सर्व वस्तुमात्रांमध्ये तो एकमेव आत्माच आविष्कृत झालेला असल्याने, कोणी कुरुप असो किंवा सुंदर, अपंग असो वा धडधाकट, कोणी थोर असो वा अशिष्ट, कोणी सुखद असो वा असुखद, कोणी चांगला असो वा वाईट, आपण या सर्वांबाबत आत्म्याचे समत्व बाळगले पाहिजे. येथेसुद्धा द्वेष, तिरस्कार किंवा घृणा असणार नाही, तर प्रत्येक वस्तू ही तिच्या खऱ्या वृत्तीनुसार आणि तिच्या नियोजित स्थानी आहे, हे पाहण्याची समत्व दृष्टी असली पाहिजे.
आपण हे जाणले पाहिजे की, सर्व गोष्टी अभिव्यक्त झालेल्या असो किंवा गुप्त, प्रछन्न (disguise) असोत, विकसित असोत किंवा विपर्यस्त, त्या त्यांच्यासाठी योजलेल्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये तसे दोष असणेच आवश्यक आहे किंवा त्या त्या परिस्थितीत त्यांच्या त्यांच्या परीने सर्वोत्तमरीतीने अभिव्यक्त करत आहेत. त्यांच्या नजीकच्या स्थितीमध्ये किंवा कार्यामध्ये किंवा त्यांच्या प्रकृतीच्या उत्क्रांतीमध्ये जे शक्य आहे त्या मार्गाने त्या त्यांचे कार्य करत आहेत.
‘ईश्वरा’च्या क्रमवार आविष्करणामध्ये, आजच्या वस्तुसमूहाच्या समग्रतेच्या दृष्टीने आणि अंतिम परिणामाच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने देखील, ईश्वरविषयक विशिष्ट सत्याची किंवा घटनेची किंवा काही ऊर्जेची किंवा क्षमतेची उपस्थिती आवश्यक असते. तात्कालिक अभिव्यक्तीच्या पाठीमागे असणाऱ्या ‘त्या’ सत्याचा शोध लावण्यासाठी आपण धडपडले पाहिजे. तसे केले असता, त्यांच्या बाह्य देखाव्याला न भुलता, त्याच्या अभिव्यक्तीचे कितीही विरूपीकरण झालेले असो वा त्यामध्ये कितीही अपूर्णता असो, तरीदेखील त्यांच्या मुखवट्यांच्या पलीकडे जात, त्या निष्कलंक, शुद्ध, सुंदर आणि परिपूर्ण अशा ‘ईश्वरा’ची आपण पूजा करू शकू. अर्थात, कुरूपता स्वीकारायची असा त्याचा अर्थ नाही, तर ईश्वरी सौंदर्यच स्वीकारायचे आहे; अपूर्णता पाहून स्वस्थ न बसता, आपण पूर्णतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत; आपले विश्वव्यापक उद्दिष्ट सर्वश्रेष्ठ कल्याण हेच असले पाहिजे, दुर्जनता नव्हे.
खरोखरच, हे सारे बदलायलाच हवे. परंतु हे सारे जे आपल्याला करावयाचे आहे ते आध्यात्मिक समज आणि ज्ञान यांच्या साहाय्याने केले पाहिजे. आपण दिव्य कल्याण, सौंदर्य, परिपूर्णता, आनंद यांच्या मानवी प्रमाणकांच्या पाठीमागे न जाता, त्याचे अनुसरण केले पाहिजे; आपल्यापाशी समत्व नसेल तर अज्ञान अजूनही आपला पिच्छा पुरवीत आहे, याची ती खूण आहे; आपल्यापाशी समत्व नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने काहीही समजणार नाही; आपल्यापाशी समत्व नसेल तर मग आपण जी जुनी अपूर्णता नष्ट करू, ती जणु दुसरी एक अपूर्णता निर्माण करण्यासाठीच असेल, कारण आपण दिव्य मूल्यांच्या जागी पर्याय म्हणून, आपल्या मानवी मनाच्या आणि आपल्या वासनात्म्याच्या (desire-soul) पसंतीच्या गोष्टी ठेवण्याचीच शक्यता अधिक आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 223-225)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…