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहात असते. ही कर्माची यंत्रणा असते.) अवचेतनामधून आलेल्या स्मृतींचे सातत्याने विलयन केल्यामुळे, व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहणार नाही तर, व्यक्ती जिवाच्या भावी बंधमुक्त प्रवासासाठी मुक्त होईल. तुम्हाला जेव्हा यासंबंधी खरे ज्ञान होते, म्हणजे अमुक एक गोष्ट का घडली, त्याचे काय प्रयोजन होते, याचे जेव्हा तुम्हाला ज्ञान होते तेव्हा त्यासंबंधीच्या स्मृती सहजपणे निघून जातात, आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 610)

साधना, योग आणि रूपांतरण – २९४

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला अवचेतनामधून वर उफाळून येणाऱ्या गोष्टींमुळे, साधनेमध्ये व्यत्यय येत आहे. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी केलेले हे मार्गदर्शन…)

हे खरं आहे की, अजून काहीतरी अवचेतनामधून (subconscient) उफाळून वर येईल, पण जे तिथे अजूनही शिल्लक राहिलेले आहे तेच वर येईल. आत्ता ज्यास नकार दिला जात आहे, ते जर नष्ट न होता इतरत्र कोठे गेले, तर ते आता अवचेतनामध्ये जाणार नाही; तर ते व्यक्ती स्वतःभोवती जी चेतना वागवत असते त्या परिसरीय चेतनेमध्ये (surrounding consciousness) जाईल. एकदा का ते तेथे गेले की ते कोणत्याही प्रकारे स्वतःचे असे राहत नाही आणि जरी त्याने परत येण्याचा प्रयत्न केला तरी ते आता एखाद्या परक्या गोष्टीसारखे असते, तेव्हा व्यक्तीने त्याचा स्वीकार करता कामा नये किंवा त्याला वाव देता कामा नये.

व्यक्ती नकाराच्या ज्या दोन अंतिम टप्प्यांद्वारे, प्रकृतीच्या जुन्या गोष्टींपासून सुटका करून घेऊ शकते ते दोन टप्पे असे : जुन्या गोष्टी एकतर अवचेतनामध्ये जाऊन बसतात आणि तेथून त्या काढून टाकाव्या लागतात किंवा मग त्या परिसरीय चेतनेमध्ये जाऊन बसतात आणि मग त्या आपल्या राहत नाहीत. (त्या सार्वत्रिक प्रकृतीचा भाग बनलेल्या असतात.)

अवचेतनामधून जे पृष्ठभागावर येत आहे ते जोवर पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत व्यक्तीने त्यांची पुनरावृत्ती होण्यास मुभा द्यावी, हा विचार योग्य नाही. कारण त्यामुळे ही त्रासदायक अवस्था विनाकारणच लांबेल आणि ती घातकसुद्धा ठरू शकते. जेव्हा या गोष्टी उफाळून येतात तेव्हा त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्या तशाच कायम न ठेवता, त्या फेकून दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 602)

साधना, योग आणि रूपांतरण – २९३

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

एखाद्या वाद्यवादकाला ज्याप्रमाणे प्रथम त्याच्या मनाच्या व प्राणाच्या सौंदर्यविषयक आकलनाच्या आणि संकल्पाच्या साहाय्याने, त्याच्या संगीताचे योग्य तत्त्व कोणते आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा हे शिकावे लागते आणि नंतर त्याचे उपयोजन कसे करायचे हे त्याच्या बोटांना शिकवावे लागते; एवढे झाल्यानंतर मग त्याच्या बोटांमधील अवचेतन (subconscient) त्यांचे कार्य शिकेल आणि नंतर ते स्वतःहून योग्य प्रकारे वाद्यवादन करेल. म्हणजे प्रत्यक्षात डोळ्यांनी न पाहतासुद्धा त्याची बोटं योग्य सूरपट्टीवरच पडतील (आणि त्यातून सुंदर सुरावट निर्माण होईल.)

(अगदी त्याचप्रमाणे, परिवर्तन घडण्यासाठी) आधी सचेत भागांचीच तयारी करून घ्यावी लागते. जोपर्यंत ते तयार होत नाहीत तोपर्यंत काही घटकांचा आणि तपशिलांचा अपवाद वगळता, अवचेतनास (subconscient) यशस्वीरितीने हाताळणे शक्य होणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 609)