ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आणखीही एक गोष्ट असते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार योगसाधना करत असता. तुम्हाला असे सांगण्यात आले असते की, “स्वतःला खुले करा, तुम्हाला शक्ती प्राप्त होईल.” तुम्हाला असे सांगण्यात आलेले असते की, ”श्रद्धा आणि सदिच्छा बाळगा, तुमचे संरक्षण केले जाईल.” आणि तुम्ही खरोखरच त्या चैतन्यामध्ये न्हाऊन निघता, त्या शक्तीमध्ये न्हाऊन निघता, त्या संरक्षणात न्हाऊन निघता आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्यामध्ये श्रद्धा असते, जितके तुम्ही स्वतःला खुले करता, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते सारे लाभते ; काही छोटे आंतरिक अडथळे आलेच तर, त्याचे निराकरण करण्यास, तसेच ते अडथळे आल्यानंतर, पुन्हा व्यवस्था प्रस्थापित करण्यास आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यामध्ये त्या चैतन्याची तुम्हाला मदत होते. जे छोटेमोठे आघात तुमच्यावर झाले असते किंवा कदाचित जे अपघात होऊ शकले असते त्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होते.

पण जर का तुमच्यामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किंवा अगदी प्राणामध्ये किंवा मनामध्ये, किंवा अनेक भागांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येही – ही अवतरित होणारी शक्ती ग्रहण करण्याची जर क्षमता नसेल, तर ती गोष्ट यंत्रामध्ये येणाऱ्या एखाद्या वाळूच्या कणाप्रमाणे गडबड करून जाते. सर्व काही सुरळीत चालू असणारे असे एक चांगले सुस्थितीतील यंत्र सुरु असते आणि अशावेळी तुम्ही जर त्यामध्ये एखादा वाळूचा कण टाकलात, तर अचानक सर्व काही बिघडून जाते आणि ते यंत्र थांबते. तर असा कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा अभाव असतो, येणारी शक्ती ग्रहण करण्यास कोणीतरी अक्षम असते, म्हणजे त्याने स्वतःला पूर्णपणे बंद करून घेतलेले असते (जेव्हा व्यक्ती त्याकडे पाहू लागते तेव्हा, कोठेतरी एखादा छोटासा काळा ठिपका असावा असे ते बनून जाते; दगडासारखी छोटीशी अगदी कठीण गोष्ट बनून जाते – शक्ती त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, ती गोष्ट शक्ती ग्रहण करणे नाकारते, एकतर ती करू शकत नाही किंवा ग्रहण करण्याची तिची इच्छा नसते) आणि त्यातूनच ताबडतोब एक मोठा असमतोल निर्माण होतो; आणि मग हीच गोष्ट, जी खरंतर ऊर्ध्वगामी वाटचाल करत होती, अद्भुतरित्या बहरत होती, तिला स्वतःलाच आजारी पडल्यासारखे वाटू लागते आणि याउलट जेव्हा तुम्ही अगदी सर्वसामान्य जीवन जगत असता, तेव्हा मात्र तुमचे आरोग्य उत्तम असते, सर्वकाही सुरळीत चालू असते, तक्रार करण्याजोगे काहीच नसते.

एखाद्या दिवशी तुम्ही एखादी नवीन संकल्पना समजावून घेतलेली असते, एक नवीनच आवेग निर्माण झालेला असतो, तुमच्यामध्ये जोरदार अभीप्सा असते आणि बरीच मोठी शक्ती तुम्ही ग्रहण केलेली असते आणि एखादी अद्भुत अनुभूती तुम्हाला आलेली असते, आंतरिक द्वारे खुली करणारा असा एखादा अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्यातून तुम्हाला पूर्वी नसलेले ज्ञान मिळून गेलेले असते; अशा वेळी तुम्हाला खात्री असते की, सारे काही सुरळीत चालू आहे… आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी आजारी पडलेले असता. मग तुम्ही म्हणता, “हे काय? हे असे अजूनही चालूच आहे ? हे अशक्य आहे, असे घडता कामा नये.” पण मी अगदी आत्ता सांगितले त्याप्रमाणे ती गोष्ट म्हणजे वाळूचा कण होती. असे काहीतरी होते की जे ग्रहण करू शकत नव्हते. आणि ताबडतोब त्यातूनच असंतुलितपणा येतो. जरी तो अगदी छोटासा असला तरीही मग तुम्ही आजारी पडता.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…

24 hours ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…

2 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…

3 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…

4 days ago

चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण

साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…

5 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…

6 days ago