आध्यात्मिकता ४९
‘सर्व जीवन म्हणजे योगच आहे’
०१) पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी सक्षम नसते… आणि म्हणून या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतर आणि प्रतिक्रिया यांपासून स्वतःला दूर राखणे अगदी अनिवार्य असते.
०२) सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी कोणती प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.
०३) तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.
०४) कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून त्या परिस्थितीला सामोरे जा.
०५) आणि तरीसुद्धा, तुम्ही अजून कोणती प्रगती करणे आवश्यक आहे याचा शोध घेण्यामध्ये कायम सतर्क राहा आणि तसे करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका.
०६) भौतिक घटनांच्या दर्शनी रूपावरून त्याचे मूल्य ठरवू नका. कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.
०७) एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर ती ताकद असेलच, तर तक्रार करण्याऐवजी (त्या व्यक्तीमधील ती गोष्ट) बदलून टाका.
०८) तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वतः समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका. एकदा का तुम्ही या महान शोधासाठी (चैत्य पुरुषाचा शोध) प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात.
०९) खाण्यापूर्वी काही क्षण अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य (पोषक) द्रव्य मिळावे आणि तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल, अशी भावना ठेवा.
१०) झोपी जाण्यापूर्वी काही क्षण अशी अभीप्सा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरू करू शकाल.
११) कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच नाही तर परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.
१२) जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा जे तुमच्या मुखातून बाहेर पडणे नितांत आवश्यक आहे तेवढेच बोलण्यास संमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास संमती द्या.
१३) सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे; तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर त्या परमशोधाची इच्छा असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.
१४) तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, बाह्य रूपे केवळ नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुतः जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे जीर्ण कपडे जसे टाकून द्यावेत त्याप्रमाणे असतात, याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल. आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याच्या भाराने दबून जाऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल. आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.
‘आध्यात्मिकता’ ही मालिका येथे समाप्त झाली.
– श्रीमाताजी [CWM 12 : 33-35]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…