साधना, योग आणि रूपांतरण – ३०७
रूपांतरण
(रूपांतरणाची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यामध्ये धीर, चिकाटी यांची कशी आवश्यकता असते ते श्रीमाताजी येथे समजावून सांगत आहेत. या प्रक्रियेस आरंभ करण्यापूर्वी व्यक्तीला त्यासंबंधी पुरेशी स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे, असे त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ दिसतो. हा संपूर्ण भाग मुळातूनच विचारात घ्यावा असा आहे. तो क्रमश: पाच भागांमधून देत आहोत.)
अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही हे खरेतर आपले दुर्दैव आहे असे म्हटले पाहिजे. कारण त्या अन्नाबरोबर, आपण दररोज आणि सातत्याने मोठ्या प्रमाणात अचेतनता, तामसिकता, जडत्व आणि मूढता यांचेही ग्रहण करत असतो. आपण सातत्याने, पूर्णपणे, अखंड सजग राहिले पाहिजे आणि जेव्हा एखादा अन्नघटक आपल्या शरीरामध्ये ग्रहण केला जातो तेव्हा आपण लगेच त्यावर क्रिया करून, त्याच्यामधील प्रकाश तेवढा बाजूला काढला पाहिजे आणि आपल्या चेतनेला अंधकारमय करणाऱ्या त्यामधील साऱ्या गोष्टींचा आपण अस्वीकार केला पाहिजे.
अन्नग्रहण करण्यापूर्वी ईश्वराला नैवेद्य दाखविण्याची, अर्पण करण्याची जी धार्मिक प्रथा आहे त्याचे मूळ येथे आहे आणि हेच त्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे. अन्न ग्रहण करताना, ते अन्न आपल्या क्षुद्र अशा मानवी अहंकाराद्वारे ग्रहण केले जाऊ नये तर ते आपल्या अंतरंगातील ईश्वरी चेतनेला अर्पण केले जावे अशी आस व्यक्ती बाळगत असते. सर्व योगमार्गांमध्ये, सर्व धर्मांमध्ये याला महत्त्व दिले जाते. दररोज, सातत्याने, आपल्याही नकळत आपण अचेतनता शोषून घेत असतो, आणि त्याचे प्रमाण वाढवत नेत असतो, ते प्रमाण शक्य तितके कमी केले जावे यासाठी, त्या अन्नाच्या पाठीमागे असणाऱ्या चेतनेशी आपला संपर्क व्हावा, हे त्या प्रथेचे मूळ आहे.
प्राणाच्या बाबतीतही तसेच आहे. प्राणिक दृष्टया तुम्ही प्राणिक जगतामध्ये राहात असता. त्या जगतामधील प्राणिक शक्तीचे प्रवाह तुमच्या चेतनेमध्ये प्रवेश करत असतात, बाहेर जात असतात, ते एकमेकांशी मिळूनमिसळून राहात असतात तर, कधी परस्परांना विरोधही करत असतात. ते प्राणिक प्रवाह भांडत असतात, एकमेकांमध्ये मिसळत असतात. आणि जरी तुम्ही तुमची प्राणिक चेतना शुद्ध करण्याचा वैयक्तिक प्रयत्न केलात आणि त्या चेतनेमधील वासनात्म्यावर व क्षुद्र मानवी अहंकारावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केलात तरीही, तुम्ही ज्यांच्यासमवेत राहत असता त्यांच्याकडून आलेली सर्व विरोधी स्पंदने सुद्धा तुमच्याकडून अपरिहार्यपणे (तुमच्या नकळत) शोषून घेतली जातात. (कारण) व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही.
शारीरिक दृष्टया असे करण्यापेक्षा प्राणिकदृष्ट्या तसे करणे अधिक अवघड असते आणि (त्यामुळेच) व्यक्ती स्वतःमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींचे ग्रहण करत असते. म्हणजे व्यक्ती जर सातत्याने पूर्णपणे जागरूक नसेल, सदैव सावध नसेल आणि आतमध्ये जे जे प्रवेश करत आहे त्यावर तिचे जर पुरेसे नियंत्रण नसेल, म्हणजे ती स्वतःच्या चेतनेमध्ये नको असलेल्या घटकांचा शिरकाव होऊ देत असेल तर, अशा व्यक्तीला तिच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींकडून येणाऱ्या सर्व तऱ्हेच्या नकोशा स्पंदनाचा, सर्व लहानसहान अंधकारमय प्रतिक्रियांचा, सर्व कनिष्ठ गतिप्रवृत्तींचा, सर्व इच्छावासनांचा सतत संसर्ग होतो. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)