प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे अशा प्रकारे आरोहण करणारा क्रमविकास (evolution) आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच त्यामुळे, ‘मी या विकासाचा अंतिम टप्पा असून, माझ्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काही असणे शक्यच नाही’, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा एक फार मोठा गैरसमज आहे.
त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशूच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे.
अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट राहू शकत नाही यामध्ये शंकाच नाही. प्रकृती एक नवीन जीव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पशुच्या तुलनेत मानव जसा आहे तसा, मानवाच्या तुलनेत तो जीव असेल. तो जीव बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; पण त्याची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि तो जीव अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेला असेल.
मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर अवतरले आहेत. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवसंपन्न, सचेत जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे श्रीअरविंदांनी सांगितले आहे. ज्या चेतनेला त्यांनी अतिमानस (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना (पृथ्वीकरता म्हणून) स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि स्वत:भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून त्यांना साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर स्वत:चे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.
– श्रीमाताजी (CWM 12 : 116)
(दि. १९.०६.१९०९) जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे…
दि. १९.०६.१९०९ प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला…
(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी भारताविषयी आणि त्याच्या जीवितकार्याविषयी वेळोवेळी जे उद्गार काढले होते ते आता…
(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन...) हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते,…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…