ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अमर्त्यत्वाचा शोध ०४

परिस्थिती कशीही असो, तुमच्या मनाला जर त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय असेल तर तुम्हाला ती असुखकारक वाटणार नाही. ही गोष्ट सर्वज्ञात आहे की, जोपर्यंत मन एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्यास नकार देते, त्याच्या विरोधात झगडत राहते, त्याच्यात अडथळा आणू पाहते, तोपर्यंत दु:खयातना, अडचणी, वादळे, आंतरिक संघर्ष आणि सर्व दु:खभोग आहेत. पण ज्या क्षणी मन म्हणते, ”ठीक आहे, हे असे होणारच होते, हे असे व्हायलाच हवे होते,” त्यानंतर मग काहीही घडले तरी तुम्ही समाधानी असता.

अशी काही माणसं आहेत की, ज्यांनी आपल्या शरीरावर आपल्या मनाचे एवढे नियंत्रण मिळविले असते की, त्यांच्या शरीराला कोणत्याही वेदनेची जाणीव होत नाही; मागे मी तुम्हाला काही विशिष्ट गूढवाद्यांबाबत ही गोष्ट सांगितली होती : त्यांनी जर असा विचार केला की – ईश्वराशी एकत्व पावण्याचे जे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे, त्याप्रत जाण्याचे टप्पे क्षणार्धातच ओलांडण्यासाठी, त्यांच्या वाट्याला आलेले दु:खभोग हे त्यांना साहाय्यक ठरणार आहेत; आणि साक्षात्कार करून घेण्यासाठी ते पायरीच्या दगडाप्रमाणे ठरणार आहेत – तर त्यांना दु:खभोग हे दु:खभोग वाटणार नाहीत. जणू त्यांच्या देहावर मानसिक संकल्पनेचा मुलामा चढविलेला असतो!

असे बरेचदा घडलेले आहे की, ज्यांच्यापाशी खरोखरी उत्साह असतो अशांमध्ये हा अनुभव अगदी सहज असतो; परंतु सरतेशेवटी काही कारणास्तव एखाद्याला आपले हे शरीर त्यागून जर नवीन देह धारण करावा लागलाच, तर मृत्युला तिरस्करणीय पराजयाचे स्वरूप देण्याऐवजी एक भव्यदिव्य, आनंदपूर्ण, आणि उत्साहवर्धक अशी घटना बनविणे अधिक चांगले नाही काय ?

…एखादी व्यक्ती या अपघाताकडे, (मृत्युकडे) साधन या दृष्टिकोनातून पाहू शकते. ती व्यक्ती जर जागृत असेल तर ती त्याला (मृत्युला), अन्य सर्व गोष्टींप्रमाणेच एका सुंदर गोष्टीचे, एका अत्यंत सुंदर गोष्टीचे रूप देऊ शकते. आणि लक्षात ठेवा, ज्यांना मृत्युची भीती वाटत नाही, जे त्यामुळे अस्वस्थ, चिंतातुर होत नाहीत, कोणत्याही अमंगल भावनेविना जे मरण स्वीकारू शकतात; ती माणसं अशी असतात की, जी मृत्युबद्दल कधीच विचार करत नाहीत. त्याच्यापासून आपली सुटका करून घ्यायलाच हवी अशी भयानक गोष्ट बनून मृत्यू त्यांच्या पुढ्यात उभा नसतो, मृत्युच्या विचाराने ते सदासर्वकाळ ग्रासलेले नसतात. आणि मृत्युला स्वत:पासून जेवढे दूर ढकलता येईल तेवढे ढकलण्याचा प्रयत्नही ते करीत नसतात. अशी माणसं, जेव्हा मृत्यु-घटिका येते तेव्हा, छातीठोकपणे, सुहास्य वदनाने मृत्युला म्हणतात, ”ये, मी तयार आहे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

5 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago