ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रत्येक कणामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’

अमृतवर्षा २७

जडद्रव्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसांना जेव्हा अंतर्यामी निवास करणाऱ्या ‘ईश्वरा’च्या विचाराची जाणीव होईल; प्रत्येक सजीवामध्ये जेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाचा काही संकेत जाणवू लागेल; प्रत्येक माणसाला जेव्हा त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वर’ दिसू लागेल तेव्हा या प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील आणि अरुणोदय होईल. कारण ”सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे कारण ती ‘ईश्वर-पुत्रां’ना (मानवांना) साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबली आहे.”

हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की, जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे.

…एखाद्या दुर्मिळ हिऱ्याप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून मार्गक्रमण केले आणि त्याला त्याचे प्रकाशमान करण्याचे व रूपांतरणाचे कार्य आपल्यामध्ये करण्यास आपण वाव दिला तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, आपल्या किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जाताना, आपल्या निर्बुद्ध अहंकाराची, तसेच आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची उरलीसुरली तटबंदी ढासळून पडताना आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंधांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत असल्याचे आपल्याला जाणवेल.

व्यक्तिगत ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कणामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’ असते आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

16 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago