चित्शक्ती ही दोन घटकांनी बनलेली असते; स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य.

सजगता ही पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुम्ही वस्तुंबाबत योग्य जाणीव राखत, योग्य प्रकारे जागरुक राहिले पाहिजे, त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे, पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही. तर ती जाणीव प्रभावी ठरण्यासाठी त्यासोबत संकल्प आणि सामर्थ्य असणे आवश्यक आहे.

कोणता बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, ह्याबाबतीत कदाचित एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल, परंतु तो बदल घडवून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. किंवा दुसऱ्या एखाद्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असू शकेल परंतु, योग्य जागरुकतेच्या अभावी ती इच्छाशक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने कशी वापरावयाची हे समजण्यास तो असमर्थ असू शकेल.

तुम्ही चैत्य जाणिवेमध्ये (Psychic Consciousness) असल्याचा फायदा असा की, तुमच्याकडे योग्य ती जाणीव असते आणि तुमची इच्छा ही श्रीमाताजींच्या इच्छेशी सुसंगत असल्याने, तुम्ही योग्य ते परिवर्तन घडून यावे म्हणून श्रीमाताजींच्या शक्ती-सामर्थ्याचा धावा करू शकता.

पण मन आणि प्राण यांमध्येच ज्या व्यक्ती जगत असतात, अशा व्यक्ती मात्र हे करू शकत नाहीत; अशा व्यक्तींना जास्त करून वैयक्तिक प्रयत्न करणे भाग पडते. तसेच त्यांच्यामध्ये जागरुकता व इच्छा आणि मनाचे व प्राणाचे सामर्थ्य हे विभाजित व सदोष असते; त्यामुळे केलेले कार्यही सदोष असते व ते सर्वोत्तमही असत नाही. केवळ अतिमानसामध्येच जाणीव, इच्छा वा संकल्प, शक्ती ह्या नेहमीच एकत्वाने कार्यरत असतात आणि म्हणून त्या स्वाभाविकपणेच अधिक प्रभावशाली असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 24-25)

चेतना म्हणजे केवळ स्वत:बद्दलची किंवा वस्तुमात्रांबाबतची जाणीव शक्ती नव्हे; तर ती एक गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा आहे. किंवा तिच्याकडे गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते. ती तिच्या प्रतिक्रिया ठरवू शकते किंवा या प्रतिक्रियांपासून स्वत:ला वेगळी राखू शकते; ती शक्तींना फक्त प्रतिक्रियाच देते असे नाही, तर ती या शक्ती निर्माण करू शकते किंवा स्वत:मधून शक्तींना बाहेरही काढू शकते.

चेतना म्हणजे फक्त चित नाही, तर चित्शक्तीदेखील आहे. चेतनेचा संबंध हा सहसा मनाशी जोडला जातो, पण मानसिक जाणीव ही अशी एक मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा मानवाची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते.

मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन, अधोमानसिक किंवा अधिमानसिक, अतिमानसिक अशा भासतात.

-श्रीअरविंद
(CWSA 28 : 15-16)

चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते तेव्हाही ती तेथेच असते. वरवर पाहता ती दिसत नाही, किंवा बाह्य गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, त्यांविषयी ती जागृत नाही असे वाटत असले तरीही ती तेथे असते; अंतरंगामध्ये ती अंतर्मुख पद्धतीने, क्रियाशील किंवा निष्क्रिय स्वरूपात असते; तिचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटत असते; किंवा आपल्याला तिचे अस्तित्व अगदी अचेतन किंवा निर्जीव असे भासत असते तरीही ही चेतना तेथे असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 15)

योग म्हणजे आपली जाणीव उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे जेणेकरून, आपल्या सामान्य जाणिवेच्या आणि आपल्या सामान्य प्रकृतीच्या अतीत असणाऱ्या गोष्टींसाठी ती सक्षम होईल.

योग म्हणजे आंतरिक सखोलतेशी, वर असणाऱ्या उत्तुंगतेशी, आपल्या अतीत असणाऱ्या व्यापकतेशी संपर्क; त्यांच्या महान प्रभावाप्रत, महान अस्त्वितांप्रत, त्यांच्या हालचालीबाबत खुले असणे म्हणजे योग. किंवा योग म्हणजे आपल्या पृष्ठवर्ती जाणिवेमध्ये आणि आपल्या अस्तित्वामध्ये त्यांचा स्वीकार करणे; ज्यामुळे आपल्या ‘सामान्य मी’ नसलेल्या अशा आत्म्याद्वारे आपल्या बाह्य अस्तित्वाचे परिवर्तन होईल, आपल्या अस्तित्वाला तो आत्मा कवळून घेईल आणि त्या आत्म्याचे सुशासन आपल्या बाह्य अस्तित्वावरदेखील चालू लागेल.

आपण ज्या सद्वस्तुचा शोध घेऊ इच्छितो ती आपल्या पृष्ठभागावर असत नाही किंवा जर ती सद्वस्तू तिथे असलीच तर ती अवगुंठित (Concealed) असते. आपल्या आवाक्यात असलेल्या जाणिवेपेक्षा अधिक गहनतर, उच्चतर किंवा व्यापकतर जाणीवच तेथे पोहोचू शकते, त्या सद्वस्तुला स्पर्श करू शकते, त्या सद्वस्तुचे ज्ञान करून घेऊ शकते आणि त्या सद्वस्तुला प्राप्त करून घेऊ शकते. आपण आपल्या सामान्य जाणिवेच्या आतमध्ये, तेथे काय आहे हे शोधण्यासाठी, बुडी मारली तरी त्या सद्वस्तुच्या केवळ अंशभागामध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 327-328)

योग हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून व्यक्ती वस्तुमात्रांमागील सत्याशी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त जाणिवेकडून आंतरिक आणि सत्य जाणिवेप्रत घेऊन जाण्यात येते.

योग-चेतना (Yogic Consciousness) ही बाह्य व्यक्त विश्वाचे ज्ञान वगळत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती विश्वाकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्यात्कारी अनुभवही घेत नाही. योग-चेतना आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात बदल घडविते. आणि त्याला सद्वस्तुचा कायदा लागू करते; प्राणिमात्रांच्या अज्ञानी कायद्याच्या जागी ईश्वरी संकल्प आणि ज्ञानाचा नियम प्रस्थापित करते.

जाणिवेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 327)

आपण जर प्राचीन ग्रंथ अभ्यासले तर ‘जाग्रत अवस्था’ (Waking State) म्हणजे भौतिक विश्वाची जाणीव असल्याचे आपल्या लक्षात येईल. सर्वसाधारणपणे भौतिक मनाची हुकमत असलेल्या आपल्या देहधारी अस्तित्वामध्ये ही जाणीव असते.

‘स्वप्नावस्था’ (Dream State) म्हणजे भौतिक पातळीच्या मागे असणाऱ्या सूक्ष्म प्राणिक व सूक्ष्म मानसिक पातळ्यांशी संवादी असलेली जाणीव होय; या सूक्ष्म पातळ्यांबाबतचे संकेत जरी आपल्याला मिळाले तरीदेखील, आपल्याला भौतिक अस्तित्वातील गोष्टी जेवढ्या खऱ्या वाटतात तेवढ्या या पातळ्या खऱ्या आहेत असे वाटत नाही.

‘सुषुप्तावस्था’ (Sleep State) म्हणजे विज्ञानसदृश (The Gnosis) असणाऱ्या अतिमानसिक पातळीशी संवादी असलेली जाणीव होय; ही जाणीव आपल्या अनुभवाच्या पलीकडे आहे; कारण, आपले कारणशरीर (Causal Body) किंवा विज्ञानकोश (Envelope of Gnosis) आपल्यामध्ये विकसित झालेला नाही; त्याच्या शक्ती आपल्यामध्ये सक्रिय झालेल्या नाहीत; त्यामुळे, या अतिमानसिक पातळीच्या अनुषंगाने पाहता, आपली सद्यस्थिती ही गाढ स्वप्नरहित झोपेत असल्यासारखीच आहे.

या अवस्थांच्या पलीकडे जी ‘तुरिया’ अवस्था आहे, ती म्हणजे आपल्या शुद्ध आत्मिक अस्तित्वाची जाणीव किंवा आपल्या पूर्ण चरमअस्तित्वाची जाणीव होय. जरी कधीकधी आपल्याला जाग्रत अवस्थेत, किंवा स्वप्नावस्थेत त्याची मनोमय प्रतिबिंब दिसली, किंवा जागे झाल्यावर न आठवणारी अशी मनोमय प्रतिबिंब सुषुप्तावस्थेत जरी दिसली तरी; असे असूनदेखील त्या आत्मिक अस्तित्वाशी आपला थेट संबंध मुळीच असत नाही.

जिच्या साहाय्याने चढून आपण परत, परमात्म्याप्रत पोहोचतो अशी आपल्या अस्तित्वाची जी शिडी आहे, तिच्या पायऱ्यांशी संवादी अशी ही चतुर्विध श्रेणी आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 520)

कोणीतरी मला एका आठ वर्षाच्या मुलीने फ्रेंचमध्ये लिहिलेले पुस्तक आणून दिले.(त्या मुलीचे नाव मिनू डुओट) आठ वर्षाच्या मुलीच्या मानाने ते पुस्तक खरंच खूप विलक्षण आहे. त्या पुस्तकात खूप चांगली चांगली वाक्यं तिने लिहिली आहेत. उदा. चेहऱ्यावर वांग (गोऱ्या रंगावर दिसणारे तपकिरी ठिपके) असलेल्या एका मुलाविषयी ती लिहिते, “तू खूप सुंदर आहेस, तुझ्या चेहऱ्यावरील वांगसुद्धा छान आहेत, जणू काही कोणी देवदूताने तुझ्या चेहऱ्यावर गव्हाचे दाणे पेरले आहेत, ज्यामुळे आकाशातील पक्षी आकर्षित व्हावेत.” खरंच, हे खूप काव्यमय आहे. (श्रीमाताजींनी अशीच उदाहरणे पुढेही दिली.)

ही सारी उदाहरणे पाहून मला मेटरलिंकची (नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक) आठवण येते. ज्या प्रतिभावान साहित्यिकांनी त्यांचे सारे आयुष्यच या साहित्यिक कामासाठी वाहिलेले असते, त्यांच्यामध्ये एक सुव्यवस्थित मानसिक अस्तित्व तयार होते, या अस्तित्वाला स्वत:चे असे जीवन असते; असे साहित्यिक जेव्हा निधन पावतात तेव्हाही हे मानसिक अस्तित्व स्वतंत्रपणे, स्वायत्तपणे शिल्लक राहते; त्याला अभिव्यक्त होण्याची सवय असल्याने ते आविष्कारासाठी इतरत्र माध्यम शोधते.

आणि त्याचवेळी जर असे एखादे मूल असेल की, जे अनुकूल अशा परिस्थितीत जन्माला आले असेल, जसे की येथे त्या मुलीची आई कवयित्री आहे; कदाचित तिची अशी इच्छा असेल की, तिचे मूल असे असामान्य असावे; अशावेळी ते मानसिक अस्तित्व या बाळाच्या जन्माच्यावेळी त्यामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वत:ला अभिव्यक्त करावयाचा प्रयत्न करते. आणि मग अशा वेळी, त्या बालकामध्ये अशी मानसिक परिपक्वता, अशा असामान्य गोष्टी करण्याच्या क्षमता येतात. या मुलीमध्ये मेटरलिंकच्या मानसिक अस्तित्वाचा पुनर्जन्म झाला आहे आणि त्याद्वारे तो अभिव्यक्त होत आहे असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 08:316-318)

प्रश्न : व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिची जाणीव ही जागेपणी असलेल्या जाणिवेपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते?

श्रीमाताजी : ती भिन्न असल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नाही का? तुमची शारीरिक जाणीव किंवा तुमची सूक्ष्म शारीरिक जाणीव, तुमची प्राणिक जाणीव किंवा तुमच्यामधील कनिष्ठ किंवा उच्चतर प्राणिक जाणीव, तुमची चैत्य जाणीव, तुमची मानसिक जाणीव, ह्या सगळ्या एकमेकींपासून पूर्णत: भिन्न आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा एक जाणीव असते आणि जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा वेगळीच जाणीव असते.

तुम्ही जागे असता तेव्हा गोष्टी तुमच्या बाहेर प्रक्षेपित झालेल्या तुम्ही पाहता, तर निद्रावस्थेत त्याच गोष्टी तुम्ही अंतरंगात पाहता. म्हणजे जागे असताना, तुम्हाला जणू बाहेर धाडण्यात आलेले असते आणि तुम्ही त्याकडे समोरून पाहता आणि निद्रावस्थेत तुम्ही स्वत:कडेच आंतरिक आरशामध्ये पाहता. व्यक्तीने जाणिवांच्या स्थितीमध्ये फरक करावयास शिकले पाहिजे अन्यथा व्यक्ती कायमच गोंधळलेली राहील.

वास्तविक, ही योगमार्गावरील पहिली पायरी आहे, ही धाग्याची सुरुवात आहे. जर व्यक्तीने हा धागा शेवटपर्यंत पकडून ठेवला नाही तर, व्यक्ती वाट चुकण्याची शक्यता असते. तेव्हा तो धागा शेवटपर्यंत पकडून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

-श्रीमाताजी
(CWM 07 : 131)

येथे दोन गोष्टी विचारात घ्यायला हव्या : जाणीव आणि ही जाणीव ज्या माध्यमांमधून व्यक्त होते ती साधने.

त्या साधनांचा विचार करू : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.

प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली आहे. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून आधीपेक्षाही अधिक सुंदर असे काही करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनही काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत जाणीव एकसारखीच आहे पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 40)

प्रश्न : चेतना म्हणजे काय?

श्रीमाताजी : अनेक स्पष्टीकरणांपैकी एकाची निवड करावयाचा मी प्रयत्न करते. गंमतीदाखल म्हणायचे तर, अचेतनेच्या विरोधी जी असते ती चेतना. दुसरे एक स्पष्टीकरण…

विश्वाचे सृजनात्मक सत्त्व म्हणजे चेतना. चेतनेविना हे ब्रह्मांड नाही; कारण चेतना म्हणजे उत्पत्ती. चेतना म्हणजे जे आहे ते सर्व. कारण चेतनेविना काहीच नाही – हे उत्तम स्पष्टीकरण आहे. चेतनेविना जीवन नाही, प्रकाश नाही, उत्पत्ती नाही, सृष्टी नाही, ब्रह्मांड नाही. चेतना ही सर्व निर्मितीचे मूळ आहे. चेतना नाही तर निर्मिती नाही, सृष्टी नाही.

आपण ज्याला ‘जाणीव’ असे संबोधतो तिचा परमोच्च चेतनेशी फारच दूरान्वयाने संबंध आहे, त्यामध्ये कोणताही नेमकेपणा, निश्चितपणा नाही. जर म्हणावयाचेच झाले तर ते प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल; पण ते मूळ चेतनेचे यथार्थ किंवा शुद्ध प्रतिबिंब नव्हे. ज्याला आपण आपली जाणीव असे म्हणतो ती म्हणजे मूळ चेतनेचे व्यक्तिरूप आरशामध्ये पडलेले धूसर असे प्रतिबिंब आहे. (कधी धूसर तर कधी विरूप.) ह्या प्रतिबिंबाच्या आधारे, सावकाशपणे मागे जात जात, जे प्रतिबिंबित झाले आहे त्याच्या मुळाशी, उगमाशी आपण गेलो तर आपण त्या सत्य चेतनेच्या संपर्कात येऊ शकतो.

आणि एकदा का आपण त्या सत्य-चेतनेच्या संपर्कात आलो की, मग आपल्याला जाणीव होते की, ती सत्य-चेतना सर्वत्र सारखीच आहे, केवळ विरूपीकरणामुळे तिच्यामध्ये भेद उत्पन्न होतात. जर विरूपीकरण नसेल तर सर्वकाही त्या एकाच आणि एकमेव चेतनेमध्ये सामावलेले आहे. म्हणजेच असे की, या विपर्यासातून, विपर्यास करणाऱ्या आरशातील प्रतिबिंबातूनच चेतनेमधील विभिन्नता आणि भेदाभेद निर्माण होतात, अन्यथा ती एकच एक अशी चेतना आहे. पण व्यक्ती ह्या साऱ्या गोष्टी फक्त अनुभवानेच जाणू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 233-34)