(भाग ०४)
व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं आहे. पण प्रत्येक वेळी या अप्रामाणिकपणाचा उद्भव एक सारख्याच गतीविधीतून होतो — ती गतीविधी कधी इच्छांमधून उद्भवलेली असते तर, कधी व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक उद्दिष्टांसाठी जी धडपड करत असते, त्यातून उद्भवलेली असते. म्हणजे अहंभावामधून, अहंकारातून निर्माण झालेल्या मर्यादांच्या सरमिसळीतून आणि वासनांमधून उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकृतींमधून या अप्रामाणिकपणाचा उद्भव होतो.
व्यक्ती जरी प्रामाणिक बनण्याची धडपड करत असली तरीसुद्धा तिच्यामध्ये जोपर्यंत अहंकार शिल्लक असतो तोपर्यंत ‘मी पूर्णपणे प्रामाणिक आहे,’ असे ती व्यक्ती म्हणू शकत नाही. व्यक्तीने अहंकाराच्या पलीकडे जायला पाहिजे, स्वत:ला संपूर्णपणे दिव्य संकल्पाच्या (divine Will) हाती सोपविले पाहिजे, समर्पित केले पाहिजे. हातचे काहीही राखून न ठेवता आणि लाभहानीचा कोणताही विचार मनात न ठेवता हे समर्पण केले पाहिजे… तेव्हाच व्यक्ती संपूर्णतया प्रामाणिक असू शकते, तत्पूर्वी मात्र ती प्रामाणिक नसते.
अर्थात, व्यक्तीने आहे त्यापेक्षा अधिक प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करू नये, असा याचा अर्थ नाही. एखादी व्यक्ती असेही म्हणण्याची शक्यता आहे की, ‘ठीक आहे, मी माझा अहंकार नाहीसा होण्याची वाट पाहीन आणि मग प्रामाणिक होईन,’ (परंतु असे करता कामा नये.) व्यक्तीने ती सध्या जेवढी प्रामाणिक आहे त्यापेक्षा, अधिक प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. किंवा असेही म्हणता येईल की, व्यक्तीने जर प्रामाणिकपणे प्रयत्नच केला नाही, तर तिचा अहंकार कधीच नाहीसा होणार नाही.
प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच एक साध्य आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर, तुम्ही हमखास असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला व इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते.
प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे एक फल अंतर्भूत असते. आपले शुद्धिकरण झाले आहे ही भावना किंवा ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे किंवा व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे तिला मिळालेला मुक्तीचा अनुभव या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे फलित असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकपणा ही एक रूपांतरकारी शक्ती असते.
– श्रीमाताजी (CWM 08 : 399-400)
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…
प्रश्न : माताजी, प्रामाणिकपणाचा खरा अर्थ काय? श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. विचार…
उत्तमरितीने प्रशिक्षित असा रणक्षेत्रातील हत्ती, बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना…
ज्यांच्यापाशी प्रामाणिकपणा आणि तळमळ असते अशा व्यक्तींचा ईश्वर नेहमीच पाठीराखा असतो. * तुम्हाला जेव्हा…