(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी शक्तीच ते कर्म करत आहे, असा अनुभव साधकाला आला पाहिजे, असे श्रीअरविंद सांगत आहेत. पण असे करत असताना प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो हेदेखील ते येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकाने त्याच्या माध्यमातून ती दिव्य शक्ती, दिव्य उपस्थिती, दिव्य संकल्प कार्य करत आहे याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. परंतु ही जाणीव बाळगण्याचा प्रयत्न करत असताना एक धोकासुद्धा असतो. तो असा की, छुप्या अहंकाराला किंवा एखाद्या निम्नस्तरीय शक्तीलाच तो ईश्वर समजण्याची शक्यता असते आणि त्यांच्या मागण्या हाच ‘ईश्वरी आदेश‌’ आहे, असे तो समजण्याची शक्यता असते. त्याच्यावर या कनिष्ठ प्रकृतीचा हल्ला होण्याचा धोका असतो. आणि उच्चतर शक्तीप्रत असणाऱ्या त्याच्या या तथाकथित समर्पणात विकार निर्माण होण्याची शक्यता असते. (म्हणजे ते समर्पण, समर्पण न ठरता उलट,) स्व-इच्छा आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या स्वतःच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांमध्ये अधिकत्वाने आणि अनियंत्रितपणे रममाण होण्याचे निमित्त ठरू शकते.

आणि असे होऊ नये यासाठी संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. आणि हा प्रामाणिकपणा त्याने फक्त स्वतःच्या सचेत मनामध्येच बाणवला पाहिजे असे नाही तर, त्यापेक्षाही, गुप्त गतिविधींनी भरलेल्या स्वतःच्याच अंतस्तलीय (subliminal) भागामध्येसुद्धा बाणवण्याचा प्रयत्न करणे अधिक आवश्यक असते. कारण, तेथे म्हणजे विशेषतः त्याच्या अंतस्तलीय प्राणिक प्रकृतीमध्ये, एक नाटकं करणारा आणि निगरगट्ट असा भोंदू वसलेला असतो. साधकाने त्याच्या कर्माचे ओझे ईश्वराकडे सोपविण्यापूर्वी, योगमार्गावर त्याची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे. म्हणजे, इच्छावासनांचे निर्मूलन व्हावे या दिशेने आणि सर्व कर्म व सर्व घटना यांच्याकडे पाहण्याची एक स्थिर समत्वबुद्धी यावी यासाठी त्या साधकाची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 23 : 229-230)

साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का?

श्रीमाताजी : ती शरणागती प्रामाणिक असली पाहिजे. जर ती खरोखरच प्रामाणिक असेल तर ती आनंददायी होते. जोपर्यंत शरणागती स्वीकारण्यात आनंद वाटत नाही तोपर्यंत ती शरणागती पूर्णपणे प्रामाणिक नाही, असे निश्चित समजा; कारण जर ती शरणागती खरोखरच प्रामाणिक असेल तर, ती नेहमीच आनंददायी असते.

जर ती आनंददायी नसेल तर त्याचा अर्थ असा की, तुमच्या व्यक्तित्वातील काहीतरी तुम्हाला मागे खेचत आहे, तुमच्यामधील एखाद्या भागाला शरणागती स्वीकारणे नको आहे, त्याला त्याची स्वतःची म्हणून काही इच्छा आहे, काही आकांक्षा आहे, त्याचे स्वतःचे असे काही प्रयोजन आहे आणि तो भाग संतुष्ट नाहीये आणि म्हणून तो पूर्णपणे समर्पित होत नाहीये आणि म्हणून त्याच्या समर्पणामध्ये प्रामाणिकपणा नाहीये.

पण जर व्यक्ती समर्पणामध्ये प्रामाणिक असेल तर ती अगदी स्वाभाविकपणे परिपूर्णतया आनंदी असते. खरंतर व्यक्तीला आपोआपच अवर्णनीय असा आनंद अनुभवायला मिळतो. आणि म्हणूनच, जोपर्यंत तुम्हाला असा अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रामाणिक नसल्याची ती खात्रीशीर खूण आहे असे समजा. म्हणजे तुमच्यामधील एखादा भाग, एखादा लहान किंवा मोठा भाग प्रामाणिक नाहीये असे निश्चित समजा.

• श्रीमाताजी (CWM 06 : 210–211)

व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो. (अहंकाराचे उच्चाटन करण्याचा) एक अवघड पण चांगला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे अहंकाराचे रूपांतरण करायचे आणि त्याला ईश्वराचे साधन बनवायचे. अहंकार रूपांतरित होऊन, तो जर ईश्वराला समग्रतया समर्पित झाला, तर तो अतिशय सशक्त आणि परिणामकारक साधन बनू शकतो. हा प्रयत्न अतिशय अवघड आहे आणि त्यासाठी निरपवाद आणि दृढ प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. ज्यांच्यापाशी प्रबळ संकल्पशक्ती आहे, उत्कट अभीप्सा आणि अविचल प्रामाणिकपणा आहे, त्यांनी हा प्रयत्न करण्यास हरकत नाही.

• श्रीमाताजी (CWM 16 : 425)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख झालेले असणे आणि त्यांना आवाहन करणे हे ठीक आहे. पण आणखी काहीतरी गरजेचे आहे. कारण ती फक्त पहिली आवश्यक गोष्ट आहे. साधकाने संपूर्ण आत्मदान केले पाहिजे आणि समर्पित असले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही मनमानी करत राहणे हे काही योग्य नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, अन्नग्रहण वर्ज्य करणे हा वासनांपासून सुटका करून घेण्याचा योग्य मार्ग आहे, ही तुमची संकल्पना अशीच आहे. तुमची ही संकल्पना हास्यास्पद आहे कारण एखादी व्यक्ती उपासतापास करत असूनही, वासनामय जीवन जगणारी असू शकते. श्रीमाताजी आणि मी अशा रितीने स्वतःची उपासमार करण्यास संमती देत नाही, हे तुम्हाला चांगले माहीत आहे आणि असे असूनही तुम्ही एखादी संधी मिळण्याचा अवकाश, तसेच वागू इच्छिता. या व यासारख्या उदाहरणांमध्ये दिसून येतात त्याप्रमाणे, तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत.

इच्छा-वासनांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, त्या वासनांपासून सुटका व्हावी अशी प्रामाणिक आस बाळगणे आणि श्रीमाताजींच्या शक्तीने तुमच्यामध्ये कार्य करावे म्हणून त्यांना आवाहन करणे, हा योग्य मार्ग आहे. श्रीमाताजींचा प्रकाश आणि त्यांची शक्ती जेव्हा तुमच्यामध्ये कार्य करू लागेल तेव्हा ती शक्ती व तो प्रकाशच तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल घडवणे आवश्यक आहेत ते दाखवून देतील आणि तुम्ही जर त्यास प्रामाणिकपणाने, पूर्ण सहमती दिलीत तर तसे परिवर्तन ती शक्ती आणि तो प्रकाश तुमच्यामध्ये घडवून आणेल.

• श्रीअरविंद (CWSA 32 : 393)

 

मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो रूपांतरणाचा निर्णय कदापिही घेणार नाही. कारण तो स्वतःवरच खूष असतो. आणि एवढेच नाही तर तो, मनाचा साथीदार असल्यामुळे, तो जे काही करतो तेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करणारी स्पष्टीकरणं मनाद्वारे पुरविली जातात. जी माणसं प्राणिक चेतनेमध्ये जीवन जगत असतात ती, – भलेही त्यांनी तसे बोलून दाखविले नाही तरी – नेहमी स्वतःवरच अतिशय संतुष्ट असतात. त्यांच्याबाबतीत जे काही घडत असते त्यावर ती अतिशय संतुष्ट असतात आणि त्यांच्यातील आवेगांबाबत (impulses) ते म्हणत असतात, “अमुक गोष्ट किती स्वारस्यपूर्ण आहे, किती रोचक आहे.” आणि म्हणून, प्राणाने रूपांतरणाचा निर्णय घेईपर्यंत जर तुम्ही वाट पाहायचे ठरविलेत तर, कदाचित अनंत काळपर्यंत तुम्हाला वाट पाहात राहावी लागेल. ‘आज्ञापालन केले पाहिजे,’ हा धडा तुम्ही प्राणाला दिलाच पाहिजे. तो संतुष्ट होण्याआधीच, त्याला ही समज दिली गेली पाहिजे की, त्याने अन्य काही करायचे नाही, तर फक्त आज्ञापालन करायचे आहे. आणि म्हणूनच, “योगसाधनेला आरंभ करणे सोपे नाही; तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका,” असे मी सांगत असते.

• श्रीमाताजी (CWM 04 : 78-79)

 

(साधकाला जर जादुटोणा वगैरे गोष्टींचा धोका असेल तर काय करावे, अशा आशयाचा प्रश्न एका साधकाने विचारलेला दिसतो. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही जोवर शक्तिशाली असता, अगदी विशुद्ध स्थितीत असता, जेव्हा तुम्ही अजेय स्थितीत असता, अशा स्थितीत असताना तुमच्या विरोधात जर कोणी काही केले तर, ती गोष्ट आपोआप त्यांच्यावरच जाऊन आदळते. टेनिसचा चेंडू भिंतीवर फेकला तर, तो जसा तुमच्याकडेच परत येतो; अगदी त्याचप्रमाणे ती गोष्ट त्यांच्याकडे परत जाते, कधीकधी तर जास्तच शक्तीनिशी त्यांच्यावर जाऊन आदळते आणि अशा रितीने त्यांना त्यांच्या स्वतःच्याच दुष्टपणाची शिक्षा मिळालेली असते. पण अर्थातच ज्या व्यक्तीविरुद्ध जादुटोणा करण्यात आला होता, त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीवर आणि शुद्धतेवर हे सारे काही अवलंबून असते. मी अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत.

अशा उदाहरणात, या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करायचा तर, मी म्हटले त्याप्रमाणे व्यक्ती ही प्राणिकदृष्ट्या योद्धा असली पाहिजे, म्हणजे ती प्राणाच्या स्तरावर आध्यात्मिक योद्धा असली पाहिजे. जे कोणी अगदी प्रामाणिकपणे योगसाधना करतात त्यांनी अशा प्रकारचा योद्धा बनलेच पाहिजे. आणि जेव्हा ते तसे होतात, तेव्हा ते अगदी पूर्णपणे संरक्षित, सुरक्षित झालेले असतात.

पण त्यासाठी एक पूर्वअट असते ती म्हणजे व्यक्तीमध्ये कधीही दुरिच्छा असता कामा नये किंवा तिच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असता कामा नयेत. कारण जेव्हा तुम्ही अशी वाईट भावना किंवा वाईट इच्छा किंवा वाईट विचार बाळगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता आणि जेव्हा अशा रितीने तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन पडता तेव्हा, तुमच्यावर त्यांच्याकडून आघात होण्याची शक्यता असते.

• श्रीमाताजी (CWM 05 : 179)

‘आम्हाला विरोधी शक्ती त्रास का देतात आणि त्यांना आमच्या प्रगतीमध्ये अशी ढवळाढावळ करण्याचा अधिकार कोणी दिला?’ असा प्रश्न साधक मला नेहमी विचारत असतात.

मी त्यांना सांगते की, ती त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते आणि ती आवश्यक असते.

• श्रीमाताजी (CWM 04 : 353)

तुम्ही जर अगदी तळमळीने ईश्वराला म्हणाल, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ईश्वर अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल. तुमच्या अस्तित्वातील कोणतातरी एखादा भाग जेव्हा म्हणतो की, ‘हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस.‌’ अशा वेळी तुमच्या त्या अभीप्सेमुळे काय होते? तर, तो तुम्हाला त्याचे अस्तित्व कळू देणार नाही, तो तुम्हाला दिसणारसुद्धा नाही, पण तो येईल. तुम्हाला त्याची पुसटशी चाहूलदेखील लागणार नाही पण तो सर्व परिस्थितीची अशा रितीने रचना करेल की, तुम्ही पूर्णपणे ईश्वराचे होण्यामध्ये ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या गोष्टी अगदी अपरिहार्यपणे तो तुमच्या मार्गामधून काढून टाकेल.

पण मग अशा रितीने तुमच्यापासून सर्व गोष्टी बाजूला केल्या गेल्यामुळे, तुम्ही आक्रोश करू लागता, तक्रार करू लागता. पण नंतर, तुम्ही खरोखरच प्रामाणिक असाल आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन, जर थेटपणे स्वतःकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्हीच कधी काळी ईश्वराला म्हटले होते, ‘मला फक्त तूच हवा आहेस.‌’ आता तो तुमच्या सन्निध असेल पण बाकी सारे नाहीसे झालेले असेल. ही खरोखरच एक उच्चतर ईश्वरी कृपा असते. अट एकच असते, तुम्ही ते तसे अगदी खात्रीने, विश्वासाने मागितले पाहिजे.

तुम्ही ते अगदी समग्रपणे म्हटले पाहिजे असेही मी म्हणत नाहीये. कारण जर एखादी व्यक्ती खरोखरच अशा रितीने समग्रपणे ‘मला फक्त ईश्वरच हवा आहे,’ असे म्हणेल तर तिचा सर्व कार्यभागच पूर्ण झालेला असतो. आवश्यकता असते ती तुमच्या अस्तित्वाच्या एखाद्या भागाने, खरंतर, तुमच्या केंद्रवर्ती संकल्पाने, ‘मला फक्त ईश्वरच हवा,’ असे अगदी खात्रीने म्हणण्याची! व्यक्तीने एकदा जरी असे प्रामाणिकपणे म्हटले असेल तर ते तेवढे पुरेसे असते. अर्थात या सर्व गोष्टींना कमी अधिक कालावधी लागतो. कधीकधी तर त्याला अनेक वर्षं लागतात पण व्यक्ती ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतेच.

• श्रीमाताजी (CWM 06 : 176–177)

तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या अभीप्सेला साहाय्यक ठरतील अशा रितीनेच रचल्या जातील. त्या तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतील म्हणजे, एकतर एखाद्या नवीन गोष्टीशी त्या तुमचा संपर्क साधून देतील किंवा तुमच्या प्रकृतीमधील जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी एखादी गोष्ट त्या काढून टाकतील. ही बाब काहीशी लक्षणीय असते.

तुम्ही खरोखरच जर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल तर, ही अभीप्सा प्रत्यक्षात येण्यासाठी अगदी प्रत्येक परिस्थिती साहाय्यभूत ठरते. सभोवतालची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणू काही एका अतिशय परिपूर्ण व असीम चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती अज्ञानामुळे कदाचित ती ओळखू शकणार नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोधही कराल, तक्रार कराल, ती परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न कराल; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि जेव्हा तुम्ही व ती घटना यांमध्ये काही कालावधी गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी तेव्हाची ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार सर्व गोष्टींची रचना करत असतो आणि ती परिस्थिती स्वीकारण्याऐवजी तुम्ही तिला प्रतिकार करत राहिलात, कितीही तक्रार करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वांत प्रभावीपणे कार्य करत असतो.

• श्रीमाताजी (CWM 06 : 176)

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान माणसं ज्यांना अगदीच नगण्य समजतात अशा अनेक व्यक्तींना ईश्वरी कृपे‌मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना किंवा फारशी मानसिक शक्ती नसताना किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना किंवा त्यांच्या व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांना एकाएकी किंवा अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते आणि त्यांनी अभीप्सा बाळगली होती.

ही आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांचा एवढा ऊहापोह का केला जातो, किंवा इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

‘सामर्थ्य’, जर ते आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती ‘प्रामाणिकपणा’मध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती त्या सगळ्यातून पार होतेच, हे मी आजवर अनेकदा सांगितले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)