अमृतवर्षा ०२
चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. प्रथम आरोहण असते; तुम्ही जडभौतिक चेतनेमधून बाहेर पडून, उच्चतर चेतनेच्या श्रेणीमध्ये स्वत:चे उन्नयन करता. निम्नतर श्रेणीमधून उच्चतर श्रेणीमध्ये होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर श्रेणीमध्ये अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता, उन्नत होता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, किंवा रूपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे तुम्ही अवतरण घडवता.
आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकींशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर या गोष्टी आता एकत्रित येऊ लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला ‘चमत्कार, चमत्कार’ असे म्हणतात ते असे घडून येतात.
विश्व हे चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्या स्तराला लागू पडत नाहीत. ‘चमत्कार’ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानकपणे घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो.
त्या परिणामाला आपण ‘चमत्कार’ म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य कक्षेमधील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.
आपल्या जडभौतिक जगामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही असामान्य घटना नाही, किंबहुना अशा घटना या नित्याच्या असू शकतात; आपल्याला त्या घटना पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.
– श्रीमाताजी [CWM 03 : 30-31]
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…