साधना, योग आणि रूपांतरण – २६४
प्राणाचे रूपांतरण
तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रथमतः तुमच्या प्राणिक अस्तित्वामधील दोषांपासून निर्धारपूर्वक, चिकाटीने सुटका करून घेतली पाहिजे. भलेही मग ते करणे कितीही अवघड असो किंवा त्याला कितीही वेळ लागो, सदासर्वकाळ ‘ईश्वरा’च्या साहाय्यासाठी आवाहन करत राहा आणि स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक होण्यासाठी नेहमी प्रवृत्त करा.
पात्र-अपात्रतेच्या बाबतीत (सांगायचे झाले तर) पूर्णयोगासाठी कोणतीच व्यक्ती पूर्णपणे सुपात्र असते असे म्हणता येणार नाही. अभीप्सा, अभ्यास, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांद्वारे व्यक्तीने स्वतःला सुपात्र बनविणे अभिप्रेत असते. तुमच्यामधील आंतरात्मिक भागाला आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनाची आस होती; मात्र तुमच्या प्राणामुळे त्यामध्ये नेहमीच आडकाठी निर्माण होत आली आहे. तुमच्या प्राणामध्ये एक प्रामाणिक इच्छा प्रस्थापित करा; वैयक्तिक इच्छावासना, मागण्या, स्वार्थीपणा आणि मिथ्यत्व या गोष्टींची सरमिसळ तुमच्या साधनेमध्ये होऊ देऊ नका. असे केलेत तरच तुमच्यामधील प्राण हा साधनेसाठी सुपात्र होईल. तुम्ही यशस्वी होऊ इच्छित असाल तर ते प्रयत्न नेहमीच अधिकाधिक विशुद्ध, अधिक स्थिर आणि चिकाटीपूर्ण झाले पाहिजेत.
तुम्ही जर प्रामाणिकपणे साधना करत राहिलात तर, आवश्यक असलेले साहाय्य तुम्हाला लाभेल. तुमच्या कर्माबाबत तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगलात तर स्वयमेव त्यातूनच तुम्हाला साहाय्य मिळेल. ‘ईश्वरा’साठी ‘ईश्वरा’र्पण भावाने कर्म करणे, त्यामध्ये फळाची कोणतीही मागणी नसणे, त्यामध्ये कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छावासना मिसळलेल्या नसणे, कोणताही दुराग्रह आणि उद्धटपणा नसणे, तुमच्या सहकाऱ्यांसोबत वादविवाद न करणे, तुम्ही करत असलेले कर्म हे तुमचे स्वतःचे नाही तर ते श्रीमाताजींचे कार्य आहे, हे लक्षात ठेवणे आणि कर्म करत असताना, त्याच्या पाठीशी त्यांची शक्ती कार्यरत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कर्माबाबत योग्य दृष्टिकोन बाळगणे होय. तुम्ही जर असे करू शकलात तर तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन होईल आणि तुमची प्रगती होईल.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 108-109)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…