जीवन जगण्याचे शास्त्र – ३१
सर्वसाधारणपणे माणसं ज्याला प्रेम असे संबोधतात, ते प्रेम प्राणिक भावना असणारे प्रेम असते; ते प्रेम हे (खरंतर) प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, एक प्रकारच्या अभिलाषेची ती उपजत प्रेरणा असते, तो मालकी भावनेचा आणि एकाधिकाराचा भावावेग असतो. योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीदेखील भेसळ होऊ देता कामा नये. ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे असे प्रेम असता कामा नये. (कारण) ते दिव्य प्रेम नसते.
ईश्वराबद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान (self-giving) असते, त्यामध्ये कोणतीही मागणी नसते. ते शरणभावाने आणि समर्पणाने परिपूर्ण असते. ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही. मत्सर, अभिमान वा राग अशा प्रक्षोभक भावना त्याच्या ठिकाणी आढळत नाहीत, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात.
ईश्वराभिमुख झालेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून ‘दिव्य माता’ खुद्द स्वत:लाच देऊ करते, अगदी मुक्तपणे! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते. दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना परिपूर्णत्व (perfection) आणि परिपूर्तीच्या (fulfillment) दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या कवेमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने तुमच्या अगदी जडभौतिक अंगापर्यंत तुमचा ताबा घ्यावा, अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. येथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!
व्यक्तीने जर खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि ती जर तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असणार नाही. आणि व्यक्तीने जर खरोखरच अशी अभीप्सा बाळगली तर, ती जसजशी अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतशी निश्चितपणे तिला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा-वासना यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग प्रेम ग्रहण करण्याची, धारण करण्याची तुमची जेवढी क्षमता आहे, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे, असे तुम्हाला आढळेल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…