आत्मसाक्षात्कार – ०२
आपल्यासाठी ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.
१) सर्व वस्तुंच्या व व्यक्तींच्या अंतरंगामध्ये व पाठीमागे असणारे ‘चैतन्य’ आणि ‘विश्वात्मा’ म्हणजे ‘ईश्वर’. ज्याच्यापासून आणि ज्याच्यामध्ये विश्वातील सर्वाचे आविष्करण झाले आहे तो म्हणजे ईश्वर. सद्यस्थितीत हे आविष्करण अज्ञानगत असले तरीसुद्धा ते ईश्वराचेच आविष्करण आहे.
२) आपल्या अंतरंगातील, आपल्या अस्तित्वाचा ‘स्वामी’ व ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. आपण त्याची सेवा केली पाहिजे; आपण आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला शिकले पाहिजे, तसे केल्यामुळे आपल्याला अज्ञानामधून प्रकाशाकडे उन्नत होता येईल.
३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान आणि शक्ती आहे. त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या प्रकाशाकडे आपण उन्नत झाले पाहिजे; तसेच त्याची सत्यता आपण आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उतरविली पाहिजे.
सर्वसाधारण जीवनात आपण अज्ञानामध्ये जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती (undivine forces) असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना व अचेतनेचा एक पडदा विणतात आणि त्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.
जी चेतना, ‘ईश्वर’ म्हणजे काय हे जाणते आणि त्यामध्ये जाणिवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर व सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट व्हायचे असेल तर, आपण कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या क्रियेसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे. तसे केल्याने ती दिव्य शक्ती, आपल्या चेतनेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर घडवून आणेल.
ही आहे ‘ईश्वरा’ची, ‘दिव्यत्वा’ची संकल्पना आणि तिच्यापासून आपण प्रारंभ केला पाहिजे. दिव्यत्वाच्या सत्याचा साक्षात्कार, चेतना खुली होण्याने आणि तिच्या परिवर्तनामुळेच होणे शक्य असते.
– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…