१९१४ मध्ये जेव्हा श्रीअरविंदांनी ‘आर्य’ मासिकासाठी लिखाण करावयास सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट. ते जे लिखाण करीत असत त्याला मानसिक ज्ञान किंवा मनोनिर्मिती असे म्हणता येणार नाही.

श्रीअरविंद मन निश्चल करून, टंकलेखनयंत्रासमोर बसत असत. आणि उच्च स्तरावरून जे त्यांच्यामध्ये प्रवाहित होत असे ते त्यांच्या टंकलेखन करणाऱ्या बोटांच्या माध्यमातून थेट कागदावर उमटत असे. अशा मानसिक निश्चल स्थितीमध्ये ‘आर्य’साठी ते पानेच्या पाने एकटाकी पद्धतीने टंकलिखित करीत असत.

अशा रीतीने १९१४ ते १९२१ या कालावधीत श्रीअरविंदांनी टंकलिखित केलेले सर्व प्रमुख लिखाण ‘आर्य’ या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. The Life Divine, The Human Cycle, The Ideal of Human Unity, Essays on the Gita, The Secret of the Veda, The foundation of Indian Culture ग्रंथसंपदा त्यांनी ह्याच काळात लिहिलेली आहे. ‘Synthesis of Yoga’ हा ग्रंथही ‘आर्य’ मधूनच प्रथम क्रमश: प्रकाशित झाला.

(Stories told by the Mother 11: Page 31)

*

[या काळात मीरा रिचर्ड्स (श्रीमाताजी) व त्यांचे पती पॉल रिचर्ड्स असे दोघे मिळून आर्य मासिकाच्या फ्रेंच आवृत्तीचा कार्यभार सांभाळत असत. मीरा रिचर्ड्स या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारीदेखील सांभाळत असत.]

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने शोधायचा, तो मार्ग अभीप्सेच्या (Aspiration) आधारे शोधावयास हवा; विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा यांच्या माध्यमातून शोधावयास हवा.

जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो.

अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट बनते. ती मांडणी कमी अधिक तंतोतंत असू शकते.

…ती मांडणी तुमच्यासाठी चांगली आहे, हेच केवळ महत्त्वाचे आहे. ती कशीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील जेव्हा तुम्ही ती इतरांवर लादू पाहता तेव्हाच ती मिथ्या बनते…

मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत पण प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:चा आक्रमिला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल करावयास हवी.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 407)

ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झाला आहे वा तुमची घडण झाली आहे त्याचे खरे मूल्य तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल, किंवा ज्या समाजात वा ज्या देशात तुमचा जन्म झाला आहे त्याविषयी, यथार्थदर्शी चित्र तुम्हाला हवे असेल, किंवा ज्या विशिष्ट वातावरणात तुम्ही फेकले गेला आहात आणि जेथे तुम्ही स्वत:ला जखडून घेतले आहे, ती गोष्ट किती सापेक्ष आहे, हे तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल तर, तुम्ही देशाटन करा. तेव्हा तुम्हाला आढळेल की, ज्याला तुम्ही चांगले समजता ते इतरत्र वाईट मानले जाते आणि ज्याला एका प्रांतात वाईट मानले जाते त्याचेच दुसऱ्या प्रांतात स्वागत केले जाते.

सर्व देश आणि धर्म यांची निर्मिती ही अनेक परंपरांच्या समूहांपासून झालेली आहे. सर्वच ठिकाणी तुम्हाला संतमहात्मे, शूरवीर, महान व्यक्तिमत्त्वे पाहायला मिळतात आणि त्याबरोबरच अगदी क्षुद्र, दुष्ट माणसंदेखील आढळतात. ”माझी अमुक एका धर्मामध्ये घडण झाली आहे त्यामुळे तोच खरा धर्म होय; मी अमुक एका देशामध्ये जन्माला आलो आहे त्यामुळे, माझाच देश सर्व देशांमध्ये चांगला आहे’ असे म्हणणे ही केवढी मोठी थट्टा आहे हे तुम्हाला जाणवेल. व्यक्ती आपल्या कुटुंबाविषयी देखील असाच दावा करू शकते : “अमुक एका देशामध्ये, अमुक एका ठिकाणी, शतकानुशतके राहत असलेल्या एका कुटुंबातून मी आलो आहे म्हणून त्याच्या परंपरा मला बंधनकारक आहेत, त्याच केवळ आदर्शवत आहेत.”

गोष्टी जेव्हा तुमच्यावर लादलेल्या नसतात, जेव्हा तुम्ही त्या स्वेच्छेने प्राप्त करून घेता, तेव्हाच त्या गोष्टींना तुमच्यासाठी आंतरिक मूल्य प्राप्त होते आणि तुमच्यासाठी त्या यथार्थ ठरतात. जर तुम्हाला तुमच्या खऱ्या धर्माविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या देशाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या कुटुंबाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, त्याचीसुद्धा तुम्ही निवड केली पाहिजे.

केवळ दैवयोगाने तुम्हाला जे देण्यात आले आहे, ते कोणताही प्रश्न न विचारता, जसेच्या तसे तुम्ही स्वीकारलेत तर, तुमच्यासाठी ते चांगले आहे का वाईट, तुमच्या जीवनासाठी ते योग्य आहे का नाही, ह्याची तुम्ही कधीच खात्री देऊ शकणार नाही.

ज्या कोणत्या गोष्टींमुळे तुमचे स्वाभाविक वातावरण घडते किंवा तुमची तथाकथित वंशपरंपरा निर्माण होते आणि निसर्गाच्या आंधळ्या यांत्रिक प्रक्रियेद्वारे हे वातावरण व ही वंशपरंपरा तुमच्यावर लादण्यात येते, त्या साऱ्या गोष्टींपासून दोन पावले मागे सरा; स्वत:च्या अंतरंगामध्ये शिरा आणि तेथून सर्व गोष्टींकडे शांतपणे आणि निरासक्तपणे पाहा. त्यांचे मूल्यमापन करा, मग स्वेच्छेने त्यांची निवड करा. मग तेव्हा तुम्ही आंतरिक सत्यानिशी म्हणू शकाल, ”हे माझे कुटुंब आहे, हा माझा देश आहे, हा माझा धर्म आहे.”

– श्रीमाताजी
(CWM 03 : 80-81)

धार्मिक मते आणि धार्मिक सिद्धान्त ह्या मनोनिर्मित गोष्टी असतात आणि जर तुम्ही त्यालाच चिकटून राहिलात आणि तुमच्यासाठी बनविलेल्या जीवनविषयक कायद्यांच्या चौकटीत स्वत:ला बंदिस्त करून घेतलेत तर या नियमांच्या, धर्मसिद्धान्तांच्या पलीकडे असलेल्या, व्यापक, महान, मुक्त अशा चैत्यनाचे सत्य तुम्हाला गवसू शकणार नाही. विश्वातील एकमेव सत्य असे गृहीत धरून, जेव्हा तुम्ही एखाद्या धार्मिक संप्रदायापाशीच थांबता, त्याच्याशी स्वत:ला जखडून घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात्म्याच्या विस्ताराची आणि विकासाची प्रक्रिया गमावून बसता.

पण जर तुम्ही धर्माकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, धर्म नेहमीच सगळ्या माणसांना अडथळा ठरतो असे नाही. मानवाचे उच्चतर कार्य, ह्या दृष्टीने जर तुम्ही त्याकडे पाहिलेत आणि मानवनिर्मित गोष्टींच्या अपूर्णतांकडे दुर्लक्ष न करता, त्याकडे मानवाची आकांक्षा म्हणून पाहिलेत तर आध्यात्मिक जीवनाकडे वळण्यासाठी धर्माचे तुम्हाला एकप्रकारे साहाय्यदेखील होऊ शकते.

धर्माकडे गंभीरतेने आणि उत्कट भावनेने पाहिले तर, त्यामधील सत्य काय आहे हे तुम्ही शोधून काढू शकता; त्यामध्ये कोणती आकांक्षा, अभीप्सा सुप्तपणे वसलेली आहे; कोणत्या दैवी प्रेरणेमध्ये, मानवी मन आणि मानवप्रणालीमुळे बदल होत आहेत, आणि कशाचे विरूपीकरण होत आहे हे तुम्हाला कळू शकते. योग्य अशा मानसिक भूमिकेतून बघितल्यास, धर्म त्याच्या आहे त्या स्थितीतदेखील तुमच्या मार्गावर काही प्रकाश टाकू शकतो आणि तुमच्या आध्यात्मिक प्रयासांना साहाय्य पुरवू शकतो.

प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला असे लोक आढळतात की, ज्यांची भावनिक क्षमता खूप मोठी असते आणि ते खरीखुरी, तळमळीची अभीप्सा बाळगत असतात, पण त्यांचे मन अगदी साधेसुधे असते आणि त्यांना ईश्वराकडे ज्ञानाच्या माध्यमातून जाण्याची गरज भासत नाही; अशा लोकांसाठी धर्माचा उपयोग होतो आणि त्यांच्यासाठी त्याची गरजदेखील असते. कारण बाह्य रूपांच्याद्वारा, उदाहरणार्थ चर्चमधील समारंभ इ. द्वारे त्यांच्या आंतरिक आध्यात्मिक आकांक्षेला एक प्रकारचे साहाय्य मिळते.

प्रत्येक धर्मामध्ये उच्च आध्यात्मिक जीवन ज्यांच्यामध्ये उदित झाले आहे अशा काही व्यक्ती असतात परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की, त्यांच्या धर्माने ही आध्यात्मिकता त्यांना प्रदान केलेली असते, उलट त्यांनीच त्यांच्या आध्यात्मिकतेद्वारे धर्मामध्ये भर घातलेली असते. अशा व्यक्तींना कोठेही ठेवले असते, त्यांचा जन्म कोणत्याही संप्रदायामध्ये झाला असता, तरी त्यांनी तेथेही अशाच आध्यात्मिक जीवनाचा शोध घेतला असता आणि असेच आध्यात्मिक जीवन व्यतीत केले असते. ती त्यांची स्वत:ची क्षमता असते, त्यांच्या अंतरात्म्याची ती एक प्रकारची शक्ती असते; मात्र त्यांची अशी जडणघडण धर्मामुळेच झाली आहे असा दावा धर्म करत असतो; पण वस्तुस्थिती मात्र तशी नसते. त्यांच्या प्रकृतीमधील या शक्तीमुळेच धर्म हा त्यांच्यासाठी गुलामी वा बंधन बनत नाही. एवढेच की, त्यांच्याकडे शक्तिशाली, सुस्पष्ट आणि सक्रिय मन नसल्यामुळे, त्यांना ह्या वा त्या संप्रदायाला निरपवाद सत्य म्हणून मानण्याची आणि कोणतेही विरोधी प्रश्न वा शंका मनात उठू न देता, स्वत:ला एखाद्या संप्रदायाला नि:शेषतया समर्पित करण्याची आवश्यकता भासते. मला प्रत्येक धर्मामध्ये अशा प्रकारची माणसे भेटलेली आहेत. आणि अशा लोकांच्या श्रद्धेला धक्का लावणे हा गुन्हा आहे. त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा नसतो.

परंतु जे याहूनही पुढे जाऊ शकतात, चैतन्याच्या मार्गावर जे एका विशिष्ट अंतरापर्यंत वाटचाल करू शकतात, त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा ठरतो, पण जे असे पुढे जाऊ शकत नाहीत त्याच्यांसाठी धर्म हा साहाय्यकारी ठरतो.

उत्तमोत्तम तसेच अगदी निम्न बाबींबाबत देखील धर्माचा आवेग आढळून येतो. एका बाजूला धर्माच्या नावाने तुंबळ युद्ध झाली आहेत आणि अगदी हिडीसपणे जाचदेखील झालेला आहे, पण त्याचबरोबर स्वार्थत्याग आणि सर्वोच्च धैर्यालाही तो पोषक, प्रेरक ठरलेला आहे. कोणत्या उच्चतर कृतींपर्यंत मानवी मन जाऊन पोहोचू शकते ह्याची मर्यादा तत्त्वज्ञानाप्रमाणेच धर्मानेही दाखवून दिली आहे. तुम्ही जर धर्माच्या बाह्य देहाचे गुलाम झालात तर, तुमच्यासाठी तो खोडा वा बेडी बनेल, पण जर तुम्हाला त्यांतील आंतरतत्त्व कसे उपयोगात आणावयाचे हे माहीत असेल तर चैतन्याच्या अधिराज्यामध्ये झेपावण्यासाठी धर्म ही उपयुक्त अशी उड्डाणफळी (jumping-board) बनेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 78-79)

समाजजीवनात धर्माची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते, हे लक्षात येण्याजोगे आहे. उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते. त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो, कधीकधी ह्या धर्माचे उद्दिष्ट अगदी कनिष्ठ प्रकारचे देखील असू शकते….

ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल, मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो शब्दांतदेखील सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी ते एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल. काही लोकांसाठी समाधान ही मोठी गोष्ट असते, तर काही जणांसाठी मौजमजा, चैन ही गोष्ट मोठी असते.

ह्या गोष्टी खरंतर खूप निम्न स्तरावरच्या आहेत आणि त्याला एका ध्येयाचे नाव देण्याची इच्छाही होत नाही, पण त्या गोष्टी धर्माची रूपे आहेत; त्या गोष्टी म्हणजे असे काहीतरी होय की ज्यासाठी व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन खर्ची घालावे असे वाटू शकते…. आधार म्हणून अशा गोष्टींचा वापर करून, अनेक गोष्टी मानवावर आपला प्रभाव टाकण्याची धडपड करीत असतात. माणसांमधील असुरक्षिततेची भावना, अनिश्चिततेची भावना ह्याच गोष्टींचा वापर करून, राजकीय किंवा धार्मिक समूह त्यांच्यावर प्रभाव टाकू पाहतात. ते या भावनांशी खेळू पाहतात. प्रत्येक राजकीय वा सामाजिक संकल्पना ही एखाद्या धर्माच्या मूलभूत आदर्शाची भ्रष्ट अशी अभिव्यक्ती असते. व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा, काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते. पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-356)

सामान्य जीवनामध्ये बुद्धीचे क्षेत्र ज्या परिघापर्यंत आहे तेथवर तर्कबुद्धी मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी जसे म्हटले आहे त्याप्रमाणे, सामान्य मानवी जीवनात प्राणिक आणि मानसिक कृतींवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे हेच तर्कबुद्धीचे खरेखुरे कार्य होय.

उदाहरणार्थ, जर कोणा व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि अशा वेळी जर त्या व्यक्तीने तर्कबुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या तर्कबुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहावयाचा प्रयत्न केला तर, ती व्यक्ती या सर्व गोष्टी परत सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व हालचाली संघटित करणे आणि नियमित करणे हे तर्कबुद्धीचे खरे कार्य होय.

उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत की, त्या एकमेकींच्या विरोधी आहेत; आपल्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत की, ते सिद्धान्त एकमेकांना मारक आहेत हे पाहण्यासाठी आपण तर्कबुद्धीचा आश्रय घेऊ शकतो. सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे आणि त्यापेक्षा देखील अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे, त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, तो आवेग चालवून देण्याजोगा आहे का, हे पाहण्याचे काम तर्कबुद्धीचे आहे. हे तर्कबुद्धीचे खरे कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 166-167)

पाश्चिमात्य मनाच्या दृष्टीने, नीति ही बाह्य वर्तनाची गोष्ट आहे; भारतीय मनाच्या दृष्टीने मात्र, बाह्य वर्तन हे आत्मावस्थेच्या अभिव्यक्तीचे केवळ एक साधन आहे, ते आत्मावस्थेचे केवळ एक लक्षण आहे. पालन करण्यासाठी हिंदुधर्माने नैतिक नियमांचा तक्ता, काही आदेश कधीकधी जरुर एकत्रित केलेले आढळतात, पण अधिक भर दिलेला आहे तो मनाच्या आत्मिक, नैतिक शुद्धीवर; येथे वर्तन, कृति ही केवळ आंतरिक शुद्धीचे बाह्य लक्षण आहे असे सांगितले जाते; येथे “तू हिंसा करू नकोस” असे जोरकसपणे सांगितले जाते, खूप स्पष्टपणे सांगितले जाते, पण त्याहून अधिक ठामपणे अशा एका आदेशावर भर दिला जातो की, “तू कोणाचाही द्वेष करू नकोस; लोभ, क्रोध, मत्सर या विकारांना बळी पडू नकोस.” कारण हिंसेचे मूळ या द्वेषादि विकारातच असते.

आणखी एक गोष्ट अशी की, हिंदुधर्मात सापेक्ष आदर्श मान्य करण्यात आले आहेत. परंतु युरोपीय बुद्धीला हे शहाणपण झेपणारे नाही. हिंदुधर्मात सर्वात श्रेष्ठ नियम अहिंसा हा आहे – ‘अहिंसा परमो धर्मः’ तथापि योद्ध्यासाठी मात्र हा नियम ठेवलेला नाही; शारीरिक अहिंसा त्याच्या कर्तव्यात बसत नाही; मात्र योद्ध्याने न लढणारे लोक व दुबळे, नि:शस्त्र, पराभूत झालेले लोक, कैदी, जखमी, पळणारे लोक यांजबददल दया, दाक्षिण्य व समानबुद्धी दाखवलीच पाहिजे असे हिंदुधर्म आग्रहाने सांगतो. याप्रमाणे सर्वांना एकच पूर्ण निरपवाद नियम ठेवण्यात जी अव्यावहारिकता असते, ती अव्यावहारिकता हिंदुधर्म टाळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 149)

योगाचा अर्थ

 

श्रीमाताजींनी एका लहान मुलाला योगाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एका चित्राचे रेखाटन केले आहे.

खालील बाजूस माणूस दर्शविला आहे आणि वरील बाजूस ईश्वर आहे.

नागमोडी वळणे असलेली रेषा ही सामान्य जीवनमार्गाचे प्रतीक आहे तर, मधोमध असलेली सरळ रेषा हे योगमार्गाचे प्रतीक आहे.

(Stories told by the Mother : Part II)

प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला आमचे असे सांगणे आहे की, “जर तुमची मने युरोपियन कल्पनांनी भारलेली असतील, जर तुम्ही आपल्या जीवनाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहत असाल, तर वरील ध्येये तुम्ही स्वत:पुढे ठेवू शकणार नाही….

आपल्या पूर्वजांचा वारसा परत मिळवा. आर्य विचार, आर्य प्रणाली, आर्य शील व आर्य जीवन पुन्हा संपादन करा. वेदान्त, गीता, योग ह्या गोष्टी पुनश्च प्राप्त करून घ्या. केवळ बुद्धीने अथवा भावनेने नव्हे, तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनात त्या संपादन करा, त्यांचे आचरण करा. म्हणजे तुम्ही थोर, समर्थ, बलाढ्य, अजिंक्य आणि निर्भय व्हाल. जगण्याची किंवा मरणाची भीती तुम्हाला वाटणार नाही. अडचण आणि अशक्य हे शब्द तुमच्या शब्दकोषात राहणार नाहीत. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते, ते शाश्वत असते. बाह्य साम्राज्य मिळविण्यापूर्वी हे तुमचे आत्मसाम्राज्य, आंतरिक स्वराज्य तुम्ही प्रथम परत मिळवा.

तुमचे अंतरंग हे मातृदेवतेचे निवासस्थान आहे. तिने तुम्हाला सामर्थ्य प्रदान करावे म्हणून तुम्ही तिची प्रार्थना करावी यासाठी ती वाट पाहत आहे. तिच्यावर निष्ठा ठेवा, तिची सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा तिच्या इच्छेशी एकरूप करा. तुमचा वेगळा राहिलेला अहं राष्ट्राच्या अहंमध्ये विलीन करून टाका. तुमचा विभक्त स्वार्थ मानवजातीच्या सेवेत विलीन होऊ द्या. तुमच्या अंत:करणातील सर्व सामर्थ्याचा मूळ स्रोत हस्तगत करून घ्या. म्हणजे मग सामाजिक दृढता, बौद्धिक श्रेष्ठत्व, राजकीय स्वातंत्र्य, मानवी विचारांचे स्वामित्व, जगाचे नेतृत्व सर्वकाही तुम्हाला प्रदान केले जाईल”

-श्रीअरविंद
(CWSA 08 : 24-28)

जो जो कोणी श्रेष्ठता प्रकट करण्याचा संकल्प करील, एकामागून एक डोंगर चढत ईश्वरी शिखर गाठण्यास पुढे सरसावेल तो ‘आर्य’ होय. त्याला भीतीचा लवलेशही कधी स्पर्श करीत नाही. परागती वा अपयश त्याला आपल्या ध्येयमार्गापासून विचलित करू शकत नाहीत. जो कोणी ह्याची निवड करतो, जो कोणी दिव्यत्वाची शिखरे एका पाठोपाठ एक सर करण्याचा यत्न करतो, जो कशासही घाबरत नाही, पिछेहाट किंवा पराजयाने ज्याची गती अवरूद्ध होत नाही, स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या खूप पलीकडे, अति व्यापक आहे म्हणून त्या व्यापकतेपासून, विशालतेपासून जो अंग चोरून घेत नाही, स्वत:च्या जीवाच्या मानाने एखादी गोष्ट खूप उच्च पातळीवर आहे असे पाहून जो त्या उंचीमुळे दडपून जात नाही, स्वत:च्या शक्तीच्या आणि धैर्याच्या मानाने एखादी गोष्ट खूपच महान आहे म्हणून त्या महानतेपासून जो दूर पळत नाही, तो आर्य होय; तो दिव्य योद्धा आणि विजेता, उदात्त मानव आहे, तो उच्चकुलीन, श्रेष्ठ, गीतेत वर्णिलेला ‘श्रेष्ठ’ आहे.

आर्य ह्या शब्दाचा मूळ अर्थ प्रयत्न, उत्थान आणि विजय असा आहे. मानवी प्रगतीच्या विरूद्ध येणाऱ्या सर्व आंतरिक प्रवृत्ती व बाह्य परिस्थिती ह्यांविरुद्ध लढून त्यांच्यावर जो विजय मिळवतो तो आर्य! ‘आत्मविजय’ हा त्याच्या प्रकृतीचा पहिला कायदा आहे. तो पृथ्वी व शरीर ह्यांवर विजय मिळवितो आणि अन्य सामान्य माणसांप्रमाणे आळस, प्रमाद, चाकोरी इत्यादी तामसिक मर्यादांमध्ये राहण्यास आपल्या शरीरास संमती देत नाही. नाना इच्छा, भुका व अन्य रजोगुणात्मक वासना ह्यांच्या गुलामीत तो आपले जीवन वा जीवनशक्ती जखडू देत नाही. तो मनोविजय प्राप्त करतो. तो मन आणि त्याच्या सवयी यांच्यावर मात करतो. तो अज्ञान, परंपरागत पूर्वग्रह, रुढीबद्ध कल्पना, सुखद मते यांच्या कवचामध्ये राहत नाही; तर ठाम आणि दृढ अशी इच्छाशक्ती स्वत:कडे असूनदेखील, बुद्धि विशाल आणि लवचीक कशी बनेल ह्याचा तो शोध घेत असतो, निवड करीत असतो. प्रत्येक गोष्टीत तो सत्याचा वेध घेत असतो, प्रत्येक गोष्टीतील योग्य, प्रत्येक गोष्टीतील सर्वोच्च आणि स्वातंत्र्य यांचा तो शोध घेत असतो.

आत्मसिद्धी हे त्याच्या आत्मविजयाचे ध्येय असते. तो ज्या ज्या गोष्टीवर विजय संपादन करतो ती ती गोष्ट तो नष्ट करीत नाही; तर तिला उदात्तता व पूर्णता प्राप्त करून देतो. शरीर, प्राण व मन ही साधने आहेत आणि त्या साधनांच्या अतीत असणाऱ्या उच्चतर गोष्टींच्या प्राप्तीसाठी ती आपणास देण्यात आली आहेत, हे तो जाणतो; आणि त्यामुळे त्यांच्यावर मात करून, त्यांच्या अतीत जाणेच आवश्यक आहे, त्यांच्या मर्यादा नाकारणेच आवश्यक आहे, त्यांची पुष्टीतुष्टी करण्यातील मग्नता टाळणेच आवश्यक आहे, हे तो जाणतो. भलेही कनिष्ठ जीवनाने ह्या शोधकावर, साधकावर काही अटी, मर्यादा लादलेल्या असल्या तरी, एकदा का ही परमोच्च अवस्था त्याने प्राप्त करून घेतली की, त्याने काय करणे अपेक्षित आहे हे तो जाणतो.

परमोच्च अवस्था म्हणजे या जगातून निघून जाणे, नाहीसे होणे नव्हे तर, ईश्वरी संकल्प, चेतना, प्रेम, सौंदर्य जे ह्या शोधकाद्वारे, साधकाद्वारे ओसंडून बाहेर पडू पाहते, त्या साऱ्याची चढत्यावाढत्या प्रमाणामध्ये त्याने अभिव्यक्ती करणे; सभोवती असणाऱ्यांपैकी जे कोणी स्वीकारक्षम आहेत त्यांच्यावर त्या साऱ्याचा वर्षाव करणे. आर्य हा त्या परमोच्च शक्तीचा सेवक, भक्त, उपासक व साधक असतो. आत्मसिद्धी प्राप्त झाल्यावर आपल्या सर्व कर्मातून अखिल मानवजातीवर तो प्रेम, आनंद व ज्ञान ह्यांचा वर्षाव करीत राहतो. कारण आर्य हा सदैवच एक कर्मयोगी व योद्धा असतो. परमेश्वराची प्राप्ती व सेवा ह्यांमध्ये कोणत्याही अडचणीस तो जुमानत नाही वा थकल्यामुळे त्याच्या कामात कधी मंदपणा येत नाही. त्याच्या जीवनांत मनाशी व जगाशी अंतर्बाह्य युद्ध करण्याचा प्रसंग सदैवच हजर असतो. तो आपले स्वराज्य व साम्राज्य सदैव स्थापन करीत व वाढवीत असतो. स्वत:च्या आतल्या स्वराज्यासाठी आणि बाहेरील साम्राज्यासाठी तो सदैव झुंज देत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 442-443)