श्रीमाताजी म्हणतात : दि. ०१ जानेवारी १९६९ रोजी मध्यरात्री दोन वाजताचा प्रहर होता… अतिमानवी चेतना पृथ्वी चेतनेमध्ये अवतरली आणि प्रस्थापित झाली. चेतना, ऊर्जा, शक्ती, प्रकाश, आनंद आणि शांती यांनी परिपूर्ण भरलेले असे ते अद्भुत अवतरण होते आणि त्याने संपूर्ण पृथ्वीचे वातावरण भरून गेले. सद्यकालीन मनोमय चेतना आणि अतिमानसिक चेतना यांच्या मधील हा एक दुवा आहे असे मला जाणवले. ही अतिमानवाची चेतना अवतरित होत होती. जी अजूनही मानवाची चेतनाच आहे परंतु अधिक विस्तृत श्रेणीतील, अधिक सामर्थ्यशाली, पण अतिमानसिक जीवामध्ये रुपांतरित झालेली नाही, अशी ही चेतना आहे. आता ही अतिमानवी चेतना पृथ्वी-चेतनेमध्ये फक्त अवतरित झालेली आहे असे नाही, तर ती तेथे प्रस्थापित झाली आहे आणि पूर्णपणे कार्यकारी झाली आहे.
(The Spirit of Auroville by Huta : 82)
*
ह्या अनुभवानंतर भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या कोणते बदल घडून आले, यासंबंधी श्रीमाताजींनी एका निकटवर्ती शिष्याकडे केलेले हे भाष्य –
‘ऊर्ध्वस्थित असणाऱ्या गोष्टी सर्वोत्तम आहेत, तिथे तुम्हाला चांगले चांगले अनुभव, तेजोमय, अद्भुत असे सगळे अनुभव येतील, पण इथे? इथे मात्र काहीच नाही,’ – ही मनाने पूर्वापार केलेली विभागणी होती. आणि मग एखादा जन्माला येतानाच ‘हे जग आशाहीन आहे’ ह्या धारणेनेच पुन्हा या जगतामध्ये जन्माला येतो.
ह्यावरूनच असे स्पष्ट होते की, यापेक्षा काही निराळे असू शकते ह्याची कल्पनादेखील ज्यांच्या मनाला शिवली नसेल अशी माणसे म्हणतात, “या जगामधून निघून जाणेच योग्य आहे….”
मला सारे काही स्पष्ट झाले ! परंतु आता ह्या घटनेमुळे, येथून सुटका करून घ्यायलाच हवी, असे ते जग अजिबात राहिले नाही. आणि हा मोठाच विजय आहे : सुटका करून घेणे यापुढे आवश्यक नाही. तुम्हाला ते जाणवते, दिसते आणि ते या देहाने स्वत:च अनुभवले आहे – ती शक्यता लवकरच, अगदी इथे देखील प्रत्यक्षात येईल, गोष्टी अधिक सत्यतर होत जातील.
असे काही आहे…. असे काही आहे की, ज्यामुळे ह्या विश्वामध्ये निश्चितपणे काहीतरी बदलले आहे.
अर्थातच, गोष्टी खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्यासाठी, काही कालावधी निश्चितच लागणार. तीच तर लढाई चालू आहे. ‘बाह्यत: काहीच बदललेले नाही’, असे सांगण्यासाठीच जणू काही प्रत्येक बाजूने, प्रत्येक पातळीवर, सर्व बाजूंनी गोष्टींचा मारा होत आहे, पण ते खरे नाही. ते खरे नाही, या शरीराला माहीत आहे की, हे खरे नाहीये.
श्रीअरविंदांनी Aphorisms मध्ये जे लिहिले आहे, तसे ते आत्ता मला दिसते आहे, ती केवढी भविष्यवाणी होती…. त्या सत्यवस्तूचे त्यांना झालेले ते दर्शन होते, ते केवढे भविष्यसूचक होते !
मला आता समजते आहे, त्यांचे महानिर्वाण आणि त्यांचे कार्य…. इतके अफाट, आणि तेही सूक्ष्म भौतिकातील कार्य, त्याची इतकी, इतकी मदत झाली आहे ना ! त्यांनी केवढी… (जणू एखादे जडद्रव्य मळत आहेत, याप्रमाणे श्रीमाताजी हाताने दर्शवितात) …गोष्टी घडविण्यासाठी केवढी मदत केली आहे, या भौतिकाची रचनाच बदलण्यासाठी केवढी तरी मदत केली आहे.
उच्चतर जगतांशी संपर्क साधण्याचा आजवर ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला, त्या सर्वांनी या ‘भौतिका’ला मात्र ते जसे आहे तसेच सोडून दिले…. म्हणूनच ही सगळी वर्षे तयारी करण्यामध्ये आणि तयारीमध्येच खर्ची पडली – स्वत:ला खुले करावयाचे आणि तयारी करावयाची – आणि हे अलीकडचे काही दिवस तर… देहाने ‘भौतिक’ दृष्ट्यासुद्धा ही नोंद घेतली आहे की, गोष्टी बदलल्या आहेत. त्यावर अजून काम व्हावे लागेल, प्रत्येक तपशीलानिशी गोष्टी प्रत्यक्षात आणाव्या लागतील, पण बदल घडून आला आहे, बदल झाला आहे.
भौतिक परिस्थितीतून सुटकाच नाही; (श्रीमाताजी मूठ घट्ट आवळून दाखवितात) ती मनुष्याला अगदी घट्ट बांधून ठेवते अशी, समजूत मन तिच्याविषयी करून घेते. ही समजूत इतकी दृढ असते की, ज्यांनी ज्यांनी उच्चतर जगतांचा जिवंत अनुभव घेतला होता, त्यांना असे वाटत होते की, जर एखाद्याला खरोखरच सत्यामध्ये जीवन जगावयाचे असेल, तर त्याने या जगापासून पळून जायला हवे, ह्या जडभौतिक जगाचा त्यागच करावयास हवा : (अशा प्रकारच्या सर्व सिद्धान्तांचा, श्रद्धांचा आधार हाच तर आहे), पण आता गोष्टी तशा उरलेल्या नाहीत. आता गोष्टी तशाच राहिलेल्या नाहीत.
जडभौतिक हे आता उच्चतर प्रकाश, सत्य, सत्यचेतना ग्रहण करण्यासाठी आणि त्याचे ‘आविष्करण’ करण्यासाठी सक्षम झाले आहे.
हे सोपे नाही, त्याला चिकाटी, इच्छाशक्तीची आवश्यकता आहे; पण एक दिवस असा येईल की, हे सारे सहज स्वाभाविक होईल. केवळ एक दरवाजा उघडायचा अवकाश – बस, इतकेच; आता आपल्याला फक्त पुढे चालून जायचे आहे.
(Conversation with a Disciple, March 14, 1970)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…