ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

17 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago