आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू काही समुद्रात उडी मारल्याप्रमाणे दिव्यत्वामध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर ती केवळ सुरुवात असते. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला दिव्यत्वामध्ये जीवन जगता आले पाहिजे. तुम्ही ते कसे करू शकता? “मी कोठे पडेन? नंतर माझे काय होईल?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहते. पण तुम्ही स्वत:ला जाऊ दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि जर तुम्ही सगळा वेळ असाच विचार करीत बसलात,”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा दगड असेल इ..” तर तुम्ही कधीच उडी घेऊ शकणार नाही.

पण अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला हवा आणि तुम्हाला त्याविषयी काही माहिती हवी त्याप्रमाणेच तुम्हाला दिव्य सद्वस्तूचे आधी थोडे का होईना दर्शन घडलेले असावे. हे दर्शन म्हणजे सहसा चैत्य जाणिवेची जागृती असते. भले त्या दिव्य सद्वस्तूशी अगदी खोलवरचा चैत्यमय वा संपूर्ण संपर्क प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील किमान एक सुस्पष्ट असा मानसिक वा प्राणिक साक्षात्कार तरी तुम्हाला झालेला असला पाहिजे. तुम्हाला सुस्पष्टपणे तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर ईश्वरी उपस्थितीची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला दिव्य विश्वाचा श्वास जाणवला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध अशा या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दाब तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडेल. जर तुम्हाला तसा अनुभव असेल तर तुम्ही केवळ त्या दिव्य सद्वस्तूमध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करावयाचे आहे. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी करावयास हवे. ही उडी तुम्हाला मारावयाची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे योगसाधना करीत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही ह्याची शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि आध्यात्मिक जीवनाची खराखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 21-22)

कधीकधी असेही होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पावलाने देखील तिची पुढे प्रगती होत नाही. असेही घडते की, एखादी व्यक्ती धर्माची अगदी उत्कट भक्त असू शकते पण तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झाले नाही. अशी ही काही माणसं आहेत की, जी अगदी साधीसुधी कामे करायची, उदा. चांभाराने जुन्या चपलाबूट शिवणे इ. आणि त्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला होता. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा अनुभव वगैरे गोष्टी या खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी आहे, इतकेच काय ते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ईश्वराशी एकत्त्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ईश्वरामध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एकच वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही तत्त्वज्ञानाचे आख्खे पुस्तक वाचूनही काही उपयोग होत नाही. पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी गौण असतात.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण या गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे. जेव्हा एखाद्याला असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे त्याला विरोध करत आहे ते त्याने शोधून काढावयास हवे; आणि मग आवश्यक ती प्रगती करावयास हवी. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा, तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जडवादी असतात पण हे सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो सत्य आहे – तो खरा आहे, कारण ती एकमेवाद्वितीय अशी वस्तुस्थिती आहे. व्यक्ती काय बोलते ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 26-27)

प्रश्न : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आपण बाळगली पाहिजे का?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे.

कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून कमीअधिक काल्पनिक आणि भ्रामक अनुभवांची दारे उघडू शकतात, उच्च गोष्टींचे रूप धारण करणाऱ्या प्राणिक कृतींची दारे उघडू शकतात. त्याद्वारे व्यक्ती स्वत:चीच फसवणूक करून घेऊ शकते.

वस्तुत: आध्यात्मिक अनुभव हे सहजस्फूर्तपणे यावयास हवेत, आंतरिक प्रगतीचा परिणाम म्हणून यावयास हवेत, पण केवळ अनुभवासाठी अनुभव अशा पद्धतीने ते यावयास नकोत.

*

आध्यात्मिक अनुभव म्हणजे स्वत:मधील किंवा बाहेरील, ईश्वराच्या संपर्कात येणे. हा अनुभव सर्व देशांमध्ये, सर्व माणसांमध्ये, सर्व काळामध्ये सारखाच असतो.

जर तुम्ही ईश्वराला भेटलात तर ईश्वर तुम्हाला नेहमीच सर्वत्र सारख्याच प्रकारे भेटतो. परंतु फरक पडत असेल तर त्याचे कारण असे की, आलेला अनुभव आणि त्याची शब्दांत मांडणी यामध्ये एक खोल दरी असते. तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव येतो आणि तो तुमच्या बाह्य चेतनेमध्ये शब्दांकित होतो. तुमचे शिक्षण, तुमची श्रद्धा, तुमच्या मानसिक वृत्तीप्रवृती यानुसार तो शब्दांकित होतो.

केवळ एकच सत्य, एकच वास्तव अस्तित्वात आहे, पण ते सत्य, ते वास्तव ज्या रूपांमधून अभिव्यक्त होते ती रूपे अनंत आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 432) (CWM 03 : 17)

बडोद्यामध्ये आल्यानंतरही श्रीअरविंदांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेटाऱ्यातील पुस्तके ते वाचत असत. श्रीअरविंदांना बंगाली शिकविणारे जे शिक्षक होते ते सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तासन्तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले जरी गेले असते तरी त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”

इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करीत असत.

श्रीअरविंदांच्या एका मित्राने ही हकिकत सांगितली आहे : “श्रीअरविंद कॉलेजमधून परतले आणि आल्या आल्या लगेच तेथे पडलेले एक पुस्तक उघडून त्यांनी वाचायला सुरुवात केली. तेव्हा तेथे आम्ही सर्व मित्र बुद्धिबळाचा डाव मांडून जोरजोराने हसतखिदळत बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने श्रीअरविंदांनी पुस्तक वाचून संपविले. आम्ही त्यांना असे करताना बरेचदा बघितले होते. ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात की, केवळ वरवर चाळतात हे आम्हाला बरेच दिवसांपासून जाणून घ्यायचे होते. आत्ता ती कसोटी घेण्याची वेळ आली. आमच्यातील एकाने पुस्तकातील एक ओळ वाचून दाखविली आणि नंतर त्यापुढची ओळ कोणती असे श्रीअरविंदांना विचारले. श्रीअरविंदांनी क्षणभर मन एकाग्र केले आणि नंतर ती ओळ ज्या पानावर होती त्या पानावरील संपूर्ण मजकूर, एकही चूक न करता जसाच्या तसा सांगितला. जर ते अशा प्रकारे अर्ध्या तासात शंभरेक पाने वाचू शकत असतील तर त्यांनी अल्पावधीतच त्या पेटाऱ्यातील सगळी पुस्तके वाचून संपवली ह्यात नवल ते काय?”

(Sri Aurobindo or The Adventure of Consciousness)

प्रश्न : आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे येऊ शकतात?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव ही एक अशी गोष्ट असते की, ज्यामुळे तुम्ही नेहमी ज्या चेतनावस्थेत वावरत असता त्यापेक्षा अधिकउच्च अशा चेतनावस्थेशी तुमचा संपर्क येतो. तुम्हाला स्वत:विषयी काहीतरी एक भावना असते, भले तुम्ही त्याविषयी जागृतही नसाल, ती तुमची सामान्य स्थिती असते, ती तुम्हाला माहीत असते. पण जर तुम्हाला तुमच्या अंतरंगातील काही वेगळ्या आणि अधिक उच्च अशा चेतनेची एकाएकी जाणीव झाली तर ती काही का असेना, तरीही तो एक आध्यात्मिक अनुभव असेल.

तुम्ही मानसिक कल्पनेद्वारे त्याची मांडणी कराल किंवा करणार नाही; तुम्ही ते स्वत:लाच स्पष्ट करून सांगाल किंवा सांगणारही नाही, ते उत्स्फूर्त असू शकते. पण जेव्हा हा जाणिवेमधील अनिवार्य असा फरक तुम्हाला जाणवतो, त्याचा परिणाम म्हणून, काही अधिक उच्च, अधिक स्पष्ट, अधिक शुद्ध असे काही जाणवते तेव्हा त्याला आध्यात्मिक अनुभव म्हणता येते. म्हणजेच असे की, अशा हजारो वेगवेगळ्या गोष्टी आहेत की, ज्याला आध्यात्मिक अनुभव असे म्हणता येते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 432)

….नैतिकता ही अशी ताठर, कृत्रिम स्वरूपाची असते आणि त्यामुळेच ती तिच्या तत्त्वांबाबत आणि तिच्या कार्यपद्धतीबाबत आध्यात्मिक जीवनाच्या विरोधी असते. आध्यात्मिक जीवन सर्वांमध्ये असलेले एकच तत्त्व उघड करते पण त्याचबरोबर त्याची अगणित विविधताही ते उघड करते; ते एकतेतील विविधतेसाठी आणि त्या विविधतेतील पूर्णत्वासाठी कार्य करते.

नैतिकता मात्र या जीवनाच्या विविधतेच्या आणि आत्मस्वातंत्र्याच्या विरोधी असणारे असे एक कृत्रिम जीवनमान उचलून धरते. ती काहीतरी मानसिक, ठरीव, मर्यादित असे तयार करते आणि सर्वांना त्याला मान्यता द्यावयास लावते. सर्वांनी समानच गुण आणि समानच आदर्श प्रकृती आत्मसात करावी, त्यासाठीच सर्वांनी धडपडावे असे तिला वाटते. नैतिकता ही काही दैवी नाही किंवा त्यामध्ये ईश्वरी असेदेखील काही नाही; ती मानवी असते, माणसासाठी असते. चांगल्या आणि वाईटामध्ये निश्चित असा भेद आहे असे समजून, तोच मूलभूत घटक आहे असे नैतिकता मानून चालते. पण ही एक स्वैर कल्पना आहे. ती सापेक्ष अशा काही गोष्टी घेते आणि त्या निरपवाद आहेत असे मानून दुसऱ्यांवर लादू पाहते; हे चांगले आणि हे वाईट याबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. नैतिकतेची संकल्पना पुढे जाऊन असेही सांगते की, काही वासना चांगल्या असतात आणि काही वासना वाईट असतात. आणि त्यातील चांगल्या स्वीकाराव्यात आणि दुसऱ्या नाकाराव्यात असेही ही नैतिक संकल्पना सांगते.

पण आध्यात्मिक जीवनाची मात्र अशी मागणी असते की, वासना मग त्या कोणत्याही प्रकारच्या असोत तुम्ही त्या अव्हेरल्याच पाहिजेत. जे तुम्हाला ईश्वरापासून दूर घेऊन जाते अशी सर्व प्रकारची स्पंदने तुम्ही दूर सारलीच पाहिजेत, असा त्याचा कायदा असतो. वासना वाईट आहेत म्हणून तुम्ही त्या नाकारल्या पाहिजेत असे नव्हे, कारण त्या इतरांसाठी वा एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्याही ठरू शकतात. पण वासना म्हणजे असे आवेग वा शक्ती असतात, ज्या प्रकाशहीन आणि अज्ञानी असल्याने, दिव्यत्वाकडे चालू असलेल्या तुमच्या वाटचालीमध्ये त्या अडसर बनून उभ्या ठाकतात. सर्व प्रकारच्या इच्छावासना, मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या ह्याच वर्णनामध्ये बसतात कारण, वासना ह्या मुळातच अप्रकाशमान अशा प्राणिक जीवांकडून आणि त्यांच्या अज्ञानातून उदय पावतात.

दुसऱ्या बाजूने, ज्यांच्यामुळे तुम्ही ईश्वराच्या संपर्कामध्ये येऊ शकाल अशा सर्व कृती तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत. त्या चांगल्या आहेत म्हणून, तुम्ही त्या स्वीकाराव्यात असे नव्हे तर, त्या तुम्हाला ईश्वराप्रत घेऊन जातात म्हणून, तुम्ही त्या स्वीकारावयास हव्यात. ईश्वराप्रत जे काही तुम्हाला घेऊन जाते त्याचा स्वीकार करा आणि जे त्यापासून तुम्हाला दूर नेते त्या सगळ्या गोष्टींना नकार द्या. पण ह्या गोष्टी चांगल्या आहेत किंवा ह्या वाईट आहेत असे म्हणू नका आणि तुमचा दृष्टिकोन इतरांवर लादण्याचाही प्रयत्न करू नका. कारण ज्या गोष्टीला तुम्ही वाईट असे संबोधता तीच गोष्ट तुमच्या शेजाऱ्यासाठी, की जो दिव्य जीवनाची अनुभूती यावी म्हणून प्रयत्नशील असेलच असे नाही, त्याच्यासाठी ती गोष्ट चांगलीही असू शकेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 118-119)

धार्मिक आणि आध्यात्मिक शिकवण यामध्ये गल्लत करता कामा नये. धार्मिक शिकवण ही भूतकाळाशी संबंधित असते आणि प्रगतीस विराम देते. आध्यात्मिक शिकवण ही भविष्याची शिकवण असते, त्यामुळे चेतना उजळून निघते आणि भावी काळातील साक्षात्कारासाठी तयारी करून देते. आध्यात्मिक शिकवण ही सर्व धर्मांतीत असते आणि वैश्विक सत्याच्या दिशेने शर्थीचे प्रयत्न करते. ही शिकवण दिव्यत्वाशी थेट नाते निर्माण करण्यास शिकविते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 120)

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये – दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याची व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची – प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)

“सत्य-प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. अतिमानस ही अट्टहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, पुष्कळ काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.” – श्रीअरविंद

प्रश्न : माताजी, असे येथे का म्हटले आहे? “खाली ओढणे, खेचणे” ही अनेक जणांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसं घाईत असतात आणि त्यांना लगेचच फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, त्यांनी अतिमानस खाली उतरविले आहे – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: त्याचे पर्यवसान त्यांना वेडाबावळा, मूर्ख बनविण्यात होते. बहुतेक वेळा, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हेच घडते. असे प्राणिक व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व हा मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकाचक, दिखाऊ असा खेळ उभा करते. आणि तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला खेचले होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

जेव्हा तुम्हाला खरंच ईश्वराचा, सत्य-प्रकाशाचा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्या सत्य प्रकाशाशी तुमचा संबंध निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही तो प्रकाश, प्राणिक प्रकाशाहून वेगळेपणाने ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो चकाकणारा प्रकाश कसा कृत्रिम आहे, हे समजू शकते. जणू काही तो रंगमंचावरील कृत्रिम प्रकाशाचा खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरेजन त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही सत्यप्रकाश पाहिलेला असतो, त्या सत्याशी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्याकडे फक्त पाहता, आणि हसता. ती भोंदूगिरी असते, फसवेगिरी असते, पण ती फसवेगिरी आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महारंगमंचच असतो – तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ काय ते माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला ते नको आहे.”

जेव्हा तुम्ही खेचता, शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते….लाखातूनच एखाद्या बाबतीत असे घडते की, त्याने खरंच सद्वस्तु खाली खेचलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, तो तयार झालेला होता. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे असे काहीतरी, ते त्या वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती सद्वस्तु नव्हे.

खेचणे ही अहंमन्य प्रतिक्रिया आहे. ते अभीप्सेचे विकृत रूप होय. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे, आत्मदान समाविष्ट असते तर खेचण्यामध्ये, ओढण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना – अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नाही, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार!

– श्रीमाताजी
(CWM 11 :22-23)

प्रश्न : एखाद्याला जर कोणत्या एका गोष्टीची माहिती हवी असेल, किंवा कोणाला मार्गदर्शन हवे असेल किंवा इतर काही, तर त्याच्या त्याच्या गरजेनुसार, त्या त्या व्यक्तीने ती गोष्ट, ईश्वराकडून कशी प्राप्त करून घ्यावी?

श्रीमाताजी : ईश्वराकडे त्याची मागणी करूनसुद्धा जर तुम्ही त्याची याचनाच केली नाहीत, तर ती तुम्हाला कशी मिळेल? तुम्ही ईश्वराकडे वळलात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवलात आणि त्याच्याकडे याचना केलीत तर, आवश्यक असलेली गोष्ट तुम्हाला निश्चितपणे मिळेल – अर्थात् तुम्हाला जी गोष्ट गरजेची आहे अशी तुमची कल्पना असेल ती नव्हे तर, खरोखरीच तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. परंतु त्या गोष्टीची तुम्ही त्याच्याकडे याचना केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मन:पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आधी स्वत:हूनच एखादी गोष्ट मिळविण्याचे इतर मार्ग अवलंबायचे, धडपड करायची आणि नंतर मग मात्र ईश्वराकडून अपेक्षा बाळगायची की, त्याने तुम्हाला ती द्यावी, आणि तीसुद्धा तुम्ही ती त्याच्याकडे न मागता; असे करता कामा नये.

खरे म्हणजे, दुसऱ्यांकडून जेव्हा तुम्हाला काही हवे असते, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते मागता, आणि ईश्वराच्या बाबतीत मात्र तुम्ही त्याच्याकडे काही न मागता, त्याने ते तुम्हाला द्यावे अशी त्याच्याकडून अपेक्षा का बाळगता?

सामान्य चेतनेच्या स्तरावर मात्र ही प्रक्रिया याउलट घडते. तुम्ही काहीतरी गृहीत धरता आणि म्हणता, “मला अमुक एका गोष्टीची गरज आहे, मला ह्या नात्याची आवश्यकता आहे, मला हे प्रेम, ही ममता हवी आहे, मला हे ज्ञान हवे आहे इ.इ. आणि ईश्वराने ते मला द्यायलाच हवे, नाहीतर तो ईश्वरच नाही” म्हणजेच असे की, तुम्ही समस्या पूर्णपणे उलट करून टाकता.

सर्वात प्रथम तुम्ही म्हणता, “मला गरज आहे.” पण त्या गोष्टीची तुम्हाला खरोखरीच गरज असते का? की, तशी तुमच्या मनात काहीतरी अस्फुट कल्पना असते? की, ती केवळ एक वासना असते? की, ती खरोखरच एक अज्ञानी हालचाल असते? तुम्हाला ह्याविषयी खरंच जाण असते का? पहिला मुद्दा असा की, तुम्हाला त्याविषयी काहीच माहीत नसते.

दुसरा मुद्दा हा की, खरंतर तुम्ही तुमचीच इच्छा ईश्वरावर लादू पाहत असता आणि त्याला म्हणत असता, “मला ह्याची आवश्यकता आहे. परंतु, “मला ते दे”, अशी याचनासुद्धा तुम्ही त्याच्याजवळ करत नाही. तुम्ही म्हणता, “मला ते हवे आहे. आणि ज्याअर्थी मला अमुक एक गोष्ट हवी आहे, त्याअर्थी मला ती मिळालीच पाहिजे, अगदी स्वाभाविकपणे, सहजपणे मला ती मिळालीच पाहिजे, मला जे हवे ते देणे, हे ईश्वराचे कामच आहे.”

पण जेव्हा असे घडते तेव्हा, तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, हे तुम्हाला माहीत नसते. तो केवळ तुमच्या मनाचा खेळ असतो, आणि त्यात काही तथ्य नसते आणि त्या देवघेवीमध्येही, तुम्ही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या जीवनाकडून मिळावी अशी अपेक्षा बाळगता आणि त्या ईश्वराकडे वळतसुद्धा नाही, त्याच्यामध्ये व तुमच्यामध्ये कोणतेही नाते निर्माण करत नाही, त्याचा क्षणभरही विचार करत नाही, किंवा तुमच्या दृष्टिकोनात थोडीफारसुद्धा मन:पूर्वकता बाळगत नाही. आणि तुम्ही त्या ईश्वराकडे काहीच मागितलेले नसते त्यामुळे, त्याने तुम्हाला देण्याचे काही कारणच उरत नाही. पण जर तुम्ही ईश्वराकडे याचना केलीत, तर तो ईश्वरच असल्यामुळे, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे त्याला अधिक चांगले कळत असते आणि त्यामुळे तो ते तुम्हाला देईलच.

आणि तरीही जर तुम्ही हट्ट धराल आणि तुमची इच्छा त्याच्यावर लादू पहाल, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आणि खरोखरीच तुम्हाला त्या गोष्टीची काही गरज नव्हती, हे दाखवून देण्यासाठी तो तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट कदाचित देईलही. पण नंतर तुम्ही तक्रार करू लागता आणि तुम्ही म्हणू लागता की, “ईश्वराने मला त्रास होईल अशी गोष्ट का दिली?” पण तेव्हा तुम्ही हे पूर्णपणे विसरलेले असता, की ती गोष्ट तुम्हीच मागितलेली होती.

दोन्ही बाबतीत, कसेही असले, तरी तुम्ही तक्रारच करता. तुम्ही जे काही मागितले असेल, ते त्याने तुम्हाला दिले आणि त्यामुळे तुम्हाला उपयोग होण्याऐवजी अपायच झाला, तरी तुम्ही तक्रार करता आणि त्याने ते तुम्हाला दिले नाही तरी, तुम्ही तक्रारच करता. “हे काय ! मी त्याला सांगितले, की मला याची गरज आहे आणि तरी तो मला ते देत का नाही?” दोन्ही बाबतीत तुम्ही तक्रारच करता आणि बिचाऱ्या ईश्वरालाच दोषी ठरवता.

या सर्व गोष्टींपेक्षा, तुमच्या ठिकाणी जीवनाचे परम सत्य शोधून काढण्याची अभीप्सा असेल, उत्कंठा असेल, तीव्र, आर्त इच्छा असेल, ज्याला साधारणत: तुम्ही स्पष्टपणे तुमच्या जीवनाचे सारभूत सत्य समजता, वस्तुजाताचे मूळ उगमस्थान, सर्वोत्तम हितकारक अशी बाब समजता, आपल्या सर्व इच्छांवरील समाधान मानता, आपल्या सर्व समस्यांवरील उपाय मानता, त्याविषयी तीव्र निकड तुम्हाला भासत असेल, ते प्राप्त करून घेण्याची अभीप्सा तुम्ही बाळगत असाल, तर त्यानंतर तुम्ही ईश्वराला असे कधीच म्हणणार नाही, की “मला हे दे, मला ते दे.” किंवा “याची मला गरज आहे, ते मला मिळालेच पाहिजे.” तुम्ही त्याला अशी विनवणी कराल की, “माझ्यासाठी जे गरजेचे आहे ते तू कर आणि माझ्या अस्तित्वाच्या सत्याप्रत तू मला घेऊन चल; हे ईश्वरा, तुझ्या परमप्रज्ञेला जे दिसते की, अमुक एक गोष्ट माझ्यासाठी आवश्यक आहे, ती तू मला प्रदान कर.”

त्यानंतर मात्र, मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही, ह्याची तुम्हाला खात्री असेल. आणि ईश्वरही मग तुम्हाला अपायकारक असे काही तुम्हाला देणार नाही.

पुष्कळ धडपड केल्यानंतर, पुष्कळ चुका केल्यानंतर, बऱ्यापैकी दुःखकष्ट सहन केल्यानंतर, आणि खूप नाऊमेद झाल्यानंतर, मग सरतेशेवटी कधीतरी, एखादी व्यक्ती शहाणी, समजदार बनायला सुरुवात होते आणि स्तंभित होऊन, अकुंठित होऊन, जाणू पाहते की, ह्या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? म्हणजेच असे की, स्वत:च्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा एखाद्याला काही तरणोपायच नसतो का? आणि तेव्हा मग, त्या क्षणी ती व्यक्ती बाहू फैलावून असे म्हणू शकते की, “ही मी इथे आहे, माझा स्वीकार कर; मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल.”

मग सारे काही सुरळीत व्हायला सुरुवात होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 121-124)