विचारशलाका ३८
(श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)
समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे. ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हो, तुम्ही जर भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.
पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी तुम्ही जर स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहातो आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेतो. हो, तो मला तसे का बरे म्हणाला असेल?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही प्रयत्न करत तिथेच थांबून राहता.
दुसरा माणूस मात्र बोलतच असतो, नाही का? – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.
तो काय म्हणतो आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि मग, तुमच्याशी तो तसा का बोलत आहे, याचे तुम्हाला आकलन होते.
आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला आधी जे माहीत होते ते आणि आत्ता जे समजले ते या दोन्ही गोष्टी जर शेजारी शेजारी ठेवल्यात तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोन्हींचा समेट घडविणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.
स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.
तुम्ही जर एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे होणार नाही. त्याउलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवू शकाल. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!
– श्रीमाताजी [CWM 05 : 218-220]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…